आजरा(हसन तकीलदार):-हिरण्यकेशी नदी काठावर असलेला रामतीर्थ धबधबा आजरा शहरापासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर आहे. पावसाळ्यात या धबधब्याला बहर येतो आणि ऑगस्ट ते डिसेंबर या महिन्यात धबधब्याचे दृश्य मनाला मोहून टाकते. आता तर हिरण्यकेशीच्या वरच्या बाजूला प्रकल्प झाले असल्याने हा धबधबा अखंड प्रवाहीत असतो. वेंगुर्ला, सावंतवाडी येथून कोल्हापूर, पुण्याला जाण्यासाठी बसेस आंबोली घाटमार्गे आजऱ्यावरून जातात.
रामतीर्थ परिसराचे विलोभनीय, विहंगम दृश्य पर्यटकांना आकर्षित करीत आहे. शुद्ध हवा, निसर्गाचा सहवास आणि निर्मळ वाहणारी नदी त्यामुळे शुद्ध निसर्गाचा आस्वाद येथे घेता येते.


महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आजऱ्याचा रामतीर्थ धबधबा हा ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा आहे. कारण भगवान राम वनवासात असताना येथे राहिले होते असे मानले जाते. या धबधब्याचे नाव या अख्यायिकेवरून ठेवण्यात आले आहे आणि ते एक पवित्र स्थळ मानले जाते. आजरा तालुक्यातील पर्यटन स्थळामधील रामतीर्थ हे महत्वाचे स्थळ आहे. रामतीर्थवरील धबधबा प्रसिद्ध असून हा धबधबा पाहण्यासाठी,त्याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक या परिसरात येतात. दरवर्षी शेकडो पर्यटक या स्थळाला भेट देतात. मोठ मोठाले काळे तांबूस पाषाण आणि हिरव्या गर्द झाडीतून वाहणारी हिरण्यकेशी नदी, धबधब्यातून कोसळणारे पांढरेशुभ्र पाणी, नदीकाठची हिरवीगर्द झाडी यामुळे या ठिकाणचे सौंदर्य अतुलनीय आणि विलोभनीय आहे. या ठिकाणी भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे ऑगस्ट ते डिसेंबर या पावसाळ्यानंतरचा हाच काळ तुम्ही धबधब्याचे अपरिमित सौंदर्य निहारू शकता. महादेव मंदिरातील नंदी, श्रीरामाचे, भगवान हनुमान, दत्ताचे, भगवान शिव मंदिर हे या ठिकाणातील पवित्र मंदिरे आहेत. मंदिरासमोर असलेले रामतीर्थ कुंड व रामतीर्थ धबधबा हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेने येथे पर्यटकांची आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वर्दळ कायम असते. मंदिरात रामनवमी, दसरा, दीपावली, हनुमान जयंती, दत्त जयंती आदि वार्षिक उत्सव साजरे केले जातात. या “क” वर्ग पर्यटनस्थळी काही प्रमाणात रॅम्प व किरकोळ कामे झाली असली तरी प्राथमिक सुविधांचा आभावच आहे. यात्रीनिवासी स्थळामध्ये सुधारणा, स्वछता गृहांची देखभाल यासारख्या सुविधामध्ये वाढ करून आणखीन पर्यटकांना आकर्षित केले जाऊ शकते.

धबधब्याजवळच मंदिरासमोर कित्येक वर्षाचे देवचाफ्याचे एक झाड होते. बालपणीच्या आठवणी या झाडाशी जुळले होते. यावर्षीच्या पावसात या झाडाचा बळी गेला. आजही ते झाड तसेच पडून आहे. लुप्त होणाऱ्या निसर्गाच्या ठेव्यातील एक ठेवा धारातीर्थ झाल्यामुळे मनात हळहळ निर्माण झाली. अशा दुर्मिळ वनसंपदेला जपणे काळाची गरज आहे. त्यामुळे यापरिसरात अशा प्रकारच्या दुर्मिळ आणि निसर्गपूरक वनसंपदा वाढवणे गरजेचे आहे आणि यासाठी वनविभागाने जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असे वनप्रेमिंचे मत आहे.
🟢 दैनंदिन अपडेट्ससाठी खास निमंत्रण!
आपणास महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेची माहिती आणि इतर उपयोगी अपडेट्स दररोज मिळाव्यात, यासाठी आजच खालीलपैकी कोणत्याही पर्यायामध्ये सामील व्हा:
📌 WhatsApp Group – नियमित अपडेट्ससाठी
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
व्हाट्सअप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
You Tube लिंक 👇
https://youtube.com/@linkmarathi-news?si=4ycB0yncq6Xs8asH

मुख्यसंपादक



