दातेगड

दातेगड हा सुंदर किल्ला पाटण शहराच्या जवळ ५ किलोमीटर अंतरावर आहे. पाटण – टोळेवाडी – दातेगड हा रस्ता झाल्याने किल्ल्यावर जाणे सोपे झालेले आहे. किल्ल्यावर असलेली तलवारीच्या आकाराची विहीर (Step well), किल्ल्याचा दगडात कोरुन काढलेला प्रवेशमार्ग या गोष्टी पाहण्या सारख्या आहेत. दातेगड जिंकून घेतल्यावर छ. शिवाजी महाराजांनी त्याचे नाव सुंदरगड ठेवले होते. दातेगड, गुणवंतगड आणि वसंतगड हे तिन्ही किल्ले खाजगी वहानाने एका दिवसात पाहाता येतात.

इतिहास :
पंधराव्या शतकात दातेगड शिर्क्यांच्या ताब्यात होता. मलिक उत्तुजारने शिर्क्यांचा पराभव करुन हा किल्ला बहामनी राज्यात सामील केला. बहामनी राज्याचे तुकडे झाल्यावर हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात गेला. १५७२ म्ध्ये पाटणकरांना या किल्ल्याची देशमुखी मिळाली होती. अफ़जलखानाच्या वधानंतर छ. शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला. त्यांनी गडाची जबाबदारी साळुंखे नावाच्या सरदारावर टाकली होती. पाटन परिसरात वास्तव्यास असल्याने पुढे हे घराणे पाटणकर या नावाने ओळखले जाऊ लागले. छ. संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर हा किल्ला मुघलांकडे गेला. इसवीसन १६८९ मध्ये मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला. त्यावेळी संताजे आणि पाटणकरांनी गाजवलेल्या पराक्रमासाठी छ. राजाराम महाराजांनी त्यांना पातण महालातील ३४ गावे इनाम दिली होती. इसवीसन १७४५ मध्ये पेशवे आणि तुळाजी आंग्रे यांच्या वादात आंग्र्यांनी दातेगडाला वेढा घातला पण हा किल्ला त्यांना जिंकून घेता आला नाही.

पहाण्याची ठिकाणे :
टोळेवाडी मार्गे गडावर जाण्यासाठी कच्चा रस्ता झालेला आहे. या रस्त्याने तटबंदीतून आपण गडावर प्रवेश करतो. डाव्या बाजूला तटबंदीचे अवशेष आहेत त्यात पाहारेकर्‍यांना विश्रांतीसाठी एक खोली आहे. पुढे गेल्यावर उजव्या बाजूला वाड्याचे अवशेष आहेत. त्यात एक छोटी विहीर पाहायला मिळते. वाडा पाहून पुढे गेल्यावर कातळात खोदलेल्या पायर्‍या दिसतात. या २० पायर्‍या उतरतांना उजव्या बाजूला कातळात कोरलेली एक खोली दिसते. पायर्‍या उतरल्यावर समोर कातळ भिंतीत कोरलेली ६ फ़ूट उंच गणपतीची मुर्ती आहे. तर त्याच्या काटकोनात असलेल्या कातळ भिंतीवर मारुतीची ८ फ़ूती मुर्ती कोरलेली आहे. मारुतीच्या मुर्ती समोर (पायर्‍यांच्या काटकोनात) गडाचे पश्चिमाभिमुख प्रवेशव्दार आहे. प्रवेशव्दाराची कातळात कोरुन काढलेली कमान तुटलेली आहे. प्रवेशव्दारातून किल्ल्या बाहेर पडल्यावर टोळेवाडीतून येणारा पायर्‍यांचा मार्ग दिसतो. या मार्गावर कातळात पहारेकर्‍यांसाठी कोरलेली गुहा आहे. ही गुहा पाहून परत प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश करुन पायर्‍या चढून गडमाथ्यावर यावे.

गड माथ्यावर थोडे पुढे चालत गेल्यावर स्थापत्य शास्त्रातील एक अदभूत नमुना असलेली तलवारीच्या आकाराची विहीर (Step well) पाहायला मिळते. ही विहीर ५० मीटर लांब X ३ मीटर रुंद आणि ३० मीटर खोल आहे. विहीरीत उतरण्यासाठी ४४ मोठ्या पायर्‍या आहेत. त्या पायर्‍यांच्या उजव्या बाजूला छोट्या पायर्‍या कोरलेल्या आहेत. पाण्याच्या थोड्या वरच्या बाजूला पायर्‍यांलगत ६ फ़ूट X ६ फ़ूटाची एक गुहा आहे. गुहेत पिंड आणि गुहे बाहेर नंदी आहे. या गुहेच्या वर विहीरीच्या छताकडील भागावर एक हत्ती कोरलेला आहे. पण तो हत्ती पाहाण्याकरीता विहीरीच्या वरच्या बाजूला जावे लागते. विहिरीतील पाणी पिण्यायोग्य नाही. विहिर पाहून गडमाथ्यावर येऊन पुढे गेल्यावर कातळात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या दिसतात. त्याच्या खालच्या बाजूला अजून एक पाण्याचे टाक कोरलेल आहे. गडाच्या उत्तर टोकावर तटबंदी आहे. तटबंदी पाहून परत येतांना विहीरीच्या बाजूला एक बुजलेले टाके पाहायला मिळते. दातेगडावरुन गुणवंतगड दिसतो.

पोहोचण्याच्या वाटा :
वहानाने जाण्यासाठी :- मुंबई – कोल्हापूर रस्त्यावरील उंब्रज गाठावे. उंब्रज वरुन उंब्रज – चिपळूण रस्ता आहे. या रस्त्यावर उंब्रज पासून २८ किलोमीटरवर पाटण हे तालुक्याचे गाव आहे. पाटणहून टोळेवाडी हे दातेगडाच्या पायथ्याचे गाव ५ किलोमीटरवर आहे. रस्ता कच्चा असल्याने या मार्गावर एसटीचा बसेस धावत नाहीत. खाजगी वहानाने या रस्त्यावरुन थेट टोळेवाडी गाठावे. टोळेवाडी ते दातेगड हे १ किलोमीटरचे अंतर कच्च्या रस्त्याने कापून थेट दातेगडाच्या पायथ्याशी जाता येते. टोळेवाडी ते दातेगड रस्ता सध्या (२०१८) कच्चा असल्याने पावसाळ्यात या रस्त्यावर वहानाने जाता येणार नाही. या रस्त्याने तटबंदीतून आपण गडावर प्रवेश करतो.

चालत जाण्यासाठी :- दातेगडला जाण्यासाठी कराड – कोयनानगर मार्गावरील ‘पाटण’ गाठायचे. पाटण एसटी स्थानकाच्या समोरुन चिपळूणच्या रस्त्याला लागायचे. थोड्या अंतरावरच दातेगडच्या अलीकडचा डोंगर दिसतो. या डोंगरसोंडेवरुन चढत गेल्यावर पाऊण तासात एक दर्गा लागतो, तिथून टेकडीच्या धारेवरती गेल्यावर एक घर लागते. घराचे पुढे पठार आहे, याच्या पुढे एक वाडी आहे, हीचे नाव टोळेवाडी. दर्ग्यापासून टोळेवाडीला पोहचण्यास पाऊण तास लागतो. समोरच्या टेकडीच्या पलिकडे दातेगड आहे, मध्ये दरी आहे. दरीच्या काठावरुन चालत गेल्यावर आपण गडाच्या पायथ्याशी पोहचतो. पुढे मात्र गडाच्या वर जाण्यास पायर्‍या आहेत. टोळेवाडी ते गड हे अर्ध्यातासाचे अंतर आहे. पाटण पासून गडापर्यंत रमतगमत जाण्यास अडीच तास पुरतात.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular