नाते

आजी :काय ग बरी आहेस ना ?

नात :नसायला काय झालं. मी बरीच आहे.आजी जाम वैताग आलाय.

आजी :आता काय बिनसलय?

नात :आजी ग तुझे आणि आजोबांचे कसे काय पटायचे ग? आपले आजोबा म्हणजे जमदग्नी एकदम अॅंग्री मॅन. तुमची जाम भांडण होत असतील ना? आणि तुम्ही भेटलात कधी ग?

आजी :काहीतरी फाजिलपणा करु नकोस.

नात :सांग ना ग आजी. प्लीज…

आजी:तुम्हा आजकालच्या मुलांना काही ताळतंत्र उरलेला नाही. आमच्यावेळी नव्हती हो ही थेर. तरी झालाच ना आमचा संसार. नाहीतर आजची तुम्ही मुले बघा. काल नाही लग्न झाले तर निघाले लगेच काडीमोड घ्यायला. तरी बरं तुम्ही मुले चांगली निरखून पारखून दहावेळा भेटून आपला जोडीदार निवडता. आम्ही तर लग्न लागायच्या वेळी पहिल्यांदा बघितलं एकमेकांना.
नात :काय सांगतेस. हाऊ इज धिस पॉसिबल?

http://linkmarathi.com/वृद्धावस्थेतील-मानसिक-सम/

आजी :आमच्या वेळी आम्हाला शिकवणच तशी होती. एकतर आमची वय लहान होती. सासूबाई म्हणायच्या त्याप्रमाणे माती ओली होती. त्यात मुलापेक्षा आणि श्रीमंतीपेक्षा मुलाचे घराणे, घरातले संस्कार महत्त्वाचे! माझे बाबा म्हणायचे, “लक्ष्मी चंचल असते. ती काय, आज आहे उद्या नाही. संस्कार, ज्ञान शाश्वत असते. त्यामुळे ते महत्वाचे!”
एकूणात काय तर आमचे लग्न मोठ्यांनी ठरवले आणि आम्ही निभावले. बर कोडकौतुक, हौसमौज काही नाही. तरी बरं माझ्या सासरी मोठ्या काकांना नाटकांची आवड होती म्हणून आम्हा बायकांना बालगंधर्वांची सगळी नाटके बघायला मिळाली ती पण तुझे आजोबा पुरुषाबरोबर आणि मी बायकांमध्ये. नाहीतर आमच्यासाठी देवदर्शन, हळदीकुंकू हेच बाहेर जायचे कारण असे तेसुद्धा जाऊबाई, आत्येसासुबाई किंवा नणदांसोबत. सहज फिरायला नवराबायको दोघांनीच बाहेर जायची पद्धतच नव्हती.
एकमेकांशी बोलणे, काही सांगणे सवरणे फक्त रात्रीच व्हायचे.बाकी दिवसभर ते त्यांच्या व्यापात आणि मी स्वैपाकघरात. त्यामुळे एकमेकांशी वादावादी, भांडणे व्हायचीच नाहीत फारशी आणि झालीच तर आपणच नमते घ्यायचे असते हे सगळ्या बायकांना चांगलेच ठाऊक होते. नवरा आपल्यापेक्षा सगळ्याच बाबतीत वरचढ आहे हे आम्हाला माहीत होते आणि आम्ही ते मान्य केले होते.
आताच्या तुम्ही मुली! तुम्हाला तुमच्या पेक्षा जास्त शिकलेला, उंचीने, वयाने मोठा, जास्त कमावणारा मुलगा नवरा म्हणून हवा असतो आणि तो जराही वरचढ झालेला चालत नाही.
बर तुम्हा मुलींना एखाद्या कमी शिकलेल्या पण घरकामाची, स्वैपाकाची आवड असलेल्या मुलाचे स्थळ चालेल का? तुम्हाला पुरुष तथाकथित मर्दासारखा हवा पण तुमची इच्छा असेल तेव्हा तो बल्लवाचार्य व्हायला हवा आणखीन पण काय काय त्याला यायला हवे आणि तरीही अशा मुलाने तुम्हाला बरोबरीच्या नात्याने वागवायला हवे अशा कशा ग अपेक्षा तुमच्या!!
तुच विचार करून बघ. अग ते आजकालचे नवरे आणि तुम्ही नवऱ्या किती गोंधळलेले असता ग. तुम्ही एकतर तुमच्या कामाच्या ठिकाणी इतका तणाव असतो मग घराततरी शांतता हवी ना?आपण कधी माघार घ्यावी हे कळायला हवे ग प्रत्येकाला. आता तुम्ही मुली स्वतःला मुलांपेक्षा जास्त हुशार समजता ना? मग शहाणपणाही तुम्हालाच जास्त यायला हवा. खरे आहे ना?

नात :आजी ग, कुठून ग एवढ शहाणपण शिकलीस. कसली सॉलिड आहेस. तुला कसं कळलं ग की माझं काहीतरी बिनसलय ?

http://linkmarathi.com/जागतिक-पुरुष-दिन/

आजी :एवढीशी वीतभर होतीस. तेव्हापासून तुला बघतेय. अगो तू तो दरवाजा बंद करतेस ना घरी आल्यावर आणि तुझा तो लॅपटॉप ठेवतेस टेबलावर त्याच्या होणाऱ्या आवाजावरून मी तू रागावलेयस की खुशीत आहेस त्याचा सहज अंदाज बांधू शकते. आमचं शिक्षण असच ग. आयुष्याच्या शाळेत परिस्थितीचे टक्केटोणपे खात घेतलेलं.
माझी लेक म्हणजे तुझी लाडकी आत्तू ग, जेव्हा सासरी जात होती ना तेव्हा नमस्कार करायला वाकली ना, तेव्हा माझ्या काकूने तिला काय सांगितले होते माहितेय “हे बघ सीमे, एकत्र कुटुंबात जातेयस. त्यात तू शिकलेली, नोकरी करणारी सून पण नोकरीवरनं घरी येशील ना तेव्हा तुझी अक्कल आणि चप्पल घराबाहेर ठेवायची. तरच सासरी निभावून जाईल. तुझ्या आत्त्याने ते ऐकले आणि त्यात स्वतःचं शहाणपण मिसळले. बघतेस ना सासरी किती मान आहे तिला ते. तिचे आणि जावई बापूंचेही छान नाते आहे ना?हे असले शिक्षण घेतलेय आमच्या पिढीतल्या बायकांनी…..
सतारी सारखा असतो ग संसार. तारा योग्य तेवढ्याच ताणल्या की सुरेल आवाज येतो आणि अती ताणल्या तर ताराच तुटून जातात मग कसला सूर अन् काय आणि जास्तच आदळआपट केली तर भोपळाच फुटून जातो त्या सतारीचा!!
नात :आज्जी ग . थांब हं जरा एक फोन करून येते.

आजी :मग कधी आणतेस नातजावयाला भेटायला…

नात:हे काय ग..हे चिटिंग आहे . तुला सगळच कसं कळत….

डॉ. समिधा गांधी

https://surveyheart.com/form/615fcb6ec182fe215fb90303

नवोदित लेखक व कवींच्या सुद्धा इतरत्र प्रसिद्ध न झालेल्या कविता स्वीकारल्या जातील

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular