वास्तवाचे शल्य
नमस्कार - वाचकराजा
माध्यमं वाईट नसतात. आपण त्यांचा उपयोग कसा करतो.
यावर काय तो खेळ विसंबून असतो. मला एक दिवस मेसेंजर वर एक मेसेज आला. एका साधारण ५० ते ५२ वय असणाऱ्या महिलेचा. त्या सांगत होत्या, मला एका महत्वाच्या विषयावर तुमच्या सोबत बोलायचे आहे...
त्यांनी बोलायला सुरुवात केली की, माझे कमी वयात लग्न झाले. माझे मिस्टर एका नामांकित कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. परंतु दारुचे खुप व्यसन होते.अवघ्या नऊ वर्षाची सोबत मिळाली. आणि ते अती दारु सेवनामुळे कायमचे निघून गेले. मागे मात्र दोन मुलं आणि एक मुलगी अशी पोक्त जबाबदारी सोडून…
मोठ्या हिंमतीने मी हा अर्धवट संसाराचा गाडा एक चाक निखळले असतानाही एकटीने नेटाने पुढे ओढला. मोठा मुलगा कॉलेजमध्ये प्राध्यापक झाला. दुसरा मुलगा सरकारी बँक मध्ये मोठ्या पदावर नोकरीस लागला. मुलीचे ही लग्न झाले.जावई देखील प्राध्यापक मिळाला….
वरवर पाहता सर्व काही मांगल्याने काठोकाठ भरलेले दिसत होते. मात्र या आनंदाच्या अन् सुखाच्या पडद्याआड मात्र एक खुप मोठी दुखरी नस ठणकत होती. एक अशी अडचण त्यांना होती की, जी त्या त्यांच्या दोन्ही मुलांच्या, मुलीच्या समोर मांडू शकत नव्हत्या. हे मनातील दु:ख सतत निरंतर चरचरत होते. आणि ही वेदना त्यांना इतका मोठा संघर्ष वाट तुडवून देखील, त्या थेट आत्महत्या करावी इथवर पोहचल्या होत्या.
माझ्या पोस्ट काही समूहावर नियमित पोस्ट होतात. त्या ह्या महिला नेहमी वाचत होत्या. आणि त्यात मी पोलीस खात्यात आहे. हे बघून त्यांनी मला मदतीसाठी मेसेज केला…
मी हे सर्व मेसेजवर वाचत होतो. त्या महिला दिसण्यासाठी या वयातही खुप सुंदर दिसत होत्या. मात्र हीच सुंदरता त्यांचा घात करत होती. २००८ पासून त्यांचाच जावई त्यांना शरीर सुखासाठी सतत दबाव टाकत होता. त्या मात्र जीव मुठीत धरुन त्याला विरोध करत होत्या. मात्र काही दिवसांपूर्वी तर कहरच झाला. त्यांच्या लहान मुलाचे लग्न झाले होते, आणि त्यांच्या सुनेला देखील तो अश्लील मेसेज पाठवत होता. दोन्ही मुलं खुप शिस्तबद्ध होती, आणि घरातील जावई असे कृत्य करतोय हे कुणाला सांगणार? त्यांच्या समाजामध्ये आजही डोक्यावर पदर घेऊन वावरावे लागते. असे जाचक अवस्था आहे…
मी त्यांना चार समजूतीच्या गोष्टी सांगून त्या नराधमाचा मोबाईल नंबर घेतला. आणि त्या जर आत्महत्या हा विचार करणार नसतील तरच मी मदत करण्याचे कबूल केले. मी त्या श्वापदाला फोन केला. पण त्याला मी फोन वर धमकावले मात्र, त्याला ही गम्मत वाटली. मग त्याच्या कॉलेजच्या जवळील पोलीस स्टेशनमधील एका मित्राला त्याच्याकडे पाठवले. आता मात्र तो पुर्णपणे घाबरून गेला. हात जोडून गयावया करायला लागला. मी त्याला सांगितले तु जाऊन तुझ्या सासूशी बोल, त्यांचा मला चोवीस तासात जर तुला माफ केले असा फोन आला नाही तर, मी तुझ्या वर कायदेशीर गुन्हा दाखल करुन तुझी नोकरी, प्रतिष्ठा संगळे धूळधाण करेल…..
वाचकराजा… त्याने सासू- सुनेची पाय पकडून माफी मागितली, आणि मला त्या महिलेचा फोन आला. फोनवर त्यांचा आवाज खुप हलका वाटत होता. मनावरचे ओझे पार गळून गेले होते. त्या समाधानी होत्या. त्या दिवसानंतर त्याने त्या दोघींना त्रास देणे कायमस्वरूपी बंद केले. नंतर कधीतरी त्यांचा खुशालीचा मेसेज मला यायचा, त्यांनी खुप वेळा मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु मला त्यांना भेटणे राहूनच गेले.
काल रात्री मला त्यांनी फोन केला. आणि सांगितले की, माझा मुलगा खुप हुशार आहे. त्यांने बँकचे काम सांभाळून इतर ठिकाणी नोकरीचे प्रयत्न केले. आणि त्याला अमेरिकेत नोकरी मिळाली आहे. पुढील सहा दिवसांत आम्ही तिघेही अमेरिका इथे जातोय. मी त्यांचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या तुमची प्रत्यक्ष भेट नाही होऊ शकली. आता पुन्हा कधी इकडे येणे होईल कुणास ठाऊक. त्यांचा आवाज कातळ भावनिक झाला होता. मग त्या म्हणाल्या, पण मी तुम्हाला नक्की भेटेन.
सांगा तुमच्यासाठी अमेरिका मधून काय आणू?
मी उत्तर दिले. तिकडे मुली खुप सुंदर असतात. एखादी सुंदर गोरीपान मुलगी आणा. त्या खळखळून हसल्या आणि फोन कट केला. कदाचित आपलेपणाचा हुंदका अनावर होऊन अश्रूंचा बांध थोपवणे अशक्य झाल्यामुळे…
माणसं भेटली या शब्दांच्या माध्यमातून नोकरी निमित्त ओळख असेलही मात्र या शब्दांच्या मुळे माणसांच्या मनात देखील ओळख मिळाली हिच खरी दौलत. आज कितीतरी महिला अशा आहेत की, ज्यांना आपल्याला होणारा त्रास घरातील व्यक्तीना किंवा पोलीस स्टेशनवर येऊन सांगता येत नाही.
आणि आयुष्यभर ती माऊली हा त्रास सहन करत बसते.
हा आपल्या समाजाचा एक विकृत चेहरा आहे. हे नक्कीच…
मनोज वढणे
( महाराष्ट्र पोलीस )
श्रीरामपूर-अहमदनगर
समन्वयक – पालघर जिल्हा
आपल्या ह्या कामाचे करावे तेवढे कौतुक कमीच. अश्या नाजूक नात्यांमधे हा तोंड दाबून बुक्क्यांचा मारच. पण आपण त्या महिलेच्या मनात इतका विश्वास निर्माण केलात की ती आप्तांना जी गोष्ट बोलू शकली नाही ती तुम्हाला विश्वासाने बोलली. आणी आपण तिची त्या त्रासातून सुटका करुन त्या विश्वासाला पात्र ठरलात.तिचे जगणे सुकर केलेत. सलाम आपल्याला. 🙏🏻🙏🏻