(१) मनुष्याला निसर्गाविषयी आध्यात्मिक व्हायची खरंच गरज आहे काय आणि शेवटी आध्यात्मिकता म्हणजे तरी काय? निसर्गाला आत्मा आहे अशी कल्पना करून निसर्ग मोठा असल्याने त्याच्या मोठ्या आत्म्याला परमात्मा म्हणायचे व मग त्या परमात्म्याची ध्यानधारणा करायची म्हणजे का अध्यात्म? निसर्गातील परमात्म्याची ध्यानधारणा करून, परमात्मा चिंतन करून मानवी मनाला काय गवसते? अशा ध्यानधारणेतून त्या परमात्म्याचा मानवी मनाला खरंच दिव्य स्पर्श होऊन मानवी मनाचे रूपांतर दिव्यात्म्यात होते का? महात्मा गांधी यांना महात्मा का म्हणायचे? त्यांच्या मनाला परमात्म्याचा स्पर्श होऊन त्यांचे मन दिव्य झाले व त्यांचा आत्मा हा दिव्यात्मा म्हणजे महात्मा झाला असे समजायचे का? छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य जोतीबा फुले, ज्ञानसूर्य डॉ.आंबेडकर यांना महापुरूष, महामानव असे म्हणायचे, पण त्यांना दिव्यात्मे का म्हणायचे नाही? क्रांतीसूर्य फुले यांनाही गांधीच्या बरोबर महात्मा असे संबोधले जाते हे विशेष! प्रश्न मन व आत्मा यातील फरकाचा आहे.
(२) अध्यात्माची अशी चिकित्सा करण्याचे कारण म्हणजे त्यात असलेला आत्मा हा शब्द! मन व आत्मा यात काही फरक आहे का? तसे तर पक्षी, प्राणी यांनाही मन असते? मग त्यांना आत्मा नसतो का? घरात ढेकूण, झुरळे, डास यासारखे कीटक निघाले तर आपण त्यांना निर्दयीपणाने मारून टाकतो. मग निसर्गानेच निर्माण केलेल्या सृष्टीत जगण्याच्या त्यांच्या हक्काचे काय? त्यांना मारून आपण त्यांचे आत्मे चिरडून तर टाकत नाही ना? मानवी मनातील आतला आवाज म्हणजे अंतरात्म्याची हाक व बाहेरचा आवाज म्हणजे मानवी मनाची वरवरची समज हे सत्य आहे काय? याच विशेष अंतरात्म्यामुळे माणूस इतर प्राणी मात्रांपासून वेगळा झालाय का? हा आतला आवाज व ती हाक देणारा मानवी अंतरात्मा हा मानवी मनाचा आदर्श भाग आहे असे मानले तरी तो भाग मूलतः भौतिक असलेल्या मानवी मनापासून वेगळा आहे काय?
(३) तरीही शेवटी निसर्ग आहे पण निसर्गाला मन नाही असे समजायचे का? सजीवाला मन असणे हे त्याच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. सजीवाच्या शरीरात (मेंदूत) मन असेल तरच तो जीव जिवंत आहे हे कळते. मन मेलेला सजीव हा निर्जीव पदार्थ होतो. पण निसर्ग तर विविध गुणधर्मीय निर्जीव व सजीव पदार्थांनी बनलेला आहे. म्हणजे निसर्गाचे शरीर निर्जीव व सजीव असे दोन्ही प्रकारचे आहे. पण या शरीरात जर सजीव हा भाग आहे तर मग निसर्गाला मन आहे असे म्हणावे लागेल. या सजीव मनानेच निसर्ग कार्य करतोय असे म्हणणे भाग पडते व असे म्हणणे हे वैज्ञानिक होते. पण वैज्ञानिक म्हणजे आध्यात्मिक नव्हे जसे नैसर्गिक म्हणजे दैवी नव्हे!
(४) निसर्गाने उत्क्रांतीतून माणूस निर्माण केला. त्या माणसाला सुरूवातीला निसर्गाचे विज्ञान हे तसे अपरिचित होते म्हणून माणसांनी देवाचा धर्म जवळ केला. पण हळूहळू जसा माणूस विज्ञानाशी परिचित होऊ लागला तशा त्याला देव धर्मातल्या त्रुटी जाणवू लागल्या. फार पूर्वी तर सगळीकडे धर्माचेच राज्य होते. पण धर्म वेगवेगळे झाले कारण देवाविषयीच्या मानवी कल्पना वेगवेगळ्या होत्या व अजूनही आहेत. मग धर्माचे राज्य जाऊन कायद्याचे राज्य ही संकल्पना पुढे आली. आधुनिक जगाने ही संकल्पना जागतिक स्तरावर स्वीकारली आहे.
(५) आपल्या भारतात अनेक धर्माचे लोक राहतात. त्यांच्या धर्मश्रध्दा, धर्मसंस्कृती व धर्मग्रंथ हे वेगवेगळे आहेत. हे वेगवेगळे धर्मग्रंथ भारतावर कायद्याचे राज्य निर्माण करू शकत नव्हते म्हणून कायद्याचे राज्य या जगाने मान्य केलेल्या संकल्पनेनुसार भारताने स्वतःची एक स्वतंत्र राज्यघटना बनवली जिचे शिल्पकार आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर! भारताची ही राज्यघटना, संविधान हाच भारताचा सर्वोच्च कायदा व याच कायद्याप्रमाणे भारताचा संपूर्ण राज्यकारभार चालतो व याच कायद्याच्या चौकटीत राहून भारताची न्यायालये व भारताचे सर्वोच्च न्यायालय न्यायनिवाडा करते. असा राज्यकारभार करताना व न्यायनिवाडा करताना कोणताही धर्मग्रंथ नाही तर भारताचे संविधान प्रमाणभूत मानले जाते.
(६) वरील विवेचनावरून हेच सिद्ध होते की कायदा हाच धर्मापेक्षा श्रेष्ठ म्हणून जगात मान्य केला गेला आहे. असे का? याचे कारण म्हणजे धर्म हा दैववाद किंवा मानवी नैतिकता यांच्या पलिकडे गेला नाही व जात नाही. पण निसर्ग हा फक्त असा दैववादी किंवा मानवतावादी नाही. तो विज्ञानवादी आहे. निसर्गाच्या वैश्विक विज्ञानात मूलभूत स्तरावर भौतिकता आहे व मानवता हा या भौतिकतेचा एक छोटासा भाग आहे. याच मानवतेला देवाची आध्यात्मिकता चिकटवली की मनाचा गोंधळ उडतो. मानवी मनातील प्रेम, करूणा यासारख्या उच्च भावना हा मानवी भौतिकतेचा उच्च, आदर्श भाग आहे. पण केवळ मानवी मनाचा हा आदर्श भौतिक भाग म्हणजे मानवी मनाची आध्यात्मिकता नव्हे!
(७) निसर्गाची मूलभूत भौतिकता हाच खरं तर मानवी जीवनाचा मूलभूत आधार आहे. या भौतिकतेशिवाय मानवी जीवन पूर्ण होऊ शकत नाही. ज्या धर्म नावाच्या गोष्टीवरून भौतिक जगात अनेक वादविवाद निर्माण होतात, युद्धे होतात तो धर्म हा मानवी मनाच्या प्रेम, करूणा युक्त आदर्श भागाभोवतीच घुटमळतो व तरीही क्रोधाने भडकून युद्धाला, हिंसेला तयार होतो. असा हा धर्म निसर्गाच्या भौतिकतेपासून अर्थात निसर्गाच्या मूलभूत विज्ञानापासून लांब पळतो. म्हणून तर धर्म मानवी जीवनाचे व एकंदरीतच निसर्गसृष्टीचे नियमन करण्यासाठी कमकुवत ठरला आहे. याच कारणाने कायदा हा धर्मापेक्षा श्रेष्ठ ठरतो. कायद्याने धर्माचा कमकुवतपणा जाणलाय व म्हणून त्याने निसर्गाच्या विज्ञानाला जवळ केलेय. म्हणून मी धर्माऐवजी विज्ञानाला कायद्याचे उगमस्थान समजतो. कायदा हा असा धर्मापेक्षा व्यापक असल्याने तो धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे असे म्हणण्यात गैर काय?
- ॲड.बी.एस.मोरे
मुख्यसंपादक