विजयादशमी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं; त्यात राम अगदी बरोबर आपल्या भात्यातून एक तीक्ष्ण तिर काढून, तो पेटलेला तिर रावणाच्या दिशेने सोडतो आणि क्षणार्धात रावण आगीच्या लोळात होरपळत होरपळत खाली कोसळतो, म्हणजेच रावण मरतो.
बस्स- मग आपण हे दृश्य पाहतो आणि आनंदून जातो, रामाने रावणाला मारले हे पाहून आपल्याला मनातून खूप समाधान वाटते आणि पुन्हा एकदा आपण आपल्या कामाला निघून जातो, किंवा आपल्याला तेवढंच पाहायचं तर होतं याच उद्देशाने मागे फिरून आपण घरी जातो.
मला मात्र या छोट्याशा कथेतून एक प्रश्न पडला आहे की, आज रावण खरंच मेला आहे का ? किंवा खरंच तो ज्यावेळी रामाने मारला त्यावेळी नष्ट झाला का ?
थोडा विचार करून आणि समाजाकडे तिरक्या नजरेने पाहिले तर आपणा सर्वांनाही कळेल की मी कोणत्या रावणाबद्दल बोलत आहे. हो – रावण आज सर्वांमध्ये जिवंत आहे, परंतु हा रावण तो नाहीय जो रामाने मारला !!
अहो !! रामाने ज्या रावणाचा वध केला तो तर विद्वान होता, महापराक्रमी होता, एक चूक जर त्याने केली नसती तर सत्य-युगातही त्याला मारणारा कोणताही वीर जन्मला नव्हता, आणि रावण कधीच मारला गेला नसता.
http://linkmarathi.com/सिमोल्लंघन/
पण ! आज ठीक-ठिकाणी, सगळीकडे जो रावण दिसतोय, पाहायला मिळतोय तो माणसांत अगदी बऱ्यापैकी रुजलेला आहे, विशेष म्हणजे या रावणाला, रावण नाव देऊन मात्र सगळे मोकळे झाले, परंतु आपण ज्या रावणाच्या नावाने दिवसभर जो जप करतो त्या रावणाची तुलना स्वतःशी करताना लाज वाटली पाहिजे लाज !!
स्वतःमध्ये लपलेला रावण अजून लपविण्यासाठी प्रत्येक जण वाईट कृत्य करून मोकळा होतो, परंतु हे कुणाच्याही लक्षात येत नाही की, आपण आपल्यातल्या रावणाला झाकण्यासाठी एका विद्वानाशी आणि एका महान योध्याशी स्वतःची तुलना करत आहोत.
आजचा रावण एकमेकांच्या मनाचा खेळ करायला शिकला आहे, एकमेकांवर सूड उगवताना दिसतो आहे, दुसऱ्याला उत्कर्षापासून रोखू पाहत आहे, जो व्यवसायात म्हणा किंवा स्व-बळावर काहीतरी करून दाखवण्याचा तयारीत आहे, त्याला मागे खेचून स्वतःची उन्नती करण्याच्या प्रयत्नात आहे.
आजच्या रावणाला, “तू किती महान आहेस” हे सांगावं लागत नाही तर तो स्वतःच तसे मानून काही अवैचारिक मार्गातून स्वतःचाच विनाश करून घेत आहे. त्याला आपण कोणत्या मार्गाने जात आहोत आणि आपली प्रगती कशी होईल हे कोणी समजावून सांगत सांगत असेल तरीही तो सांगणाऱ्याला मीच तुझ्यापेक्षा श्रेष्ठ कसा आहे हे पटवून देत आहे. मिळविलेल्या संपत्तीचा कुठे व कसा वापर करावा हेही त्याला न कळल्यामुळे स्वतःच्या जवळचे धन नाहीसे करत आहे. कोणाशी कसे बोलावे, कसे वागावे याचेही भान त्याला राहिलेले नाहीय.
सध्याची परिस्थिती बदललेली आहे, आपल्या सभोवताली असलेल्या समाजात वावरत असताना कुणालाच कशाचीही तमा राहिलेली नाहीय. आज " स्त्री " ही आपल्या समाजात सुशिक्षित, सक्षम आणि शैक्षणिक जगात कितीही उंच भरारी मारून पुढे जात असली, तरीही " स्त्री " ही सुरक्षित मात्र नक्कीच नाही. रोज घडणाऱ्या घटना पाहता आपण कसं म्हणू शकतो की, माणसांमधला रावण नाहीस झाला आहे. सकाळी उठून टीव्ही चालून करून बातम्यांचे चॅनेल फिरवून बघा, मग कळेल समाजात वावरत असणारा रावण आजही जिवंत आहे की खरोखरच नष्ट झाला आहे. आजही माणसांतला रावण राजरोस जिवंतच फिरतो आहे, अगदी सर्वांच्या नजरेसमोरून.
हे चित्र जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तरी रावण मेला किंवा त्याला मारले गेले असे म्हणता येणार नाही. परंतु या रावणाची तुलना महान योद्धा, महापराक्रमी असणाऱ्या रामयणातल्या रावणाशी करू नका; कारण तो रावण असा मुळीच नव्हता, त्याच्या हातात विश्व नष्ट करण्याची ताकद होती, त्याला सर्वांप्रति आदर होता, त्याने कधीही कोणाला उगाचच डिवचले नाही, स्वतःच्या स्वार्थासाठीही त्याने कधी युद्ध केले नाही.
http://linkmarathi.com/सप्तशृंगी-गड-वणी/
म्हणूनच प्रत्येकाने आपल्या स्वतःतील रावण स्वतःच मारला पाहिजे, तो ज्याला त्याला ठाऊक असतो. फक्त सकात्मक विचारांची जोड हवी असते, योग्य ज्ञान मिळविण्याची जिज्ञासा असावी लागते. हे गुण प्रत्येकात असतातच परंतु आपल्या समोर घडत असलेल्या चांगल्या वाईट कृत्यांचा परिणाम प्रत्येकावर होत जाऊन सगळ्यांच्या आत असलेला रावण जागा होतो. हे जरी खरे असले तरी त्या जागा झालेल्या रावणाला त्याच जागी थोपविण्याची ताकदही प्रत्येकात असते. स्वतःतल्या रावणाला बाहेर पडू न देवून तिथेच त्याचा शिरच्छेद करता आला पाहिजे तरच प्रत्येक माणूस समाजात निडरपणे राहू शकेल आणि सर्वांची प्रगती होऊन प्रत्येकजण आदराने, सन्मानाने जगेल.
आपल्याला हा लेख कसा वाटला किंवा काही सुचवायचं असल्यास जरूर कमेंट बॉक्स मध्ये लिहावे.
व्यक्त व्हा – लिहिते व्हा….
✍️ विजय वैशाली दत्ताराम पराडकर- आण्णा
( विरार )
समन्वयक – पालघर जिल्हा
छान लिहिलंय. 👌🏻👌🏻
चांगले वाईट गुण सर्वांच्यात असतात. आपल्या मनावर कोणते विचार अधिकार गाजवतात या बाबत प्रत्येकाने जाणीवपूर्वक निरीक्षण करुन, चांगल्या विचारांचा अंगीकार केला पाहिजे. तरच तो व्यक्ती समाजात वावरण्यालायक ठरेल.
अप्रतिम विचार मांडलेत. असेच लिहा आणि सर्वांना जागृत करा
Good think… मांडत रहा