संंक्रांंतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा होतो. या हवामानात उपलब्ध सर्व शेंंगाभाज्या, फळभाज्या यांंची तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी अणि मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात. संंक्रांंतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व असते.
संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाणे,पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात. म्हणूनच न खाई भोगी तो सदा रोगी असे म्हटले जात होते. तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे हा कार्यक्रम असतो.
नवविवाहित वधूचे हळदीकुंंकू विवाहानंंतरच्या प्रथम संंक्रांंतीला करण्याची प्रथा आहे. तिला यासाठी काळी साडी भेट दिली जाते. हलव्याचे दागिने मुलीला व जावयालाही देऊन त्यांंचे कौतुक केले जाते.
लहान बालकांंनाही संंक्रांंतीनिमित्त काळ्या रंंगाचे कपडे घालणे व त्यांना हलव्याचे दागिने घालणे अश्या पद्धती दिसून येतात. चुरमुरे, बोरे, हरभरे, उसाचे तुकडे, हलवा असे मिश्रण लहान मुलांंच्या डोक्यावर ओततात. अलीकडे यामधे गोळ्या, छोटी बिस्किटे घालण्याची हौसही दिसते. तसेच या मिश्रणामध्ये लहान मुलांची आवडती चाॅकलेटेही घालतात. याला बोरन्हाण अथवा लूट असे म्हणतात. बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरन्हाण केले जाते.

मुख्यसंपादक