Homeमुक्त- व्यासपीठश्री क्षेत्र तुळजापूर -

श्री क्षेत्र तुळजापूर –

          उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध आणि नावारूपास असलेले तसेच साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले तीर्थक्षेत्र आणि अवघ्या समस्त हिंदू कुळाची कुलस्वामिनी म्हणजे तुळजापूरची आई तुळजा भवानी. तिथे जाण्यास नाशिकपासून सुमारे ८ तास लागतात. तुळजापूरमध्ये प्रवेश केल्यानंतर गावात बरीच जेवणासाठी हॉटेल्स तसेच राहण्यासाठी उत्तम असे गेस्ट हाऊस उपलब्ध आहेत. तसेच जर आपण केवळ आई तुळजा भवानीचे दर्शन घेण्यास आले असाल तर मंदिरातल्या गुरुजींच्या घरी सुद्धा एक दिवसाचे वास्तव्य करू शकतात. त्यासाठीच्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध असतात.
          आई तुळजा भवानीच्या मंदिरात साधारणपणे नवरात्रीच्या दिवसात प्रचंड गर्दी असते. दर्शनासाठी लांब पर्यंत अगदी मंदिराच्या सभागृहापर्यंत रांगा लागलेल्या असतात. आईचे भक्त श्रध्देने तिथे पूजा अर्चा करत असतात. तसेच अष्टमीचा, नवमीचा होम हवन तिथे नवरात्रीच्या दिवसात केले जातात. त्यामुळे या पवित्र स्थानाला नवरात्रीत अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. हे देवीचे मंदिर पहाटे तीन वाजता भाविकांच्या दर्शनासाठी खुले होते. मंदिरात सकाळी ६ वाजता पहिली काकड आरती असते. तर शेवटची आरती रात्री १ वाजता असते. रात्री १ ते पहाटे ३ वाजेपर्यंत हे मंदिर दर्शनासाठी पूर्णपणे बंद असते.
          मंदिरात जाण्याआधी सुरुवातीला वर श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार लिहिलेली कमान आहे. याच भवानी आईच्या मंदिरात महाराजांना मिळालेली भवानी तलवार आशिर्वादासाठी आणण्यात आली होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी आई भवानीला सोन्याची अलांकराची माळ ही प्रदान केल्याचा इतिहास तुळजापूर शहरातील आई तुळजा भवानीच्या मंदिराला आहे. या मंदिराचे संपूर्णपणे भरीव दगडी कोरीवकाम केलेले आहे. मंदिराचा परिसर बराच मोठा आहे तसेच मंदिराला सृजनात्मक सुंदर असा गाभा आहे. सुरुवातीला या मंदिरात जाण्यासाठी फक्त प्रवेशद्वारावर नागरिकांची तपासणी होत होती. परंतु आता तिथे शिर्डी साईबाबा मंदिराप्रमाणे दर्शनाची व्यवस्था केलेली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना दर्शनाचे कूपन घेऊन आत जाण्यास परवानगी आहे. आत गेल्यानंतर पुढे मंदिरात आई भवानी पर्यंत जाण्यास बरेच पायी जावे लागते. त्यासाठीच भक्तांनी रांगेत उभे राहण्याकरिता सोय केलेली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आत सुद्धा बसण्याची व्यवस्था केलेली आहे.
          पुढे जाऊन भवानी आईच्या मंदिरापर्यंत पोहोचल्यास सर्व प्रथम आईच्या लक्ष्मी पावलांचे दर्शन होते. आणि तिथेच पुढे आई तुळजा भवानीची सुबक सुंदर आकर्षक मूर्तीचे दर्शन होते. मूर्तीचे रूप इतक्या देखण्या स्वरूपाचे आहे की मूर्तीचे दर्शन होताच अगदी आपल्याला भरून पावल्यासारखे वाटते. तसेच मन शांत आणि प्रसन्न होते. देवीचे दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर मंदिराच्या पाठीमागे देवीला अभिषेक घालण्यासाठी गुरुजी उभे असतात. तिथेच देवीची खणा नारळाने ओटी ही भरली जाते. मग आरती करून आपले दर्शन कार्य समाप्त होते. तिथेच मंदिराच्या मागे एक मोठा दगड ठेवलेला दिसतो, त्या दगडावर हात ठेवून आपण जी मनोकामना व्यक्त करतो ती पूर्ण होईल की नाही याचे संकेत मिळतात. ते ही दगड जर उजव्या दिशेने फिरला तर इच्छा पूर्ण होते, जर डावीकडे फिरला तर नकार असतो आणि याउलट तो दगड यदाकदाचित स्थिर राहिला तर आपली इच्छा ही स्थिर असते त्याचे काही मोजमाप लागत नाही अशी तेथील भाविकांची धारणा आहे.
          देवी आई भवानीच्या मूर्तीचे विशेष म्हणजे नवरात्रीत घटस्थापनेच्या दिवशी आईचे स्थान निद्रा स्वरूपात पलंगावर असते. ते घटस्थापनेपासून पुढे अंदाजे जवळपास दिवाळीपर्यंत म्हणजे साधारण एक महिना देवी निद्रा अवस्थेत असते. त्याचे कारण म्हणजे देवी घटस्थापनेच्या दिवशी महिषासुराशी युद्ध करण्यास गेली असता पुढे नऊ दिवस हे युद्ध देवीने लढले आणि दहाव्या दिवशी महिषासुराचा वध केला. त्यामुळे युध्दाचे नऊ दिवस आणि पुढे काही दिवस देवीला आराम म्हणून देवी आई भवानीचे स्थान पलंगावरून हटवता येत नाही. अशी तेथील आख्यायिका सांगितली जाते. तसेच देवी युद्ध जिंकून आली म्हणून देवीचा विजय म्हणून दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी मोठा सीमोल्लंघनाचा उत्सव ही जल्लोषात केला जातो.
          मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर आल्यानंतर तिथे बरेच खाण्यापिण्याची दुकाने सुद्धा लागलेली असतात. नवरात्रीच्या दिवसात मोठी प्रचंड जत्रा ही तिथे भरते.
दर्शन घेऊन घरी परतण्यास मंदिरापासून काही अंतरावरच बस स्थानक ही आहे. आपली यात्रा (प्रवास) व देवीचे दर्शन नक्कीच सुखकर आणि सुरळीत होईल यात तिळमात्र शंका नाही.

लेखक : नयन धारणकर – नाशिक

http://linkmarathi.com/तेरीमा-कसीहललित-लेख/
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular