Homeमुक्त- व्यासपीठकुठे गेले ते दिवस : उन्हाळी सुटी

कुठे गेले ते दिवस : उन्हाळी सुटी

      " जाने कहॉं गए वो दिन,रहते थे तेरी याद में" जुन्या हिंदी चित्रपट सृष्टीतील हे गाणे ऐकताच मला माझ्या बालपणाची प्रकर्षाने आठवण आली.

‘उन्हाळी सुट्टीच्या मौज मस्तीचा उन्हाळा’

 ‌     माझ्या बालपणीच्या काळी आम्ही उन्हाळी सुटीत आजोळी किंवा वडिलांच्या  गावी जायचो. आजी आजोबा आम्हाला गावी न्यायला यायचे. तिथे दिवसभर हूंदडायचं. चिंचा, बोरं, करवंद हे सगळं खायचं. दुसऱ्यांच्या शेतातल्या कैऱ्या, आंबे चोरून खाण्याची मजा काही औरच.आम्ही आमच्या आजोबांनी लावलेल्या रोपांची कच्ची वांगी,टोमॅटो तोडुन खायचो. निरनिराळे खेळ खेळणे, मस्ती करणे, भांडणे, सायकलवरून रपेट तसेच मनसोक्त फिरणे म्हणजे पर्वणीच. पण आता काळ बदलला. आम्ही केलेली मजा मुलांना आता गोष्टीरूपाने सांगावी लागत आहे. हल्लीच्या पिढीला ती मजा तर मिळतच नाही. कुठे गेली ती झुकझूक आगिनगाडी आणि कुठे गेले ते मामाचे गाव ?मामाचे गावही नाही आणि ती झुक झुक करणारी आगिनगाडीही नाही.

     आज फक्त मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांनी लहानथोर सगळ्यांनाच वेडं केलं आहे. पुर्वी सुट्टी पडली की मुले मैदानावर खेळायची. क्रिकेट,खोखो आट्यापाट्या, दोरी उड्या, हुतुतू सूरपारंब्यासारखे  खेळ खेळायचे. नदीत डुंबायला जायचं, विहिरीत पोहायला जायचं. आज ते खेळ राहिलेच नाहीत. जणू इतिहासजमा झालेत. त्यामुळे आजकालच्या लहान  मुलांचे बालपण हरवलेय. त्यांच्या सुट्टीची मजा म्हणजे फक्त मोबाईलवर गेम खेळणे आणि घरात राहून अरबट-चरबट, जंक फूड खाणं.टीव्ही पाहण्यामुळे , मैदानी खेळ न खेळल्यामुळे त्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागते.

लहान वयातच त्यांची जाडी वाढणे किंवा अनेक रोगांना बळी व्हावं लागतं. मैदानी खेळांची ओळख नसल्यामुळे घाम जाऊन किंवा खेळाचा निर्भेळ आनंदाला ही मुलं मुकलेली आहेत.या प्रकाराला कुठेतरी पायबंद घालणं आवश्यक आहे. ही पिढी अशीच भरकटत गेली तर भारताची अमेरिका व्हायला वेळ लागणार नाही. आत्ताच आपण, आपल्या पिढीने थोडं सावध व्हायला पाहिजे.आपणच आपल्या नातवंडांना बागेत खेळायला नेणे आणि वेगवेगळे खेळ शिकवणे,त्यांना गोष्टीरूप इतिहास सांगणे आवश्यक आहे.त्यांचे हरविलेले क्षण पुन्हा त्यांना उपभोगु देणे हे आपले परमकर्तव्य आहे.त्यामुळे मुलांची मानसिक बौद्धिक आणि शारीरिक ही वाढ होईल.मुलांना वाचनाची
आवड निर्माण करावी,दुपारच्या वेळी त्यांच्याशी इंग्रजी शब्दांची अंताक्षरी खेळणे.त्यांना महाभारतात
रामायणातील कथा सांगणे. फावल्या वेळेत गणिताचा अभ्यासही करून घेणे हे आजच्या पिढीसाठी आवश्यक झाले आहे.

    आधुनिक तंत्रज्ञान आले आणि या

तरूण पिढीच्या हातात मोबाईलरूपी खेळणे आले. ज्यात ही तरुणाई व्यसनाधीन झाल्याप्रमाणे अडकली गेली आहे. ना वेळेचे बंधन आणि नाही दुसऱ्या कामासाठी सवड! हातात मोबाईल घेऊन बसले की दिवस कसा आणि कुठे निघून जातो हेच लक्षात येत नाही. मोबाईल मधून माहिती किंवा अभ्यासात्मक खूप उपक्रम वाचायला मिळतात. परंतु मुले मात्र त्याचा गैरफायदा घेताना दिसत आहेत. दिवसभर चित्रपट, गेम आणि मालिका पाहण्यातच त्यांच्या वेळ व्यतित होत आहे. नित्यनियमाने अभ्यासात्मक दृष्टीने या मोबाईलचा उपयोग केला तर मोबाईल आपला मित्र बनू शकतो. नाहीतर तो शत्रू बनुन मानगुटीवर बसू पाहत आहे. याला वेळीच रोखले गेले नाही तर अभ्यास सोडून इतर ठिकाणी ही तरुण पिढी जास्त गुरफटलेली दिसून येईल. पूर्वीच्या काळी दूरदर्शन, मोबाईल, लॅपटॉप अशी आधुनिक साधनसामग्री नव्हती. त्यामुळे मुले मैदानी खेळ खेळण्यात रमून जात. त्यातून अंगमेहनतही होत असे. तब्येतीसाठी ते फायदेशीर असायचे. रानातला मेवा गोळा करत सूरपारंब्या, आट्यापाट्या, लगोरी, लंगडी, खोखो असे खेळ खेळले जायचे. घरी बसून लुडो, सापशिडी आणि चेक्ससारखे बौद्धिक खेळ खेळले जात असत. त्यामुळे मुलांची एकाग्रता वाढत असे. परंतु आता जास्त वेळ मोबाईल समोर बसल्यामुळे तरूणाईत स्थूलपणा वाढला आहे. त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.

        पूर्वी मुले सुट्टीला गावी जायची. त्यावेळी मामाच्या नारळाच्या वाडीत, आमराईत खूप हिंडायची. सर्वकाही मनसोक्त  खायची आणि ढवळ्या पवळ्या च्या बैलगाडीतूनदेखील त्यांची रपेट चालायची. वेळ काळाचे बंधन नसताना नदीत, विहिरीत मस्त पोहत असत, डुंबत असत. त्यामुळे गावच्या मातीची त्यांना खूप ओढ होती. हल्ली गावी जाणे होत नसल्यामुळे गावच्या मातीची ओढ राहिली नाही आणि मामाच्या बैलगाडीतून  फिरण्याचा षौकही राहिला नाही. त्यामुळे हल्ली मुलांचा कल पूर्णतया घरी बसून गेम खेळण्यावर असतो. याचे दूरगामी परिणाम त्यांच्या स्वास्थ्यावर होणार आहेत.  'कळतं पण वळत नाही' अशी स्थिती या तरुण मुलांची झालेली आहे. शहरात राहणाऱ्या मुलांची मैदानेदेखील आता इमारतींनी भरून गेलेली आहेत. त्यामुळे त्यांना खेळायला तितकीशी मोकळी जागा राहिली नाही.  घरात बसून दूरदर्शन आणि मोबाईलशिवाय त्यांना गत्यंतर नसते. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना छंद वर्ग असायचे. आता तेही शक्य नाही. त्यामुळे हल्ली मुलांचे फार नुकसान होत आहे.

सौ. भारती सावंत
मुंबई
9653445835

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular