Homeवैशिष्ट्येजगाला खरा धर्म सांगून सर्व धर्मांचा सन्मान करणारे महान व्यक्तिमत्त्व स्वामी विवेकानंद...

जगाला खरा धर्म सांगून सर्व धर्मांचा सन्मान करणारे महान व्यक्तिमत्त्व स्वामी विवेकानंद यांचे खरे विचार उपलब्धतेची गरज आहे.

“निस्वार्थ मानवसेवा हाच खरा धर्म” अशी धर्माची व्याख्या करणारे स्वामी विवेकानंद यांचा स्वार्थी वापर करणारे त्यांचे खरे धर्मविषयक व समाजविषयक विचार बाजूला ठेवून हेतुपरस्पर वापरतात पण आपण खरे विवेकानंद समजून घेऊन जोपासण्याची गरज आहे – मनोज गावनेर

स्वामी विवेकानंद हे तथागत गौतम बुद्ध यांच्या करूणामय धर्मविचाराला मानणारे होते. म्हणून स्वामीजी म्हणायचे कि, “एखाद्या धर्मग्रंथात लिहिले आहे म्हणून किंवा एखाद्या धर्मगुरूने सांगितले आहे म्हणून त्यावर डोळेझाकपणे अंधविश्वास न करता, तो विचार तुमच्या विचारशक्तीला पटत नसल्यास ठामपणे नकारा. कारण परमेश्वराने मानवाला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे विचार करण्याची शक्ती. म्हणून कोणत्याही गोष्टिचा विचार न करता आंधळेपणाने स्वीकारणे म्हणजे पशूच्या पातळीत पोचणे” असे त्यांचे मत होते. त्यांनी जुनाट अंधश्रद्धा व जातिआधारित भेदभाव संबंधी प्रश्न उपस्थित केला होता आणि सारासार विचार व व्यवहारी दृष्टिकोण यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यांचे धर्मविषयक विचार हे स्वतः जागून इतरांना जागवणारा व इतर धर्मांमधील चांगले विचार आत्मसात करून इतर धर्मांनाही जोडणारा होता. ते जगातील सर्वच धर्मांचा सन्मान करत. म्हणून धर्म जाणून घ्यायचा असेल व आध्यात्मिक उन्नती करायची असेल तर खरे स्वामी विवेकानंद जाणून घेणे आवश्यक आहे. सद्यपरिस्थितीत काही स्वार्थी आपला स्वार्थ साधण्यासाठी धर्माचा आंधळा अतिरेक करताना दिसत आहे व इतर धर्मांप्रति तिरस्कार करण्याची भावना निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असताना दिसते व धर्माला हिंसक वळण लावण्याचे काम चालू आहे. हे सर्व हाणून पाडण्यासाठी जगाला धर्मविषयक संदेश देणारे स्वामी विवेकानंद यांना समजून घ्यावे लागेल. पण त्यासाठी गरज आहे स्वामी विवेकानंद यांचे खरे विचार सांगणाऱ्या स्रोतांच्या उपलब्धतेची. यासाठी आपल्याला सारासार विचार व व्यवहारी दृष्टिकोण बाळगावा लागेल. म्हणून उठा, जागे व्हा आणि ध्येयप्राप्त झाल्याशिवाय थांबू नका.
स्वामी विवेकानंदांनी शिक्षणाविषयी विचार मांडताना म्हटले की, “शिक्षण म्हणजे एखाद्याच्या अंगी अगोदरपासून असलेल्या पूर्णत्वाचा आविष्कार होय.”
अशा या मला भावलेल्या व नेहमीच प्रेरणादायी मार्गदर्शक ठरलेल्या महान व्यक्तिमत्त्व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त नमन्..


स्वामी विवेकानंद यांची जयंती आपण देशभरात युवक दिन म्हणून साजरा करतो. स्वामी विवेकानंदांचे संपूर्ण जीवन व विचार युवकांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे. आजच्या युवकाला कुणी भडकावले कि लगेच भडकतो, युवकांना सर्वात जास्त जाति धर्माबद्दल द्वेष पसरवून भडकविल्या जाते आणि युवकांना खरा धर्म च माहित नसल्याने मुठभर लोकांच्या फायद्यासाठी युवक बळी पडतो. म्हणून आजच्या युवकाला जर कुणी धर्माची परिभाषा व शिकवण कुणी देऊ शकते तर ते आहे स्वामी विवेकानंदांचे खरे विचार. युवक ‘छत्रपति शिवाजी महाराज की जय’ तर म्हणतात पण शिवाजी महाराजांच्या जीवन विषयक विचारांना स्वतःच्या जीवनात उतरवून घेत नाहित. युवकांसमोर अनेक महापुरुषांचे जीवनचरित्र आहे फक्त ते समजून घेऊन सत्यता पडताळून आपल्या जीवनात तशा प्रकारची वागणूक ठेवण्यासाठी प्रयत्नशिल राहिल्यास देशाचा सर्वांगिण विकास होणे अपरिहार्य आहे. जगातील सर्व देशांपेक्षा भारत देशात सर्वात जास्त युवक आहेत म्हणून “भारत हा युवकांचा देश” म्हणून ओळखला जातो. युवाशक्ती च्या सहाय्याने संपूर्ण जगात बदल घडविल्या जाऊ शकते. स्वामी विवेकानंदांनी सांगितल्या प्रमाणे “स्वतः जागा व इतरांना जागवा” असा संदेश दिला आणि असे सामर्थ्य युवकांमध्ये असते. युवा वर्गाने कोणतीही गोष्ट करायची ठरविल्यास ते पूर्ण करण्याची कुवत युवकांमध्ये असते. म्हणून युवा वर्गाने कुणाच्याही भडकविण्यात न येता प्रत्येक गोष्टिबद्दल माहिती घेऊन सारासार विचार करूनच गोष्ट स्वीकारावी व स्वतःचे मत मांडत राहावे. लाथ मारेल तिथे पाणी काढण्याची कुवत प्रत्येक युवकांमध्ये असते फक्त आपली शक्ति ओळखता यावी. “लाथ मारून पाणी काढणे” म्हणजे यात शक्तिचाच उपयोग होतो असे बिलकुल नसून यात शक्ति आणि युक्ति अशा दोहोंचा संगम म्हणजे युवक. युवकांची अशी परिभाषा करताना यामध्ये वयाची कुठलीही अट नसते. नव्वद वर्षांच्या व्यक्तिमध्ये जर नवनिर्मितीचा ध्यास असेल, ऊर्जा असेल तर नव्वद वर्षाचा व्यक्ति सुद्धा युवकच आहे. म्हणून जगातील सर्व युवकांना माझा साष्टांग दंडवत व युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

मनोज प्रल्हाद गावनेर

मु.पो. मंगरूळ चवाळा, ता. नांदगाव खंडेश्वर, जिल्हा – अमरावती

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular