Homeघडामोडीआता लोकाभिमुख कामाची वेळ - पालकमंत्री आबिटकर

आता लोकाभिमुख कामाची वेळ – पालकमंत्री आबिटकर

आजरा (हसन तकीलदार) :
महाराष्ट्र राज्य शासनाच्या जुलै 2025 मधील सुधारित अनुकंपा धोरणामुळे गेल्या अनेक वर्षांच्या लढ्यातून मिळालेल्या या अमूल्य संधीचा पूर्णपणे सदुपयोग करा आणि लोकाभिमुख कामाच्या माध्यमातून आपली छाप पाडा, असे आवाहन शासकीय सेवेतील नवनियुक्त अनुकंपा व सरळ सेवा उमेदवारांना सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत राज्यभरात अनुकंपा धोरण व सरळ सेवेच्या माध्यमातून सुमारे 10 हजार उमेदवारांना विविध विभागांमध्ये नियुक्ती मिळाली. या मोहिमेचा भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील 312 उमेदवारांना नियुक्तीचे आदेश पालकमंत्री प्रकाश आबिटकर व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.महासैनिक दरबार हॉल येथे आयोजित या भव्य कार्यक्रमात आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह संबंधित निवड प्राधिकरण कार्यालयांचे विभागप्रमुख, नियुक्ती मिळवलेले उमेदवार व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
या वेळी बोलताना पालकमंत्री आबिटकर म्हणाले की, गेल्या 10 वर्षांच्या अथक संघर्षातून, आझाद मैदानावरील तरुणांच्या लढ्यापासून कोल्हापूरचं नातं या अनुकंपा सुधारित धोरण प्रक्रियेशी जोडले गेले होते. आता सुधारित धोरणामुळे अनेक वर्षे वाट पाहणाऱ्यांना अखेर न्याय मिळाला. शासन निर्णयात आलेल्या स्पष्टतेमुळे आणि 100 व 150 दिवसांच्या कार्यक्रमातील प्रशासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही संधी 164 जणांना लाभली. यासोबतच सरळ सेवेतील 148 उमेदवारांनीही शासकीय नोकरीची जबाबदारी पेलत नागरिकांना उत्कृष्ट सेवा द्याव्यात. त्यांनी आपल्या बोलण्यातून नवनियुक्तांना कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा यावेळी दिली.

चांगल्या कामातून आदर्श घडवा : मंत्री हसन मुश्रीफ
नवनियुक्त उमेदवारांना शासकीय नोकरीसाठी हार्दिक शुभेच्छा देताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले, प्रत्येकाने आपल्या कामातून यश मिळवून उच्च पदावर झेप घ्यावी आणि चांगल्या कामाच्या माध्यमातून समाजासाठी आदर्श निर्माण करावा. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मी मनापासून आभार मानतो. 100 दिवसांच्या शासकीय गतिमानता अभियानातील हे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. तसेच, उमेदवारांना कुटुंबाची जबाबदारी सांभाळत मिळालेल्या संधीचा लाभ घेऊन आई-वडिलांना जपण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शासनाच्या सुधारित अनुकंपा धोरणामुळे भरती प्रक्रियेला वेग आल्याचे सांगितले. पालकमंत्री स्तरावर 2, स्वतः 10 तर निवासी उपजिल्हाधिकारी स्तरावर 5 बैठकांद्वारे अनुकंपा यादी व शिफारस प्रक्रिया गतीने अंतिम केली. राज्य शासनाच्या अनुकंपा मार्गदर्शक सुचना नियमावलीतील बदल समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांचा सहभाग होता, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली, तर मान्यवरांचे स्वागत जिल्हाधिकारी यांनी पुस्तिका देऊन केले. प्रातिनिधिक स्वरूपात दोन्ही गटातील 10 उमेदवारांना नियुक्तीपत्रे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. तसेच, सर्व नवनियुक्तांसह एकत्रित छायाचित्रणही झाले.

कोल्हापूर जिल्ह्यात 312 जणांना नियुक्तीचे आदेश
कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 312 उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. अनुकंपा अंतर्गत जिल्हाधिकारी कोल्हापूर सर्व विभागांमधून गट क मधील 41 आणि गट ड मधील 56 उमेदवारांचा समावेश आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही नियुक्त्या झाल्या असून, कोल्हापूर महानगरपालिकेत गट क मधील 7 व गट ड मधील 23 जणांना, तर इचलकरंजी महानगरपालिकेत गट क मधील 2 व गट ड मधील 8 जणांना नियुक्ती मिळाली. नगरपरिषद कागल व वडगाव येथे गट क व ड मधून अनुक्रमे 2 व 1 जणांना आदेश देण्यात आले. जिल्हा परिषदेत गट क मधील 18 व गट ड मधील 6 जणांचा अनुकंपा अंतर्गत समावेश होता. दरम्यान, सरळ सेवा नियुक्तीमध्ये विविध शासकीय विभागांमध्ये 148 उमेदवारांना नियुक्तीपत्रे यावेळी देण्यात आली.

**माझे वडील पाटबंधारे विभागात कार्यरत असताना 2018 मध्ये त्यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर मी अनुकंपा भरतीसाठी नाव नोंदविले. मागील 8 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्तीची संधी मिळाली. माझी नियुक्ती विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था कोल्हापूर विभाग, कोल्हापूर येथे झाली आहे. या अनुकंपा नियुक्तीमुळे शासन नेहमीच माझ्या पाठीशी आहे, ही खात्री झाली. मी मुख्यमंत्री व महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक आभार मानते.
….शिवानी रामचंद्र दळवी (नवनियुक्त कर्मचारी)

📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)

🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!

व्हाट्सअप चॅनेल लिंक👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

युट्युब लिंक 👇

https://youtube.com/@linkmarathi-news?si=8CVnKR338XXteBA3

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular