Homeमुक्त- व्यासपीठजीवधन- रोप चा वापर केलेला माझा पहिला ट्रेक.

जीवधन- रोप चा वापर केलेला माझा पहिला ट्रेक.

खरं तर जीवधन या ट्रेक विषयी आधी काहीच माहिती नव्हती,
पण ट्रेक ची प्रचंड आवड असल्याने लगेच तयार झालो.
स्टार हॉस्पिटल आकुर्डी यांनी शिवाजी ट्रेल जुन्नर यांच्या मदतीने ट्रेक चे आयोजन नियोजन केले.
सुरवातीला कुबडे सरांनी लिमिटेड 35 सिट असणार आहेत सांगितलं पण जस जसा ट्रेक च दिवस जवळ यायला लागला तास तशी ही संख्या 52 वर येऊन ठेपली. ट्रेक च्या गृप वर मस्तीला उधान आले होते, ट्रेक कसा आहे याची बहुतेकांना माहिती नव्हती त्यामुळे अगदी उत्साहात सगळे तयारी करत होते.
आमच्या नादि लागून बरेच नवशिके ट्रेकर की जे पहिल्यांदाच ट्रेक ला येनार होते ते ही यात सामील झाले. (कदाचित त्यातल्या बऱ्याच जणांचा हा पहिला आणि शेवटचा ट्रेक असावा हा, बोन्डे सरांच्या म्हणण्यानुसार बेड वरून उतरताना ही रोप शोधणार बरेच जण 😜😜).

13 ऑगस्ट 2017
ट्रेक चा दिवस ठरला,
ट्रेकर्स ची फायनल लिस्ट तयार झाली,
नेहमीप्रमाणे संदिप सांडभोर सरांनी ट्रेक विषयी जुजबी माहिती देऊन (सरांना माहिती होत, पूर्ण माहिती दिली तर 52 ची संख्या 25 होऊ शकते 🙆🏻‍♂🙆🏻‍♂) ट्रेक साठी सोबत घेण्याची चेकलिस्ट पाठवली.
जोमाने तयारी सुरू झाली.
Individual snacks घ्यायचेत म्हणल्यावर मी आणि पीजे मास्तर नी आमचे K2S (कात्रज ते सिंहगड नाईट ट्रेक) फेम खाद्यमंत्री डॉ. आशुतोष तोडकर मास्तरकडे कृतज्ञतेने पाहिलं.
नजरेनेच त्यांनी काही काळजी नसावी अशी आम्हाला खात्री दिली🙏🏻.
13 ऑगस्ट, रेपोर्टींग टाईम 5.30 .
सगळे मावळे जमले पण 5.40 झाले तरी गावडे सरांचा फोन लागेना आणि पाटोळे सर फोन उचलेना, त्यामुळे हे दोघे सर्जन आणि भुलतज्ञ सकाळी सकाळी कुठे OT करायला गेले की काय अशी शंकेची पाल मनात चुकचुकली.
6.10 ला शेवटी बस निघाली.

हा हा ही ही ला उत आला.
भन्नाट लावण्या आणि डीजे गाण्यावर कुबडे सर आणि कंपनीचा डान्स सुरू झाला.
त्यातही काहींनी मस्त झोप काढली होती.

http://linkmarathi.com/गावाकडची-दिवाळी/

बस मध्ये उजवी बाजू व डावी बाजू असे 2 गट पडले आणि गाण्यांच्या भेंड्या सुरू झाल्या.
डाव्या आघाडीवर कुबडे सर, खोसे सर, बोन्डे सर, पालवे सर किल्ला लढवत होते, बाकी मावळे साथीला होतेच,
तर उजव्या बाजूने सी बी पवार सर, भाऊ वाघमोडे सर हल्ले परतवून लावत होते.
आमची उजवी बाजू वरचढ होतीय अस वाटत असतानाच डाव्या बाजूने कुठूनतरी गावडे सरांचा आवाज आला आणि बाजी पलटली,
आमच्या उजव्या गटावर अतिरिक्त ताण येऊ लागला. तेवढ्यात सांडभोर सरांच्या वेळेच्या नियोजनात बरोबर 8.30 ला जुन्नर ला पोहोचलो,
मिसळ पाव आणि चहावर सर्वांनी ताव मारला आणि बस पुढे निघाली.
जुन्नर मध्ये शिवाजी ट्रेल संस्थेचे कार्यकर्ते/ मावळे आम्हाला जॉईन झाले.
मिसळ चहा घेऊन सुस्तावलेले चेहरे मस्त फ्रेश झाले होते आणि मग आमच्या बाजूच्या आळंदीकर मंडळींनी आम्हाला गाणे म्हणायला साथ दिली.
अगदी लावण्या, आंनद शिंदे , मिलिंद शिंदे फेम गाण्यांवरून मोर्चा भजन, भक्तीगीत, बालगीत, बडबड गीत यांच्याकडे वळला, आणि डाव्या बाजूला पळता भुई थोडी झाली.
उजव्या बाजूने भाऊ सर, सी बी सर यांनी बरेच नवीन गीतकार, संगीतकार, चित्रपट जन्माला घातले तर डाव्या बाजूला गावडे सरांना त्यांच्या श्री गुगल नेटधारी या मित्राने बरीच मदत केली.
अगदी तापलेले हे वातावरण गडाचा पायथा आल्याने 0-0 या गुणांवर थांबले आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला.
बस मधून उतरून गडाकडे पाहिलं,
तर गडधुक्यात हरवलेला,
फक्त वानरलिंगी चा काही भाग, आणि गडाचा थोडा भाग दिसत होता.
थोडा पाऊस, थोडं धुके अस मस्त वातावरण होत,
जर्किन घालावं की नाही या विचारात बरेच जण होते.
उत्साहात, हसत खेळत, फोटो काढत चालायला सुरुवात केली,
एक 500 मीटर गेल्यावर च खडकावरून पाय घसरायला लागले आणि हा ट्रेक सोपा नसणार याची पुसटशी कल्पना आली.
नवीन मंडळींना, आपल्या शुज ला ग्रीप व्यवस्थित नाही असं सांगून पटवण्यात यश मिळालं.
शिवाजी ट्रेल च्या खोत सरांनी
सर्वांना सोबत राहण्याच्या तसेच फोटो काढण्यात वेळ वाया न घालवण्याच्या सूचना दिल्या.
(तरी सर्वांचे मिळून 500 फोटो निघाले असावेत असा अंदाज)
खरमाळे मेजर तसेच शिवाजी ट्रेल च्या इतर मावळ्यांनी पुढे मागे व मध्ये अशा प्रकारे जागांवर कब्जा करून ट्रेक चे नेतृत्व केले.
सुरवातीचा सपाट रस्ता, थोड्याच वेळात गर्द झाडांचा झाला, पाऊस नव्हता, चालायला अतिशय उत्तम वातावरण त्यामुळे नवीन मंडळी ,”अरे हे तर सोप्प असतंय” अस म्हणायला लागले.

…….आणि पहिला कठीण टप्पा आला..!!

जंगल वाट संपली आणि समोरच खूप चांगल्या पायऱ्या दिसल्या,
सर्वांनी हुश्श केलं,
आता पायऱ्या म्हणजे मज्जा, त्यात वरून खळाळत येणार झऱ्यासारखं पाणी आणि त्यातून आपल्याला जायचंय या आनंदात चालायला सुरुवात केली.
2 पाऊले टाकल्यावरच लक्षात आले की सततच्या पावसामुळे शेवाळ साठून पायऱ्या अतिशय गुळगुळीत झालेल्या आहेत, उजव्या बाजूला सरळ कातळ असून तो ही शेवाळलेला आहे आणि डाव्या बाजूला प्रचंड मोठी दरी, त्यातच चांगल्यापैकी पडणारा पाऊस यामुळे हा रस्ता जेवढा विलोभनीय दिसत होता तेवढाच धोकादायक झालेला.
सर्वांच्या बोबड्या वळलेल्या, एकमेकांना आधार देत, एकमेकांचा आत्मविश्वास वाढवत प्रवास सुरु होता, सगळे एकमेकांना कृपया डाव्या बाजूला दरीकडे पाहू नका अशा सूचना करत होते.
अशी सूचना कानावर पडली की हमखास लक्ष दरीकडे जात होते आणि पाय लटलट कापत होते.
हा टप्पा पार करून पुढे गेलेले मागच्यांना ठीक आहे ठीक आहे म्हणून मानसिक बळ देत होते.
एकदाचा सगळ्यांनी हा घसरडा, निसरडा, दरीच्या कडेचा टप्पा पार केला आणि सर्वांनी एकमेकांकडे पाहत प्रतिक्रियेचा अंदाज घेतला.नवखे मावळे पुढे अजून असाच रस्ता आहे का विचारत होते, तर जुने शिलेदार मजा आली अस म्हणून भीती लपवत होते.
पुढचा रस्ता मस्त हसत खेळत चालायला सुरुवात झाली,
एक गट बराच पुढे निघून गेला होता,
आम्ही मस्त फोटो वगैरे काढत, हसत खिदळत धुक्यात हरवलेली वाट तुडवत चाललो होतो.
एका अरुंद रस्त्यावर आलो आणि पुढुन आम्हाला थांबायची सूचना मिळाली.
चला तेवढाच थोडा आराम म्हणून आम्ही एकमेकांची टिंगल करत उभे राहिलो.तेवढ्यात दुसरी सूचना मिळाली, रोप पुढे पाठवा.
काळजात धस्स झालं. आता रोप ने जायचं ??
रोप पुढे गेला, जवळजवळ अर्धा तास आम्ही त्या चिंचोळ्या रस्त्यावर कसेतरी अवघडून उभे होतो,
पुढे हालचाल होण्याची काही लक्षणे दिसेनात.
नक्की काय चालू आहे ते ही कळेना.
वरून आवाज आला या पुढे,
पुढे गेलो तर मस्त पायऱ्या , विशेष शेवाळ नसलेल्या, जरा बरी ग्रीप असलेल्या.
आयला या अशा रस्त्यावर का उगीच घोळ घातलाय या लोकांनी अशा प्रकारची चर्चा आमच्या टोळीत चालू होती,
तेवढ्यात……

……दुसरा कठीण टप्पा…!!!

तेवढ्यात वरून एक हाडाचा जुना ट्रेकर, फिटनेस अगदी उत्तम, उत्साहाचा खळखळता झरा असणारा एक मावळा खाली आला आणि एवढी रिस्क आपण घेणार नाही बाबा, चला इथूनच परत जाऊ अस म्हणायला लागला.
(त्यांच्यासारखा फिट मावळ्यांची ही अवस्था मग आपल्यासारख्या अवजड वाहनांच आणि नवख्या ट्रेकर च काय हा विचार मनात येऊन आमचे 4 शिलेदार ढेपाळले)

त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव स्पष्ट सांगत होते की पुढे खात्रीशीरपणे अतिशय धोकादायक रस्ता असणार.
त्या मावळ्यासोबत आमच्या गटातले आणखी 4 मावळे परत फिरायला तयार झाले,
परंतु त्या चौघांनाच परत पहिल्या कठीण टप्प्यावरून जायला डेरिंग होईना आणि शिवाजी ट्रेल ने निरोप दिला की आपल्याला उतरताना दुसऱ्या सोप्या रस्त्याने खाली यायचे आहे. मागे फिरलेले मावळे जरा थबकले.
डॉ चेतन चौधरी आणि डॉ किर्तीराज काटे पायऱ्यांवर मध्येच बसून कधी वर तर कधी खाली पाहत होते.
मला थांबून थांबून वैताग आलेला, चेतन चौधरींना वैतागून बोललो, अरे चाचा वरती नक्की काय चालू आहे, का टाईमपास लावलाय??
चाचा म्हणाले ये ना वर, तूच बघ.
वर गेलो तर बोबडी वळली.
याआधी कधी रोप चा कधीच वापर केलेला नव्हता.
उंच, निसरड्या, पायऱ्या नसलेल्या कड्यावरून खाली आलेला रस्ता 90 डिग्री कोनात वळत होता आणि कोणी सटकून सरळ गेला तर दरी नक्की किती खोल होती याचा काही अंदाज येईना.
उत्साह आणि भीती अस मिक्स फीलिंग मनात होत,
उसनं अवसान आणून खालच्या मावळ्यांना आवाज दिला, अरे काही नाही, सोप्पंय, या वर.
खोत सर मध्ये उभे राहून सर्वांना सूचना देत होते.
एक एक करत सगळे मावळे रोप च्या मदतीने वर गेले.
वर परत एकदा पायऱ्या दिसल्या,
आणि सोबतच शेवाळ ही.
यावेळी मात्र शेवाळ वाढलेलं होत आणि पायऱ्यांची रुंदी कमी झालेली,
शिवाय उंची वाढलेली.
यापेक्षा रोप सोपा होता असे वाटायला लागलं.
मजल दरमजल करत आणि मोठ्या प्रमाणावर पृष्ठभागाचा वापर करत पायऱ्या ओलांडुन पुढे गेलो.

आता वाट छोट्या मोठ्या दगडांची होती,
तिथल्या पायऱ्या इंग्रजांनी तोफेने उडवल्या होत्या अशी माहिती खोत सरांनी दिली.
सुरवातीला दगडावरून जाणे सोप्पे वाटले परंतु लवकरच लक्षात आले की दगड पक्के नाहीयेत,
कोणता आणि केवढा दगड कधी वरून निखळून खाली येईल सांगता येत नव्हते.

तिसरा टप्पा……जीव घाबरवणारा..!!

रोप हवाय म्हणून परत एकदा वरून आवाज आला,
आम्ही सगळे कोंबडीच्या गारठलेल्या पिल्लासारखे थोड्याच जागेत अवघडून उभे होतो.
शिवाजी ट्रेल सोबतच आमचे मावळे श्री समीर देशमुख हे बिना रोप चे तो अवघड टप्पा पार करून गेले.
त्या सर्वांना सलाम.

रोप लावला गेला,
चढाई सुरवात करणार तेवढ्यात मनात शंका आली, उंच कातळाला रोप अडकवण्यासाठी लावलेली कडी निसटली तर….?????

भर पावसात पार घाम फुटला,
पण पुढे असलेली 2-3 अवजड वाहने पुढे गेल्याने मनातली शंका दूर झाली.
कडी अगदी भक्कम होती,
शेवाळलेला खडक,
वरून जोरात येणारं पाणी, सैल झालेले पायाखालचे दगड आणि त्यातच पडणारा पाऊस यामुळे तिथलं वातावरण थोडं तणावाच झालं.
शिवाजी ट्रेल च्या 7 हिरकण्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय चा जोरदार जयघोष केला आणि सर्वांच्या अंगात वीरश्री संचारली,
एक एक करत सर्वांनी अगदी व्यवस्थित तो रस्ता पार केला.

जवळच गडाचा दरवाजा होता,
तिथे थोडे फोटो वगैरे काढून आणि आपापल्या बॅग मध्ये आणलेल्या शिदोरीवर ताव मारत थोडं रिलॅक्स व्हायचा प्रयत्न केला.

आता पाऊस सुरू झालेला,
त्यातच वरच्या भागात असल्याने वाऱ्याचे जोरदार झपके कानशीलवर आढळत होते,
खायची बॅग, शर्ट ची कॉलर,
हात, जर्किन ची टोपी अस हे मिळेल त्याचा वापर कान झाकण्यासाठी केला जात होता.
रस्ता गुडघ्यापेक्षा उंच वाढलेल्या गवतातून जात होता, आणि सरपटणाऱ्या प्राण्यांची प्रचंड भीती वाटत होती.
थंडीने सगळे कुडकुडत होते,
वाढलेल्या वाऱ्यामुळे पावसाचे सपके अंगावर जोरजोरात लागत होते.
ट्रेक ला येणार का अस मी ज्यांना विचारलं होत ते माझ्याकडे रागाने पाहत होते, मी त्यांच्यापासून लाम्ब राहण्याचा प्रयत्न करत होतो.

विशेष म्हणजे गडावर जवळपास सगळ्या नेटवर्क ला रेंज होती.
त्यामुळे सगळ्यांच्या बॅग मध्ये मोबाईल वाजत होते, पण जोराच्या पावसामुळे कोणालाही मोबाईल ला उत्तर देता येत नव्हते.
पडत धडपडत आम्ही धान्यकोठरावर पोहोचलो,
याच वैशिष्ट्य म्हणजे 3 ही बाजू कोरलेल्या परंतु छत हे बांधलेले, थोडक्यात स्लॅब टाकलेले आहे तरीही आज इतके वर्ष होऊन त्यातून पाण्याचा एक थेंब ही खाली येऊ शकत नाही,
तसेच इंग्रजांनी हा किल्ला जिंकल्यावर इथल्या अन्नधान्याला आग लावून दिलेली, ती जी राख आहे ती अजूनही तिथे पाहायला मिळते.

तिथे थोडं थांबून, इंग्रजांना शिव्या देत त्या उबदार कोठरातून बाहेर आलो तर परत एकदा वाऱ्याने जोरदार स्वागत केले,
आणि आता लवकरच थंडी ताप येतोय अस वाटायला लागलं.

आणि विनायक खोत सरांनी बॉम्ब टाकला

उतरताना सोपा रस्ता आहे या आशेवर खोत सरांनी अक्षरश: नांगर फिरवला आणि तो दुसरा रस्ता पहिल्यापेक्षा ही धोकादायक आहे अस कारण देत आपल्याला परत आहे त्याच रस्त्याने परत जायचे आहे असं सांगितलं.

झालं अंगातलं उरल सुरलं अवसानही गळून गेलं.
मी विचारलेल्या लोकांपासून मी सुरक्षित अंतर ठेवून चालू लागलो.
परत एकदा गडाच्या दरवाज्याजवळ आलो.
55-60 लोकांना वरून उतरण्यासाठी खूप वेळ लागत होता आणि आम्ही थंडीने कुडकुडत होतो,
आता पाऊस जरा थांबला होता,
परंतु त्या चिंचोळ्या भागात थंड वाऱ्याचे प्रचंड झोत येत होते,
आमचे जमदाडे सर देवळीत अगदी शांत बसले होते, आम्हाला पुढे जावं की थोडी वाट पहावी ते कळत नव्हतं.
कोणी गुपचूप बायको मुलांचे फोटो पाहत होते, तर कोणी आज मुलाला फोन नाही केला म्हणून हळहळत होते, वातावरण भावनिक झालं होतं,
शांतता आणि वारा आणखी भीती निर्माण करत होते.
पण..

पुन्हा एकदा एकमेकांना आधार देत, सांभाळत सगळे मावळे खाली उतरले आणि वर चढण्यापेक्षा खाली उतरायला थोडं सोप्प आहे वाटून थोडा जीवात जीव आला.

अगदी किरकोळ, दुखापती सोडल्या तर कोणतीही मोठी घटना न घडता सगळे मावळे पृष्ठभागाचा जास्तीत जास्त वापर करत खाली उतरले.

शिवाजी ट्रेल, तसेच संदीप सांडभोर सरांनी सर्वांना सुखरूप खाली आणण्यात आणि आत्मविश्वास वाढवण्यात मोलाची भूमिका बजावली.
खाली उतरल्यावर सर्वांनी राजांची आग्र्याहून सुटका झाल्याप्रमाणे सुटकेचा निश्वास टाकला.
काहींना परत फिरून किल्ल्याकडे पहायचा धीर होईना, काहींना मस्त ट्रेक झाला असे वाटायला लागलं
काही अगदी निशब्द झाले.
मेजर रमेश kharmale यांनी गडाची थोडी माहिती देऊन गृप फोटो काढून ट्रेक ची सांगता झाली.

पण आता सर्वांना भुकेची जाणीव झाली होती, सडकून भूक लागलेली सगळी मंडळी जेवणाच्या जागी पोहोचण्यात पटपट चालू लागली,
आम्ही 5-6 लोकांनी reverse waterfall पाहून यायचं ठरवलं.

उत्तम प्रकारची जेवणाची सोय होती, उत्कृष्ट , चवदार असे जेवण करून ट्रेक चा सगळा शीण हलका झाला होता आणि आता परतीच्या प्रवासाचे वेध लागले होते.

बस मध्ये जाऊन आता झोपायचं अस ठरवून सगळे बस मध्ये बसले होते,
पण एवढा वेळ शांत असलेले बोन्डे सर आता चांगलेच फ्रेश झाले होते.
आणि पूर्ण प्रवासात सरांची चौफेर फटकेबाजी चालू होती. सर्वांचा दिवसभराचा
उरला सुरला थकवाही डॉ विवेक बोन्डे सरांनी पळवून लावला होता.
सर्व सुखरूप झाल्याने कुबडे सर व संदीप सांडभोर सरांच्या चेहऱ्यावर ,”ओके झालं बुवा सगळं एकदाच” असे भाव होते.

© डॉ. संदिप नरवडे

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular