Homeमुक्त- व्यासपीठवकिली रक्तात लागते!

वकिली रक्तात लागते!

एलएल.बी. होऊन कायद्याचे ज्ञान डोक्यात घेतले, वकिलांच्या बार कौन्सिलची सनद व प्रॕक्टिस प्रमाणपत्र घेतले म्हणजे माणूस खरा वकील होतो का? कायद्याच्या दृष्टिकोनातून तो वकील होतो पण वकिलीच्या कसोटीवर तो खरा वकील होतो का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला आवडो अगर न आवडो, पटो अगर न पटो, वकिलाकडे जर खून, बलात्कार, दरोडा, आर्थिक फसवणूकची केस स्वतःहून चालत आली तर त्याने ती घेतलीच पाहिजे व आपल्या क्लायंटला कोर्टात वाचवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केलाच पाहिजे. तो आरोपी क्लायंट दोषी आहे की नाही हे न्यायालय ठरवेल. ते काम वकिलाचे नाही. हे तत्व कायद्यानेच मान्य केले आहे. वकिली व्यवसाय स्वीकारला की या तत्वाने जो वकील त्याची वकिली करेल तो खरा वकील! पण या कायदेशीर तत्वाप्रमाणे वकिली करणे सोपे नाही. शैक्षणिक पात्रता म्हणजे कायद्याचे ज्ञान, सनद, प्रॕक्टिस परवाना, बुद्धी एवढ्याच भांडवलावर खरी वकिली करता येत नाही. खरी वकिली ही रक्तात लागते. मी खाजगी वकिलीविषयी लिहितोय जी बचाव पक्षाचे काम करते. सरकारी वकिली विषयी मी हा लेख लिहीत नाही. खरं व स्पष्टच लिहायचे तर मी हा असा खरा वकील होऊ शकलो नाही.

http://linkmarathi.com/abacus-म्हणजे-काय-सर्व-माहिती-ए/

माझ्या वकिलीची काही उदाहरणे इथे देतो. मग वाचक वर्ग ता म्हणता ताक ओळखेल. मी एका छोट्या कंपनीचा कायदा सल्लागार होतो. तशी तर मी छोट्या छोट्या कंपन्यांचीच वकिली केली आहे. एके दिवशी त्या कंपनीचे संचालक व लेबर अॉफीसर माझ्याकडे आले व म्हणाले “मोरे साहेब, कंपनी घाट्यात चाललीय व आता यापुढे कारखाना चालवता येणे शक्य नाही, तेंव्हा तुम्ही फॕक्करी व लेबर कायद्याप्रमाणे कारखाना बंदीची (फॕक्टरी क्लोजर) कायदेशीर कार्यवाही सुरू करा”. ते ऐकून मला खूप वाईट वाटले. कारण तो कारखाना बंद झाल्यावर जवळजवळ २०० कायम कामगार व इतर १०० तात्पुरते कामगार रस्त्यावर येणार होते. त्या कामगारांचे संसार उघड्यावर पडणार होते. काय करावे ते सुचेना? माझ्या आतल्या मनाला (हृदयाला) वकिलीचे ते काम करणे खरंच पटत नव्हते. पण डोके सांगत होते की, “तू कंपनीचा वकील आहेस, कामगारांचा नाहीस, तेंव्हा तू तुझ्या क्लायंटविषयीचे वकिली कर्तव्य पार पाड”! आणि मी हृदयाच्या हाकेला न जुमानता डोक्याचे ऐकले. लेबर कमिशनरपुढे कारखाना बंदची केस कायदेशीर रीत्या बसवून कारखाना बंदीची नोटीस विश्वासू कर्मचाऱ्यांच्या मदतीने रात्रीच कारखान्याच्या गेटवर चिकटवली व वॉचमेनला सूचना दिली की सकाळी एकाही कामगाराला कारखान्यात येऊ द्यायचे नाही. स्थानिक पोलीस स्टेशनला यासंबंधीची कल्पना देऊन पोलीस बंदोबस्त लावण्याचा विनंती अर्ज दिला. त्यानंतर मी घरी आलो. पण नीट जेवू शकलो नाही की रात्रभर झोपू शकलो नाही. कारण मीही एका गिरणी कामगाराचा मुलगा होतो. वरळीच्या गिरणगावातली कामगार चळवळ प्रत्यक्षात जगलो होतो. या कायदेशीर कामाची फी मला मिळाली होती. पण माझे मन मला खात होते. या ३०० कामगारांचे संसार उघड्यावर आणण्याचे पाप मी या फी साठी केले? त्यांचा तळतळाट मला लागणार. पण दुसरे मन म्हणत होते “अरे वेड्या, जरी तू हे काम केले नसते तरी दुसऱ्या कोणत्या तरी वकिलाने हे काम केलेच असते, तू तुझा वकिली धर्म पाळला आहेस, हे पाप नव्हे”!

http://linkmarathi.com/मानसिक-आरोग्य-म्हणजे-काय/

दुसऱ्या दिवशी सकाळी कारखाना वॉचमनचा मला फोन आला की सगळे कामगार गेटवर जमा झाले आहेत. सगळेजण गेटवर अचानक लागलेली कारखाना बंदीची नोटीस वाचून फार हबकून गेले आहेत. पण पोलीस बंदोबस्तामुळे सर्वजण शांत आहेत. मला कंपनी संचालक व लेबर अॉफीसर यांनी माझ्या सुरक्षेसाठी तिकडे बिलकुल फिरकू नका असे सांगून ठेवले होते. कारण त्यातील काही कामगार मला चांगले ओळखत होते. त्यांचे काही वैयक्तिक प्रश्न मी माझ्या कायदेशीर सल्ल्याने सोडवले होते. ते सर्व मला भला माणूस समजत होते. त्यांना तोंड दाखवण्याची मला लाज वाटत होती. त्यापैकी काही कामगारांकडे माझ्या घरचा लँडलाईन टेलिफोन नंबर होता. त्यावेळी काही जणांकडे पेजर असायचे. मोबाईल फोनचा तो जमाना नव्हता. संपर्कासाठी घरचे लॕंडलाईन फोन हेच प्रमुख साधन होते. त्यापैकी काही कामगारांने मला फोन करून सांगितले की “साहेब, कंपनी मालकाने अचानक कारखाना बंदीची नोटीस गेटला लावलीय, तुम्ही प्लिज इकडे येऊन आम्हाला मदत करा”! पण मला हे शक्य नव्हते. कारण मी कंपनी मालकाची वकिली स्वीकारली होती. मी त्यांना माझी हतबलता सांगितली. त्यांना मी माझ्या लेबर कोर्टातील ओळखीच्या वकिलांमार्फत मदत करून त्या कारखाना बंदीच्या नोटीसीविरूद्ध मनाई हुकूम आणण्याची हालचाल करू शकत होतो. पण मी तसे केले असते तर ती माझ्या वकिलीशी गद्दारी झाली असती. ती गद्दारी मी केली नाही. पण त्यानंतर गरीब लोकांचा असा तळतळाट लागणाऱ्या केसेसच घेतल्या नाहीत कारण वकिलीत ते स्वातंत्र्य मला होते व आहे.

http://linkmarathi.com/नवरात्र-आणि-उपासना/

आता माझ्या जामीन वकिली विषयी सांगतो. आरोपींना पकडून सकाळी ११ व दुपारी ३ या दोन वेळा पोलीसांच्या गाड्या फौजदारी कोर्टात यायच्या. काही वकील त्या गाड्यांचे दरवाजे उघडले की आरोपींच्या सह्या वकील पत्रांवर घेण्यासाठी धडपड करायचे. मग पोलिसांच्या रिमांड अर्जावर कोर्टात सरकारी वकील विरूद्ध बचाव पक्षाचे वकील असा युक्तिवाद व्हायचा. आताही होतोय पण त्या सिनमध्ये मी आता बिलकुल नाही. कारण फौजदारी वकिलीला मी कधीच रामराम केलाय. त्याची गंमत अशी झाली की एकदा एक जामीन अर्जाची केस चुकून एका वकिलाने माझ्याकडे दिली. पण त्या आरोपीने माझ्या चेहऱ्याकडे बघत मला ती केस देणाऱ्या वकिलाला सांगितले की “या वकिलांच्या चेहऱ्यावरून मला वाटत नाही की हे वकील मला जामीन मिळवून देतील”! मग त्या वकिलानेच तो युक्तिवाद केला. मला मात्र त्यावेळी सुटका झाल्यासारखे वाटले. याचा अर्थ असा की आरोपी काय किंवा क्लायंटस काय वकिलाचा वकूब ओळखण्यात हुशार असतात. म्हणून म्हणतोय की वकिली रक्तात लागते.

आता तिसरे उदाहरण देतो ते म्हणजे नवरा बायकोच्या भांडणाच्या केसेसचे. पत्र्याच्या चाळीतील एका जुनाट घरात माझी वकिली सुरू होती. आत एक छोटेसे स्वैपाकघर. तिथे माझी बायको माझ्या एकुलत्या एक मुलीला (तान्ह्या बाळाला) घेऊन बसलेली असायची व मी बाहेरच्या घरात सेकंड हँडचे कपाट, टेबल, खुर्ची व पुस्तकेही सेकंड हँडची हे सर्व सेकंड हँड वकिली साहित्य घेऊन घरातच अॉफीस थाटून रूबाबात बसलेला असायचो. नवरा बायकोच्या भांडणात माझ्याकडे कधी नवरा अगोदर यायचा तर कधी बायको अगोदर यायची व तास तासभर त्यांची गाऱ्हाणी मी ऐकत बसायचो. फीचे काहीच बोलायचो नाही. कारण चाळीतही माझ्याकडे क्लायंटस येतात याचा रूबाब आजूबाजूच्या लोकांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना दाखविण्याची मला भारी हौस! तर अशा केसेस मध्ये नवरा बायकोचा घटस्फोट व्हावा ही गोष्ट माझ्या मनालाच पटत नसायची. अगोदर नवऱ्याचे गाऱ्हाणे ऐकले की मी त्याला तुझ्या बायकोला घेऊन ये, कारण मला तिचे पण म्हणणे ऐकायचेय असे सांगायचो किंवा अगोदर बायकोचे गाऱ्हाणे ऐकले की मी तिला तुझ्या नवऱ्याला घेऊन ये, मला त्याचे पण म्हणणे ऐकायचेय असे सांगायचो. मग दोघेही माझ्या समोर आले की दोघांची माझ्यासमोर चांगलीच जुपांयची. त्यात कमीतकमी तासभर तरी जायचा. मग मी आत स्वैपाकघरात मुलीला मांडीवर घेऊन बसलेल्या बायकोला हळूच आत जाऊन सांगायचो की, अगं तीन कप चहा कर व बाहेर पाठवून दे. तिच्या चेहऱ्यावरून ती जाम वैतागलेली असायची पण तरीही ती तीन कप चहा करून बाहेर आणून द्यायची. आपला वकील नवरा यातून आपल्या घरासाठी थोडी तरी फी मिळवेल अशी तिला आशा असायची. मग चहा पिता पिता मी त्या नवरा बायकोला समजावून सांगायचो. “कशाला रे उगाच भांडत बसलात क्षुल्लक कारणांवरून, चारित्र्यावरून तर काही संशय नाही ना, मग भांड्याला भांडे लागणारच, मी वकील आहे पण आम्हा नवरा बायकोचीही भांडणे होतच असतात, तरीही आम्ही संसार करतोय ना”! हा चांगला वकिली सल्ला ऐकून मग नवरा बायको एक व्हायचे. तेच नाहीत तर त्यांचे आईवडीलही मला दुवा द्यायचे. दिवाळीला घरी येऊन त्यांच्या घरचा फराळ देऊन जायचे. या असल्या वकिलीतून मी काय आणि किती पैसा मिळवला असेल याची तुम्हीच कल्पना करा. एखाद्या केसमध्ये मात्र घटस्फोट अटळ झाला की ती केस दुसऱ्या वकिलाला देऊन मी मोकळा व्हायचो. कारण संसार मोडणे ही गोष्ट माझ्या मनाला पटतच नसायची.

वरील तीन उदाहरणांवरून माझ्या वकिली विषयी वाचकांना साधारण अंदाज येईलच. यातून मी काय सांगू इच्छितो की, खरा वकील व्हायचे असेल तर राजकारणी माणसासारखे वागता आले पाहिजे. म्हणजे डोक्याने वागता आले पाहिजे. तुम्ही डोक्याऐवजी हृदयाचे (अंतर्मनाचे) ऐकायला गेलात की मग कठीण आहे. खरी वकिली डोक्याने करायची असते. माझ्या हृदयाने नेहमीच माझ्या डोक्याला नीट काम करू दिले नाही. त्यामुळे मी प्रांजळपणे कबूल करतो की मला खरी वकिली जमलीच नाही. कारण ती माझ्या रक्तातच नव्हती व नाही!

  • ॲड.बी.एस.मोरे©
http://linkmarathi.com/किंकाळी/
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular