Homeवैशिष्ट्येकोल्हापुरातील नवदुर्गा - माहिती

कोल्हापुरातील नवदुर्गा – माहिती

कोल्हापुरातील नवदुर्गा

आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. नवरात्री अर्थात देवीची आराधना करण्याचे पवित्र नऊ दिवस. कोल्हापूर परिसरात देवीची इतर नऊ जागृत देवस्थाने आहेत. यांना एकत्रित नवदुर्गा असे संबोधतात. नवरात्रीच्या काळात या नवदुर्गाचे आवर्जून दर्शन घेतलं जातं. चला तर पाहूया कोणत्या आहेत या कोल्हापुरातील नवदुर्गा.

1) एकांबिका (एकविरा देवी) नवदुर्गाच्या मालिकेतील पहिली दुर्गा आहे एकांबिका. आझाद चौकातील कॉमर्स कॉलेजजवळ या एकांबिकेचे छोटे मंदिर आहे. एकविरा, रेणुका, यल्लमा अशी या देवीची इतर नावे आहेत. ही शक्तिप्रधान देवता मानली जाते.

2) मुक्तांबिका (मुकांबा देवी) – नवदुर्गामधील दुसरी दुर्गा आहे मुक्तांबिका. या देवतेला मुकांबा असेही म्हणतात. दुर्गेचे ज्ञानमय मुक्तस्वरूप असे हिचे वर्णन केले जाते. ही आद्य शंकराचार्याची उपासना देवता आहे. मंगळवार पेठेतील साठमारी येथील विवेकानंद आश्रमाजवळ मुकांबेचे मंदिर आहे. मुकांबा ही विशेषत: कर्नाटकातील काही कुटुंबांची कुलदेवतादेखील आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे या मंदिरामध्ये स्वामी विवेकानंदांचे काही काळ वास्तव्य होते. मंदिरासमोरील मार्गाला आता रामकृष्ण मार्ग असे नाव दिले गेले आहे.

3) पद्मांबिका (पद्मावती देवी) – नरसिंह स्वरूप असणारी पद्मावती ही नवदुर्गापैकी तिसरी देवता आहे. पद्मावती देवीला पापनाश करणारी म्हटले जाते. लोकप्रिय अशा जयप्रभा स्टुडिओजवळ या पद्मावती देवीचे मंदिर आहे. याच ठिकाणी पद्मावती तळेदेखील आहे.

4) प्रियांगी देवी (फिरंगाई) पूर्वीच्या काळी कोल्हापुरामध्ये पाच छोटी छोटी गावं वसली होती. या गावांचे मिळून सध्याचे कोल्हापूर वसले आहे. आणि ही फिरंगाई गावाची ग्रामदेवता. फिरंगाई ही नवदुर्गाच्या मालिकेतील चौथ्या क्रमांकाची देवता. प्रियांगी असेदेखील या देवीला म्हटले जाते. ही देवता पीडाहारक आहे असे मानले जाते. पद्माराजे शाळेजवळ या देवीचे मंदिर आहे. मंदिरामध्ये आपल्याला देवीची छोटी मूर्ती पाहायला मिळते. या मंदिराजवळ पूर्वी तळे होते. या तळ्यातील पाणी हे त्वचारोगांवर उपचार म्हणून वापरले जायचे असे सांगितले जाते.

5) कमलजा (कमलांबिका देवी) कमलजा ऊर्फ कमलांबा ही नवदुर्गाच्या मालिकेतील पाचवी देवता आहे. अर्धा शिवाजी पुतळ्यावरून रंकाळा तलावाच्या दिशेने जाताना अपना बँकेजवळ पंत अमात्य बावडेकरांच्या वाडय़ामध्ये या देवीचे मंदिर आहे. मंदिरामध्ये कमळावर बसलेली देवीची मूर्ती आहे. कमलजा हे दुर्गेचे अभयदायक स्वरूप मानले जाते. या देवीला देवांची रक्षक मानले जाते.

6) महाकाली (कलांबिका देवी) – महाकाली हे शक्तीचे प्रतीक मानले गेले आहे. हे दुर्गेचे संहारक रूप आहे. महाकाली ही रामकृष्ण परमहंसांची उपासना देवता आहे. या देवीचे तोंड दक्षिणेला आहे. त्यामुळे या देवीला दक्षिण कलिकादेखील म्हटले जाते. शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकाजवळ महाकालीचे मंदिर आहे. ही नाथ संप्रदायाची देवता आहे. त्यामुळे मंदिराच्या आसपास आपल्याला नाथ संप्रदायातील लोकांच्या समाध्या पाहायला मिळतात. महाकाली ही नवदुर्गामधील सहावी देवता आहे.

7) अनुगामिनी (अनुगाई देवी)अनुगामिनी ही नवदुर्गामधील सातव्या क्रमांकाची देवता. ‘गम’ म्हणजे जाणे आणि ‘अनु’ म्हणजे पाठीमागून. पाठीमागून जाणारी ही देवता आहे. ही देवता कोल्हापूरबाहेर मृत होणाऱ्या आत्म्याला पाठीमागून जाऊन मुक्ती देते.रंकाळा टॉवर परिसरामध्ये अनुगामिनीचे मंदिर आहे. सहा हातांची आणि पायाखाली राक्षसाचा संहार करणारी ही मूर्ती आहे.

8) गजलक्ष्मी (गजांबिका देवी)नवदुर्गाच्या मालिकेतील आठवी देवता आहे गजलक्ष्मी किंवा गजांत लक्ष्मी. गजलक्ष्मीचे मंदिर तोरस्कर चौकाजवळील कुंभार गल्ली येथे आहे. हा भाग पूर्वीच्या ब्रह्मपुरी गावामध्ये येणारा होता. मंदिरामध्ये काळ्या पाषाणाची तीन फूट उंचीची ही देवता आहे. गजलक्ष्मी हे संपन्नतेचे प्रतीक आहे.

9) श्रीलक्ष्मी – श्रीलक्ष्मी ही नवदुर्गामधील नववी आणि शेवटची देवता. राणाप्रताप चौकातील वजन मापे कार्यालयाच्या प्रांगणातच या देवीचे मंदिर आहे. पूर्वी या ठिकाणी हत्ती महाल होता. शाहू महाराजांचे हत्ती येथे असायचे. ही देवता संपत्ती आणि आरोग्य देणारी मानली जाते.

नवरात्रीच्या काळामध्ये नागरिक या नवदुर्गांची यात्रा करतात. या यात्रेची सांगता मात्र दोन अशा देवींच्या दर्शनाने होते ज्यांचा समावेश नवदुर्गामध्ये होत नाही. त्यातील एक आहे त्र्यंम्बोली म्हणजेच टेंबलाई. शहराच्या पूर्वेला टेकडीवर त्र्यंम्बोली देवीचे मंदिर आहे. ही महालक्ष्मीची सेवेकरी मानली जाते. तर दुसरी आहे कात्यायनी. कात्यायनी ही शहराच्या दक्षिणेला आहे. कळंब्यापासून पुढे गेल्यावर कात्यायनी मंदिर लागते.

संकलन

लेखक प्रसिद्ध पत्रकार आहेत

आनिल पाटील ( कोल्हापूर )

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

1 COMMENT

- Advertisment -spot_img

Most Popular