महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील विरार हे शहर वेगाने वाढत आहे. मुंबईला लागून असल्याने येथे लोकसंख्या प्रचंड वाढली, आणि त्याच वेगाने बांधकामांचा ओघही वाढला. परंतु या वेगात अनेकदा बांधकामांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होऊन नियम मोडले जातात, आणि त्याचे परिणाम भयंकर स्वरूपात समोर येतात.
याचाच परिणाम आणि भीषण प्रत्यय २७ ऑगस्ट २०२५ च्या मध्यरात्री आला. विरार पूर्वेतील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली अनधिकृत इमारतीचा काही भाग क्षणार्धात कोसळला. एका क्षणात आनंदाचे वातावरण शोकांतिका ठरलं. कारण या इमारतीत त्या रात्री एका बाळाच्या पहिल्या वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू होता आणि त्याच कार्यक्रम दरम्यान इमारत कोसळून जीवितहानी झाली.

मध्यरात्र जवळ आली होती. रमाबाई अपार्टमेंटमध्ये रहिवाशांनी एका लहान बाळाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी आप्तेष्टांना बोलावलं होतं. संगीत, हशा, गप्पा, मुलांच्या खेळण्याचा आवाज या साऱ्यात वातावरण आनंदमय झालं होतं. परंतु या आनंदावर काळाचे सावट कोसळलं.
अचानक इमारतीच्या भिंतीत तडे गेले, मजले हादरले, आणि काही मिनिटांतच संपूर्ण इमारत कोसळून पडली. शेकडो टन कॉंक्रिट आणि लोखंडाच्या ढिगाऱ्याखाली अनेक रहिवासी आणि पाहुणे गाडले गेले.
अधिकृत माहितीनुसार, या दुर्घटनेत १७ लोकांचा मृत्यू झाला, तर किमान २० पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बाळ, आई-वडील, लहान मुलं आणि महिला यांचा समावेश आहे. अनेक जण अजूनही ढिगाऱ्यात सापडले होते, ज्यांना शोधण्यासाठी रात्रभर बचाव कार्य सुरू राहिलं.
VVMC अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (NDRF) तातडीने घटनास्थळी पोहोचले. जेसीबी, क्रेन, गॅस कटर वापरून ढिगारा हटवला गेला. तातडीने रुग्णवाहिकांद्वारे जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं. शेजारील नागरिकांनीही रक्तदान, अन्नपुरवठा आणि मदत कार्यात सहभाग घेतला.
रमाबाई अपार्टमेंट ही इमारत २०१२ मध्ये उभारली गेली होती. ही इमारत अनधिकृत असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. VVMC (वसई-विरार महानगरपालिका) ने वेळोवेळी या इमारतीसंदर्भात नोटिसा काढल्या होत्या, पण योग्य कारवाई झाली नाही. परिणामी, इमारत वर्षानुवर्षे उभी राहिली आणि अखेर २०२५ मध्ये शेकडो जीवांच्या आयुष्यात हाहाकार माजवून गेली.
या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
@ बांधकामांना परवानगी न घेता इमारती कशा उभ्या राहतात?
@ अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची?
@ प्रशासनाकडून वेळीच कारवाई झाली असती तर आज इतक्या जिवांचा बळी गेला असता का?
या दुर्घटनेत निष्पाप जीव गेले. एका वर्षाच्या बाळाचा पहिला वाढदिवस साजरा करताना त्या बाळासह त्याचे आई-वडीलही ढिगाऱ्याखाली दबले. एका क्षणात आनंद शोकांतिका ठरला.
अनेक कुटुंबांनी आपलं सर्वस्व गमावलं. काहींनी कुटुंबातील कमावते गमावले, तर काहींना उपचारासाठी मोठ्या खर्चाचा डोंगर उभा राहिला.
वाचलेले नागरिक भीतीच्या छायेत आहेत. “आता आपल्या इमारतीचं काय?” हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे.
@ प्रशासनाची भूमिका या घटनेत मोठ्या प्रमाणावर संशयास्पद ठरते.
@ अनेकदा नोटिसा देऊनही अवैध इमारतीवर पाडकार्य का झाले नाही?
@ बांधकाम व्यावसायिकांनी बेकायदेशीररित्या इमारत बांधली तरी स्थानिक अधिकारी डोळेझाक का करतात?
@ रहिवाशांना सुरक्षिततेबाबत सतर्क का केलं गेलं नाही?
ही केवळ एका इमारतीची शोकांतिका नाही, तर संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाचं प्रतीक आहे.
दुर्घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप उफाळून आला आहे. मृतांच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरुद्ध आवाज उठवला. “आम्ही जीव धोक्यात घालून अनधिकृत इमारतीत राहत होतो, पण आमच्याकडे पर्याय नव्हता,” असं म्हणत त्यांनी शासनाकडून ठोस कारवाईची मागणी केली.
सोशल मीडियावरही या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. लोकांनी या दुर्घटनेला “प्रशासनाच्या भ्रष्टाचाराचा परिणाम” ठरवले.
१. अनधिकृत बांधकामं उभी राहताना जी साखळी असते-बिल्डर, राजकारणी, अधिकारी ती मोडली पाहिजे. कडक कायदे करून दोषींवर त्वरित कारवाई झाली पाहिजे.
२. अनेकदा स्वस्त घरांच्या मोहात लोक अनधिकृत इमारतीत राहायला जातात. पण त्याची किंमत जीवितहानीत मोजावी लागते. म्हणूनच नागरिकांनीही परवानगी, नकाशा आणि कागदपत्रे तपासूनच घर विकत घ्यावं.
३. विकासाच्या नादात सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झालं तर अशा दुर्घटना अपरिहार्य होतात. शहर नियोजन, स्ट्रक्चरल ऑडिट आणि जुनी धोकादायक इमारत पाडणे हे तातडीने केलं पाहिजे.
४. शासनाने तात्काळ मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत, जखमींना मोफत उपचार आणि पुनर्वसनाची जबाबदारी घ्यावी.
विरारमधील रमाबाई अपार्टमेंट दुर्घटना ही केवळ एक अपघात नाही, तर मानवनिर्मित शोकांतिका आहे. कारण ही इमारत कायद्याच्या चौकटीबाहेर उभी राहिली आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे आज निरपराध जीव गमवावे लागले.
प्रत्येक वेळी अशा घटनेनंतर काही दिवस गदारोळ होतो, आरोप-प्रत्यारोप होतात, पण नंतर सगळं विस्मरणात जातं. पण या वेळी तरी शासन, प्रशासन आणि नागरिकांनी या घटनेतून शिकून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस पावलं उचलली पाहिजेत.
या दुर्घटनेने अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त केले. कालपर्यंत आनंदाने गणेशोत्सवाच्या स्वागताची तयारी करणारे हात, आज अवशेषाखाली दडपून गेले. लहान मुलांचे निरागस जीवन, आईवडिलांचे स्वप्न, वृद्धांचे आश्रय सगळं एका क्षणात उद्ध्वस्त झालं. आक्रोशाने विरारचे आभाळ भरून गेलं आहे. जे वाचलेत त्यांच्याकडे आता फक्त रिकामं घर, हरवलेले आप्त आणि डोळ्यांतून न थांबणारे अश्रू उरले आहेत. या दु:खाला आधार देणारा हात म्हणजे फक्त शासनाचा हातच आहे.”
प्रत्येक जीव अमूल्य आहे. सुरक्षिततेपेक्षा मोठं स्वप्न नाही.
रमाबाई अपार्टमेंटच्या ढिगाऱ्यातून आपल्याला हेच स्मरण दिलं गेलं आहे “भ्रष्टाचार, दुर्लक्ष आणि बेकायदेशीरता यांचं परिणाम नेहमीच काळाच्या रूपानं समोर येतो.”
“आज या दुर्घटनेत ज्यांनी आप्तेष्ट गमावले आहेत, त्यांच्या आयुष्यातील पोकळी भरून काढणं अशक्य आहे. कालपर्यंत ज्या घरात हशा आणि आनंदाचा माहोल होता, तिथे आज केवळ शांतता, हंबरडा आणि शोक दिसतोय. लहान मुलांच्या निष्पाप चेहऱ्यावर उमटलेले भीतीचे सावट आणि त्यांच्या डोळ्यांतील हरवलेल्या नात्यांची आस पाहताना मन पिळवटून निघतं. हे दु:ख पाहून सगळ्या समाजमनाला मोठी जखम झाली आहे.”
“गणेशोत्सव हा उत्सव एकोप्याचा, आशेचा आणि आनंदाचा मानला जातो. पण त्याच उंबरठ्यावर काळाने उभं राहून रमाबाई अपार्टमेंटसारख्या अनेक कुटुंबांच्या आयुष्यावर संकट कोसळवलं. बाप्पाच्या स्वागताची तयारी करणारी घरं आज भग्नावस्थेत उभी आहेत. अशा वेळी शासनाने केवळ आर्थिक मदतच नव्हे तर पुनर्वसन, मानसिक आधार आणि सुरक्षिततेची हमी देणं ही काळाची गरज आहे. कारण आजचा आक्रोश उद्याच्या असंतोषात बदलू नये, हीच खरी समाजाची अपेक्षा आहे.”
✍️विजय वैशाली दत्ताराम पराडकर – आण्णा
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
व्हाट्सअप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h


समन्वयक – पालघर जिल्हा



