Homeकृषीआले पीक व्यवस्थापन

आले पीक व्यवस्थापन

जमीन -:
मध्यम ते हलकी, सेंद्रिय पदार्थ भरपूर, भुसभुशीत ६- ६.५ सामू असणारी, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. वारंवार एकाच जमीनीत आले पीक घेऊ नये.

पूर्व मशागत -:
वळीव पावसानंतर ४- ५ उभ्या- आडव्या दोन खोल नांगरटी, ढेकळे फोडणे, कुळवणी करून जमीन भुसभुशीत करून घ्यावी.

पेरणीची वेळ -:
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मे महिन्याखेर

सुधारीत वाण-:
माहीम, रियो डी जानेरो, कालीकत, महिमा, वरदा, रजता

बियाणे -:
२- २.५ लांबीचे, २५- ४५ ग्रॅम वजनाचे एक ते दोन डोळे असणारे, ७- ८ क्विंटल बियाणे/ एकर

बीज प्रक्रिया -:
०.३ टक्के मँकोझेब व ०.०७५ टक्के क्विनॉलफॉस द्रावणात बियाणे ३० मिनिट भिजवून लागवडीपूर्वी ३-४ तास सावलीत वाळवावे.

पेरणीची पद्धत :
एक मीटर रुंद, ३० से.मी. ऊंच व पुरेशा लांबीचे गादीवाफे ५० से.मी. अंतरावर बनवावेत. बागायती पिकात ४० से.मी. अंतरावर सरी पाडाव्यात.
.
खत -:
लागवडीवेळी चांगले कुजलेले शेणखत १०-१२ टन/ एकरी वाफ्यांवर पसरून द्यावी किंवा कंद लागवडीच्या खड्यांमध्ये टाकावे. लागवडीनंतर २.५ ते ३ महिन्यांनी उटाळणी करतेवेळी ८०० किलो निंबोळी किंवा करंज पेंड द्यावी. लागवडीपूर्वी वाफ्यात ३० किलो स्फुरद व ३० किलो पालाश पसरून द्यावे. ४८ किलो नत्र लागवडीनंतर तीन हप्यांत ४५, ५५ व ६५ दिवसांनी विभागून द्यावे.

आंतर मशागत :
आले लागवडीनंतर अवश्यकतेनुसार २ ते ३ खुरपण्या कराव्यात. तसेच लागवडीनंतर ४५ व ९० दिवसांनी खुरपणी करून खते दिल्यानंतर पिकाला भर द्यावी. पिकाला लागवडीनंतर लगेचच ४-५ टन/ एकरी पालापाचोळा किंवा २-३ किलो भाताचे तूस/ वाफा वापरून आच्छादन करावे. परत ४५ व ९० दिवसांनी ७.५ टन/ एकर पालापाचोळ्याचे आच्छादन करावे.

पाणी व्यवस्थापन -:
आले पिकाला वाढीच्या कालावधीमध्ये १३००-१५०० मिमी पाणी लागते. पिकाच्या संवेदनशील अवस्था कोंब उगवताना, फुटवे फुटताना (लागवडीनंतर ९० दिवस) व कांदांचा विकास (लागवडीनंतर १२० दिवस) या आहेत. लागवडीनंतर लगेचच पहिले पाणी (आंबवणी) द्यावे. त्यानंतर ७-१० दिवसांच्या अंतराने हवामान व जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीने पाण्याचा कार्यक्षम वापर होतो व उत्पादनातदेखील वाढ होते.

पिक संरक्षण -:
कंदकुज – लागवडीसाठी रोगमुक्त बियाण्याची निवड करावी. साठवणुकीपूर्वी व लागवडीपूर्वी ०.३ % मँकोझेब किंवा ०.१२५ % मेटालॅक्झील+ मँकोझेबची ३० मिनिटे बियाणेप्रक्रिया करावी व लागवडीनंतर ३० व ६० दिवसांनी आळवणी करावी.

पानांवरील ठिपके –: प्रादुर्भाव दिसून येताच मँकोझेब ०.२ % किंवा कार्बेंडाझीम ०.१ % फवारणी करावी.

कंद पोखरणारी अळी –: किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच जुलै ते ऑक्टोबर कालावधीत ०.१ % मॅलाथीऑनची २१ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

खवले कीड –: पिकाची काढणी वेळेवर करावी. साठवणूक व लागवडीपूर्वी क्विनॉलफॉस ०.०७५ % द्रावणात ३० मिनिटे बियाणेप्रक्रिया करावी.

काढणी व उत्पादन -:
पाने पिवळी पडून वाळू लागताच वाळलेला पाला कापून पालापाचोळा वेचून घ्यावा. कुदळीने खोदून गड्यांना इजा न करता आल्याची काढणी करावी. आले वेचून पाण्याने स्वच्छ धुवून गड्डे व बोटे (नवीन आले) वेगवेगळी करावी. एकरी ४- ६ टन उत्पादन मिळते.

कालावधी – :
ताज्या आल्यासाठी पिकाची काढणी लागवडीनंतर ७ महिन्यांनी व सुंठनिर्मितीसाठी ८.५ ते ९ महिन्यांनी करावी.

“आशाच नवनवीन शेतीविषयक माहिती घेण्यासाठी Follow करा आपल्या हक्काची लिंक मराठी वेबसाईट “

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular