Homeवैशिष्ट्येकोरोनानंतरची ही दिवाळी करूया आनंदाची…

कोरोनानंतरची ही दिवाळी करूया आनंदाची…

दिवाळी म्हणजे आनंद,उत्साह,चैतन्य. दिवाळी म्हणजे गोडवा. प्रकाशाची उधळण करत येणारा, अंधार दूर सारून प्रकाश देणारा सण म्हणजे दिवाळी.
‘ दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’. दिवाळी येते ती चांगली पाच-सहा दिवस मुक्काम ठोकून राहते. दिवाळी म्हणजे लहान मुलांसाठी ती एक पर्वणीच असते. लहान मुले दिनदर्शिकेवर दिवाळीची तारीख पाहतात. आणि दिवस मोजायला सुरुवात करतात. शाळेला सुट्ट्या लागलेल्या असतात. या दिवाळीला हे करायचं ते करायचं मुले गप्पात दंग असतात. फटाके कोणकोणते आणायचे याची यादी तयार असते. दिवाळीला नवे कपडे मिळणार याचा आनंदही मुलांच्या चेहर्‍यावर असतो. दसऱ्यानंतर दिवाळीची चाहूल लागते. घरातील महिला फराळाच्या तयारीला लागतात. आपल्या आपल्या आर्थिक नियोजनानुसार दिवाळी साजरी करतात. पाहुणे मंडळी एकमेकांच्या घरी जातात. गोड तिखट फराळाचा आस्वाद घेतात. घरोघरी दिव्यांची रोषणाई असते. सर्वजण एकमेकांना दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा देतात.

http://linkmarathi.com/तुम्हाला-दिवाळीत-बोनस-का/


दिवाळीच्या या पाच सहा दिवसाचे वेगळेच महत्त्व आहे. द्वादशीला वसुबारस साजरी करून गाय वासराची पूजा करतात. ‘दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी,’ हे गाणं म्हणून प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. धनत्रयोदशीला धनाची पूजा करतात व नैवेद्य दाखवतात. धन जपून वापरा हा संदेश मिळतो. त्यानंतरचा दिवस नरक चतुर्दशी. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला. बंदिवासात असलेल्या हजारो स्त्री-पुरुषांना मुक्त केले. म्हणून हा आनंदोत्सव साजरा करतात. अशी आख्यायिका सांगितली जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवसाचे व्यापारी वर्गात महत्त्व असते. ‘इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, असे म्हणत बलिप्रतिपदा साजरी केली जाते. कर्तव्यदक्ष, दानशूर शेतकरी राजाच्या स्मरणाचा हा दिवस. तर दीपावली पाडवा हा एक शुभ मुहूर्त समजला जातो. भाऊबीज हा भाऊ बहिणींच्या प्रेमाचा दिवस. असे प्रत्येक दिवसाचे आगळेवेगळे महत्त्व आहे. घरांना उजळून टाकणारे आकाश कंदील, सजवलेली घरे, अंगणातील रांगोळ्या, दिव्यांची रोषणाई, घराघरातून येणारा पदार्थांचा सुगंध. यामुळे घरोघरी आनंदाला उधाण आलेले असते.

http://linkmarathi.com/एका-दिवाळी-अंकात-प्रसिद्/


कोरोनाची आज भीती कमी झालेली आहे. परंतु कोरोना अजूनही गेलेला नाही याचेही भान असावे. घरोघरी दिवाळीची तयारी सुरू आहे. नियमांचे पालन करून दिवाळी उत्साहात साजरी करावी. या कोरोनाच्या काळात अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली. कित्येकांचा कोरोनाने मृत्यू झाला. अनेकांचे रोजगार , उद्योगधंदे बुडाले. ज्या घरी कोरोना पेशंट निघाले पाण्यासारखा पैसा खर्च झाला. आज या लोकांच्या घरी खरच दिवाळी साजरी होईल का ? ज्या घरातले दिवे विजले त्या घरी दिवे पेटतील का ? घरातील व्यक्ती मेल्यानंतर टाहो फोडले आज त्या घरी फटाके फुटतील का ? ज्या घरातील स्री गेली तिथे लक्ष्मीपूजन होईल का ? कुणाचा भाऊ कुणाची बहीण गेली.त्या घरी भाऊबीज साजरी होईल काय ? ईडा पिडा टळो म्हटल्याने खरचं ईडा पिडा जाईल का ? कोरोनानंतरची दिवाळी आनंदाने साजरी होईल का ? श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला म्हणून नरक चतुर्दशी . बंदिवानात असलेल्या हजारो स्त्री-पुरुषांना मुक्त केले. आनंदोत्सव साजरा केला. आज या नरक यातनेतून बाहेर काढण्यासाठी श्रीकृष्ण येईल काय ? प्रश्न अनेक असले तरी उत्तरेही आपल्याला शोधायचे आहे. त्यावर मार्ग काढायचा आहे. प्रत्येकाची दिवाळी आनंदाची व्हावी यासाठी खारीचा वाटा उचलायचा आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण येथे महापुराने कितीतरी कुटुंब उध्वस्त झाली. मराठवाड्यात अतिवृष्टीने पिकं पाण्यात बुडाली. ही संकटाची मालिका सुरूच आहे. परंतु मानवतेच्या नात्याने शक्य तेवढं कार्य करूया. आपल्या घासातला एक घास या लोकांना द्या. एक घास चिऊचा, एक घास काऊचा, आता एक घास या दुःखितांचा. नक्कीच शतपटीने आनंदी व्हाल. तुमच्या घरी रोजच दिवाळी होईल. चांगल्या विचाराची, चांगल्या कार्याची, चांगल्या संस्काराची. आपण पुढील पिढीला काय देणार असू तर हेच विचार. आपण किती उजेडात आहोत यापेक्षा आपल्या मुळे किती उजेडात आहेत हे महत्त्वाचे आहे. मी किती श्रीमंत आहे याला अजिबात महत्व नाही. परंतु माझ्यामुळे किती घडले . मी किती जणांच्या उपयोगी आलो हे महत्त्वाचे आहे. आपल्या घरी आनंदाची दिवाळी साजरी करा. आणि इतरांच्या घरीही दिवाळी साजरी होईल याची काळजी घ्या. देतो तो देव आणि राखतो राक्षस. दिल्याने वाढते, राखल्याने संपते. म्हणून मदत करा.
आपल्या आसपास असे कुटुंब असतील तर नक्की मदत करा. आज या कुटुंबांना आधाराची गरज आहे. या कुटुंबाचा तुम्ही आधार व्हा. चांगले कार्य करण्यासाठी आपण येथे आलो आहोत. ही संधी दवडू नका.
करावे सहाय्य / धावुनिया जावे/
आधार बनावे / दुःखितांचा //१//
आनंदाचा व्हावा / दीपावली सण /
तन मन धन / सेवा करा //२//
हास्य मुखावरी / तयांच्या येईल /
दिवाळी होईल / आनंदाची //३//
दुसर्‍याचे दुःख / आपले मानतो /
तोची धन्य होतो / कृष्णा म्हणे //४//

खरंच आपल्याला दातृत्वाची ,कर्तुत्वाची ,संस्काराची, विचाराची खूप मोठी परंपरा आहे. ही परंपरा जतन करूया. कोरोनानंतरची ही दिवाळी आनंदाची करूया. आनंद देऊया आनंद घेऊया.
दुसऱ्याच्या सुख-दुःखात सहभागी होऊन आपण ही दिवाळी प्रकाशमान करूया.

  • लेखक – श्री.किसन आटोळे सर

https://surveyheart.com/form/615fcb6ec182fe215fb90303

महाराष्ट्रात लोकप्रिय होत असल्येल्या Link मराठी पोर्टल मध्ये स्वतःच्या नाव सह आपले लेख- कविता प्रकाशित करण्याची इच्छा असलेल्या लोकांनी फॉर्म भरावा आणि आपल्या लेखन कॉपी-पेस्ट होण्याच्या चिंता दूर करावी. आमची टीम लवकरच संपर्क साधेल.

www.linkmarathi.com


वाहिरा ता.आष्टी जि.बीड

दररोजच्या अश्या पोस्ट सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच खालील फेसबुक पेज ला Like आणि Follow करून Link Marathi मध्ये सामील व्हा… 👇
लिंक मराठी च्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ही वर सामील व्हावे.

वेबसाईट-
www.linkmarathi.com

फेसबुक पेज -: https://www.facebook.com/Link-Marathi-114377503760034/

Instagram – :


अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular