वातावरणातील वस्तुस्थिती व परिस्थिती सजीव मनावर (मेंदूवर) जसजसे संस्कार करीत जाते तसतशी त्या संस्काराची मनाला (मेंदूला) सवय लागत जाते. मनाची (मेंदूची) ही सवय म्हणजे दुसरे तिसरे काही नसून संस्काराची गुलामगिरी होय. वातावरणातील वस्तुस्थिती व परिस्थिती यांच्याशी अनुरूप असणारे मनावरील संस्कार योग्यच होत व त्या संस्काराची मनाला लागत जाणारी सवय (मानसिक गुलामगिरी) हीही योग्यच होय.
शौचकर्म उरकल्यानंतर विष्ठेवर माती ढकलून ती विष्ठा झाकण्याची किंवा मातीत पुरण्याची मांजराची सवय सगळ्यांना माहितच आहे. या विष्ठेला उग्र वास असतो. त्या वासाने आपल्या अस्तित्वाची चाहूल इतरांना लागून आपल्यावर हल्ला होऊ नये या स्वसंरक्षणाच्या उद्देशाने व तसेच स्वतःच्या प्रादेशिक सीमा निश्चित करून ठेवण्यासाठी मांजरेच नव्हे तर मार्जार जातीचे प्राणी स्वतःचे मलमूत्र मातीने झाकून ठेवतात. ही सवय जंगली वातावरणात ठीक आहे. पण परिस्थिती बदलली की याच चांगल्या सवयीचे पुढे ओसीडीत म्हणजे मंत्रचळात रूपांतर कसे होते हे बघायचे असेल तर शहरी वातावरणात डांबरी रस्त्यावर मांजराला शौचकर्म करणे भाग पडल्यावर मातीने विष्ठा झाकण्याच्या त्याच्या सवयीचे काय होते हे बघणे गंमतीदार आहे. डांबरी रस्त्यावर शौचकर्म उरकल्यावर मांजर त्याच्या सवयीप्रमाणे डांबरी रस्त्यावरच नखांनी माती उकरण्याचा प्रयत्न करते. पण नखांनी माती काही निघत नाही म्हणून मग ते मांजर माती निघालीय व ती त्याच्याकडून विष्ठेवर टाकली गेलीय या आभासाखाली शरीराची हालचाल करते. ही विचित्र हालचाल ही त्या मांजराची ओसीडी असते. हे उदाहरण मला माझा लिगल असिस्टंट मुकेश सपकाळ याने सांगितले व त्यातून त्याने माझ्या ओसीडीवर प्रकाश पाडला. त्याबद्दल त्याचे जाहीर आभार मानणे हे माझे कर्तव्य आहे व त्याचे नाव घेऊन मी माझे हे कर्तव्य पार पाडीत आहे.
या उदाहरणावरून मला एक गोष्ट कळली ती ही की अयोग्य रस्त्यावर सुयोग्य सवयीला जुळवून घेताना जी ओढाताण होते त्यातून पुढे ओसीडी निर्माण होऊ शकते. माझ्या बाबतीत त्याचे असे झाले की, प्राथमिक व माध्यमिक शाळांतून मी माझे मूलभूत शिक्षण घेत असताना व पुढे वाणिज्य, विधी महाविद्यालयातून व भारतीय कंपनी सेक्रेटरी संस्थेतून माझे उच्च शिक्षण घेत असताना माझ्या मनावर (मेंदूवर) ज्या मूलभूत व उच्च शिक्षणाचे खोल संस्कार झाले त्या संस्काराचे माझ्या मनाच्या सवयीत रूपांतर झाले. पण माझी ही सुयोग्य सवय अंमलात आणण्यासाठी बाहेर तसा सुयोग्य रस्ता असणे आवश्यक होते. पण मला तसा सुयोग्य रस्ता काही बाहेर दिसला नाही. त्यामुळे शैक्षणिक थिअरी व प्रत्यक्ष प्रॕक्टिस यात कुठे ताळमेळ लागेनासा झाला आणि मग मात्र माझी धांदल उडाली.
विष्ठेवर माती टाकणे म्हणजे वाईटाला मातीत गाडणे हे मला माझ्या शिक्षणाने शिकवले. पण बाहेर रस्ता मातीचा नव्हता तर डांबरी होता. मग त्या रस्त्यावर मला माती कुठून मिळणार? तरीही मातीने विष्ठा झाकण्याची म्हणजे शाळा, कॉलेजातून शिकलेल्या थिअरीची काटेकोर, चोख प्रॕक्टिस करण्याची माझी सवय काही जाता जाईना. त्यामुळे झाले काय की मी त्या डांबरी रस्त्यावरच माती उकरत बसलो आणि शिकलेल्या थिअरीची खरी प्रॕक्टिस करतोय या आभासात किंवा भ्रमात राहिलो. या असल्या आभासी सवयीमुळे माझे आयुष्यात तसे खूप नुकसान झाले. इतकेच काय मला ती मांजर ओसीडी लागली. यात दोष कोणाचा? शाळा, कॉलेजातून मी शिकलेल्या थिअरीचा म्हणजे शिक्षणाचा, थिअरीची प्रॕक्टिस करण्यासाठी अयोग्य असलेल्या त्या डांबरी रस्त्याचा की माझ्या बुद्धीचा?
- ॲड.बी.एस.मोरे©

मुख्यसंपादक
धन्यवाद संपादक महोदय!