Homeवैशिष्ट्येचिऊताई चिऊताई परत ये

चिऊताई चिऊताई परत ये

    आज जागतिक चिमणी दिवस..... मला तरी शहरात चिमणी पाहून बरेच दिवस झाले, गावाकडे आजही बऱ्यापैकी दिसतात. यावरून आठवण झाली की, खरचं चिमणी पाहून बरीच वर्षे झाली आहेत आपल्याला. शेवटचं कधी चिमणीला मनसोक्त डोळे भरून पाहिलय ते पण आठवत नाहीय.

           मग मी आपल्या कोल्हापूरात जाणीवपूर्वक निदान एक तरी चिमणी दिसते का ते पाहण्यासाठी पूर्ण दिवसभर तिचा शोध घेतला व फिरलो पण शेवटपर्यंत चिमणी काही दिसली नाही. तिचा चिवचिवाट तर दूरच. मन जरासं खट्टू झालं, उदास झालं आणी संध्याकाळ होताच चिमणी न दिसल्याच्या नाराजीत मन पुन्हा लहानपणीच्या nostalgic मोड मध्ये गेलं.

        आपल्या लहानपणी, कावळयाच्या वाहून गेलेल्या शेणाच्या घराची व चिमणीच्या मेणाच्या घराची गोष्ट प्रत्येक आईने आपल्या बाळाला सांगितलेली आहे… ‘एक घास चिऊचा’ व ‘एक घास काऊ चा’… असं म्हणत आपल्या चिमुकल्याला प्रत्येक आईने चार घास भरवले आहेत. चिऊताईची ही पहिली ओळख आईने आपल्याला करून दिली आहे त्यामुळेच की काय, ‘चिमणी’ लहानपणापासून मनाच्या जवळ असलेला पक्षी आहे. पण आज आपण मोठं झालोय आणी आपली छोटीशी इवलीशी चिऊताई आपल्यापासून दुरावली आहे.

मग चिऊताई गेली तर कुठं?

का ती रुसली आपल्यावर? का ती दुरावलीय आपल्यापासून?

खरच आपण माणसं याला कारणीभूत आहोत का?

         या सर्व प्रश्नांच्या शोधामध्ये आपली चिऊताई मात्र हरवलीय हे नक्की. दिवसभर एकही चिमणी न दिसल्यामुळे मी एकांतात जाऊन अंतर्मुख होऊन विचार केला. मग काही जटिल प्रश्न जे आपणच तयार केले आहेत ते माझ्या डोळ्यासमोर आले.

म्हणजे बघा आता,

पूर्वीच्या जुन्या घरांमध्ये – वाड्यामध्ये, कौलांच्याखाली,वळचणीत, भिंतीमध्ये निखळलेल्या विटांच्या मध्ये चिमण्या दिसायच्या. मातीत अंघोळ करताना त्या दिसायच्या. पण आज जुनी घरं नाहीयत आणी दारात माती असलेली अंगणं पण नाहीयत. फ्लॅट संस्कृती आली, इमारती झाल्या, बंगलो स्कीम्स झाल्या मग ती बिचारी कुठं आपलं घरटं करणार?

पूर्वी आपल्या घरांमध्ये अंगणात आणी गच्चीवर वाळवणे, पाखडणे, निवडणे असली कामे नेहमीच व्हायचीत. पण आज आपण डी मार्ट आणि बिग बाजार मधून मोठ्या दुकानातून ‘पॅकड’ धान्य आणतो, मग चिऊताई धान्य कोठून मिळवणार?

पूर्वी परडं आणी परस प्रत्येक घरामागे असायचं. पण आता गॅलरीत अन टेरेसवर कुंडी,बगीचा हा ट्रेंड आला आणी त्यावर पण कीटकनाशके फवारण्यात येऊ लागली, मग आपल्या मोकळ्या परड्यात कीटकं पकडणारी चिमणी कुठं दिसणार?

पूर्वी रस्त्यावर वाहनांची एवढी वर्दळ नसायची आणी घरोघरी एवढी वाहनं पण नसायची, पण आता मात्र घरातल्या प्रत्येकाचं एक वाहन झालयं. ट्रॅफिकचा गोंगाट दिवसापण आणी रात्री पण सुरू आहे. याचा थेट परिणाम चिमण्यांच्या विणीवर होत आहे. त्यांच्या शरीरावर होत आहे. मग त्या शहरं सोडण्याशिवाय आणखी काय करणार?  कुठं जाणार?

           आज गावाकडं बऱ्यापैकी चिमण्या दिसतात कारण तिथं माणसाच्या जीवनपद्धतीत, राहणीमानात अमूलाग्र असा बदल झालेला नाहीय. त्या तिथं टिकून आहेत. आपल्यासारख्या शहरी पिढीनं चिऊताईला बघितलय,

पण आपली पुढची पिढी कशी व कुठं बघणार चिऊताईला? युट्युबवर???

चिऊताईचा सुमधुर चिवचिवाट कसा ऐकणार?  युट्युबवर???

मातीतली अघळपघळ अंघोळ कुठं पाहणार? युट्युबवर???

        असो, आज आपली चिऊताई हतबल झाली आहे, असहाय आहे ती. फक्त मोबाईल टॉवर आणी आधुनिक तंत्रज्ञान यांना दोष देऊन मोकळं होण्यापेक्षा आपल्या राहणीमानात जाणीवपूर्वक व जबाबदारीपूर्वक बदल करणे हीच आपल्या चिऊताईप्रती खरी कृतज्ञता ठरेल. तेव्हा मात्र आपण हक्कानं म्हणू शकू,

चिऊताई चिऊताई  परत ये……!!!


  • अभिजीत सुनिल वाघमोडे
    वर्ल्ड फॉर नेचर,
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular