Homeवैशिष्ट्येयशोदा एक आईच

यशोदा एक आईच

प्रिय माईस,
तू हे पत्र बघून आश्चर्यचकीत होशील हे मला माहीत आहे. असं घरातल्या घरात कोणी पत्र लिहितं का विश्वनाथ? तू तुझ्या नेहमीच्या सौम्य शैलीत म्हणशील. माई, जे सांगायचे आहे ते तुझ्या समोर बोलता येईलच असे मला वाटत नाही म्हणून लिहितो आहे.
माई तू या घरात आलीस तेव्हा मी सात वर्षांचा होतो.
त्या आधीची आठवण म्हणजे माझ्या आईला खूप बरे नव्हते. खूप दिवस ती हॉस्पिटलमध्ये होती. तिला बाळ होणार म्हणून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले पण पुढे नक्की काय झाले ते कळण्याइतका मी मोठा नव्हतो. एके दिवशी सकाळी मी घरातले आवाज ऐकून उठलो तर आई घरी आली होती. तिला जमिनीवर झोपवलेले होते. तिच्या तोंडावर तुळशीचे पान होते आणि नाकात कापूस. कापसाने आईला गुदगुल्या होत असतील या विचाराने मी तो कापूस काढण्यासाठी आईजवळ जायला लागलो तर तेवढ्यात आजीने मोठ्याने रडत मला जवळ घेतले. तुझी आई देवाघरी गेली रे! असे ती म्हणाली. आई अशी कशी गेली. मला कळलेच नाही. देवाघरी तर म्हातारी माणसे जातात मग आई कुठे म्हातारी होती! मी खूप गोंधळलो होतो. बाबांना शोधत होतो. बाबा एका कोपऱ्यात खाली मान घालून बसलेले होते. त्यांनी मला जवळ घेतले आणि ते पण रडायला लागले. बाबांना रडताना बघून मी पण भोकाड पसरले.
शेजारच्या डिंपलच्या आई कसेबसे समजावून मला त्यांच्याकडे घेऊन गेल्या. त्या दिवशी कधीतरी मला खोलवर जाणवले की आई आता कधीच परत येणार नाही.
मग कधी आत्या, कधी मावशी, कधी आजीच्या बोलण्यातून मला कळले की बाबा मला दुसरी आई आणणार आहेत. दुसरी म्हणजे सावत्र! शाळेतले मित्र पण हेच म्हणत होते. सावत्र आई म्हणजे कोणीतरी दुष्ट बाई असते. ती मुलांचा छळ करते असे काहीसे चित्र माझ्या मनात तयार होत गेले.
एक दिवशी बाबा मला शाळेत सोडायला आलेले असताना मी त्यांना विचारले, “बाबा तुम्ही मला दुसरी सावत्र आई आणणार? ती मला त्रास देईल, उपाशी ठेवेल. आपल्याला दुसरी आई नको बाबा.”
बाबांनी चमकून माझ्याकडे पाहिले. बाबांची ती नजर मला आजही आठवते.
मग संध्याकाळी बाबांनी मला फिरायला नेले. मला बरेच काही सांगत होते. मला नीटसे कळले नाही पण ते नवीन आई आणणार होते आणि ती दुष्ट नाही असे ते सांगत होते.
काही दिवसांनी मला बाबांनी नवीन कपडे आणले. बाबांनी पण नवीन कपडे घातले होते. आजी सारखी डोळे पुसत होती. आम्ही कुठेतरी हॉलवर गेलो. तिथे तू होतीस. हिरवी साडी नेसलेली! तुझ्याबरोबर आणखी कोणी कोणी आलेले होते. बाबांनी आणि तू एकमेकांना हार घातलेत. तू माझ्याकडे बघून हसलीस. मला जवळ बोलावलेस पण मी दूरच उभा होतो. आत्याला चिकटून. आपण सगळे जेवायला हॉटेलमध्ये गेलो होतो. मग तू घरीच आलीस आमच्याबरोबर.
ही तुझी नवी आई. हिला आजपासून तू आई म्हणायचे. बाबांनी सांगितले.
मी मात्र अडेलतट्टू प्रमाणे “ही नाही माझी आई! मला नको नवी आई!” असे म्हणून आत निघून गेलो.
आता तू किंवा बाबा मला रागवाल असे वाटले पण तसे झाले नाही. तू शांतच होतीस. तुझ्याबद्दल माझ्या मनात आढीच होती. कदाचित सगळ्यांनी सारखे सावत्र आई म्हणजे वाईट असे भरवून दिले म्हणून असेल. आणि इतके दिवस मी आणि बाबा दोघेच आमच्या रूम मध्ये झोपायचो आणि तू घरी आल्यावर मला आजीच्या पुढ्यात झोपावे लागले याचाही राग होताच मनात.
मी दिवसेंदिवस हट्टी होऊ लागलो होतो पण तू कधीही रागावली नाहीस. तू एखादी गोष्ट करायला सांगितलीस की मी मुद्दाम ती गोष्ट करायचो नाही. तुला सतत टोचून बोलायचो. तू मला आवडत नाहीस हे दाखवून देण्याची मी संधीच शोधायचो.
तुझ्या स्वभावामुळे तू घरातल्या सगळ्यांना आपलसं केलस. अगदी आत्या आणि आजीला देखील. पण मी मात्र तुझा रागराग करायचो. मित्रमैत्रिणी कधी घरी आले तर त्यांची तुझ्याशी ओळख करून देताना तू माझी सख्खी आई नाहीस हे त्यांना कळेल असे काही ना काहीतरी करायचोच. परीक्षेला जाताना मुद्दाम आईच्या फोटोला पाया पडायचो.फोटोतल्या आईशी बोलायचो. पण तुझ्याशी कधीही कामापलीकडे बोलायचो नाही. बाबा, आजी अनेकदा मला रागवायचे. असा का वागतोस म्हणून जाब विचारायचे. एखाद दोन वेळा बाबांचा मारही खाल्लाय. तेव्हा तू मध्ये पडलीस.बाबांना समजवायला गेलीस. यात तुझी काहीही चूक नसताना. “माझे बाबा मला मारतील नाहीतर माझे लाड करतील तू कोण मध्ये पडणारी?” असे मी तुला म्हणालो होतो. तू निमूटपणे तिथून निघून गेलीस.
मी कधीही तुला लाडाने विशू अशी हाक मारू दिली नाही.माझे आईबाबाच मला विशू म्हणतात. इतरांनी विशू म्हटलेले मला चालणार नाही असे मी म्हटल्यावर त्यानंतर कधीही तू मला विशू म्हणून हाक मारली नाहीस. माझ्या बक्षीस समारंभाला, पालकसभेला तुला येऊ दिले नाही. तू तरीही रागावली नाहीस. माझ्या दहावीच्या वर्षभर तू माझ्या छोट्यामोठ्या गरजांकडे नीट लक्ष देत होतीस. माझ्या समोर नसलीस तरी घरातच असायचीस. माझे क्लासेस, माझा अभ्यास सगळे नीट चालू आहे ना याची बाबांकरवी चौकशी करायचीस.
माझ्या प्रिलिममध्ये मी शाळेत पहिला आलो तेव्हा तुला झालेला आनंद मला जाणवला होता. पण… हा पणच आड येत होता.
माझ्या दहावीच्या परीक्षेआधी बाबा मला एकट्याला बाहेर घेऊन गेले होते. त्यांनी कळवळून कितीतरी गोष्टी सांगितल्या आणि माझे डोळे खाडकन उघडले.
माई तू खरच किती ग्रेट आहेस!
माझ्या परिक्षकांच्या आधी जे सराव पेपर बाबा मला द्यायचा ते तू काढलेले असायचे.
तू पालक सभेला आली नाहीस तरी नंतर किंवा आधीच तू माझ्या बाईंना भेटून माझी प्रगती जाणून घ्यायचीस.मला काय हवे असावे याचा आधीच विचार करून तू बाबांकरवी किंवा आजीकरवी ती वस्तू माझ्यापर्यंत पोहोचवायचीस. इतकेच नाही तर स्वतःला मूल झाले तर नकळत माझ्याकडे दुर्लक्ष होईल. तसे होऊ नये म्हणून तू स्वतःला मूल होऊ दिले नाहीस….
माई, तू इतकी चांगली का आहेस?
तुला एक विचारायचे होते परवा माझा दहावीचा रिझल्ट आहे. शाळेत मार्कशीट पण त्याच दिवशी देणार आहेत. तू येशील माझ्याबरोबर शाळेत?
तुझा लाडका
विशू
(मी तुला पत्र लिहिलेय हे बाबांना सांगू नकोस प्लीज)

माईने हे पत्र वाचले. तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येत होते. इतक्या वर्षांच्या तिच्या तपश्चर्येला फळ आले होते. ती विजयची बायको झाली होती. घरची सून झाली होती पण विश्वनाथची आई कधीही होऊ शकली नव्हती.
विश्वनाथच्या दहावीच्या रिझल्टच्या आदल्या दिवशीच तो मुंबईत पहिला आल्याचे कळले. माईला आणि सगळ्यांनाच कोण आनंद झाला होता.विश्वनाथला कुठे ठेऊ आणि कुठे नको असे त्यांना झाले होते. विश्वनाथ पण खूप खुशीत होता. त्याची मुलाखत घ्यायला आलेल्या टिव्ही चॅनलवाल्यांना त्याने ही माझी आई अशी माईची ओळख करून दिली आणि माई भरून पावली. हिने मला सरावपेपर काढून दिले. माझ्या अभ्यासाकडे, माझ्याकडे लक्ष दिले म्हणून मी हे यश मिळवू शकलो असे त्यानेआवर्जून सांगितले.
आज खऱ्या अर्थाने आनंदाचा दिवस होता.
दुसऱ्या दिवशी शाळेत सत्कार होता. सगळ्यांना मार्कशीट, सर्टिफिकेट देण्यात येणार होते.
विश्वनाथ माई आणि बाबा दोघांसह टाळ्यांच्या कडकडाटात स्टेजवर गेला. शाळेच्या मुख्याध्यापिकांनी त्या तिघांच्या हातात दहावीची मार्कशीट ठेवली. त्यात विश्वनाथचे नाव होते
विश्वनाथ वनिता वैशाली विजय देसाई
विश्वनाथची ही कृती पाहून माई हेलावून गेली.
सत्काराला उत्तर देताना विश्वनाथ म्हणाला. ” आजच्या माझ्या यशात सगळ्यात मोठा वाटा आहे माझ्या आईचा! माझ्या जन्मदात्या आईचा नाही तर मला मोठा करणाऱ्या माझ्या माईचा. मी तिचा कितीही राग राग केला तरी तिने मात्र माझ्यावर प्रेमच केले. आई किती ग्रेट असते ते तिने तिच्या कृतीने दाखवून दिले. एखाद्या मुलाची आई होण्यासाठी त्या मुलाला जन्मच द्यायला पाहिजे असे नाही. हे तिने पुन्हा सिद्ध केले. यशोदा की देवकी कोण कृष्णाची जास्त आई होती? दोघींचेही स्थान तितकेच महत्त्वाचे. मी नशीबवान की मलाही अशाच दोन आया मिळाल्या. आजचे माझे यश माझ्या माईला, नाही नाही माझ्या आईला समर्पित करतो. “

डॉ. समिधा गांधी
( आजच्या मदर्स डे च्या निमित्ताने समाजातील तमाम माईंना समर्पित)

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular