बाई

१)
काल त्यांच्या नेहमीच्या डॉक्टरांनी त्यांना स्पेशालिस्ट कडे पाठवले होते. त्या मॅडमनी बाईंना खूपच आपुलकीने वागवले.
बाईंनी हातातले प्रिस्क्रीप्शन वाचले आणि एक पुसटसे हसू त्यांच्या चेहऱ्यावर उमटले. त्यांनी चमकून वर पाहिले.
डॉक्टर मॅडमनी बाईंना साऱ्या स्टाफच्या समोर वाकून नमस्कार केला.
होय बाई, मी तुमची विद्यार्थिनी
चौथी अ १९८०
लिहिताना अक्षर वर खाली होऊ नये म्हणून मी प्रिस्क्रीप्शनवर समास व ओळी आखून घेतल्यात. कितीही घाईत असले तरी अक्षर वळणदार येतच.
२)काल ती रागावूनच वर्गाच्या बाहेर पडली होती. कितीही जीवतोड मेहनत केली तरी तिच्या वर्गात चाचणी परिक्षेत चारपाच जणं तरी नापास झालीच.
“अग, तुला मुद्दाम ढ मुलांचा वर्ग दिलाय. तू आहेस म्हणून इतपत तरी बरा आहे निकाल. नाहीतर मागच्या वर्षी अर्धा वर्ग नापास झाला होता.”
मैत्रिण तिची समजूत घालत होती.
दुसऱ्या दिवशी नापास झालेली चारही मुले रडवेली होऊन दरवाजातच तिची वाट पहात होती.
“बाई, आम्ही चुकलो. जास्ती मेहनत घेऊ पण पास होऊनच दाखवू. पुढचे अख्खे वर्ष त्या मुलांनी आणि हिनेही खूप मेहनत घेतली. या वर्षी तिला एकाही निकालावर लाल शाई वापरावी लागली नाही.

३) एका मोठ्या कारखान्याच्या उद्घाटनाला बोलावण्यासाठी एक प्रसिद्ध उद्योगपती बाईंकडे आले. बाईंना आठवत होते.
त्यांचा मुलगा बाईंचा विद्यार्थी!
अतिशय वांड!बाई कधीही कोणत्याही मुलाला शिक्षा करत नसत. अती झाले तर स्वतःलाच एखादी शिक्षा करून घेत. बाईंना शिक्षा नको म्हणून मुले खूप शिस्तीत वागत. यांच्या मुलाने मात्र बेदरकार वागणे, इतर मुलांना त्रास देणे सोडले नव्हते.
एकदा याने इतर मुलांच्या गृहपाठाच्या वह्यांचा गठ्ठाच गायब केला.
बाई खूप रागावल्या, “मला नीट संस्कार करता आले नाहीत, मी आता माझ्या हातावर छड्या मारून घेणार आहे. असे म्हणून हातावर छड्या मारून घ्यायला सुरुवात केली. पहिल्या चार छड्यांनंतर त्या मुलाचा धीर सुटला. त्याने धावत जाऊन ती छडी बाईंकडून घेतली.
पुन्हा कधीही तो त्या शाळेत आला नाही.
आज खूपच आग्रहाचे आमंत्रण होते आणि त्यांना न्यायला स्वतः उद्योगपती आले होते म्हणून बाई उद्घाटनाला गेल्या. कारखान्याच्या दर्शनी भागात ती छडी एका फ्रेममध्ये ठेवलेली दिसली.
“बाई तुमच्यामुळे माझा मुलगा सुधारला. परदेशातून शिक्षण घेऊन इथे आलाय आणि हा कारखाना सुरू करतोय. त्याने ही छडी स्वतःजवळ ठेवली होती. आज फ्रेम करून लावलीय. अजूनही त्याला तुमच्या समोर यायची लाज वाटतेय”
“आता तो आला नाही तर, मी मला शिक्षा करीन हं, आता माझे वय झालेय मला शिक्षा सोसत नाही.”

बाईंच्या डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर हसू होते…

४)आपल्या विद्यार्थ्यांना आपण शिकवलेले कळले की नाही, हेसुद्धा आपल्याला कळणार नाही. त्यांना शिकवणे हेच एक मोठ्ठे चॅलेंज आहे. हे माहिती असूनही स्पेशल मुलांना शिकवण्यासाठी, त्यांना पायावर उभे करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या स्पेशल शिक्षकांचे ऋण समाजाने कसे फेडायचे?
या शिक्षकांच्या चिकाटीला आणि दुर्दम्य इच्छाशक्तीला सलाम

साधी शाळा मास्तरीण तर आहे! असे ज्यांना हिणवले जाते अशा अनेक जणींनी नंदनवने फुलवली आहेत. कित्येक मुलांची वाया जाणारी आयुष्य वाचवली आहेत. कोरोनाच्या काळातही मुलांना शिक्षणापासून वंचित रहावे लागू नये म्हणून नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करून मुलांना शिकवणाऱ्या या साऱ्या शिक्षकांना मनापासून नमस्कार

समिधा गांधी

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular