गडहिंग्लज : रोटरी क्लब गडहिंग्लज, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघ आणि डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्ररोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले. पोलिस, होमगार्ड आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी हे विशेष शिबिर झाले.
गडहिंग्लज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष दीपक मांगले यांनी उपस्थितांचे स्वागत करत शिबिराचा हेतू स्पष्ट केला.
दीपक मांगले म्हणाले, रोटरी क्लब ही जगातील सर्वात जुनी आणि सर्वाधिक सामाजिक कार्य करणारी संघटना आहे. स्वखर्चाने जनतेच्या सेवेसाठी ते अखंड कार्यरत असतात. पोलिस खाते हे सतत तणावाखाली असणारे खाते आहे. मुख्यतः त्यांच्या आरोग्याची काळजी आम्ही घेणार आहोत.



सिंदकर म्हणाले, पोलिसही प्रथम माणूस आहे ही भावना दाखवणाऱ्या रोटरी क्लब आणि पत्रकार संघाचे मनापासून आभार मानतो. असेच सामाजिक उपक्रम राबवून समाजाप्रती सद्भावना निर्माण करता हे खूपच उल्लेखनीय कार्य आहे.
यावेळी उपस्थित पोलिस, पत्रकार आणि रुग्णालयातील महिला शक्तीचाही सन्मान करण्यात आला. दिवसभरात एकूण ६५ पोलिस बांधवांची तपासणी पूर्ण झाली. पोलिस उपअधिक्षक रामदास इंगवले यांनी उपक्रमात सहभागी होत शिबिराला शुभेच्छा दिल्या.

रोटरी क्लबचे सचिव धनाजी कल्याणकर, सचिन घुगरे, सचिन शेंडगे, सुधाकर गवळी, श्रीकांत कळसकर, भूषण सावळे, पत्रकार नितीन मोरे, सुरेश खोत, विजयकुमार कांबळे, संभाजी जाधव, अमित कांबळे, धनंजय शेटके, निकिता पोवार, अमित गुरव यांच्यासह मोठ्या संख्येने पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. डॉ. किशोर घेवडे यांनी आभार मानले.