Kolhapur Airport: कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी कोल्हापुरात या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
कोल्हापूर :
Kolhapur Airport: कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. ही मागणी लवकरच पूर्ण करण्यात येणार असून विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. पत्रकार परिषदेला खासदार धनंजय महाडिक, खासदार अपराजिता सारंगी, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, महिला जिल्हाध्यक्ष शौमिका महाडिक उपस्थित होते.
छत्रपती राजाराम महाराज यांनी सर्वप्रथम कोल्हापुरात विमानतळ बांधले. त्यामुळे आधुनिकीकरण केलेल्या कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र याकडे अनेकदा दुर्लक्ष करण्यात आले. मात्र आता सातत्याने पाठपुरावा केल्याने ही मागणी लवकरच पूर्ण होईल, असे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, काल मी कोल्हापूर विमानतळाच्या नवीन टर्मिनसच्या इमारतीची पाहणी केली. दिवाळीपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असून प्रत्येक गोष्टीची एक प्रक्रिया आहे. त्यानुसार मला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झाला आहे. ते आमच्या कार्यालयाकडून मंजूर केले जाईल आणि आता केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडले जाईल. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया राबविली जाईल, असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले आहे.
‘नऊ वर्षांत दुप्पट विमानतळ बांधले’
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे गेले दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण होत असल्याने गेल्या नऊ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात कसा बदल झाला आहे, हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम सध्या केंद्रीय मंत्री करत आहेत. यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन गेल्या नऊ वर्षांत केलेल्या विकासकामांची माहिती दिली.