कट्टर विरोधक आता एकत्र
कट्टर विरोधक आता एकत्र कोल्हापुरात महाडिक, मंडलिक आणि मुश्रीफ दिसणार | अजित पवार यांनी बंड केल्याने राष्ट्रवादी फूट पडली आहे. अजित पवार शिंदे-फडणवीस यांच्यासोबत राज्याच्या सत्तेत सहभागी झाल्याने फक्त राज्यातीलच नाही तर आता जिल्ह्यातील आणि स्थानिक पातळीवरील राजकारण आणि समीकरणंही बदलणार आहेत.
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर कोल्हापूरच्या राजकारणातही भूकंप झाल्याचे दिसून येत आहे. येथे कधी काळी कट्टर विरोधक असलेले आणि एकमेकांना हरवण्यासाठी प्रयत्न करणारे आता एकत्र आले आहेत. जिल्ह्याच्या राजकारणाचा एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. जिल्ह्यात ट्रिपल एम म्हणजेच महाडिक मंडलिक आणि मुश्रीफ यांचा फॅक्टर आता दिसणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेची मुहुर्तमेढ रोवलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातही आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. काहीही झाले तरी ‘शरद पवार एके शरद पवार’ असा नारा दिलेले मंत्री हसन मुश्रीफ आणि चंदगडचे आमदार राजेश पाटील हे अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. तर या पूर्वीच येथील खासदार संजय मंडलिक हे शिंदेच्या शिवसेनेसोबत गेल्याने जिल्ह्यात आता नवीन समीकरणं तयार झाले आहे.
राज्यात भाजप – शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र येत सरकार स्थापन केल्याने जिल्ह्यातही भाजपचे खासदार धनंजय महाडिक, शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ हे तिघे जण एकत्र आले आहेत. परिणामी जिल्ह्यात सत्ताधारी गटाची ताकद वाढली आहे.
खासदार संजय मंडलिक हे महाविकास आघाडीतून निवडून आले असले तरी सध्या ते मुख्यमंत्री शिंदे यांच्यात गटात आहेत. त्यांची ही तालुक्यात साखर कारखाना व कार्यकर्त्यांची फौज असल्यामुळे चांगला गट आहे. तर जिल्ह्यात महाडिक गटाची ताकद ही मोठी आहे. प्रत्येक तालुक्यात महाडिक गटाची ताकद दिसून येते.
आमदार हसन मुश्रीफ यांची कागल, राधानगरी-भुदरगडमध्ये मोठी ताकद आहे. त्यामुळे भाजप–शिंदे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस गट अशी कागल तालुक्यात मोठी राजकीय ताकद निर्माण झाली आहे. यामुळे लोकसभेच्या पुढील निवडणुकीची तयारी करीत असलेले खासदार संजय मंडलिक यांना युती धर्म म्हणून महाडिक यांची साथ मिळणार आहे. मात्र त्यांच्यासोबत आता हसन मुश्रीफ यांचीही ताकद मिळणार आहे.
तिन्ही गटाचे तीन मातब्बर नेते आहेत. त्यांची राजकीय महत्त्वकांक्षा पाहता हे नेते एकत्र येतील का? कोण कुणाशी जमवून घेणार? तिघे एकत्र राहणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामुळे कोल्हापुरातील पुढील राजकारणाबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे.