Homeमुक्त- व्यासपीठतेरीमा कसीह ( ललित लेख )

तेरीमा कसीह ( ललित लेख )

इंडोनेशियाच्या जकार्ता मधील सोकोयेर्नो हत्ता एअरपोर्ट वर सकाळी साडे दहा वाजता फ्लाईट लॅन्ड झाले. डिपार्चर नंतर अरायव्हलला पब्लिक ऍड्रेस सिस्टिम वर इंडोनेशियन भाषेत अनाउन्समेंट झाल्यावर तेरीमा कसिह हा शब्द ऐकला. तोच शब्द विमानातून बाहेर पडताना एअरहोस्टेस सगळ्यांना बोलत होती. तेरीमा कसिह या इंडोनेशियन शब्दाचा अर्थ म्हणजे धन्यवाद.
इमिग्रेशन क्लियरन्स झाल्यावर बॅगेज कलेक्ट करून बाहेर पडण्यासाठी कस्टम च्या ग्रीन गेट मधून बाहेर पडत असताना कस्टम ऑफिसरने अडवले. त्याने बाजूला नेऊन एका बाकडयावर बॅग ठेवायला लावून उघडण्यास सांगितले. माझ्या बॅग मध्ये माझ्या गरजेच्या लहान सहान वस्तू, जहाजवरील भारतीय अधिकाऱ्यांसाठी मिठाई आणि प्रवीण लोणच्याची सात आठ पाकिटं होती. कंपनीने जहाजावर असणाऱ्या भारतीय अधिकारी जे मुंबई ऑफिसला येऊन जहाजावर न येता परस्पर त्यांच्या त्यांच्या राज्यातून किंवा शहरातून जॉईन करतात अशांसाठी, सहा सेफ्टी शूज आणि बारा बॉयलर सूट असं सामान दिले होते. सिमन किंवा शिप क्रु साठी 40 kg बॅगेज अलाऊड असल्याने कंपनीने बॉयलर सूट आणि सेफ्टी शूज देण्यापूर्वी माझ्या सामानाचे वजन किती होईल ते विचारून घेतले होते. माझ्या जवळील सामानाचे वजन तेवीस किलो झाल्याने बॉयलर सूट आणि सेफ्टी शूज ची एक बॅगच माझ्या कडे दिली होती. त्याच्यासोबत एक लेटर सुद्धा दिले होते की जहाजावर वापरण्यासाठी हे सामान पाठवले आहे.
कस्टम ऑफिसर ने विचारले एवढे शूज आणि बॉयलर सूट कशासाठी आणले आहेत, त्यांची विक्री तर नाही ना करायची? त्याला कंपनीचे लेटर दाखवले आणि माझे जहाज जॉईन करायचे लेटर सुद्धा दाखवल्यावर त्याने ओ के म्हणून जायला सांगितले. परत त्याला आठवलं आणि त्याने लोणच्याचे पाकिटांबद्दल विचारले तर त्याला सांगितले की हे पण शिपवर चालवले आहेत, साठ इंडोनेशियन सोबत आम्ही पाच भारतीय आहोत त्या सर्वांसाठी. कस्टम अधिकाऱ्याने हसून मान डोलवली आणि जायला सांगून तो येणाऱ्या दुसऱ्या प्रवाशांकडे बघायला निघून गेला.
मुंबई ऑफिस मधून एअरपोर्ट वर पिक करायला येणाऱ्या एजंट चा फोटो असलेली कलर प्रिंट दिली होती. यापूर्वी अशा प्रकारे एजंट बद्दल माहिती मिळतं नसायची. पण जकार्ता मध्ये एकच एजंट मागील दहा बारा वर्ष कंपनीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना पिक आणि ड्रॉप करायला येत असल्याने ऑफिस मधून त्याचा व्हाट्सअप dp डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून मिळाली होती. एअरपोर्ट च्या बाहेर माझ्या नावाची प्रिंट आऊट घेऊन सैफुल नावाचा पन्नाशी ओलांडलेला एजंट माझ्याकडे बघून हात करत होता. सिंगापूर हुन आलेल्या फ्लाईट मध्ये प्रिंट आऊट वर नाव असलेला मीच असेन अशी खात्री सैफुल ला पण नक्कीच माझा फोटो पाठवला गेला असेल म्हणून पटली असावी.
थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या आणि सिंगापूर हुन माझ्याच फ्लाईट मध्ये आलेल्या एका चायनीज टेक्निशियनला सुद्धा सैफुल ने आमच्याजवळ बोलावून घेतले आणि आमची एकमेकांशी ओळख करून दिली. तो टेक्निशियन आमच्याच जहाजावर जी पी एस यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी एक ते दोन दिवसासाठी येणार होता.
हाय हॅलो झाल्यावर सैफुल त्याच्या कार जवळ घेऊन गेला, मग अडखळत अडखळत तो इंग्रजी मध्ये सांगू लागला, आज दुपारी एक वाजता एक कोर्स आहे तो अटेंड करून झाल्यावर हॉटेल मध्ये चेक इन करायचे आहे. एअरपोर्ट वरून त्याने एका मोठ्या मॉल मध्ये नेले, मॉलच्याच बिल्डिंग मध्ये आमचे जहाज ज्या ऑइल कंपनीच्या ऑइल फिल्ड मध्ये त्या कंपनीचे ऑफिस पंचवीसाव्या मजल्यावर होते. तिथेच दीड ते दोन तासाभराचा कोर्स होता. ज्यामध्ये क्रु चेंज बोट मध्ये दोराला लटकून कसे चढायचे आणि उतरायचं. लाईफ जॅकेट, फायर सेफ्टी आणि ऑइल फिल्ड मध्ये काय करू नये व इमर्जन्सी मध्ये काय काय करावे याची माहिती सांगितली जाणार होती. फ्लाईट मध्ये सकाळी ब्रेकफास्ट मिळाला होता पण बारा वाजता भूक लागल्यावर मॉल मध्येच खाण्यासाठी सैफुल ने सुचवलं. सैफुलला थोडंफार इंग्रजी येत होत पण मॉल मध्ये कोणाशी संवाद साधताना भाषेची अडचण येऊ लागली. इंडोनेशियन भाषा आम्हाला कळत नव्हती आणि त्यांना इंग्रजी कळत नव्हतं. सैफुल ने मॉल मध्ये मनी एक्सचेंजर चे ऑफिस दाखवले. दोनशे डॉलर्स मध्ये अट्ठावीस लाख इंडोनेशियन रुपये आले. ज्यामध्ये वीस पन्नास हजारच्या नोटा आणि एक लाखाच्या प्रत्येकी अठरा गुलाबी नोटा आल्या.
दोनशे डॉलर्स म्हणजे आपले चौदा हजार रुपये, अट्ठावीस लाखापैकी एक लाखाची एक गुलाबी इंडोनेशियन नोट म्हणजे आपली पाचशे रुपयाची करडी महात्मा गांधींची नोट असा सरळ सरळ हिशोब लावला.
इंडोनेशियात खरेदी करताना एक लाखाची गुलाबी नोटेत काय काय मिळतं असेल असा विचार करून वस्तूंच्या किंमती वगैरे बघायला सुरुवात केली.
डॉलर्स चेंज करण्यापूर्वी माझ्याकडील युरोप मध्ये असताना चालणारे ए टी एम कार्ड इंडोनेशियात चालवायला गेलो तर तिथल्या मशीन मध्ये एकावर किती शून्य टाकायचे याचाच गोंधळ जास्त व्हायला लागला. सैफुल ने प्रयत्न केला तर कार्ड अनेएबल दाखवत होते.
दुपारी एक वाजता कोर्सला पंचवीसाव्या मजल्यावर सैफुल ने नेऊन सोडले. तिथं जवळपास तीस पस्तीस जण होते, सगळे इंडोनेशियन आणि त्यात आम्ही दोघे फॉरेनर एक चायनीज आणि दुसरा मी. इंडोनेशियात चायनीज लोकं पूर्वीपासून स्थायिक असल्याने काही इंडोनेशियन चायनीज लोकांसारखेच दिसतात. काहीवेळाने माझ्यासोबत असलेला टेक्निशियन पण त्यांच्यापैकीच वाटायला लागला.
कोर्स सुरु झाला आणि संपला पण. संपूर्ण कोर्स इंडोनेशियन भाषेत फक्त काही व्हिडिओ आणि अधून मधून वापरलेल्या इंग्लिश शब्दामुळे कोर्स मध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केला ते थोडंफार समजलं.
सैफुलने संध्याकाळी पाच वाजता हॉटेल वर सोडलं. जाताना त्याचा व्हाट्सअप नंबर दिला आणि रूमवर गेल्यावर वायफाय कनेक्ट झाल्यावर हाय पाठवायला सांगितलं. सकाळी सात वाजता हॉस्पिटलला न्यायला येईन, फास्टिंग ब्लड सॅम्पल असल्याने रात्री नऊ नंतर काही खाऊ नका असं सांगून सैफुल चायनीज टेक्निशियनला सोडायला दुसऱ्या हॉटेलकडे निघून गेला.
हॉटेल मध्ये रूमवर गेल्यावर गरम पाण्याचा शॉवर घेत असताना बॅग अजून रूमवर आल्या नाहीत याची आठवण झाली न झाली तेवढ्यात डोअर बेल वाजली. अंग न पुसताच सकाळचेच कपडे पुन्हा घातले आणि दरवाजा उघडून बाहेर बघितलं तर माझ्या लगेज बॅग आणून ठेवलेल्या दिसल्या पण बेल बॉय किंवा रूम सर्व्हिस वाला दरवाजा न उघडल्याने तसाच निघून गेला असावा असं वाटून मी बॅग घ्यायला मधल्या पॅसेज मध्ये निघालो आणि तेवढ्यात डोअर क्लोजर स्प्रिंग मुळे दरवाजा बंद. दोन लगेज बॅग आणि मी आंघोळ अर्धवट टाकून भिजलेल्या अंगावर कपडे घालून अनवाणी पायाने पॅसेज मध्ये दरवाजा आतून बंद झाल्याने अडकलो. बाजूच्या रूम मधून एक फॅमिली बाहेर पडली पण त्यांना काही बोलणार आणि सांगणार तोपर्यंत ते लिफ्टने निघून गेले. रिसेप्शनला कळविण्यासाठी अनवाणी पायाने जावं लागणार होत, संध्याकाळची वेळ होती गर्दी असलेल्या लॉबी मधून रिसेप्शन काउंटर वर अशा अवतारात जावे लागेल या कल्पनेने ओशाळायला झाले होते. नाईलाजाने खाली जाण्यासाठी लिफ्ट चे बटण दाबले, पलीकडचा सर्विस दरवाजा उघडला गेला आणि तिथल्या सर्व्हिस लिफ्ट मधून हॉटेल चा कर्मचारी बाहेर येताना दिसला. त्याला मी बाहेर कसा अडकलो ते इंग्रजीत सांगितले पण त्याला फारसे काही कळालेल दिसलं नाही म्हणून मग हातवारे करून सांगितले तेव्हा तो खाली गेला. तो खाली गेल्यावर आता लगेच हा परत येईल का? त्याला मी दरवाजा बाहेर अडकलोय हे कळलंय का? मीच खाली जाऊन येऊ का असे विचार येऊ लागले. पण तीन चार मिनिटात इंग्रजी बोलणारा एक कर्मचारी कार्ड घेऊन आला आणि त्याने माझी रूम उघडून दिली.
रात्रीचे जेवणासाठी खाली बुफे सिस्टिम होती. एक एक पदार्थ अशा काही आकर्षक पद्धतीने सजवले होते की फक्त बघूनच पोट भरावे. पण खाण्याच्या बाबतीत माझ्या कल्पना आणि समज वेगळे असल्याने बुफे मधील इंडोनेशियन पदार्थ बघून काय खाऊ आणि काय नको याच्यापेक्षा यातील मी काय खाऊ असा प्रश्न पडला. अमेरिका आणि युरोप मध्ये जसं त्यांचे उकडलेले आणि बीफ किंवा पोर्क मुळे येणारी शिसारी इंडोनेशियन पदार्थ बघितल्यावर आली.
बर्फावर कापून ठेवलेले अननस, कलिंगड आणि पपई एका मोठ्या प्लेट मध्ये घेतली आणि त्याच्यात डिनर उरकून घेतलं.
फ्रुट डिनर झाल्यावर त्यासाठीच्या बिलावर सही केल्यावर हॉटेलचा कर्मचारी थँक यु बोलला पण मी त्याला त्याच्या भाषेत तेरीमा कसिह बोललो.

© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B. E. ( mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.

http://linkmarathi.com/श्री-क्षेत्र-तुळजापूर/
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular