Homeवैशिष्ट्येप्रत्येक प्रयत्नशील माणसाने वाचावे असे-: आणि हुरहूर संपली !!!!

प्रत्येक प्रयत्नशील माणसाने वाचावे असे-: आणि हुरहूर संपली !!!!

आणि हुरहूर संपली !!!!

 2003च्या सरत्या वर्षात डी.एड.ची व्यावसायिक पात्रता धारण केल्याने गवंडीकाम,पिग्मी एजंट किंवा दिसेल तो रोजगार करणाऱ्या माझ्या सारख्या सामान्य मुलाची शिक्षक म्हणून नोकरी मिळण्याची आशा हिरवळी सारखी पल्लवित झाली.त्यात आंधळा मागतो एक देव देतो दोन तसं 2004च्या मध्यात महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात नोकर भरती होणार असल्याची बातमी प्रसारीत झाल्याने आनंदाच्या भरतीला उधाण आलं.नव्हे नव्हे नोकरी लागल्याची स्वप्नं दिवसाढवळ्या पडू लागली. पण खरेच काहीचं दिवसात खरोखर जाहिरात निघाली. तेव्हा जरा ही वेळ न दवडता नोकरी संदर्भमध्ये जाहिरात पाहिली रे पाहिली की जिल्हा न पाहता अर्ज पाठवायचा मी सपाटाचं लावला.जवळ पैसे नसताना उधार उसनवारी केली पण अर्ज थांबवला नाही.जिकडे तिकडे भरलेल्या अर्जांमुळे कोठे ना कोठे आपले काम होऊन सरकारी नोकर होण्याची भाबडी अपेक्षा हाताला लागण्याच्या अंतरावर लोंबकळत असल्याचं चित्र नजरेसमोर दिसू लागलं.तरी ही खराखुरा नोकरी आदेश कधी हाती लागतो व सरकारी नोकर म्हणून आपल्या नावावर शिक्कामोर्तब कधी होतं या वाटेकडे मी अधीरतेने डोळे लावून बसलो होतो.
      परंतू 2004चं वर्ष माझ्या करीता एळकाटाच्या वाशासारखं पोकळचं गेलं. कारण जिथं भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती तिथं माझ्या कमी गुणांकामुळे मला संधी मिळाली नव्हती.तर बऱ्याच ठिकाणी भरती होणं बाकी होतं.परिणामी नोकरी मिळवण्याचं वातावरण ओहोटी लागलेल्या दर्यासारखं निश्चल व शांत झालं होतं.पण मनातली हुरहूर उतुंग लाटांसारखी आतल्या आत आशेला धडका मारण्याची थांबलेली नव्हती.तेवढीच काय ती माझ्यासाठी जमेची बाजू होती.त्या ढुसण्या राहून राहून चालू होत्या.ज्या धक्क्याने मी नव्याने अस्थिर होत होतो. तरी नोकरी नव्हती म्हणून मी गप्प बसून नव्हतो. गवंडीकाम,सेन्टरिंग काम, पिग्मी जमा करणे ही कामे करून त्याच्या साहाय्याने घर खर्चासाठी आईला हातभार लावत होतो.पण हे किती दिवस करायचं.आता आपण शिकलो आहोत जवळ एक पात्रता आहे.या विचाराने सरकारी नोकर होण्याच्या भरवशाच्या लाटेवर तरंगत होतो.आज ना उद्या आपलं काम होईल पण होईल या आशेच्या कवडशावर तग धरून होतो.BA ला प्रवेश घेतला होता.पण आता अभ्यासात मूळीच लक्ष नव्हतं.नोकरीची वाट बघता बघता 2004 अखंड वर्ष केव्हा मागे पडलं ते कळलं ही नाही. 
   2005 ची सुरुवातच माझ्यासाठी खूप गोड झाली होती.कारण लगतच्या रत्नागिरी,सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या गुणांक याद्या लागल्याचं समजल होतं.ज्याने नोकरीची सुस्तावलेली आशा पुन्हा बेभान झाली.खरं तर नोकरी शिवाय चाललेला तो एक एक क्षण डोंगरा एवढा वाटत होता.त्यात चाललेली मंद प्रक्रिया बघताना तळपायाची आग मस्तकाला जात होती.हे असं का करतात? एवढा वेळ घ्यायचा असतो का? लवकर भरती करून घ्यायला काय होत यांना ?सारखे अनेक कमी अनुभवी प्रश्न अंतर्मनाला भंडावत होते.पण मी एक सामान्य मुलगा. जमिन सोडा स्वतःची झोपडी सुद्धा ज्याच्या नशिबात नव्हती असा गरीबातला गरीब.मूग गिळून गप्प बसण्या शिवाय काय करू शकत होतो! आणि कोणाला काय जाब विचारणार होतो? नव्हे कोणाला काय विचारण्या एवढा ना माझ्याकडे अनुभव होता ना पैसा होता,ना कुठले पद.पण साकेच्या भैरोबा मंदिरात दर रविवारी मी जात असे तिथं न चुकता माझी व्यथा मूक शब्दांनी मांडत असे.तिथं मला खूप आधार वाटायचा.अर्थात तिथं मी माझ्या व्यथा का मांडत होतो,त्याच्या काय उपयोग होणार होता का?मी तसे का करत होतो.याबाबत मला काही सांगता येणार नाही. पण आपल्या मनात येत असलेल्या या प्रक्षोभ भावना मुक्तपणे जिथं मांडू शकत नव्हतो.ती एकमेव जागा अशी होती तिथं मी त्या भावभावना मांडू शकत होतो.आणि विशेष म्हणजे त्या भावना बाहेर कुठं ही फुटणार नव्हत्या.म्हणून मी तिथं सारं उघड करत असे. असो सांगण्याचा उद्देश एवढाच की माझी घालमेल मी फक्त तिथं जाऊन सांगत होतो.आता याद्या लागल्या हे कळल्यावर त्या एकदा बघून तरी येऊ असा बेत ठरवला. सुनीलशी बोललो.तो ही तयार झाला.आमचा मामा बिचारा शिवाजी गवंडी सकाळी साडेपाचला दुचाकीवरून आम्हाला त्यावेळी कागलला सोडायला आला.आम्ही रत्नागिरी गाठली.याद्या पहिल्या.त्या टक्केवारी नुसार सरसकट लावल्या होत्या.पण अंदाज घेण्यास त्या पुरेपूर होत्या.मी अपंग संवर्गातील त्या यादीत टक्केवारीने माझ्या पुढे किती दिव्यांग मुले आहेत ते पाहिले.आठ मुले पुढे होती. रत्नागिरी जि.प.च्या साधारण 284 च्या जवळपास जागा भरायच्या होत्या.त्यामुळे त्यातील एक जरी दुसरीकडे हजर झाला तरी मी रत्नागिरी जिल्ह्यात आरामात लागू शकतो.मनातल्या मनात ताळमेळ मांडला.कोल्हापूर मध्ये अजा च्या 26 जागेत मी बसणं शक्य नव्हतं.हे मला कोणत्या ही ज्योतिषाने सांगण्याची गरज नव्हती. त्यामुळे जवळचे दोन जिल्हे रत्नागिरी किंवा सांगली पैकी एका जिल्ह्यात आपलं काम व्हावं असं मला वाटत होतं. त्यात याद्या पाहून मी स्वतःशी त्याबाबत पक्का निष्कर्ष लावून समाधान पावलो होतो.रत्नागिरीच्या यादीत माझ्या पुढे असणाऱ्या मुलांची टक्केवारी व नावे कागदावर टिपून घेतली. रत्नागिरीची यादी पाहून आल्यापासून सांगलीची यादी पाहण्याची तळमळ गप्प बसू देईना.सोमवार ते गुरुवार काम केले.त्या सायंकाळी गवंडी मामाला म्हटलं बापू मला उद्या शुक्रवारी सांगलीला जायचं आहे पैसे हवे होते द्याल का?त्यांनी थोडी ही काचकूच न करता मला चार दिवसांचे पैसे दिले. त्या संध्याकाळी बराच वेळ झोप लागेना डोळ्यापुढं फक्त सांगलीची जिल्हा परिषद दिसत होती.सकाळी लवकर उठलो.पावणे सहाच्या गाडीने व्हाया कागल सांगली गाठली.याद्या पहिल्या माझा तर्क अगदी तंतोतंत बरोबर होता.रत्नागिरीच्या यादीतील आठ नावेच इथं माझ्यापुढे होती.एवढंच नाही तिचं नावे कोल्हापूरच्या यादीत ही पाहिली.म्हणजे माझी नोकरी मृगजळा सारखी वावभर जागेवर उभे राहून मला खुणावत असल्यासारखं वाटू लागलं होतं. 

  जानेवारी महिना याद्या पाहण्यात गेला.फेब्रुवारी महिन्यात मुलाखत कॉल येईल असं वाटलं होतं.पण पहिला आठवडा वाऱ्यासारखा उडाला.त्यात बरेच जण विचारायचे शिलवंत नोकरीच काय बघतोस का नाही?का नुसतं पिग्मी,गवंडीकाम सेंटरिंग काम हेच करत बसणार आहेस.याला कारण काम व्हायच्या आधीचं मनात न साठवता आल्याने मी मोठेपणाने सर्वांना माझं काम होणार!मला नोकरी लागणार असं बोललो होतो ते झिरपत झिरपत लांब लांब गेलं होतं.पण ज्यांना ज्यांना हे समजलं होतं त्यांना ते शक्य वाटत नव्हतं.नोकरीसाठी वशिला लागतो तो याच्याकडे कुठं आहे.याला कोण विचारतय.याच्याकडे ना पैसा ना गहाण टाकण्यासाठी जमिनीचा तुकडा असे त्यांना वाटत होते.ते लोक उगीचच विषय काढून मला डिवचत होते.तर काही अर्धे पुढारी एक एक जण आमच्या शिवाय कसा नोकरी लागतो ते बघतोच अशी अप्रत्यक्ष मला तंबी देत होते.काही जण मास्तर होऊन काय फायदा. लगेच कुठं पगार मिळतो होय असं म्हणून आमच्या साकेच्या हायस्कूलचे उदाहरण द्यायचे,जिथे गेली दहा वर्षे आमचे गुरुवर्य विनापगार राबत होते.तर काहीजण शेती ऐकत नाही गा!असे म्हणायचे.पण शेती करायचं म्हटलं तर माझ्याकडे शेतीचा एखादा तुकडा ही माझा म्हणून दाखवायला नव्हता.एवढंच नाही तर न विचारता पाऊल ठेवू म्हणावं एवढा स्वतःच्या मालकीचा वावभर हिस्सा ही नव्हता.त्यामुळे शेती हा विषय माझ्यासाठी खूप लांबचा होता.त्यामुळे या लोकांचं टोचणारं बोलणं ऐकलं की मनात चर्र व्हायचं, कशात मन लागायचं नाही. नोकरी तेवढी पटकन मिळावी असं वाटायचं. 
        
    त्या दिवशी गवंडी कामाला गेलो होतो. सिमेंटचा माल करण्यात गर्क असताना.मला बघून माझा मानलेला मामा तिथं आला. किसना म्हणून तोंड भरून मला हाक मारली.शिवू मामाकडे बघून म्हणाला, शिवाजीराव आता आमचा मास्तर काय थोडे दिवसच कामासाठी मिळेल हा.ते फक्त ऐकूनचं मनातला आनंद नुसता उसळ्या मारु लागला. त्या नंतर काम करताना मी काम करत आहे असं मला वाटलंच नाही.एवढा आनंद त्या दोन शब्दांनी मला दिला होता.त्या संध्याकाळी आईला ही कोणी तरी माझ्या नोकरीबद्दल विचारलं असल्याने जेवायला बसल्यावर विषय निघाला. मी अंदाजाने आईला म्हणालो आता एप्रिल सुरू असल्याने जून महिन्यात शाळा सुरू झाल्यावर आम्हाला हजर करून घेतील असं मला वाटतंय.आता हे असं सांगण्या पाठीमागे दोन उद्देश होते.आई व माझ्या मनाची सहनशक्ती अजून दोन महिने वाढवून स्वतःला धीर देणे बस्स.
    2005 चं नवं वर्ष एक नवी आशा घेऊन उजाडलं होतं.कारण 2004 ची अडकून पडलेली भरती या वर्षातपूर्णत्वाकडे जाणार हे नक्की होतं.आणि त्यात माझा नंबर असणार असं माझं एक मन मला सारखं सांगत होतं.तर दुसरं मन असे खरचं असं होईल ना ही धाकधूक आणत होतं ! या दुहेरी गोचिमुळे माझ्या आनंदी जीवनाचा रंग केव्हा केव्हा भुर्रकन फिका पडायचा.त्याला कारण अजूनही माझी मनीषा पूर्ण झाली नव्हती.नाही होय करत मार्च महिन्याचा पहिला आठवडा उजाडला.त्यात एका सायंकाळी एक लेखी पत्र पोस्टमन काकांनी आईच्या हातात दिले.मी आल्यावर पाहिले तर ते रत्नागिरी जि.प.चे मुलाखत पत्र होतं.एवढा आनंद झाला म्हणता ते बघून.आकाशाला हात लागायचे बाकी राहिले होते.पण वाचून तारीख बघून पुरता वरमलो.आई म्हणाली काय झालं बाळ!,मी म्हटलं आई या मुलाखती जानेवारी महिन्यात झाल्या आहेत. आता वेळ निघून गेली. क्षणभर हातातून नोकरी निसटल्या सारख झालं.तो शनिवार होता.रविवारी नेहमी प्रमाणे लवकर उठून भैरोबा मंदिरात गेलो.तिथं नेहमी भेटणारी आम्ही चार माणसं भेटलो.त्यांना सर्व हकीकत सांगितली.त्यावेळी केंबळीचे मामा म्हणाले तू रत्नागिरीला जाऊन ये,काय म्हणतात ते समजेल.माझ्या ही मनात तेच होतं.सोमवारी रत्नागिरी वारी केली.जो माझ्या जीवनातला टर्निंग पॉईंट ठरला.वरिष्ठ क्लार्क साहेबांनी माझ्या कॉल लेटर वरील तारखेचा शिक्का पाहिला.मला म्हणाले एक अर्ज लिही.त्याची एक झेरॉक्स काढ.आणि ये माझ्याकडे.मला भरलेल्या डोलीत जागा मिळावा तसं झालं.भरभर जिना उतरून खाली गेलो.एक कागद घेतला.अक्षर कसे येते ते न पाहता माझं म्हणणं त्या कागदावर सविस्तर मांडलं. खाली आलेल्या वेगाच्या दुपट्टीने साहेबांजवळ गेलो. त्यांनी सांगितल्या प्रमाणे मी सर्व लिहिलेले त्यांनी वाचले. झेरॉक्स वर सही शिक्का व तारीख टाकली आणि मला म्हणाले हे जपून ठेव. जीवनाच्या वाटेवर काही हस्ती आयुष्यभराची न संपणारी शिदोरी देऊन जातात ना! हे अगदी खरं त्यापैकी मला भेटलेली ती व्यक्ती.साहेबांनी त्यादिवशी मला केलेली ती मदत मोल करण्या पलिकडची होती.पुढे जाऊन मला ते मला म्हणाले दुसऱ्या यादीतील मुलाखती दोन आठवड्यांनी होतील त्यावेळी हा अर्ज घेऊन ये. तुला संधी मिळेल.त्यांचं ते दोन शब्दांचे आश्वासन मला आभाळा एवढं वाटलं.आता दोन आठवडे वाट पाहणे मला दोन वर्षांसारखे वाटत होते. आठवडा भरात सुनिलला मुलाखत पत्र आले.त्याच्या कडून मला मुलाखतीची तारीख कळली. आणि कोणतं ही अधिकृत पत्र नसताना फक्त तो अर्ज घेऊन मी दुसऱ्या फेरीत सहभागी झालो.अंग थरथर कापत होतं.काय होणार ?कसं होणार?संधी मिळणार का नाही?संधी नाही दिली तर?ते पत्र मला उशिरा मिळाले यात माझा दोष होता का? येथून जा बाहेर म्हणाले तर काय करायचे?कोणाला सांगायचे,आपला काही वशिला वगैरे नाही,कोणाची ओळख नाही.आता कसं होणार?असे नाना प्रश्न डोक्याचा भुगा करीत होते.मन अनेक विचारांवर स्वार होतं,पडत होत, धडपडत होतं,बसत होतं, उठत होतं.डोळे पाण्याने डबडबले होते.त्यावेळी फक्त मलाच माझ्या मनाची काय अवस्था झाली होती याची कल्पना येत होती.ती अवस्था शब्दात मांडण्या पलीकडची होती.सगळ्या मुलांना आत घेऊन क्रमवार बसवत होते. मी खाली मान घालून,घाबरत घाबरत,चूक करतो आहे का या भावनेने त्यांच्या मागे जाऊन बसलो.तेवढ्यात कोण तरी छान कपडे घातले साहेब आत आले.बहुतेक जि.प.सभापती असावेत.ते नेमके कोण होते हे मला ठाव नाही.कर्मधर्म संयोगाने असेल किंवा माझ्या चेहऱ्यावरील थरकाप ओळखून असेल त्यांनी मलाचं बाळ मुलाखत पत्र कुठं आहे दाखव जरा म्हणून उठवले.मी माझ्याकडे मुलाखत पत्र नाही असे खरेखरे सांगितले.त्यांनी दंडाला धरलं.आणि वर उभं केलं आणि बाहेरचा रस्ता दाखवला.माझ्यावर असे काही भडकले की,माझं सारं अवसान सर्रकन रिकाम झालं होतं काय सांगावं काहीच कळेना.त्यांनीच कसा काय माझ्या हातातील अर्ज पाहून हे काय म्हणून विचारले.मी मुकाट्याने काही ही न बोलता तो अर्ज त्यांच्या हातात दिला.तो वाचल्यावर बाहेर काढण्यासाठी धरलेला माझा हात त्यांनी सोडला.या मुलाचा विषय सोडवा म्हणून बाहेर निघून गेले.समोरच्या साहेबांनी माझा अर्ज बघून मला शेवटाला बसवले.तुला सर्वात शेवटी बोलावले जाईल अशी सूचना ही दिली.शेवटी तर शेवटी पण बोलावणार तर आहेच ना!हे ऐकून थोडं बरं वाटलं.पुढच्या मुलांसाठी दुपार गेली.जवळ जवळ सायंकाळ होत असताना माझा नंबर आला.

मी आत गेल्यावर माझे कागद तपासले,फलकावर सुविचार लिहायला सांगितला.मी सुविचार लिहिला.त्यानंतर मला त्याचा अर्थ सांगायला सांगितला मी तो ही सांगितला. मला व्वा अशी दाद ही मिळाली आणि जायला सांगितले.नोकरी मिळवण्याचा पहिला टप्पा मी पूर्ण केला होता.एका बाजूला आनंद तर दुसऱ्या बाजूला हुरहूर मनाला वारं घालत असल्यासारखं वाटतं होतं.
मुलाखत देऊन आलो पण अद्यापि आदेश आला नव्हता.दोन दिवस गेले की मी किंवा माझा मित्र जि.प.ला हालहवाल विचारत असे.फोन लावताना एक तर अर्धा अर्धा तास लागायचा नाही आणि लागला की ढोबळ उत्तर देऊन फोन ठेवला जायचं.असाच एकदा मी फोन केला आणि माझ्या दुर्दैवाने फोन मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात लागला.कदाचित सोनावणे साहेब त्यावेळी रत्नागिरीला साहेब होते.फोन घेतल्यावर ते मला खूप बोलले.कुठं फोन लावलास,तुला कळतं का नाही.मला तेवढीच कामे असतात का?वगैरे वगैरे माझे हातपाय थरथर कापत होते. बोलून घेऊन फोन ठेवला.कारण आज पर्यन्त मी दुसऱ्यांचे बोलून घेत आलो होतो.पण त्यादिवशी बोलून घेतल्यावर आयुष्यात खूप मोठा अधिकारी होऊ पण एखाद्या सामान्य व्यक्तीचा जरी फोन आला तरी असं अपमानित करणारे अजिबात बोलायचं नाही असा पण स्वतःशी केला.कसं आहे आयुष्यात पद सर्वश्रेष्ठ नाही ना!पद शेवटाला सोबत नसतं सोबत येते ती आपण मिळवलेली माणुसकीचं बरोबर ना!


दोन आठवडे फोनाफोनी, भेटचर्चा,स्वप्नांची रंगवारंगव यात झुळकन निघून गेले. आणि एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याच्या मंगळवारी सुनिलला आदेश मिळाला.त्या संध्याकाळी एका हातात आदेश असनी दुसऱ्या हातात पेढे घेऊन सुनिल घरात हजर.अरे बापरे!अंग आतून लटलट कापू लागला.आनंद होता, दुःख होतं,भीती,होती,हुरहूर होती सगळं सगळं एका दमात वाहत होतं.सुनिल काय बोलत होता ते कानावर पडत होतं.ऐकू काहीच येत नव्हतं.मी आईकडे डोळे लपवत पाहत होतो.तर आई माझ्याकडे खोलवर डोळ्यांनी चोरून बघण्याचा प्रयत्न करत होती.त्याचवेळी सुनिल आदेशामध्ये दिलेल्या वेळेच्या आता आधी हजर होणं गरजेचं असतं.त्याचा फायदा भविष्यात कसा होतो हे सांगत होता.मी नुकताच पिग्मी गोळा करून आलो होतो.भिंतीला टेकून उभा होतो.सुनिल काय सांगतोय, काय महत्वाचं आहे यापेक्षा मला आदेश का मिळाला नाही याचा मी विचार माझ्या डोक्यात धुमाकूळ करत होता.सुनिल तुला उद्या कदाचित मिळेल आदेश असे म्हणत मामांकडे जातो म्हणून बाहेर पडला.एका बाजूला मी तर दुसऱ्या बाजूला आई असं दोघांचं असलेलं हसतं खेळतं घर आज एकाएकी निपचित पडलं.आई मुला जेवायला वाढू का असं म्हणाली. नको म्हणावं का वाढ म्हणावं मला काहीच उमजेना.थांब एवढंच तुटक बोलून भरभर ढेंगा टाकत गावातल्या पोस्टमन काकांच घर गाठलं.ते म्हणाले,”काय रे बाळ! का आला होतास?” मी सर्व बाब त्यांच्या कानावर घातली.ते म्हणाले असाच मांगले काकांकडे जा.त्यांनी आजचं टपाल वितरीत केलं की नाही विचार जा.तिथून तसाच तडक जवळजवळ धावतच मांगले काकांचे घरी गेलो.ते बिचारे जेवत होते.क्षणभर आताचं का जेवायला बसले असतील असा स्वार्थी विचार माझ्या मनात आला.कारण त्यांच्या जेवणापेक्षा मला माझं काम महत्वाचं वाटतं होतं.जेवून झाल्यावर मला दारात घुटमळत असल्याचे त्यांनी पाहिले व म्हणाले काय रे, शिलवंत!का आला होतास?थरथरत्या स्वरात मी सारा मघाचा पाढा पुन्हा वाचला.एकाच वेळी पाठवलेले आदेश सुनिलला मिळाला मग माझा पण यायला हवा होता.नाहीतर मुलाखतीसारखं व्हायला नको म्हणून आलो होतो. त्यावर ते म्हणाले बाळ मी टपाल मिळाले की ठेवत नाही आजचे टपाल मघाशी पाच वाजता पोहच केलं.तुझं नाव मला काही नवं नाही.आलं असतं तर केव्हाच दिलं असतं तसं टपाल एक दोन दिवस मागंपुढं होतं कधीकधी तू नको काळजी करु.उद्या एक दीड वाजता इथं ये तुझ्या हातांनी टपाल बघ तुझा आदेश असेल त्यात तर इथूनच घेऊन जा.त्यांचं बोलणं ऐकून धीर आला.एक दोन दिवस टपाल मागेपुढे होते.म्हणजे उद्या किंवा फारफार तर परवा आदेश आपल्यास मिळेल ही अपेक्षा मनात धरून अंधारातून धासाधास पावलांनी घरी आलो.आई मुला,ये मुला अशा हाका मारत आमच्या गल्लीत मला हुडकत होती. मला बघताच तिच्या जीव भांड्यात पडल्यावाणी वाटला.कारण मी आलोच असं म्हणून जे बाहेर पडलो होतो ते जवळपास तास उलटून गेला असेल मी बाहेरच होतो म्हणून आई कावरीबावरी झाली होती. आईला चल म्हणून आम्ही घरात आलो.आईने काही ही न विचारता जेवायला वाढले. कदाचित जेवताना माझा मूड ऑफ होऊ नये म्हणून तिने घेतलेली ती खबरदारी असावी असं मला वाटलं.पण त्या दिवशी दोघांनाही जेवावं असं वाटलंच नाही.आईने माझ्या जेवायला वाढताना माझे डबडबलेले डोळे हेरले होते.ताटातले काढून राहिलेले जेवण खाऊन झाल्यावर आईने मला मघाशी कुठं गेला होतास हे शब्द बाहेर पडताच काही सांगायच्या आधीचं डोळ्यात मघापासून अडवून ठेवलेले अश्रू ताटात कोसळलेच.तसं सोबतीला आई ही रडायला लागली. विवेक बुद्धीने स्वतःस शांत करून आईला सांगितले आई पोस्टमन काकांच्या घरी गेलो होतो.ते आजच्या टपालात काही नव्हते उद्या किंवा परवा कदाचित येईल असे म्हणाले. बघूया काय होतं ते.शेवटी आपलं नशीब.असं म्हणून अंथरुणात आडवा झालो. पण बराच वेळ सुनिलचा आदेश आला,मग माझा कुठं गेला?मला पाठवला नसेल का?पाठवलाच नसेल तर का पाठवला नसेल?नेमकं काय झालं असेल?उद्या किंवा परवा तर येईल,की येणारच नाही?जर आदेश नाहीचं आली तर काय करायचं? पण असं होणार नाही कारण आपण कोणाचं काय वाईट केलं आहे का? पण मग माझ्याच बाबतीत हे असं का?देवा उद्या तरी येऊ दे रे बाबा असे एक ना अनेक प्रश्न सेकंद काट्यासारखे मागे सरकत होते.चिंतन चालू असताना कधी झोप लागली माहीत नाही.सकाळी उठल्या पासून गावात टपाल येण्याची वेळ पटकन व्हावी असं राहून राहून वाटत होतं.अगदी काटावर एक वाजल्या बरोबर दहा मिनिटांच्या फरकाने काकांच्या घरी चार एक फेऱ्या पूर्ण झाल्या होत्या.पण एखाद्या गोष्टीची खूप आतुरतेने जेव्हा आपण वाट पाहतो तेव्हा वेळ तर सरता सरत नाही पण एखादा अडथळा मात्र ठरलेला असतो अगदी तसंच एकचे टपाल आज दोन वाजता आले.टपाल आल्या बरोबर ते माझ्या हातातच दिले पण!पण माझी आदेश त्यात नव्हता.मी व मांगले काकांनी टपाल तीन चार वेळा खाली वर केले,टपालचे पोते झाडले पण माझी न आलेला आदेश त्यात दिसेलच कसा म्हणा. माझा चेहरा पुरता उतरला. रडण्याचा गळ्याला लागलेला अवंडा कसा बसा दाबून धरून घर गाठलं.आता काय करायचं हा भला दांडगा प्रश्न दृष्टी पटलावर इकडून तिकडे पळत होता.तर आईला काय सांगायचं हा दुसरा प्रश्न उसनं अवसान आईच्या विचाराने गिळंकृत करू लागला होता. मंगळवार सारखाच आजचा बुधवार ही कुठलंच समाधान न देता मागे पडला.मंगळवार पासून भूक कसली असते हा विचार ही मनात आला नव्हता पण दुष्काळात तेरावा महिना म्हणतात ना तसं जोडीला आईला व लोकांना काय सांगायचं हे विचारचक्र मात्र न बोलवता आलं होतं. डबडबलेल्या घामाने खाली मान घालून दिवसभर घरात बसलो होतो.कामाला दांडी मारली होती ना! सायंकाळी आई आली तिने माझा उतरलेला चेहरा बघून मला काही ही विचारलं नाही.
दोन दिवस माझे काम आहे ही सबब सांगून कामाला गेलो नव्हतो.तरी संध्याकाळी मामाने उद्या कामाला येणार काय म्हणून विचारले पण मी नाही म्हणून सांगितले.माझं पिग्मी गोळा करण्यात,कामाला जाण्यात, क्रिकेट खेळण्यात,जेवण्यात कशा कशात लक्ष नव्हतं.मला फक्त नोकरीचा आदेश हातात मिळावा एवढंच वाटत होतं. कोणाशी बोलावं,काय बोलावं,कसं सांगावं,काय सांगावं काहीच उमजत नव्हतं.त्या दिवशी पिग्मी जमा करून तसाच कॅनॉलकडे गेलो.एकांत पाहून मोठ्याने खूप रडलो. दाबून ठेवलेल्या भावनेला वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न करताना कोणाला आवाज जाऊ नये म्हणून स्वतःच्या हाताने तोंड दाबून रडत होतो.घडत असलेला हा सहन न होणारा हा प्रकार माझ्याच बाबतीत का घडत असेल असा प्रश्न आकाशाकडे तोंड करून त्या निर्विकार विधात्याला विचारत होतो.डोळ्यातून घळाघळा बाहेर पडणार पाणी थांबायचं नाव घेत नव्हतं.अंधार वाढत असल्याचे जाणवू लागताच स्वतःला सावरलं.ओढ्यात तोंड धुतले कारण कोणी रडत होतास का हे विचारू नये म्हणून काळजी घेतली होती.तसाच घरात आलो आईने गरमा गरम भाकरी केली होती.पण माझी भूक मेली होती.विचारांनी भुकेला वेढलं होतं.त्यामुळे काही खावं असं मनापासून वाटतच नव्हतं.पण आईसाठी जेवायला बसलो.दोघांनी ही थोडी थोडी भाकरी खाल्ली. सकाळी भांडे भरून केलेला भात तसाच होता त्याला ना आईने हात लावला होता ना मी.आजही अंथरुणावर पडलो पण उद्या काय होणार ही प्रतिक्षा शिगेला पोहचली होती.चिंतन व मनन करत केव्हासा झोपी गेलो माहीत नाही.गुरुवारी ही बुधवारचीच पुनरावृत्ती झाली.टपाल आलं,माझ्यात हातात दिलं, आम्ही दोघांनी पाहिलं पण व्यर्थ.त्यात आदेश कुठंच नव्हता.पुन्हा माझं मन नाराज.आज मांगले काकांच्या घरातच माझ्या डोळ्यांचा बांध फुटला.त्यांनी पाठीवरून हात फिरवला. मला म्हणाले बाळ असं कर उद्या वाळव्यात मुख्य ऑफीलला जा.तिथून बाचणीत पण बघून ये काही वेळा टपाल अदलाबदली होतं.हे ऐकल्यावर गप्प बसावे असं वाटेना तसाच अनिल पाटील कडे गेलो. झालेला सारा प्रकार त्याला सांगितला.तो ही नाराज झाला.ठीक आहे उद्या वाळव्यात जाऊ म्हणाला.घरी आलो.शुक्रवारी आम्ही वाळव्यात गेलो.तिथल्या साहेबांनी माझं म्हणणं ऐकलं मला आजच साक्याला जाणार टपाल स्वतः बघायला सांगितलं.एवढंच नाही या आठवड्यात जे टपाल मागेपुढे झालं होतं ते ही दाखवलं.पण कसलं काय माझा आदेश तिथे ही नव्हता. आता करायचं काय अनिल व मी विचार करत,बोलत साक्यात आलो.आता माझं लक्ष कुठेच लागेना,पुन्हा मांगले काकांच्या घरी गेलो झाला प्रकार त्यांना सांगितलं तेव्हा ते म्हणाले उद्या पुन्हा बाचणी जाऊन ये चुकून तिथं गेले असेल तर!असे म्हटल्या बरोबर पुन्हा अनिलकडे गेलो सायंकाळचे साडेपाच वाजले होते.त्याला म्हटलं अनिल चल बाचणीला जाऊया . बाचणीला गेलो तिथं वितरकाचे काम करणारे दादा तोंड ओळखीचे होते. त्यांना नोकरीबद्दल बोलल्या बरोबर निवांत बसलेले ते चटकन उठले सायंकाळ सुमारे सहाची वेळ असावी.आम्ही सोबतीने ऑफिस मध्ये गेलो. कपाटातील सर्व टपाल आमच्या समोर टाकून आमच्या हातांनी पाहायला सांगितले.पण माझ्या दुर्दैवाने माझी संगत अद्यापि सोडली नव्हती.तिथं ही माझा आदेश सापडला नाही.तरी पण बाहेर पडता पडता दादा म्हणाले उद्या तुमच्या गावाचे टपाल बघून इकडे ये उद्या आठवड्यातील उरले सुरलेले सर्व टपाल एकत्र येते.बघूया ये उद्या.उद्या ये हा बाळ असा आधाराचा हात पाठीवर ठेऊन त्यांनी आम्हाला निरोप दिला.उद्या उरले सुरले टपाल येते या शब्दांनी उद्याची अंधुक आशा प्रकाशित झाली होती.एवढीच आजच्या दिवसाची माझ्यासाठीची चांगली वेळ होती एवढंच! परंतु चार दिवस आदेश गेला कुठे हा गुंता मात्र वाढला होता.एक मन म्हणत होतं मला आदेश पाठवलाच नसेल तर दुसरं मन म्हणत होतं पाठवला ही असेल पण मुलाखत पत्रा सारखा हा ही उशिरा मिळाला तर काय करायच? कारण आता उशीर होऊन चालणारं नव्हतं.ते महाग पडलं असतं.हाता तोंडाशी आलेला नोकरीचा घास हिरावून जाईल ना.जीव मेटाकुटीला आणणारी विचारांची मैफिल एवढी रंगली होती की निर्माण झालेली हुरहूर चालणं, बोलणं,बसणं,खाणं,पिणं सगळ्यांच स्वातंत्र्य हिरावून बसली होती.मन अशांत झालं होतं.काय करावं,कसं करावं कशाला कशाचा ताळमेळ लागेना.पाच मिनिटे अनिल व मी त्याच्या गाडी जवळ येऊन शांत उभे राहिलो.शेवटी अनिल म्हणाला जाऊया ना!मी फक्त मान हालवली. अनिलने माझी मानसिकता ओळखली होती तो मला म्हणाला उद्या दुपारी येऊ बाचणीला.मी घरी आलो आणि पिग्मी पुस्तक घेऊन गावात गेलो.पण पिग्मी जमा करण्यात कणभर लक्ष नव्हतं.अंगावरच काम होतं म्हणून वरच्या मनाने पूर्ण करत होतो.वाटेत बरेचजण भेटत होते त्यांच्याशी बोलत होतो.पण कोणाशी काय बोललो,काय बोलत आहे हे देखील आज जुळेना झालं होतं.संध्याकाळी घरी आलो. कोणाशी काही बोलावं,व्यक्त व्हावं असं ही वाटेना.मनातून एवढा तुटलो होतो की एखादा धागा असेल जो मला उभं ठेवण्यास हातभार लावून होता असेल ज्याने मी अजून तग धरला होता.आज क्षणभर हे चालतं बोलतं जीवन टाकावं का संपवून एक दमात असं खलबत कोठुनस माझ्याकडे डोक्यात घुटमळू लागलं होतं. संध्याकाळी जेवायला बसलो तर सकाळचा भांड भरून भात,डाळीची आमटी वाट पाहत असल्याने आईने आज काही केले नव्हते.तिला आज ही आम्ही पोटभर खाऊ शकणार नाही याची जणू कुणकुण लागली असावी.मी थोडासा भात घाल असं म्हणत खाली बसतो तोच आई खूप चिडली. मला म्हणाली,हे बघ तुझी नोकरी मिळू दे नाहीतर राहू दे मीठ भाकरी खाऊन जगू पण हे असं खुळं डोक्यात घेऊन न खातापिता राहू नको बाबा असं म्हणून आईने चार दिवसांचा हुंदका अखेर बाहेर काढलाचं.पुन्हा आमचं दोघांचं घर सामसूम.अर्धा तास न बोलता आम्ही कसेबसे चार घास खाल्ले पण एकदा घेरलेला विचार असाच जातो का?आणि हा तर आयुष्यभराचा प्रश्न होता.तसंच विचार करत अंथरून टाकलं.अंगावर घेऊन आड्याला नजर लावून उद्या काय याचं चिंतन करू लागलो.बराच वेळ कुस बदलत होतो एखादी डुलकी लागायची अन मध्येच जाग यायची.पुन्हा विचारांची गाडी सुरू होऊन उद्या काय या बंद असलेल्या चौकात येऊन थांबायची.
सकाळी लवकर उठलो आज माझा शनिवार होता. त्यामुळे जेवायचं विषय नव्हता.तयार होऊन गावात जाऊन जरा पेपर वाचला. परत घरात आलो.आई बाहेर गेली होती.कपडे घालून अनिलकडे गेलो.अनिलने काही काम असल्याने तो येऊ शकणार नाही असे सांगितले म्हणून पुन्हा घरात आलो. आईला मी वाळव्याला काम आहे चाललो आहे असं सांगितले.कोण गाडीवर घेईल त्याला हात करत बाचणी ते वाळवे असे करत वाळवे पोस्टऑफीस गाठलं अकरा सव्वा अकरा झाले असतील. त्यांनी नवीन टपालसाठी बारा वाजेपर्यन्त थांबायला सांगितले.वाट पाहण्याची वेळ काय संपता संपत नव्हती.थांबलो पाहिले पण व्यर्थ आजच्या नविन टपालमध्ये ही आदेश दिसला नाही.बाचणीत आलो पुन्हा मन राहिना म्हणून पुन्हा बाचणी पोस्ट ऑफिसात. जिथं काही नव्हतंच तिथं काय मिळणार होतं म्हणा. रिकाम्या हातांनी पण ढीगभर विचारांनी बाचणी स्टँड वर आलो.इकडे तिकडे पाहिले, कुठं जायचं,काहीच सुचेना, मन अस्वस्थ,बैचेन झालं होतं, केसात खारखार खाजवलं. साक्याला घरी जायला मन तयारच होईना.माझी सैरभैर झालेली ती अवस्था फक्त मी आणि मी चं जाणू शकत होतो.साडेचार पाच वाजले असतील पण तोंडात पाणी ही घेतलं नव्हतं.शरीरातल्या बळाबरोबर मनाचं बळ ही अस्ताला गेल्या सारखं वाटत होतो.कसाबसा हॉटेल मध्ये गेलो पण घ्यायचं काय यावर विचार होईना.पण तिथं पाणी प्याल्यावर एकदा रत्नागिरी जि.प.ला फोन लावून विचारावं का हा विचार कोठून कसा,का,कोठून पण डोक्यात आला.काही न घेता कॉइन बॉक्स वर आलो.दहा कॉइन घेतले.दहा पंधरा मिनिटे फोन फक्त बिझी लागत होता पण मी गप्प बसलो नाही कारण या आधी खूप वेळा फोन लावताना तो बिझी लागत असे हे मला माहित होतं.शेवटी एकदा फोन लागला.मी घाबरत, चाचरत म्हटलं साहेब माझी मुलाखत झाली आहे पण ऑर्डर आलेली नाही.फोन साहेबांनी उचलला तर ही भीती मनात घर करून होती. पण आज फोन योग्य व्यक्तीलाच लागला होता. पुढून विचारणा झाली काय झालं मोठ्याने बोल.मोठे साहेब नाहीत हे ऐकून धीर आला.मग मी सांगितले, माझ्या शेजारच्या गावातील मित्राला ऑर्डर आली आहे.पण मला आलेली नाही. ती चौकशी करण्यासाठी फोन केला आहे.माझ्या विचारण्यात आर्त भाव होता, भीती होती,थरकाप होता. समोरच्या साहेबांनी सारं ऐकल्यावर अरे नाव तरी सांग असा प्रतिप्रश्न केला तेव्हा मी माझे नाव सांगितले.अरे शिलवंत ना ऑर्डर पाठवली आहे तुझी.बरं ठीक आहे. सोमवारी जि.प.ला ये असं म्हणून फोन ठेवला.अरे बापरे!कोण आनंद झाला म्हणून सांगू.अवर्णनीय होता तो क्षण ज्याचं वर्णन कोणत्याच शब्दात होऊ शकत नाही किंवा मी करू शकणार नाही एवढा उच्च पातळीवर नेणारा आनंद झाला होता.दुरमुखलेला चेहरा अचानक चमकू लागला.स्वतःचा अभिमान ओसंडून वाहू लागला.पाच दिवस ज्या दबावाखाली वावरत होतो ना तो दबाव वाऱ्यासारखा भुर्रकन उडाला होता.हातात भले कागद नव्हता पण हिमालयाच्या उंचीचा आधार देणारे शब्द ऐकायला मिळाले होते.पाच मिनिटे तिथेच हर्षोउल्हासित मनाने आभाळाकडे पाहत उभा राहिलो.स्वतःशीच,येस यह हो गयी ना बात सारखे शब्द पुटपुटत असताना भानावर आलो.मग तडक पुन्हा हॉटेल मध्ये गेलो.एक नव्हे दोन पेले सरबत पिऊन पाच दिवसांच्या उसंती नंतर काही तरी आनंदाने पोटात घातलं होतं.ताजीताजी भज्जी व त्यांचा सुटलेला खमंग भन्नाट वास या घडीला छान वाटत होता.पण उपवास असल्याने हात आखडता घेतला.तरी दोन प्लेट भज्जी बांधून घेतली.आकाश हाताला लागल्याच्या अविर्भावात घरी आलो. योगायोगाने मी पूर्वेकडून घराकडे तर आई डोक्यावर लाकडे घेऊन पश्चिमेकडून घराकडे एकच वेळ साधली होती.तरी ही ही आनंदाची बातमी कधी एकदा आईला देतोय असे झाले होते. दारातचं आईने तिच्या अनुभवाच्या जोरावर माझा चेहरा वाचला असावा. कोणाला ऐकू जाणार नाही अशा हळूवार आवाजात म्हणाली,झालं का काम!माझ्या तोंडावर हासू उमटलं.तिला म्हणालो हो हो सगळं सांगतो आधी आत तर ये.आधी ही गरमागरम भज्जी खा.पण भज्जी खाण्यात आईला रस नव्हता. हे दिसलं मी काय सांगतो याकडे तिने कान लावले.दिलेले भज्ज तसच हातात धरून मला म्हणाली हा बोल काय झालं.मी मघाचं सारं साहेबांना फोन केल्यावर काळजी करू नको सोमवारी रत्नागिरीत आदेश मिळेल म्हणाले ते आईच्या कानावर घातले.ते सारं ऐकून काही न बोलता तिला किती आनंद झाला होता हे जे मी डोळ्यात साठवून ठेवले आहे ना.ते इथं शब्दात मांडू शकत नाही पण ते समोर बघून मला माझाच गर्व वाटू लागला.त्या आनंदाच्या धुंदीत आज नेहमीपेक्षा लवकरच पिग्मी जमा करायला उठताना मी बाचणीला गेल्यावर गल्लीत भावकीची मारामारी झाल्याने आज खाली ओढ्याकडे जाऊ नकोस आणि कोणाशी काही बोलू नको असं आईने बजावलं.मी गावातूनचं पिग्मी घेऊन आलो.जेवायला बसलो पण भूक नव्हती पाच दिवस ऑर्डर आली नाही म्हणून जेवलो नाही तर आज ऑर्डर मिळणार होती म्हणून जेवलो नाही.एक मात्र झालं आज सुखाची झोप लागली.पहाटे उठलो.भैरोबा देवालयात जाऊन आलो.व दुपारच्या दरम्यान आई व मी जैताळला गेलो तिथं जेवून मला मामाच्या मुलग्याने रात्री दिडच्या रत्नागिरी गाडीत बसवले.एक बॅग,दीड हजार रुपये,चार ड्रेस,अंथरून असं सोबतीला घेऊन मी रवाना झालो होतो.पुढं काय,कसं होणार,कोणती शाळा मिळणार काही काहीच माहीत नसताना माझा प्रवास सुरू झाला.इकडे आई गावी आली तर बरेच लोक बाळीने भांडणं झाली म्हणून घाबरून पोराला गावाला पाठवले असे कुजबुज करीत असल्याचे आईने सांगितले.पण मी आयुष्य भराच्या भाकरीसाठी चाललेलं भांडण कायमचं मिटवण्याच्या मोहिमेवर रवाना झालो होतो याची कोणाला पुसटशी ही कल्पना नव्हती.ते पाच दिवस जे मी आणि आईने आतल्या आत घुटकून घेत, रडत,अन्नपाणी, झोप ही न घेता घालवले होते पण बाहेर कणभर ही दाखवलं नाही की कुठं जाऊन आमची तळमळ कोणाला सांगितली नव्हती. न पेलणार ते ओझं घेऊन आम्ही अक्षरशः रांगलो होतो होतो ते पाच दिवस.ते कोणाला अजूनही माहीत नाही बरं का?असो सकाळी साडेचार वाजता रत्नागिरीत पोहचलो.स्टँडवर तासभर कुठं मला झोप लागली असेल तेवढंच.सतत ऑर्डर देणारा हात डोळ्यांपुढं दिसत होता.हळूहळू चालत जि.प. कडे आलो तरी कसेबसे आठ वाजले होते.बराच वेळ कमानीकडे बघत थांबलो. इकडे तिकडे येरझाऱ्या मारल्या.उरलेली ती मनहूस वेळ वर्षासारखी वाटू लागली होती.सुमारे दहाच्या दरम्यान अजून दोघे आले.माझ्या जवळ असल्याने त्यांच्या बोलण्याचा कानोसा घेतला. त्यांच्या बोलण्यावरून त्यांना ही ऑर्डर मिळाली नव्हती हे कळलं.त्यामुळे माझी भीती दूर जात असल्याचं जाणवू लागलं.पावणे अकराच्या दरम्यान साहेब आले.आम्ही आधीच केबिन बाहेर जाऊन बसलो होतो.माझ्या आधी ते दोघे आत गेले.मी अजूनही घाबरलेली होतो.साहेबांनी त्यांना ऑर्डर दिली.माझी वाट पाहण्याची वेळ अजूनही संपली नसावी कदाचित असं मी मनाला समजावत होतो. ते दोघे बाहेर येताच मी आत गेलो.नाव सांगितले.ऑर्डर लिहायला घेतल्यावर अगदी हळुवारपणे म्हणालो लांजा नाही का मिळणार ? साहेबांनी काहीच प्रतिक्रिया न देता माझ्या हातात आदेश दिला आणि हास्य मुद्रेने मला म्हणाले आधी शाळा तर बघ जाऊन.खरं सांगायचं तर माझ्यासाठी त्यावेळी शाळा बघणं महत्वाचं नव्हतं तर नोकरी मिळणं आणि ती कुठं ही कोणत्या ही शाळेत मिळो पण मिळणं महत्वाचं होतं.मी फक्त खडा टाकला होता. लागला तर लागला नाहीतर हुकला.तेवढ्यात साहेब बोलले तुला तर ऑर्डर पाठवली होती शिलवंत.तुझा सुविचार छान होता.मी आदेश घेतला खर विचाराने ऐंशीच्या वेगाने थेट गत आठवणीच्या मुलाखत हॉलमध्ये पोहचलो.जिथं मी आयुष्यातील पहिली वाहिली मुलाखत दिली होती.आत प्रवेश केल्यावर मुलाखत घेणाऱ्या चमूने माझे कागद पडताळले.तदनंतर फळ्यावर सुविचार लिहायला सांगितला.”अंतराला भिण्याचे कारण नाही; सुरुवात करणे अवघड असते एवढंच!” त्यावेळी मी लिहिलेला तो सुविचार डोळ्यांपुढं तरळला.आणि त्या सुविचाराचा माझ्या प्रत्यक्ष जीवनाशी सांगड घालून स्पष्ट केलेला तो अर्थ आठवला.लहानपणापासून डाव्या हाताने अपंग,सोबत गांजलेली आर्थिक परिस्थिती जी जरा ही बाजूला सरकू पाहत नव्हती.पण माझं कसं होईल,कसं करायचं,काय करायचं या विचारांनी मी कधीच गर्भगळीत झालो नाही.अंतर भले विशाल होतं असलं तरी घाबरून प्रयत्न थांबवले नाहीत.मला हे कोणत्या ही परिस्थिती बदलायचंच आहे.या ध्येयाने अंतराला न जुमानता सुरुवात केली.झगडलो,झुंजलो त्याचे फलित हेचं की, आज मी हा तुमच्या समोर उभा आहे. साहेबांनी अर्थ ऐकून व्वा!एवढाच तोंड भरून पाठीवर कौतुकाचा थाप टाकणारा शब्द उच्चारून मला जायला सांगितले होते.त्याप्रसंगाचे साक्षीदार इथं मला आता आदेश देणारे हे साहेब होते. त्यांनी स्मितहास्य करून मला निरोप दिला.कसे ही असो पण आजच्या भाग्योदय क्षणाने या घडीला मी जगातला सर्वात आनंदी प्राणी असल्याचे क्षण उपभोगत होतो.हातात दिलेला आदेश डोळे भरून पाहिली एक मोठा उसासा सोडला.आणि भरभर पायऱ्या उतरून खाली आलो.जवळ जवळ 60 ते 65 रुपयांचे कॉइन संपले असतील एवढे माझ्या सुख दुःखात सहभागी होणाऱ्या सर्व हितचिंतकांना फोन लावले.मग हॉटेलमध्ये गेलो एक थंडा घेतला.आता मन आणि शरीर दोन्ही ही शांत झालं होतं.सारे नकारार्थी विचार आता झटकून टाकले होते.कारण आता सगळं एका झटक्यात खड्ड्यात गेलं होतं.सात दिवस विचारांची उलथापालथ,जीवाची घालमेल,नकोसे वाटणारे ते क्षण आणि मला तळ्यात मळ्यात करणारी ती हुरहुर या साऱ्या बाबींना हातात पडलेल्या आदेशाच्या दुबारप्रतीने अखेर कायमचा पूर्णविराम दिला होता हे ढळढळीत सत्य आता माझ्या समोर शड्डू ठोकून उभं होत. तरी पण मला पाठवलेला तो मुख्य आदेश जो आज ही माझ्या पर्यन्त पोहचला नाही तो कुठं गेला असेल बरं! हा मला पडलेला प्रश्न आज ही निरुत्तरीत राहतो.

या अश्याच विविध प्रकारच्या खाजगी व सरकारी नोकरीच्या जाहिराती सर्वप्रथम पाहण्यासाठी खालील फेसबुक ग्रुप मध्ये सामील व्हावे.

https://www.facebook.com/groups/2574733692753005/?ref=share

  ✍कृष्णा शिलवंत     
 साके,कागल,कोल्हापूर  

     
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

2 COMMENTS

- Advertisment -spot_img

Most Popular