Homeमुक्त- व्यासपीठMother Day Special | आई फक्त आईच असते..

Mother Day Special | आई फक्त आईच असते..

आई फक्त आईच असते..
कावेरीचे लग्न चार दिवसांवर आले होते!घरात खूपच धुमधाम सुरू होती.
कावेरीच्या आई अब्बांची तर अक्षरशः धुमश्चक्री सुरू होती.
कावेरीचे कपडे, तिच्या इतर वस्तू यांचे एकीकडे पॅकिंग सुरू होते.
कावेरीची धाकटी बहीण सुरैय्या तर तिला चिकटूनच बसली होती. कावेरीच्या बरोबरीने सुरैय्याला पण मेंदी लावली जात होती. घरात मिठाई बनवायला स्पेशल हलवाई बोलावला होता एकीकडे त्याची गडबड सुरू होती.
कावेरीची अमिनाभाभी आणि शमीम भैया यांची पण खूप धावपळ सुरू होती.लग्न जरी अगदी साधेपणाने
करायचे असे ठरवले असले तरीही दोन्हीकडची मिळून शंभरेक माणसे लग्नाला जमलीच असती. इतक्या माणसांची रहाण्या जेवण्याची सोय करायची तर गडबड तर होणारच ना !
कावेरीची अम्मी सईदा आणि तिची जवळची मैत्रिण एकीकडे बुंदीचे लाडू वळत होत्या आणि एकीकडे भूतकाळात रमल्या होत्या .
चौदा वर्षांपूर्वी घडलेल्या घटना अगदी काल घडल्यासारख्या सईदाबेगमला आठवत होत्या.त्यांच्या एका शेतात राजमणी नावाचा एक मजूर कामाला होता. अतिशय प्रामाणिक माणूस!आपण बरे आपले काम बरे अशी त्यांची वृत्ती होती.काम संपले की इतर मजूरांसारखा तो दारुच्या गुत्त्यावर जात नसे तर कधी रेल्वे प्लॅटफॉर्मवर हमाली करायला कधी शेतातल्या भाज्या, फळे विकायला तो जात असे.चार पैसे गाठीशी जमले की तो मुलीला शाळेत पाठवणार होता. आपल्यासारखे जगणे आपल्या मुलीच्या वाट्याला येऊ नये असे त्याला फार वाटायचे . त्याच्या घरात त्याची बायको आणि लहान मुलगी होती. पैशाची चणचण असूनही तिघांचे आयुष्य छान सुरू होते.बायकोही राजमणीला हातभार लावायचा म्हणून शेतात मजूरीवर काम करायची.त्यांची छोटी जवळपास कुठेतरी खेळत असायची.
सहा वर्षांची झाल्यावर छोटी शाळेत जाऊ लागली. छानसा युनिफॉर्म घातलेल्या,अगदी ऐटीत शाळेत जाणाऱ्या आपल्या लेकीकडे पाहून‌ राजमणीचा उर आनंदाने आणि अभिमानाने भरलेला होता.
पण देवाला त्याचा आनंद फार दिवस बघवला नाही. शेतात काम करताना साप चावल्याचे निमित्त झाले आणि त्याची बायको त्याला आणि त्यांच्या लेकीला पोरके करून गेली.राजमणी खूपच दुःखी कष्टी झाला. त्याला जगण्यात काही राम वाटेना. सईदाबेगम आणि अब्दुलमियांनी
त्याची खूप समजूत काढली. मुलीकडे बघ ,तिला मोठं कर.तिला आता तुझ्याशिवाय कोण आहे?असे समजावून त्याला पुन्हा उभारी दिली.
आईवेगळी पोरही लवकर समजूतदार झाली. बाबाला घरात मदत करू लागली. सईदाबेगम पण तिला अधूनमधून काही खाऊ पाठवत असत. छोटी त्यांच्याकडे खेळायला पण जात असे. अब्दुलमिया मालक असले तरी कधीही मालकाचा रुबाब दाखवत नसत. सगळ्यांशीच प्रेमाने वागत असत. त्यांनाही या छोटीचा लळा लागला होता.
ती छोटी हळूहळू मोठी होऊ लागली होती. ती दहा वर्षांची झाली. पाचवीत जाऊ लागली. राजमणी आताशा सावरला होता. एके दिवशी शेतात काम करताना त्याच्या छातीत कळ आली. डॉक्टरी उपाय करण्याच्या आधीच राजमणीचा मृत्यू झाला. आणि दहा वर्षांची छोटी पूर्णपणे पोरकी झाली.
राजमणी दूर गावावरून या गावात कामाच्या शोधात आला होता.गावात त्यांचे कोणीच नातेवाईक नव्हते. त्याच्या नातेवाईकांचा शोध लावण्याचा अब्दुल मियांनी खूप प्रयत्न केला. छोटीच्या आत्याचा पत्ता मिळाला तिच्याकडे छोटीला न्यावे असे अब्दुलमियांनी ठरवले पण आधीच हलाखीची परिस्थिती असल्याने आत्याने छोटीची जबाबदारी स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली. आता छोटीचे काय करायचे हे अब्दुलमियांना कळेना. तिला अनाथाश्रमात सोडायचे हे काही त्यांना आणि सईदा बेगमना पटेना. शेवटी त्यांनी दोघांनी मिळून छोटीला आपल्या घरी तिचे आपल्या मुलीसारखे पालन पोषण करायचे ठरवले.
गावातल्या अनेकांना हे काही फारसे पटले नाही. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे विरोध करायचा प्रयत्न केला.
दोन धर्मांमध्ये तेढ येईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. शेवटी निवाड्यासाठी गावपंचायत बोलावली गेली. या सगळ्यापासून दूर ती छोटी कावेरी सईदा बेगमच्या कुशीत निवांत झोपली होती.
सईदा बेगमना जेव्हा छोटीवरून गावात गडबड सुरू आहे हे कळले तेव्हा त्या फार अस्वस्थ झाल्या. आईबाबाविना पोरक्या मुलीचे काय होणार हा प्रश्न होताच पण त्याहीपेक्षा जास्त त्यांना छोटीचा खूप लळा लागला होता. मनोमन त्यांनी तिला आपली मुलगी मानले होते.आपल्या दोन मुलात ही तिसरी अशीच त्यांची धारणा होती.खरेतर तिचा धर्म कोणताही असता तरी त्यांनी तेच केले असते.
अब्दुलमियांसारख्या मातब्बर व्यक्तीसमोर इतरवेळी बोलण्याची कोणाचीही हिंमत नव्हती.पण आज मात्र सगळेचजण त्यांच्या विरोधात तावातावाने बोलत होते.त्यांनी आपापल्या धर्माला बट्टा लावला असे दोन्हीकडच्यांना‌ वाटत होते. वातावरण खूपच तापले होते. कोणीतरी येऊन‌ सईदा बेगमना सगळी हकीकत सांगितली.हे ऐकून कधी नव्हे ते त्या सर्वांसमोर आल्या.
“आम्हाला दोष देण्यापूर्वी मला माझ्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत.आईबाबाविना पोरक्या झालेल्या मुलीला आईची माया देणे चूक आहे असे कोणत्या धर्मात सांगितले आहे?
आपल्याच गावातल्या एकाला अपघात झाला तेव्हा अनेकांनी त्याच्यासाठी रक्तदान‌ केले होते.रक्ताला कोणती जातपात किंवा‌ धर्म असतो का?
उद्या गंगेच्या काठावर एखादा इतर धर्माचा माणूस गेला तर गंगामाता त्याला आपल्या पाण्यापासून दूर ठेवेल‌ का?
एखादा डॉक्टर,हकीम पेशंटचा‌‌ धर्म कोणताही असला तरी उपचार करतातच ना?
जगातल्या कोणत्याही आईचे प्रेम धर्माप्रमाणे बदलते काय?आई आणि मुलांचा एकच धर्म असतो तो म्हणजे प्रेमाचा.त्याच प्रमाणे कावेरी आणि माझा धर्म एकच आहे !ती जन्माने काय होती याचा मला काहीच फरक पडत नाही आणि माझा धर्म तिच्या माझ्यावरच्या मायेच्या आड येत नाही.मग आम्हा मायलेकींमध्ये पडणारे तुम्ही कोण?कावेरी माझी मुलगी म्हणूनच वाढणार. कोणीही आमच्यामध्ये यायचा प्रयत्न करायचा नाही.”
हळूहळू वातावरण निवळले.

त्यांनी कावेरीचा आपल्या मुलीसारखा‌ प्रतिपाळ केला.
कावेरीला कोणताही धर्म पाळायची सक्ती नव्हती. कावेरी अनेकदा गावातल्या देवळात जात असे.कावेरी त्यांच्या घरात आल्याने त्यांच्याकडे दोन्ही धर्मांचे सण साजरे होऊ लागले. आताशा गावात तर तिचा उल्लेख अब्दुल सईदाची ‌मुलगी असाच करायला सुरुवात झाली होती.
कावेरीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर सईदा आणि अब्दुल यांनी सुशिक्षित ,सुशील मुलगा वर म्हणून निवडला.कावेरी अतिशय आनंदात होती.
“अरे सईदा,काय झालं?लाडू वळून झाले पण.तू काय अजून तशीच बसली आहेस?”मैत्रिणीच्या बोलण्याने सईदाबेगम भानावर आल्या.भराभर कामे करू लागल्या.
लग्नाआधीचे चार दिवस भुर्रकन गेले.
सुंदर अशा कांजीवरम साडीत कावेरी खूप सुंदर दिसत होती.
आज सईदा आणि अब्दुल यांनी कावेरीचे सालंकृत कन्यादान केले आणि नवपरिणीत दांपत्याला भरभरून आशीर्वाद दिले.त्यांनीच नाही तर साऱ्या गावाने मोठ्या प्रेमाने तिची पाठवणी केली.
कावेरी सासरी जाताना नमस्कार करायला म्हणून आम्ही अब्बू समोर वाकली . तिथे आलेल्या पत्रकाराने हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात साठवून ठेवला.
आज पुन्हा एकदा सर्वांना नव्याने जाणवले की आई फक्त आईच असते.

(वरील कथा सत्य घटनेवर आधारित आहे.)
डॉ.समिधा गांधी

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular