१० जानेवारी पुण्यातील शनिवारवाडयाचे भूमिपूजन याच दिवशी झाले. त्याला आज २९१ वर्षे झाली.( १० जाने १७३० ) एकेकाळी देशाचे राजकारण या वाड्याने ढवळून काढले होते. अनेक पराक्रमी लढवय्ये या वास्तूतून प्रेरणा घेऊन रणांगणावर जाऊन लढले. विजयी झाले.त्याचे असे झाले की, कसबा पेठेतील पटांगणावर एक ससा शिकारी कुत्र्याचा जोरदार पाठलाग करतो आहे.असे दृश्य बाजीराव पेशव्यांना दिसले. हा शुभशकून आहे. असे मानून त्यांनी याच जागेवर वाडा बांधण्याचा निर्णय घेतला. तोच तो हा शनिवारवाडा.अशी आख्यायिका सांगितली जाते. या वाड्याची वास्तूशांत २२ जानेवारी १७३२ रोजी मोठ्या थाटामाटात झाली. तेव्हापासून १८१८ पर्यंत म्हणजे तब्बल ८६ वर्षे या वाड्याची मालकी मराठा एम्पायरकडे होती.या कालावधीत तिथे पेशवाई नांदत होती. त्यानंतर १९४७ पर्यंत म्हणजे जवळपास १२९ वर्षे हा वाडा ब्रिटीशांच्या, काहीकाळ ईस्ट इंडिया कंपनीच्या मालकीचा होता.त्यानंतर मात्र आता तो भारत सरकारच्या मालकीचा झाला आहे. विस्तीर्ण भूभागावर वसलेला हा वाडा. मराठा वास्तूशैलीचा उत्तम नमूना मानला जातो.काही तज्ञ हा भुईकोट किल्ला आहे असेच मानतात.तो सात मजली होता. सातव्या मजल्यावर मेघडंबरी होती. स्वतः पेशवे या मजल्यावर रहात होते. या मेघडंबरीतून आळंदी व तेथील संत श्री ज्ञानेश्वरमहाराज यांचे मंदिर दिसत होते.वाड्याच्या पहिल्या मजल्यापर्यंतचे बांधकाम दगडी होते. तर उरलेल्या सहा मजल्यांचे बांधकाम विटांचे होते. या बांधकामासाठी चिंचवडच्या खाणीतून दगड आणले गेले. जुन्नरच्या जंगलातून लाकूड आणि जेजुरी येथून चुना आणला गेला . राजस्थानातील कुमावत क्षत्रिय या ठेकेदाराने ही भव्य वास्तू उभी केली. कोंडाजी सुतार, शिवराम कृष्ण, देवजी सुतार, व मोरारजी पाथरवट या आर्किटेक्ट मंडळींनी शनिवारवाड्याचे डिझाईन तयार केले. राघो नावाच्या पेंटरने संपूर्ण वाड्याचे रंगकाम केले. वाड्याच्या बांधकामाला १६११० रूपये एवढा खर्च आला. १७६० पर्यंत वाड्याचे आतील बांधकाम चालू होते. दिल्ली दरवाजा हे या वाड्याचे महाद्वार. ते जसेच्या तसे आज अस्तित्वात आहे.मोगलांचे राज्य ज्या दिशेला होते त्या दिशेला हा दरवाजा बसविण्यात आला. असे संदर्भ वाचायला मिळतात. याच दिशेला मस्तानी दरवाजा आहे. तो मस्तानीच्या वापरात असायचा. अग्नेय दिशेला गणेश दरवाजा आहे. ग्रामदेवत कसबा गणपतीचे दर्शन घेण्यासाठी हा दरवाजा वापरात होता. आतमध्ये गणेश रंगमहाल होता. तो नानासाहेब पेशव्यांनी १७५५ साली बनवून घेतला. गणेशोत्सव भव्य दिव्य प्रमाणात साजरा करता यावा हा त्यामागचा उद्देश होता. महालाच्या एका टोकाला सोन्याचा पत्रा असलेली संगमरवरी गणेशमूर्ती होती, तर दुसऱ्या टोकाला कारंजी व सुंदर फुलबाग होती. फुलांचा सुगंध व कारंज्याचे फवारे यामुळे महालात बसणे हा सुखद अनुभव असे. पश्चिमेला खिडकी दरवाजा होता. तर दक्षिणेला जांभूळ दरवाजा होता.तिथून दासदासी जा ये करीत असत.हे सर्व दरवाजे टोकदार कमानींमधे असून मोठे अणुकुचीदार लोखंडी खिळे व जाडजूड पट्ट्या ठोकून ते भक्कम केलेले आहेत. दिल्ली दरवाज्याची उंची २१ फूट असून रुंदी १४ फूट आहे. हाच सर्वांत मोठा दरवाजा आहे. वाड्याच्या सर्व तटांवर मिळून २७५ शिपाई, रात्रंदिवस ५०० स्वार व वाड्यातील अंतर्गत बंदोबस्तासाठी १००० हून अधिक नोकर होते. दिल्ली-दरवाज्यावर नगारखाना आहे. आगीच्या प्रलयातून वाचलेला अस्सल पेशवेकालीन शाबूत असलेला भाग हा पर्यटक आवर्जून पहातात. देवडीच्या भिंतीवर शेषशायी विष्णू, गणपती या दैवतांची चित्रे काढलेली आहेत. ती आता बरीच खराब झाली आहेत. वाड्याच्या आतल्या भागांमध्ये काय चालले आहे, हे बाहेरच्या माणसांना दिसू नये म्हणून दिल्ली दरवाजा, देवडी आणि आतला चौक नागमोडी रचनेत आहे.सर्वच दरवाज्यांवर अष्टौप्रहर गारद्यांचा जागता पहारा असे.दिल्ली दरवाजातून आत गेल्याबरोबर एक प्रचंड वाटोळा बुरूज लागे. या बुरुजाच्या माथ्यावर तोफांचा गोल रचला होता. आणि त्याच्या मध्यभागी महाराष्ट्राचे जरीपटक्याचे भगवे निशाण फडकत असे. बुरुजाच्या आत तीन मोठया कमानी असून त्या कमानींवर नगारखान्याची माडी होती. कमानींतून आत गेल्यावर एक विस्तीर्ण पटांगण लागे. या पटांगणाच्या पूर्व बाजूस व पश्चिम बाजूस दोन दोन लहान चौक असून दक्षिणेच्या बाजूस वाड्याची मुख्य इमारत होती. तिथे चार मोठमोठे चौक होते. आग्नेयेकडील चौकास लाल चौक असे नाव होते, पण तो बाहेरील चौक या नावानेही ओळखला जाई. नैर्ऋत्येकडील चौकास मोतीचौक असे म्हणत. त्या चौकाला बाईंचा (गोपिकाबाई) चौक असेही म्हणत. वायव्येकडील चौकास हिरकणी चौक असे नाव असून तो मधला चौक या नावाने ओळखला जात असे. शेवटच्या म्हणजे ईशान्येकडील चौकास माणिकचौक म्हणत.या मोठया चौकांशिवाय फडाचा चौक, ताकचौक, मुदपाकचौक, पक्कान्नचौक इत्यादि अनेक पोटचौक होते. त्यांपैकी फडाचा चौक हा हिरकणी चौकात असून त्यांत पेशवे सरकारांची कचेरी भरत असे. या सर्व चौकांत मिळून गणपतीचा रंगमहाल, नानांचा दिवाणखाना, नवा आरसेमहाल, जुना आरसेमहाल, दादासाहेबांचा दिवाणखाना, थोरल्या रायांचा जुना दिवाणखाना, खाशांचा दिवाणखाना, हस्तिदंती दिवाणखाना, नारायणरावांचा महाल, अस्मानी महाल इत्यादी अनेक महाल व दिवाणखाने होते. नारायणरावांचे देवघर, रावसाहेबांचे देवघर, दादासाहेबांचे देवघर इत्यादी अनेक देवघरे होती. याशिवाय जामदारखाना, जिन्नसखाना, दप्तरखाना, पुस्तकशाळा, गोशाळा, पीलखाना, उष्ट्रखाना, शिकारखाना, शिलेखाना अशी दालने होती. वाड्याचे सर्व चौक उत्तम चिरेबंदी बांधलेले होते.मध्यभागी अनेक हौद व कारंजी असत. त्यांच्यापैकी हिरकणी चौकातले हजारी कारंजे कमलाकृती असून त्याचा घेर सुमारे ऐशी फूट होता. त्यात सोळा पाकळया होत्या. प्रत्येक पाकळीत सोळा याप्रमाणे दोनशे छप्पन्न कारंजी उडण्याची सोय केली होती. वाड्याचे सुतारकाम उत्तम सागवानी लाकडाचे होते.त्यांतील दिवाणखान्यांचे व महालांचे नक्षीकाम फारच प्रेक्षणीय होते. दिवाणखाने कलमदानी आकाराचे असून त्यामध्ये एक मोठा सभामंडप व चारी बाजूंस चार दालने काढलेली होती. सभामंडपाचे काम सुरूदार नक्षीचे होते. त्यावर नक्षीदार लाकडी कमानी होत्या. त्यांवर पक्षी, फळे, वेलबुट्टी अशी चित्रे कोरलेली होती.. विशेषतः हिरकणी चौकांतल्या गणपती महालात रामायण-महाभारतातील कथांची चित्रे होती. जयपुरमधील भोजराज नावाच्या चित्रकाराने हे काम केले होते.कमळाच्या आकाराचे जै कारंजे होते. त्याला हजारी कारंजे असे नाव होते. सवाई माधवराव बालपणी तेथे खेळत असत. थोरल्या रायांचा दिवाणखाना, जुना आरसेमहाल,न्याय निवाडा करण्याचे दालन,नृत्याचा दिवाणखाना, ठिकठिकाणचे हौद,अशी या वाड्याची अंतर्गत रचना होती.वैद्यखाना, कबूतरखाना, कोठी इत्यादीची व्यवस्था वेगवेगळ्या चौकांतून करण्यात आली होती. कात्रज येथे तलाव बांधून त्यातून पाणी शहरात आणून ते वाड्यात सर्वत्र खेळविले होते.असे वर्णन कवि साधुदास यांनी ‘पौर्णिमा’ या कादंबरीत केले आहे. ठिकठिकाणी सिलींगला काचेच्या हंड्या बसविलेल्या होत्या. विवाह सोहळे. सैनिक सभा यामुळे वाड्यात सतत वर्दळ असायची अनेक घटना, दुर्घटनांचा हा वाडा साक्षीदार आहे. वाड्यातील पेशव्यांच्या कार्यालयात अनेक वीर आणि मुत्सद्दी येत. राजकारणाचे येथे फड रंगत; पेशव्यांचा दरबार येथेच होता. समोरील पटांगणात मोहिमेला जाणारे सैन्य उभे असायचे. १७५८ मध्ये या वाड्यात सुमारे एक हजार लोक रहात होते. १८०८, १८१२ व १८१३ या वर्षात या वाड्याला लहान मोठ्या आगी लागल्या होत्या. पुण्याचे पहिले जिल्हाधिकारी हेनरी डंडास राॅबर्टसन १८१७ मध्ये या वाड्यात रहात होते असे संदर्भ वाचायला मिळतात. त्यानंतरच्या काळात वाड्यात तुरूंग होता.पोलीसांची घरे होती.पंगुगृह होते. १८२८ मध्ये शनिवार वाड्याला आग लागली. ती आठवडाभर धुमसत होती. त्यात आतील वाडा भस्मसात झाला. त्यानंतर ब्रिटीशांनी १९१९ मध्ये संरक्षित स्मारक म्हणून शनिवारवाडा जाहीर केला. १९२३ मध्ये उत्खननासाठी कोर्टासाठी वापरण्यात येणारी इमारत पाडण्यात आली. आता या वाड्यात एकही इमारत अस्तित्वात नाही. नऊ बुरूज मात्र शाबूत आहेत. पुण्यातील मध्यवस्तीत ते दिमाखाने उभे आहेत. या बुरूजांवर तोफा बसवण्याची सोय केलेली आहे. यांपैकी ‘पागेचा बुरूज’ आतून पोकळ असून त्याच्या पायथ्याशी मध्यभागी बांधून काढलेला एक गोल खड्डा आहे. त्यात तोफांचे गोळे ठेवत असत. आता हा वाडा पर्यटन स्थळ झाल्याने तिथे दिवसभर वर्दळ असते. वाड्याच्या पटांगणावर आता खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. काही विद्यार्थी अभ्यासासाठी आत बसलेले दिसतात. बाहेर बाजीराव पेशवे यांचा भव्य पुतळा. जाहीर कार्यक्रमांसाठी आसनव्यवस्था असलेले पटांगण. भेळपुरीच्या गाड्या. या वैशिष्टयांसह पेशवाईला उजाळा देण्याचे काम करीत हा वाडा रूबाबात उभा आहे. वाड्याच्या चारही दिशेचे रस्ते प्रचंड रहदारीमुळे सतत जॅम असतात.वाहनांच्या गराड्यातच हा वाडा सापडला आहे असे मी म्हणेन. स्वातंत्र्यानंतर शनिवार वाड्यावर गाजलेल्या सभा हा राजकीय विश्लेषकांच्या अभ्यासाचा विषय आहे.आचार्य अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढयाचे रणशिंग याच वाड्याच्या पटांगणातून फुंकले. उपमहापौर प्र. बा. जोग यांची भाषणे हा शहरभर चर्चेचा विषय असायचा. या वाडयाचा निर्माता महान सेनानी पहिले बाजीराव पेशवे यांनी मराठा दौलतीच्या सीमा उत्तर भारतापर्यंत विस्तारल्या. त्यांनी पस्तीस लढाया केल्या. त्या सर्वच्या जिंकल्या. शंभर टक्के सक्सेस रेट असणारा हा महापुरूष सर्वार्थाने शनिवार वाड्याशी समरस झाला होता .जोडला गेला होता.
या लेखनासाठी बाजीराव पेशवे व शनिवारवाडा याविषयावरील उपलब्ध साहित्य याचा आधार घेतला आहे.
सौजन्य- सो.मि
मुख्यसंपादक