आजरा -: ( हसन तकीलदार ) :- वन्य प्राण्यामुळे शेतकऱ्यांना निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात तसेच वन्य प्राणी हल्लेग्रस्ताना विलंब न करता तातडीने भरपाई द्यावी या मुख्य मागणीसह भागातील इतर अनेक प्रश्न घेऊन बहुजन मुक्ती पार्टीने एक दिवशीय आंदोलन केले. या आंदोलनाची पूर्वसूचना वनपरिक्षेत्र अधिकारी यांना पत्र देऊन बहुजन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिलेली होती, तरीही वनपरिक्षेत्र अधिकारी आजरा या आंदोलनाला उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून वनपाल शकील मुजावर व भरत निकम यांना पाठवले होते. त्यामुळे बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचा जोरदार निषेध केला. यावेळी बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना फोनवरून त्यांच्या अनुपस्थितीबद्दल खड्या शब्दात जाब विचारला. याशिवाय दोन्ही उपस्थित वनपालांनाही बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी धारेवर धरले.
बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी सक्षम अधिकारी नसल्यामुळे पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा उपवनसंरक्षक यांच्याशी चर्चा करण्याचा आग्रह केला, त्याशिवाय आम्ही आंदोलन स्थगित करणार नाही असे घोषित केले.
“तालुक्याची कमिटी बनवून कोल्हापूरला जाऊन जिल्हा उपसंरक्षकांची भेट घेऊया”, अशी भूमिका वनविभागाच्या वतीने मांडण्यात आली. परंतु या भूमिकेला बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला व जिल्हा उपवनसंरक्षकांनी आजऱ्यामध्ये येऊन येथील शेतकऱ्यांची भेट घेतली पाहिजे ही इच्छा व्यक्त केली. कारण गव्यांचे हल्ले आजऱ्यामध्ये होत आहेत, येथील शेतकऱ्यांना त्याचा त्रास होत आहे त्यामुळे उपवनसंरक्षक यांनी आजरा मध्ये येणेच संयुक्तिक होईल, असे प्रतिपादन बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केले.
यानंतर जिल्हा उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांच्याशी बोलल्यानंतर 26 जून 2025 रोजी वनविभाग व बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांची समोरासमोर चर्चा घडवून आणली जाणार आहे असे उपस्थित वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसे रितसर पत्र वनविभागाने बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्द केले. तसे पत्र प्राप्त झाल्यानंतर बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
परंतु यानंतर बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पुढील शृंखलाबद्ध आंदोलनाचे निवेदन सुद्धा लागलीच वनपरिक्षेत्र अधिकारी तथा तहसीलदार यांना सुपूर्द केले. जोपर्यंत वन्य प्राण्यांमुळे निर्माण झालेल्या समस्यांचा प्रश्न कायमचा सुटत नाही तोपर्यंत आंदोलन कधीही मागे घेतले जाणार नाही असा इशारा बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी डॉ. उल्हास त्रिरत्ने, डॉ. सुदाम हरेर, ॲड. विद्या त्रिरत्ने, किरण केके, राहुल मोरे, अमित सुळेकर, दशरथ सोनुले, संदीप दाभिलकर, काशिनाथ मोरे, शिवाजी गुरव, मसणू सुतार, द्वारका कांबळे, नाहिदा महागोंडे, नाझिया शेख, नितीन राऊत, सूर्यकांत कांबळे,झूल्पीकार शेख,दत्तराज पाटील, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
Youtube लिंक
https://youtube.com/@linkmarathi-news?si=gxRWKqmw6V24xhxH
- व्हॉट्सॲप चॅनल
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
फेसबुक पेज लिंक
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
लिंक मराठी वेबसाईट
www.linkmarathi.com
वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून ‘लिंक मराठी Live’ चे ताजे अपडेट्स पाहू शकता.
Follow Us | आमचं अनुसरण करा:
[ Whatsapp Chanel ] [Facebook Page ] [YouTube]
*Follow Us*

मुख्यसंपादक