Homeमुक्त- व्यासपीठभुतांना घाबरू नका !

भुतांना घाबरू नका !

लहानपणी भुताखेतांच्या गोष्टी खूप ऐकल्यात. शाळा, कॉलेजात शिकत असताना वरळीच्या अभ्यास गल्लीत रात्रीचा अभ्यास करायला जात होतो. तेंव्हा तिथल्या एका भिंतीवर खडूने कोणीतरी एका माणसाचे चित्र काढून ठेवले होते. रात्री तिथे अभ्यास करताना मला त्या चित्रातून भूत निर्माण होऊन माझ्याकडे बघून हसतेय असा भास व्हायचा. मी त्या भुताची एवढी धास्ती घेतली की अभ्यास गल्लीत जाणे मी टाळू लागलो. आईला ही गोष्ट मी सांगितली होती. तिने ती वडिलांना सांगितली. मग त्याच रात्री वडील मला म्हणाले की “चल, कोणते भूत तुला घाबरवतेय ते दाखव”! मी वडिलांना घेऊन त्या अभ्यास गल्लीत गेलो व भिंतीवरील त्या चित्राकडे लांबूनच बोट दाखवून तेच भूत मी एकटा असलो की मला भीती दाखवते असे सांगितले. मग वडिलांनी त्या चित्राला हात लावून मला तिथे बोलावले व म्हणाले की “मार या भुताला”! मग मी त्या भुताला जाम चापट्या मारल्या. त्यामुळे माझी भीती कमी झाली. मग वडिलांनी जवळच असलेल्या कँटिन मधल्या एका मुलाला बोलवून ते चित्र पाण्याने धुवून काढले व मला विचारले “आता कुठे भूत आहे ते दाखव”! वडिलांनी केलेल्या या प्रकारातून मला कळून चुकले होते की त्या चित्रातूनच मला भुताचा भास व्हायचा. पण भूत नव्हतेच ते. तो केवळ माझ्या मनाचा भास होतो. मी लगेच वडिलांना बोललो की “काका, तुम्ही आता घरी जा, मी इथेच बसून अभ्यास करतो”. वडिलांना आम्ही भावंडे काका म्हणायचो. ती सवय आमच्या जवळ राहत असलेल्या मावस बहिणीमुळे लागली. त्या दिवसापासून मी या भुताखेतांच्या गोष्टींकडे एक करमणूक म्हणून बघू लागलो.

http://linkmarathi.com/सप्तशृंगी-गड-वणी/

हल्ली तर मी जिवंत माणसांच्या गोंगाटाचा वैताग आला की सरळ स्मशानभूमीत जाऊन बसतो. तिथे मला भुते नाहीत तर शांती मिळते. माणसांच्या रूपातील भुते आजूबाजूला नाचत असतात व त्यातली काही भुते तुमचे भवितव्य घडवत असतो. त्यांच्याकडे असलेल्या गडगंज पैशाच्या ताकदीवर ती तुमच्या ज्ञानाची, कष्टाची किंमत करतात आणि तुम्हाला आयुष्यभर नाच नाच नाचवतात.

भुतांच्या गोष्टीत एक गोष्ट हमखास सांगितली जाते ती म्हणजे आडवाटेला भूत दिसले तर त्याच्याकडे मागे वळून बघायचे नाही, नाहीतर ते मागे लागते. खरं तर, शांत निर्जन स्थळी भूत दिसणे हा आपल्या मनाला होणारा भुताचा भास असतो. पण हा भास आपल्याला भीती दाखवू शकतो. म्हणून तसा भास झाला तरी मागे वळून बघायचे नाही कारण तो भास खरा वाटून आपल्या मागे लागत असल्याचाही भास होतो. हा मानसशास्त्रीय प्रश्न आहे. मंत्रचळ या मानसिक रोगात (ओसीडी) एखादी गोष्ट पूर्ण केली तरी ती अपूर्ण राहिल्याचा मनाला भास होतो व पुन्हा पुन्हा ती कृती करण्याचा मोह होतो. म्हणून एकदा कृती केली की मग मागे वळून बघायचे नाही, नाहीतर ओसीडीचे भूत मागे लागते. भूत मागे लागल्यासारखे वाटणे म्हणजे तसा सारखा सारखा भास होणे यालाच भूत लागणे किंवा भुताने पछाडणे असे म्हणता येईल. पण हे मानसशास्त्रीय विज्ञान लक्षात न घेता काही लोक या आभासी भीतीवर लिंबू, मिरच्या, भुताचा मंत्र असल्या अंधश्रद्धांच्या नादी लागतात व मानसिक रोग्याचे आणखी नुकसान करतात.

http://linkmarathi.com/गगन-रेप-कर/

पुराणातील देवदेवतांविषयी सुद्धा लोक काही अंधश्रद्धा निर्माण करतात. खरं तर, हिंदू धर्मात ज्या अनेक देवदेवता आहेत त्या प्रत्येक देव, देवतेचे एक वेगळे गुणवैशिष्ट्य, रूपवैशिष्ट्य व कार्यवैशिष्ट्य आहे. या देवदेवता निसर्गातील विविधतेची प्रतिके आहेत. अनेक गुणधर्मांची अनेक मूलद्रव्ये निसर्गात आहेत. अगदी तसेच हे आहे. आपल्या पूर्वजांनी पुराणकथांतून निसर्गाच्या विज्ञानाचा व मनुष्य जीवनाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण तो अर्थ नीट समजून न घेता लोक त्या कथांतूनही अंधश्रद्धा निर्माण करतात.

एक वकील म्हणून सांगतो की कायदा हा एक महासागर आहे. अनेक कायदे, त्यांची अनेक कलमे, त्याखालील अनेक नियम व उपविधी, त्याखालील अनेक सरकारी आदेश, कोर्टाचे अनेक न्यायनिर्णय या सर्वांचा मिळून कायदा बनतो ज्यात निसर्ग विज्ञान तर असतेच पण मानव धर्मही असतो. कायद्याचा अर्थ कलमा कलमांनी सांगत बसलो तर आयुष्य पुरायचे नाही. म्हणून अशा तुकड्या तुकड्यांनी कायदा सांगण्याऐवजी कायद्याचा मूळ गाभाच सांगून मी मोकळा होतो. अशाने वकिली प्रॕक्टिस कशी चालेल? पण मी चालवतो व त्यातून खूप कमी पैसे मिळतात.

अंधश्रद्धा ही गैरसमजाचाच भाग आहे. म्हणून अंधश्रद्धा ही फक्त धर्मातच नाही तर विज्ञान व कायदा समजून घेण्यातही आहे असे माझे म्हणणे आहे. आता हेच बघा ना की विवाहाचा व संसाराचा मूळ अर्थच नीट समजून घ्यायचा नाही आणि वैवाहिक कायदे व त्यावरील अनेक न्यायनिर्णय वाचून त्यांची पारायणे करायची याला काय म्हणावे! विवाहबंधन म्हणजे एक मोठा आनंद सोहळा जो आयुष्यभर पुरतो. पण त्याला वैवाहिक, सांसारिक जबाबदाऱ्या चिकटलेल्या असतात. त्या लक्षात घ्यायच्या नाहीत आणि एकमेकांना दूषणे देत बसायचे. तुमची आर्थिक कमाई काय, वडिलोपार्जित मिळकत किती हे अगोदर नीट बघा व मग विवाहातून अपत्ये किती निर्माण करायची हे ठरवा. कारण मुलाबाळांना योग्य शिक्षण देऊन वाढवायचे ही काय साधीसुधी गोष्ट नाही. जवळ चिटभर मिळकत आणि घरात भरपूर पोरं मग कसले सुख मिळणार व कसली शांती लाभणार संसारात! आयुष्याच्या अंताला ही पोरं चिटभर मिळकतीच्या वाटणीसाठी भांडत बसून डोक्याला ताप देणार हे निश्चित! आईवडिलांचे मरण सुद्धा असह्य करून टाकतात ही पोरं हे मी वकिलीच्या अनुभवातून सांगतोय. तेंव्हा किती ओझे डोक्यावर घ्यायचे याचा विचार करा. असा व्यावहारिक विचार वेळीच केला नाही तर मग पुढे विवाह, संसार महागात पडेल. आईवडिलांनी मुलांच्या जबाबदाऱ्या नीट पार पाडल्या नाहीत तर निराधार मुलांचे व मुलांनी आईवडिलांविषयीच्या जबाबदाऱ्या नीट पार पाडल्या नाहीत तर आईबापांची वृध्दापकाळी वृध्दाश्रमात रवाना करण्याचे प्रश्न निर्माण होत राहतात. याला कायदा किती मदत करणार? म्हणून विवाह कायद्याची कलमे व न्यायनिर्णय वाचण्यापेक्षा (ते काम वकिलांवर सोडा) विवाह कायद्याचा गाभा नीट समजून घ्या.

http://linkmarathi.com/तुम्हाला-दिवाळीत-बोनस-का/

माझ्या लेखाचा सार हाच आहे की, ज्याप्रमाणे दारू, सिगारेट, अमली पदार्थ हे शारीरिक आरोग्यास अपायकारक आहेत त्याप्रमाणे गैरसमज, अंधश्रद्धा डोक्यात घेऊन आभासात जगण्याची सवय ही मानसिक आरोग्यास फार अपायकारक आहे. तेंव्हा वेळीच सावध व्हा व चुकून भूत दिसले म्हणजे तसा भास झाला तर त्या भुताला मागे वळून बघू नका, नाहीतर ते मागे लागेल! अहो, भूतबीत काही नसते हो! भुतांना घाबरू नका!

  • ॲड.बी.एस.मोरे

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular