Homeवैशिष्ट्येशिवकालीन ऐतिहासिक मालिका . झुंज : भाग १२

शिवकालीन ऐतिहासिक मालिका . झुंज : भाग १२

झुंज : भाग १२ –

पहाटे पक्षांचा किलबिलाट सुरु झाला तसा अलीला जाग आली. पहाटेची थंडी अंगाला बोचत होती तरीही तो उठला. कपडे आवरले आणि पुजाऱ्याचा निरोप घेऊन तो बाहेर पडला.

त्र्यंबकगडावर पोहोचला त्यावेळेस पूर्ण उजाडले होते. गडाचा किल्लेदार दिवाणखान्यात हजर झाला होता. सर्वात प्रथम अली किल्लेदारासमोर हजर झाला.

“नाव काय तुजं?” किल्लेदाराने प्रश्न केला.

“अली… अली हसन…”

“गडावर समदं ठीक हाय नव्हं?”

“जी हुजूर… आजूक तरी समदं आलबेलं हाय… पर…” अलीने वाक्य अर्धेच तोडले.

“पर काय?” किल्लेदाराने विचारले.

“आमच्या किल्लेदारानं सांगावा धाडलाय. ह्यो खलिता…” खाली मानेन त्याने किल्लेदारासमोर रामशेजच्या किल्लेदाराचा खलिता पुढे केला. किल्लेदाराने त्याच्या चिटणीसाला मानेनंच खुण केली आणि चिटणीसाने पुढे होत खलिता स्वतःच्या हाती घेतला.

“तू वाईज आराम कर…” किल्लेदाराने अलीला हुकुम केला. तसेच दारावर असलेल्या पहारेकऱ्याला आवाज दिला.

“आज्ञा किल्लेदार…” पहारेकरी आत येत मुजरा करीत म्हणाला.

“याच्या न्याहारीची आन जेवनाची यवस्था करा…”

“जी किल्लेदार…” म्हणत पहारेकरी अलीला घेऊन बाहेर पडला.

“दिवाणजी… काय लिवलंय किल्लेदारानं?” त्र्यंबक किल्लेदाराने विचारणा केली.

“सरदार… रामशेज किल्लेदार मदत मागून ऱ्हायले… गडावरची रसद संपायला आली आन मुगल सैन्याचा येढा निघायचं नांव नाई. आता बादशानं शहाबुद्दीन खानाला माघारी बोलीवला. तो रवाना झाला आहे पन नवा सरदार यायला चार सा दिस लागतीन. तवर काई मदत पोचीवता येईल का म्हनून इचारलं हाये त्यांनी.”

“अस्सं… दोन वर्स झाली, पठ्ठ्यानं गड लढीवला… मानायला पायजे… असं करा आपला येक दूत अहिवंत गडाकडे रवाना करा. त्याच्यासंग येक खलिता धाडा. आन आपल्या लोकास्नी गोळा करा…” किल्लेदाराने हुकुम सोडला आणि चिटणीस मुजरा करून बाहेर पडला.

दुपारच्या वेळेला त्र्यंबकगडावर सैन्य अधिकारी जमले होते. जवळपास सगळ्यांनाच सभा कशासाठी बोलविली याची कुणकुण लागली होती. रामशेजवरून माणूस आला म्हटल्यावर त्याचे कारण काय असणार हे वेगळे सांगण्याची गरजच नव्हती. सभा सुरु झाली. किल्लेदाराने कोणताही वेळ न दवडता विषयाला हात घातला.

“समद्यांना ठावं हाय, दोन वर्सापासनं रामशेजचा किल्लेदार मुगल सैन्याशी लढून ऱ्हायला. पन आता गडावरली रसद संपाया लागली. त्यानं मदत मागितली हाये. गडाचा येढा आजूकबी उठलेला नाई. तवा आता आपन दोन गोष्टी करायच्या. येक म्हंजी आपल्यातले काई लोकं मुगल सैन्यावर हल्ला करनार आनी एकदा का घमासान चालू झाली की मंग बाकीच्यांनी रामशेजवर रसद पुरवायची. तसा सांगावा अहिवंत गडाच्या किल्लेदारालाबी पाठवला हाय. पन आपल्याला आताच त्याबद्दल कायबी ठरीवता येनार नाई. संबाजी राजानंबी पयलेच रामशेजच्या किल्लेदाराला मदत कराया सांगितली हाये. मंग आता घ्या महादेवाचं नांव. पन येक गोष्ट करायची. येकदा का रसद गडावर यवस्थित पोचली की मंग लगोलग माघारी फिरायचं. समजलं?” त्र्यंबकच्या किल्लेदाराने फर्मान सोडले आणि हर हर महादेवचा जयघोष झाला.

क्षणाचाही विलंब न करता दोन हजार माणसे कामगिरीवर निघाली. रामशेज किल्ला जसा जवळ आला तसा दोन हजाराची फौज दोन भागात विभागली गेली. त्यातील एका भागात दीड हजार माणसे होती. ज्यांचे काम अचानक मुगल फौजेवर हल्ला करण्याचे होते आणि उरलेले पाचशे जण हे या वेळात गडावर रसद पोहोचवणार होते. अली देखील याच पाचशे जणांबरोबर होता.

अलीला जाऊन दोन दिवस झाले होते. त्याच्याकडील काहीही हाकहवाल किल्लेदाराला समजली नव्हती. तो वेढा भेदून बाहेर पडला किंवा पकडला गेला याबद्दल काहीही सांगता येण्यासारखे नव्हते. पण नक्कीच तो वेढा भेदण्यात यशस्वी झाला असणार असे त्याची मनोदेवता त्याला सांगत होती. तसे या काळात देखील जिवाशिवा परत एकदा हेरगिरी करून आले होते आणि कुणी पकडला गेला आहे अशी कोणतीही कुणकुण त्यांना लागली नव्हती.

तिसरा दिवस उजाडला. किल्लेदार नेहमीप्रमाणे तटावर जाऊन दूरवर नजर टिकवून होता. काही वेळात त्याला दोन दिशांनी धुळीचे लोट दिसू लागले. सैन्याची एक तुकडी नाशिकच्या बाजूने पुढे सरकत होती आणि दुसरी तुकडी दिंडोरीच्या बाजूने गडाकडे येत होती. येणारे सैन्य आपल्या बाजूचे की विरुद्ध बाजूचे हेच त्याला नीट उमजेना. पण जसजसे सैन्य पुढे येऊ लागले तसतसा त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. दोन्ही कडील सैन्याबरोबर घोडागाड्या, बैलगाड्या दिसून येत होत्या. तसेच त्यांचे पेहेराव देखील मुगल सैन्यासारखे नव्हते. म्हणजेच अलीने त्याचे काम चोख बजावल्याची ती खुण होती.

मुगल सैन्य मात्र काहीसे बेसावध होते. एकतर अनेक दिवसांचा पहारा असल्यामुळे त्यांना थकवा जाणवत होता. दोन दिवसांपासून जरा कुठे त्यांना सवड मिळाली होती. एकदा का फत्तेखान आला की परत आराम असा मिळणारच नव्हता. काही वेळ होतो न होतो तोच त्यांना मराठा सैन्य दोन बाजूने येते आहे असे समजले. तसे इतर मनसबदार, जहागीरदार आणि सैन्य अधिकारी त्यांच्याबरोबर होतेच पण तरीही त्यांच्यात एकवाक्यता म्हणावी अशी नव्हती. त्यांनी इतर तयारी करेपर्यंत मराठा सैन्याने दोन बाजूंनी आक्रमण केले. दीड हजाराची कुमक त्रंबकगडावरून आली होती आणि जवळपास हजार माणसांची कुमक अहिवंत गडावरून आली होती.

समोरासमोर युद्धाला सुरुवात झाली. मुगल सैन्य तसे सहा सात हजाराचे होते पण थकलेले. त्यामानाने मराठा सैन्य जरी कमी होते तरी पूर्ण ताजेतवाने. तसेच असा गनिमी हल्ला करण्यात त्यांचा हात कुणी धरू शकणार नव्हता. तलवारींना तलवारी भिडल्या. सगळीकडे खणखनाट सुरु झाला. रक्ताचे पाट वाहू लागले. हर हर महादेव आणि अल्ला हु अकबरच्या घोषणांनी आसमान दणाणले. मुगल सैन्य हळूहळू माघार घेऊ लागले. आणि त्यातच त्रंबक गडावरून रसद घेऊन निघालेली तुकडी पुढे झाली. सगळ्यात पुढे अली स्वतः होता. त्या तुकडीला गडाचा वेढा भेदण्यास काहीही वेळ लागला नाही. किल्लेदार गडावरून हे सगळे पहात होता. त्याचे मन आनंदाने उजळले होते. अली जसा किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यावर पोहोचला तसे किल्ल्याचे दरवाजे उघडले गेले. धान्याच्या पोत्यांनी भरलेल्या गाड्या दरवाज्यातून आत जाऊ लागल्या. काही वेळातच अहिवंत गडावरून आलेली कुमकही किल्ल्यावर पोहोचली. गडावरील लोकांमध्ये नवचैतन्य संचारले आणि मुगल सैन्य मात्र वाट फुटेल तिकडे पळत सुटले.

क्रमशः

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. या अश्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टी मोठ्यांच्या इतिहासातून कळत नाही
    या अश्या गोष्टींनी स्वराज्य कसे भररलेलं असेल याची कल्पना येते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular