Homeमुक्त- व्यासपीठआयुष्याचे गणित

आयुष्याचे गणित

     आयुष्यात प्रत्येक माणसावर वाईट वेळ किंवा घटना कधी येईल हे सांगणे कठीण असते. आयुष्यात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अनेक घटना घडत असतात, त्यात आलेले अनुभव आणि शहाणणातुनच मनुष्य पुढची वाटचाल घडवत असतो. या जगात प्रत्येक मनुष्य जन्माला येतो, तेव्हा त्याचा जन्म आणि मृत्यू निश्चितच दैव योजना असते, त्यात बदल नसतो. देवाने प्रत्येकाचे जीवन एका विशिष्ट साच्यात तयार केले आहे, त्या दैव नियोजित साच्याप्रमाणेच  त्याला आकार प्राप्त होतो.

  जीवनातील संकटाचा सामना करण्यासाठी सतत नव्या आणि अनोळखी मार्गावर भ्रमण केले तर आपल्याला नवीन अनुभव तर येतीलच पण त्यातून प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग कसा काढावा हे ज्ञात होईल. दुसऱ्याच्या मार्गाने चालण्यापेक्षा स्वतःच आपला मार्ग शोधून त्यावर मात केली तरच आपल्यावर आलेले कुठचेही संकट मोठे वाटतं नाही. नव्या आणि अनोळखी मार्गावर कुणीही सहसा चालायला तयार होत नसतं अश्याच कामाला आपण हात घातला पाहिजे. अडी-अडचणीवर मात करून आलेल्या संकटाचा सामना करून जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये काही बदल करावे लागतात. आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात, काहीतरी अनमोल देणगी, शिकवण, अनुभव आणि शहाणपण शिकवून जाते. आपल्या जीवनातील कुठलीही व्यक्ती ठरवून आपल्या जीवनात येत नसते. जाणीवपूर्वक कुठल्याही घटना घडत नसतात. ज्या घडतात, त्या नियतीनेच योजनाबद्ध केलेल्या असतात, त्यातूनच आपण सिद्ध होतो.

       जीवनात आपण यशस्वी होण्यासाठी कोणत्या ना कोणत्या व्यक्तींचे अनुकरण करत असतो. आपल्या जीवनात येणारे आई-वडील, भाउ-बहिण, मित्र-मैत्रिणी, लेखक, कवी, नेते, कलाकार, अशा कोणत्या ना कोणत्या व्यक्तीच्या प्रभावामुळेच आपल्या जिवनात अमुलाग्र बदल घडत असतात .

जीवनातील प्रभाव टाकणारी व्यक्ती आपल्या जीवनातील स्थान हे आपल्या उद्दात्तिकरणावरच अवलंबुन असते. आपण त्यांचे जीवन जगण्याच्या प्रयत्नात असतो. जीवनात येणारे खाच खळगे पार करूनच आपणही त्यांच्याप्रमाणे उत्तुंग शिखरावर पोहचण्यासाठी सातत्याने प्रयत्नशिल असतो.

          जीवनातील यशच आपले आयुष्य होवु शकतं, त्यातून आपण स्वतः मार्ग निवडणे योग्य असते. जगण्याचे तीन काळ आहेत. भूत, भविष्य आणि वर्तमान. भूतकाळात रमुन त्याच त्याच आठवणी आठवून दुःखाला आपणच आमंत्रण देवून त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत नाही. तो भूतकाळच काहीजण आयुष्यभर कुरवाळतात आणि आपल्या जीवनातील पुढे जाण्याचे मार्ग ते स्वतःच बंद करतात. भविष्याचे तसेच आहे, अकारण भविष्यातील शक्यतांबाबत चिंताग्रस्त होवून जीवन भित भित जगतात. कसे होईल काय होईल या भ्रमात राहून जीवनात पुढे जाण्याऐवजी नुसते चिंतित राहतात.

  जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर सुखी जीवनाचे एकच सूत्र आहे ते म्हणजे वर्तमान. भूत, भविष्याच्या गर्तेतून बाहेर पडून वर्तमानात जगण्याची प्रेरणा आपोआपच मिळते. आपल्या क्रियेवरच आपला वर्तमान साकार होत असतो. जीवनातील उत्कृष्टता हे कोणत्याही प्रकारचे स्वभाव, लक्षण नसून तो एक ठायी-भावच आहे. भावनांवर नियंत्रण ठेवून वर्तमानाचा विचार केला तरच आपण जीवनाची यशस्वी वाटचाल उत्कृष्ट रित्या पार पाडू शकतो, अन्यथा वाटच हरपून जाईल. जन्माला येणाऱ्या कुठल्याच व्यक्तीचे आयुष्य हे निश्चित नाही. मनुष्याच्या हातात जन्म मृत्यू नाही. आपण कुणाच्या घरात जन्म घ्यायचा, कुठल्या देशात, गोत्रात घ्यायचा हे आपल्या हातात नसते. ह्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आपल्या कुणाकडेच नाही जीवनातील ह्या सगळ्या घटना ह्या योगायोगाच्या गोष्टी आहेत. असं असतं तर बरं झालं असतं, तसं झालं असतं तर अमुक झालं असतं, असा विचार करण्यात बसण्यापेक्षा वास्तव/वर्तमान स्विकारून च योग्य तो निर्णय घेतला पाहिजे.

         अचानक घडणाऱ्या घटनांना न डगमगता त्यांचा सामना करून वेळीच उपाययोजना आणि मार्ग काढत जीवन जगले पाहिजे. आहे त्या परिस्थितीत मार्ग काढून आनंदी राहण्यात खरं शहाणपण आहे. आयुष्यातील घटनांना क्रम नसतो. त्या घडणारच म्हणून आपण आयुष्याच्या एखाद्या वळणावर एखादी गोष्ट करण्यासाठी निर्णय घेण्याची वेळ येईल तेव्हा सतत कार्यरत राहणे गरजेचे असते. आयुष्याकडे पाठ फिरवून मार्ग सापडत नसतात, ते आपणच आपले काढावे लागतात. वाईट गोष्टींचे खापर दुसऱ्यावर फोडण्यापेक्षा आपणच शहाणपण अंगी बाळगून विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक असते. प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट काळ हा येतच असतो. सुखामागुन दुःख हे येणारच. कुठल्याही परिस्थितीत नकारात्मक विचारशक्ती घातकच ठरते. नकारात्मकता हा मनुष्याचा, "slow poison"  सारखा शत्रू आहे, त्यालाच आपल्या जीवनातून काढून टाकले पाहिजे. सकारात्मकता अंगी बाळगली की संकट कितीही मोठे असले तरी त्यावर विजय हा मिळतोच. कुठलेही संकट छोटे किंवा मोठे नसते, मनुष्यच ते मोठे किंवा छोटे ठरवतो. नेहमी चांगल्या गोष्टी करण्यासाठी जीवनात अग्रेसर रहा म्हणजे अंतर्मन आनंदी राहील. चांगली संगत ठेवून नवनवीन गोष्टी आत्मसात केल्याने बरीच संकटे संपुष्टात येतात कोणत्याही गोष्टींचा त्रास करण्यापेक्षा आलेल्या संकटाचा सामना करून त्यातून मार्ग काढला म्हणजे जीवन अधिकाधिक सुखकर होईल.

जीवन म्हणजे एक पुस्तकच असते देवाने लिहिलेले. प्रत्येकाची पुस्तकाची पाने ही वेगवेगळी लिहिलेली असतात. त्यात प्रत्येकाचं पहिलं पान असतं जन्माचे आणि शेवटचे मृत्यूचे. मधली पाने प्रत्येकालाच आपआपली भरायची असतात.

    "जन्माला आलो आहोत तर जगणं जगुन पहावं...
  जीवनातील किचकट कोडं आपणच आपलं सोडवून पहावं..."


लेखिका- सुनेत्रा प्रशांत नगरकर
        ( अहमदनगर )

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular