Homeमुक्त- व्यासपीठनैराश्य (Depression) मानसिक आजार

नैराश्य (Depression) मानसिक आजार

               नैराश्य किंवा उदासीनता (Depression) ही मनाची उदासीन अवस्था आणि सर्वाधिक आढळणारा मानसिक आजार आहे. या आजाराने ग्रासलेल्या व्यक्तीला नेहमीच उदास व निराश वाटत असते. दैनंदिन कामे तसेच आनंददायी गोष्टीतील आवड कमी होते. एकांत आवडायला लागतो. २०/३० टक्के व्यक्तीमध्ये हा आजार होतो. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण दुप्पट आहे. भारतातील १५ कोटी लोक कोणत्या ना कोणत्या मानसिक दडपणाखाली जीवन जगत आहेत. त्यापैकी ७ कोटी लोक नैराश्य ग्रस्त आहेत.

आपल्याकडे नैराश्याला दुर्लक्षित केले जाते. आणि भीतीपोटी ते मानस शास्त्रज्ञाकडे जात नाहीत. नैराश्याची उत्पत्ती बहुतांश घरातूनच होत असते. मानसिक आघात, अकारण केलेले आरोप, जिवलगांशी झालेले वाद-विवाद, गरिबी, बेरोजगारी, जवळच्या व्यक्तीचा मृत्यु, घटस्फोट, प्रेमभंग, किंवा अन्य शारिरीक आजार होतात, मात्र असे कारण नसताना सुद्धा जैविक घटकांमुळे म्हणजेच मेंदूतील रासायनिक बदलांमुळे नैराश्य येऊ शकते. नेहमीच्या जीवनातील दगदग, नकार, विरह, अपयश, पैशांचे व्यवस्थापन या गोष्टींनी तणाव वाढतो. नैराश्य न येण्यासाठी दैनंदिन जीवनात सतत कार्यशील राहावे कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा छंद जोपासावा जेणे करून एकटे वाटणार नाही. जवळच्या व्यक्तीशी, नातेवाईकांशी, मित्रांशी सवांद साधावा म्हणजे मनाला भावनिक आधार मिळेल. स्वतःसाठी वेळ द्यावा.

       नैराश्य आलेल्या व्यक्तिच्या सहवासात राहणे सुद्धा खूपदा कठीण आणि त्रासदायक ठरते. अश्या व्यक्तीची नकारात्मकता इतकी मनामध्ये घर करुन असते की, त्यांना आपले चांगले वाईट कशात आहे ही भावनाच संपुष्टात येते. इतरांनी कितीही नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन केले तरी ते त्यातून बाहेर निघायला तयार नसतात. 

       नैराश्यग्रस्त व्यक्ती सतत आत्महत्येविषयी बोलत असतात. त्याचा परिणाम ते स्वतःच्या मनावर  खोलवर करून घेतात. सुप्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत हे त्याचेच एकमेव उदाहरण आहे. तो खुप मानसिक तणावाखाली  वावरत होता. सुशांत सिंह राजपूत ला एखाद्या सल्लागाराची अतोनात गरज होती. त्याच्या मनातले वादळ, ताणतणाव त्याने शेअर केले असते तर तो ह्या मानसिक नैराश्येतून बाहेर पडला असता. पण त्याने तसे न करता आत्महत्या हा पर्याय निवडला आणि आपण आज एक चांगला अभिनेता गमावून बसलो. ही खंत कायमच राहील. दैंनदिन जीवनात अश्या घटना घडताना रोजच पाहायला, ऐकायला मिळतात. 

       कोरोना सारख्या महामारिने साऱ्या जगाला विळखा घातला त्यात झालेले लॉकडाऊन खूप काही घडवून गेले. हातावर पोट भरत असलेल्या जनतेची उपासमार झाली, अन्न पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली, कुणी काम नाही म्हणून निराश होवून गावी परतले, काहींनी आपले जीव गमावले. नैराश्य मनुष्याचे जीवन संपवून टाकते. 

निराश व्यक्तीला आपली समस्या सहनशीलतेच्या पलीकडची वाटू लागते. नैराश्य हे मेंदूमधील अ-स्वाभाविक क्रियेमुळे येते. अश्या व्यक्तीला भरपूर पाठिंब्याची आणि सौम्य प्रोत्साहनाची गरज असते.त्यांना जास्तीत जास्त ऐकण्याची व कमी सल्ला देण्याची गरज असते.
नैराश्य हि वैद्यकीय समस्या आहे त्यातून वेळेवर योग्य उपचार केले तर लवकरात लवकर बाहेर पडता येते. हा आजार कुणालाही होवु शकतो. हा आजार मानसिक असल्यामुळे त्याच्या जखमा कुणालाच दिसत नाही, पण त्या खोलवर रुजलेल्या असतात.
नैराश्य म्हणजे मानसिक वेदना. मानसिक संघर्ष जर बोलून व्यक्त करता आला तर वेदनेला एक मोकळी वाट मिळेल. नैराश्य ही काही शरीरावरची जखम नसते तर ही वेदना खूप खोल आणि खरी असते. ती समजून घेतली नाही तर आपलंच हे जवळचं माणूस खूप खूप दूर जावू शकतो. कारण, आरती प्रभूंचे ते शब्द आठवतात …… हसायचे कुठे? कुठे आणि केंव्हा कसे आणि कुणा पाशी? इथे भोळ्या कळ्यानाही आसवांचा येतो वास… मानवी अस्तित्वाला पूर्ण ग्रहणा सारखा गिळून टाकणारा हा आजार आहे .

हा २१व्या शतकातील सर्वात महत्वाचा आजार आहे. हे शतकच मुळात धकाधकीचे अमर्याद गतीचे आणि जीवघेण्या स्पर्धेचे आहे. मानसिक रोगांनी त्रस्त आणि गस्त असं हे शतक आहे…

लेखिका – सुनेत्रा प्रशांत नगरकर

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. खरंय मॅडम. आज समाजात कमी जास्त प्रमाणात प्रत्येक व्यक्ती नैराश्यातून जात असते काही त्यातून सावरतात स्वतःला.. पण काही सावरण्याच्या पलिकडे जातात. मानसोपचारतज्ज्ञा कडे जाणे त्यांना कमी पणाचे वाटत असावे. कारण लोक वेडे समजतील असा गैरसमज असतो कींवा काही अंशी तसे घडते पण. वेळेवर आपली गरज ओळखून त्यातून बाहेर पडणे गरजेचे असते.

- Advertisment -spot_img

Most Popular