झुंज : भाग ११ –
सकाळ झाली तशी किल्लेदाराने परत सभा बोलावली.
“गड्यांनो… आपला देव आपल्यासंग हाये. बादशानं खानाला परत बोलीवलं अशी बातमी कालच्याला जीवाशिवानं आनली. जवर नवीन सरदार येत नाई तवर किल्ला सुरक्षित ऱ्हाईल. त्यो यायला चार सा दिस लागतीन. तवर त्रंबकगडावर जाऊन आपल्याला मदत मागावी लागनं. पन त्यासाठी मुगल फौजेचा येढा तोडून ह्ये काम करावं लागनार. ही कामगिरी कोन घ्येनार अंगावर?” परत एकदा अनेकजण समोर आले. पण तेवढ्यात त्याच्यातील एकाचा आवाज आला.
“किल्लेदार… मै लेता है…” अली हसन पुढे येत म्हणाला.
किल्लेदाराने आवाजाच्या दिशेने पाहिले. एक २०/२२ वर्षाचा युवक त्याच्यासमोर उभा होता. किल्लेदार बाकी काही बोलणार तेवढ्यात त्या युवकाने सुरुवात केली.
“ह्ये कुनी गेले आन फौजेच्या हाती गावले तर काम ऱ्हाईल… म्या मुसलमान हाये. कुनीच संशय घेनार नाई… काम फत्ते हुनारच…” किल्लेदाराला त्याच्या आश्वासक शब्दांचे कौतुक वाटले तसेच ही गोष्टही त्याला मनोमन पटली.
काहीवेळातच त्र्यंबकगडाच्या किल्लेदारासाठी एक खलिता बनविण्यात आला. त्यावर किल्लेदाराने आपली मोहोर उठवली आणि तो अलीच्या ताब्यात देण्यात आला.
अली अगदी सावधगिरीने गड उतरत होता. त्याने जरी आश्वासकपणे कामगिरी फत्ते करण्याबद्दल किल्लेदाराला सांगितले होते तरीही त्याच्या मनात याबद्दल पूर्णतः खात्री नव्हती. तशी ती कुणाच्याही मनात नव्हतीच. इतर वेळेस गोष्ट वेगळी होती. पण यावेळेस मुघल सैन्याचा वेढा पडलेला होता. आणि अशा वेळेस कुणीही त्याची झडती घेतली असती आणि त्याच्याकडील खलिता त्यांच्या हाती लागला असता तर तो जीवानिशी गेला असताच, पण कामगिरीही अर्धवट राहिली असती. यासाठीच त्याला शक्य तितकी काळजी घ्यावी लागत होती.
काही वेळातच त्याला मुघल सैन्याच्या छावण्या दिसू लागल्या. दोन छावण्यांमधील अंतर हे जास्तीत जास्त दोन फर्लांगाचे. पण दैव अलीच्या बाजूने होते. छावणीत सैनिक तर दिसत होते पण काहीसे सुस्त. एका क्षणासाठी त्याचे मन कचरले. पण त्याला थांबून चालणार नव्हते. त्याची एका क्षणाची भीती ही अनेकांना उपासमारीने तडफडून मरण्यास कारणीभूत ठरणार होती. ज्या माणसांबरोबर आपण लहानाचे मोठे झालो, ज्यांच्या घासातला घास त्यांनी आपल्या बरोबर खाल्ला त्या लोकांशी दगा करायचा? शक्यच नाही. स्वराज्यासाठी मरण आले तर जन्नत मिळणारच. अलीचे मनाने उभारी घेतली आणि त्याची पावले पुढे पडू लागली. दोन छावण्यामधून गेलो तर लोकांचे लक्ष जाणारच हे त्याच्या लगेचच लक्षात आले आणि त्याने एका छावणीच्या बाजूने पुढे सरकायला सुरुवात केली. लवकरच तो एका तंबूच्या जवळ पोहोचला. सैनिकांचे आवाज त्याला स्पष्ट ऐकू येत होते. अर्थात त्याला त्याच्याशी काहीही देणेघेणे नव्हते. कसेही करून त्याला ती छावणी पार करून वेढ्यातून बाहेर पडायचे होते. एका ठिकाणी त्याला पहाऱ्यावरील सैनिक बाजूला झाल्याचे दिसले आणि त्याने त्याबाजूला आपली पावले वळवली. अगदी सावधगिरीने तो पुढे चालला होता. काही क्षणातच त्याने छावणी पार केली आणि तो सुटल्याचा श्वास घेतो न घेतो तोच त्याला आवाज आला.
“ए… कोन है? ठहेरो…!!!” आवाज आला तसा तो आहे त्या ठिकाणीच थांबला. पुढे पळाला असता तर नक्कीच तो सैन्याच्या हाती सापडला असता. त्याने एकदा अल्लाचे नाव घेतले आणि तो मागे वळला.
“ए… इधर आव…” पहाऱ्यावरील अधिकाऱ्याचा आवाज आला.
“जी हुजूर…” अली त्या अधिकाऱ्यासमोर उभा होता.
“कोन हो तुम… इधर कायको आया?” अधिकाऱ्याने दरडावून विचारले.
“हुजूर… इधर मै नही आया… मेरी भैसका बछडा आया…” अलीने बावळटपणाचा आव आणत सांगितले.
“भैस का बछडा?”
“जी हुजूर…”
“और तुम उसके पीछे आया?”
“जी हुजूर…”
“तुमको पता नही है क्या… यहां से आगे जाना मना है?”
“हुजूर… मेरेको पता है पर उसको पता नही है…” अली अधिकाऱ्याच्या नजरेला नजर देत उत्तरला.
“नाम क्या है?” अधिकाऱ्याने पुढचा प्रश्न केला.
“छोटू हुजूर…” अलीच्या चेहऱ्यावर बावळटपणाचे भाव पुरेपूर दिसून येत होते.
“छोटू? ये कैसा नाम है?”
“हुजूर… अभी छोटा है ना… इसलिये सब छोटू बोलते है…”
“अबे चूप… तुम तो छोटा नही दिखता…” अधिकारी काहीसा वैतागला.
“हुजूर… ये मेरा नही, उस बछडेका नाम है…”
“क्या पागल हो? मैने तुम्हारा नाम पुछां है…” अधिकारी पूर्णच वैतागला.
“हुजूर… मेरा नाम अली है… अली हसन…”
“तुम मुसलमान हो? रहेते कहां हो?” अधिकारी काहीसा नरम पडला.
“हुजूर… वो झोपडे है ना? वहीच…” दूरवर विरुद्ध बाजूला बोट दाखवत अलीने सांगितले.
“चलो जाव इधरसे… नही तो अल्ला को प्यारे हो जावोगे… भागो…” अधिकाऱ्याने फर्मावले आणि अलीने मनोमन अल्लाचे आभार मानले. किल्लेदाराने त्याच्यावर सोपवलेली कामगिरी जवळपास अर्धी फत्ते झाली होती.
वेढ्यातून बाहेर पडल्यावर मात्र अलीने एक क्षण देखील वाया घालवला नाही. त्र्यंबकगडाखाली तो पोहोचला त्यावेळेस जवळपास अंधार पडला होता. रात्रीच्या वेळेस गडाचे दरवाजे काही केल्या उघडले जाणार नाहीत हे तो पक्के जाणून होता. त्यामुळे मग त्याने गडाच्या पायथ्याशी महादेवाच्या मंदिराजवळ आराम करण्याचा निर्णय घेतला.
एकतर थंडीचे दिवस. त्यात अंगावरील कपडे देखील बेताचेच आणि रात्रीचा अंधार. बरे या भागात रात्रीचा बिबटे, तरस अशा जनावरांचा वावर. शेवटी अल्लाचे नाव घेत त्याने महादेव मंदिराचा दरवाजा ठोठावला. काही वेळ शांततेच गेला आणि नंतर मुख्य दरवाज्याजवळ त्याला हालचाल ऐकू आली.
“कोन ए?” आतून आवाज आला.
“मै अली…, रामशेजवरनं किल्लेदाराचा खलिता आनलाय. त्रंबकगडावर देन्यासाठी. पन रातच्याला किल्ल्याचे दरवाजे बंद ऱ्हातेत…” अलीने सगळे खरे सांगून टाकले. काही वेळ परत शांततेत गेला आणि परत आवाज आला.
“किती लोकं हायेत?”
“येकलाच हाये…” अलीने उत्तर दिले आणि दरवाजा उघडला गेला.
मंदिराचा पुजारी हातात मशाल घेऊन उभा होता.
“रामराम…” अलीने मुद्दाम सलामच्या ऐवजी रामराम म्हटले होते.
“रामराम… पन.., रामशेजला तर बादशाच्या फौजेचा वेढा हाये?” पुजारी काहीसा साशंक झाला.
“हा… म्हनून तर किल्लेदाराने मदत मागितली… ही पहा संबाजी राजाची खून…” अलीने पुजाऱ्याला किल्लेदाराने त्रंबकच्या किल्लेदारासाठी दिलेली खुणेची मुद्रा दाखवली आणि पुजाऱ्याचा संशय मिटला.
“वाईज धीर धर… तुज्या राहन्याची व्यवस्था करतो…” अलीला दारातून आत घेत आणि मंदिराचा दरवाजा बंद करत पुजारी त्याच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी निघून गेला. काही वेळाने पथारी आणि घोंगडी घेऊन तो परत आला.
“ह्ये घे… आन त्या कोपऱ्यात मांड पथारी. पहाटेला कोंबडा आरवला की गडावर जा… आता आराम करून घे…”
“लई उपकार झालं…” अलीने त्याचे आभार मानले.
“अरे… संबाजी राजाचा शिपाई तू… येवढं तर करूच शकतो ना…” असे म्हणत पुजारी निघून गेला आणि अलीने पथारीवर अंग टाकले.
क्रमशः
मुख्यसंपादक