माणूस हा निसर्गाची निर्मिती असल्याने त्याने निसर्ग प्रेरणेनुसार वागणे हेच नैसर्गिक आहे. निसर्ग प्रेरणेने माणसांनी माणसांसाठी निर्माण केलेला कायदा हा या अर्थाने माणसांचा कायदा नसून अप्रत्यक्षपणे निसर्गाचा कायदा होय.
या निसर्ग प्रेरित पण मानव निर्मित कायद्याचे मुख्य उद्देश दोन आहेत, ते खालीलप्रमाणे.
(१) माणसातील चांगल्या प्रवृत्तीला प्रोत्साहन देणारे चांगल्यास पोषक असणारे निर्मळ, शुद्ध वातावरण किंवा चांगल्यास अनुकूल असणारी परिस्थिती निर्माण करून ती नेहमी कायम ठेवणे, आणि
(२) माणसातील वाईट प्रवृत्तीला प्रोत्साहन देणारे वाईटास अनुकूल असणारे घाणेरडे वातावरण किंवा वाईटास अनुकूल असणारी परिस्थिती सातत्याने नष्ट करून वाईटाला भीती दाखवणारे वातावरण किंवा वाईटास प्रतिकूल असणारी परिस्थिती निर्माण करून ती नेहमी कायम ठेवणे.
वरील दोन उद्देश हे एकमेकांशी संलग्न आहेत व म्हणूनच दिवाणी व फौजदारी कायदे वेगळे दिसले तरी ते एकमेकांशी संलग्न आहेत.
वरील दोन्ही उद्देश समाविष्ट असलेला निसर्ग प्रेरित पण मानव निर्मित कायदा हा कायद्याच्या पुस्तकांत प्रदर्शन म्हणून ठेवण्यासाठी किंवा पुजण्यासाठी नसून तो प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी आहे. याच अंमलबजावणीसाठी मानव समाजाने लोकशाही मार्गाने निवडलेले सरकार असते. हा कायदा मूलतः निसर्ग प्रेरित असल्याने हे सरकारही निसर्ग प्रेरित असते अर्थात नैसर्गिक असते ही गोष्ट सर्व माणसांनी सतत लक्षात ठेवली पाहिजे. आपण जेंव्हा या सरकारला मायबाप सरकार म्हणतो तेंव्हा जणू आपण निसर्गालाच मायबाप म्हणत असतो.
कायद्याचा हा सखोल अर्थ जसा मला कळला तसा तो सर्वांना कळो, हीच निसर्गापुढे सदिच्छा ठेवून हा लेख संपवतो.
- ॲड.बी.एस.मोरे
मुख्यसंपादक