Homeघडामोडीशुक्राणू ,स्त्रीबीज दान करणाऱ्यांचा मुलांवर अधिकार नाही !

शुक्राणू ,स्त्रीबीज दान करणाऱ्यांचा मुलांवर अधिकार नाही !

मुंबई : शुक्राणू किंवा स्त्रीबीज दान करणाऱ्यांचा मुलांवर कोणताही कायदेशीर अधिकार नाही तसेच ते मुलाचे बायोलॉजिकल पालक होण्याचा दावाही करू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मंगळवारी मुंबई हायकोर्टाने दिला. ‘सरोगसी’द्वारे आई झालेल्या मातेला आपल्या पाच वर्षांच्या जुळ्या मुलांना भेटण्याची परवानगीसुद्धा हायकोर्टाने दिली.

ही दोन जुळी मुले पती आणि मेहुणीसोबत राहतात. मेहुणीने स्त्रीबीज दान केल्यामुळे या दोन्ही जुळ्या मुलांची बायोलॉजिकल आई तीच आहे. पत्नीचा या मुलांवर कोणताही अधिकार नाही असे आपल्या पतीचे म्हणणे आहे, असे पत्नीने आपल्या याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकल खंडपीठासमोर सुनावणी झाली.

“याचिकाकर्तीच्या बहिणीने स्त्रीबीज दान केले असले तरी, या जुळ्या मुलांची बायोलॉजिकल आई होण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार तिला नाही. फक्त स्त्रीबीज दान केले, हीच धाकट्या बहिणीची भूमिका आहे. स्वेच्छेने दान करणाऱ्यांपेक्षा ती आनुवंशिक आई होण्याइतपत कदाचित पात्र होऊ शकेल. त्यापलीकडे तिला कोणताही अधिकार प्राप्त होऊ शकत नाही,” असा निर्वाळा हायकोर्टाने नोंदवला.

‘सरोगसी’ करारावर २०१८मध्ये स्वाक्षऱ्या झाल्या होत्या व सरोगसी कायदा २०२१मध्ये लागू करण्यात आला. २००५मध्ये भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेद्वारे या कायद्याने नियमन करण्यात आले होते, याकडे न्यायालयाला मदत करणाऱ्या वकील ॲड. देवयानी कुलकर्णी यांनी लक्ष वेधले.

२००५च्या नियमांनुसार, शुक्राणू किंवा स्त्रीबीज दान करणाऱ्या तसेच सरोगेट आईला पालकत्वाचे सर्व हक्क सोडावे लागतात. त्यामुळेच या जुळ्या मुलांची आई ही याचिकाकर्ती आणि वडील हा तिचा पती आहे. शुक्राणू/ओसाइट (स्त्रीबीज) दात्याला मुलाच्या संबंधात पालकत्वाचे कोणतेही अधिकार किंवा कर्तव्ये नसतील. त्यामुळेच याचिकाकर्ती महिलेच्या लहान बहिणीला कोणताही अधिकार असू शकत नाही, असेही हायकोर्टाने स्पष्ट केले.

नेमके प्रकरण काय?

या दाम्पत्याला नैसर्गिक पद्धतीने मूल होत नसल्याने त्यांनी सरोगसीचा निर्णय घेतला. पत्नीच्या बहिणीने सरोगेट आईची भूमिका निभावत ऑगस्ट २०१९मध्ये जुळ्या मुलींना जन्म दिला. एप्रिल २०१९मध्ये मेहुणीच्या पतीचे आणि मुलीचे एका अपघातात निधन झाले. याचिकाकर्तीचा २०२१ पर्यंत सुखी संसार सुरू होता, मात्र नंतर त्यांच्या नात्यात वितुष्ट आले. परिणामी, पती आपल्या मुलींसह विभक्त राहू लागला. पत्नीच्या बहिणीचे कुटुंब अपघाताने हिरावून घेतल्यामुळे मानसिक धक्क्यात असलेली ही बहीण नंतर या जुळ्या मुलींचा सांभाळ करण्यासाठी आपल्या भावोजींबरोबर राहू लागली. त्यामुळे मुलांना भेटू देण्याबाबतची तक्रार आईने पोलिसांकडे केली होती.

प्रत्येक आठवड्याला तीन तास मुलांना भेटू द्यावे

आईला त्यांच्या मुलांना भेटण्याचा अधिकार कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. प्रत्येक आठवड्याला तीन तास जुळ्या मुलींना भेटण्याची परवानगी द्यावी, असे निर्देश कोर्टाने पतीला दिले.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular