“मुजरा घ्यावं राजं”…………
शिवजयंती निमित्त आपणा सर्वास हार्दिक हार्दिक शुभेच्छा
छत्रपती शिवाजी शहाजी राजे भोसले हे आपले राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. दिनांक १९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८० या कालावधी त ते आपल्यासाठी काय काय नाही करून गेले.
विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली. इ.स. १६७४ मध्ये रायगड किल्ल्यावर औपचारिकपणे छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ.स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. तोच शिवजयंती सोहळा आपण या तारखेला साजरा करत असतो.
जेव्हापासून जन्म झाला आहे महाराष्ट्र्याच्या या लाल-काळ्या मातीत छत्रपतींच नाव घेऊन च
आपण सर्व मोठे झालो आहोत , कोणतीही संकट आले तरी त्यांचाच चेहरा समोर असतो आणि येणाऱ्या संकंटांशी लढण्याची ताकत आपोआप येऊन जाते. प्रत्येक मराठी मनाचा अभिमान म्हणजे छत्रपती शिवराय ….प्रत्येक मराठी मनाचा सण म्हणजेच शिवजयंती.
आजचा दिवस म्हणजे मराठी माणसाच्या आनंदा चा दिवस. मराठी माणसाचा अभिमान छत्रपती शिवाजी महाराज अनन्य साधारण असे राजे, असे दैवत लाभले आपल्या महाराष्ट्राला.
राज्यांची जयंती आम्हास केवळ १९ फेब्रुवारी लाच नव्हे तर वर्षाचे बारा महिने ३६५ दिवस साजरे करण्यास आवडेल. देव्हाऱ्यातील विठोबा आणि मराठ्यांचा आमचा शिवबा आमचे दैवत. आणि भगवी आमची पताका. भगव आमचं रक्त.
आज शिवजयंती निमित्त मला काही बोलावयाचे आहे काही मांडायचे आहे. आज मराठी मावळे ज्योत घेऊन वैविध्यतेने पूर्ण नटलेल्या, सजलेल्या , पराक्रमाने गाजलेल्या गडांना भेट देतात . महाराष्ट्रात अनेक किल्ले आणि गड ताठ मानेने श्वास घेत आहेत.
हे गड हे किल्ले आपल्या राजांनी दिलेली अमृततुल्य देणगी आहे . याचे आपल्यालाच संगोपन करावयाचे आहे . साध्याच मी रायगड जाऊन आले .
गडांचा राजा , राजांचा गड . असा थाटामाटात उभा असलेला रायगड .
बरेच लोक आपल्या गडांची काळजी घेत आहेत , स्वच्छता , गडांचा निटनिटकेपणा , इत्यादी कडे लक्ष देत असतात पण काही लोक त्याच पवित्र स्थानांना निष्काळजीपना ने वावरत असतात , कुठे गड दर्शनास गेल्यास कचरा करून येणे , कुठे भिंतीवर प्रेमी युगुलांची नाव लिहून येणे , अशी कृत्य करताना हा विचार नक्की करा . प्रेम ही सुंदर परिभाषा आहे तिला अशी व्यक्त करण्याची भाषा योग्य नाहीय.
गडकिल्ले आपली मंदिर आहेत. आपण तरुण युवक – युवती आहोत भविष्याचे कर्ते आपणच आहात. असं कृत्य करू लागलो तर आपली पुढील पिढी हि तेच करेल तसेच वागेल. आपण आपली किल्ल्याची योग्य माहिती , त्यांची कीर्ती पुढील पिढीला सांगावयाची आहेत. प्रत्येक मुलीला आई जिजाऊंची शिकवण देऊया , राणी साहेब ताराराणी यांनी केलेल्या पराक्रमाची माहिती देऊयात . बाहेरच्या देशातील संस्कृती शिकवण्यापेक्षा , त्यांच्या संगितावर डान्स शिकवण्यापेक्षा
शिवरायांचा मराठा मोळा पोवाडा शिकवूया . प्रत्येक मुलाला अन मुलीला शिवगर्जना शिकवूयात देवाची आरती रोज करतात तशी रोज घरा घरात शिवरायांची शिव रुपी पहाट आणुयात.
सर्वांना नम्र व आग्रहाची विनंती ही की यंदाच्या शिवजयंतीपासून एक प्रथा पाडून घेऊ… ज्याप्रमाणे आपण लक्ष्मीपुजनाला घराबाहेर सकाळी व संध्याकाळी दिवे लावतो त्याच प्रमाणे या वर्षापासून शिवजयंतीला आपण आपल्या घरी दिवे लावा व घरावर 🚩भगवा झेंडा लावावा.घराबाहेर रांगोळी काढावी,जेणेकरुन शिवजयंतीच्या सणाचे महत्व आपणास व भावी पीढीस कळेल तसेच १९ फेब्रुवारी फक्त जयंती न राहता महाराष्ट्रातील एक मोठा सण व्हावा … हा संदेश आपल्या सर्व समाजबांधवांना पाठवा तसेच गावात व परिवारात ही प्रथा पाडा… ही आपणा सर्वाना आग्रहाची विनंती…
राजे होते म्हणून आपण आज दिवाळी दसरा मोठ्या उत्सहाने साजरे करत आहोत हे नका विसरू . मराठयांचा भगवा फडकावा दाही दिशांना. फक्त शिवजयंती आली अन् आपण ज्योत घेऊन गडा पर्यंत पळत आहोत इथं पर्यंत च शिवजयंती मर्यादित ठेऊ नका . त्यांचे विचार , त्यांनी केलेल्या कृती , त्यांच्या युक्त्या , त्यांचं धाडस , त्यांचं शौर्य, त्यांनी केलेल्या बलिदानाचे चीज करून दाखवा . महाराष्ट्र आपला आहे त्याची शान कायम ठेवा.
ज्या काळात काहीही सोय सुविधा नसताना राजे पायदळी काटे कुटे तुडवून आपल्यासाठी दिल्ली आणि आग्रा सारख्या ठिकाणी दूर दूर प्रवास करून आले , त्याची जान ठेवा. आताच्या शिकलेल्या जगात राहून आपल्या महाराष्ट्राचे कारभार दुसऱ्या राज्यात जाऊ देऊ नका जागे व्हा वेळ जाण्यापूर्वी .
नाहीतर राजे एक दिवस बोलतील ही अपेक्षा नव्हती माझ्या मराठमोळ्या मावळ्याकडून . प्रत्येक ठिकाणी मला उपस्थित राहून नाही चालणार इथून पुढे महाराष्ट्राची आन , बाण , शान तुम्हालाच राखायची आहे .
मद्यपान करून व्यसनी होण्या पेक्षा स्वराज्यासाठी पेटून उठा करून दाखवा काहीतरी नवीन .
आया बाया कडे पाहणारी वाईट नजर फोडून टाका . शेतीला प्राधान्य द्या . आपली बाजारपेठ जगाच्या कानाकोपऱ्यात उभी करा . मराठा काय करू शकतो हे दाखवा जगाला . शिवरायांची शिकवण अंमलात आणा . स्वतः ला कमी न समजता व्यवसाय आणि इतर गोष्टीकडे वळा . राजाच्या काळातले खेळ मुलांना शिकवा , मोबाइल आणि इतर गेम्स कडे वळू न देता वर्षातून काही काही वेळा गडावर भेट द्या . त्या काळात मावळे गडावरून , दरी खोऱ्यातून लढत होते . आताची स्थिती पहिल्या पेक्षा हजार पटीने चांगली आहे , दळणवळणाची साधने प्रचंड प्रमाणात वाढलेली आहेत . यंत्र तंत्रात देश प्रगतशील आहे . विकसनशील देश विकसित होण्याकडे कसा कल जाईल याकडे लक्ष द्या.
तुमच्या काम करण्याच्या पद्धती बदला . अजून खूप मागे आहोत आपण. गोर गरीब गरीब च आहेत अजून, राजाच्या काळात कोणी उपाशी झोपत नव्हते. आज उपाशी आणि गरिबांना पाहून काय वाटत असावं राज्यांना
याची तमा भ्रष्टाचार करणाऱ्यांनी जाणून घ्यावी . काय करावयाचे आहे अन् काय नाही याचे आराखडे काढा . कोणी तुमच्या वर हसले तरी चालेल पण इतिहास घडवण्याचे काम करा.
अनेक मंडळ आणि ग्रुप तयार करण्या ऐवजी एकीने लढा .
आपण च आपले राज्य आणि त्याची संस्कृती पुढे नेऊ शकतो. ज्या दिवशी आपल्या देशात एकही व्यक्ती उपाशी झोपणार नाही, एकही मुलगा मुलगी शिक्षणा शिवाय वंचित राहणार नाही, शिक्षणावर वाढत चाललेला खर्च कमी होईल, ज्यादिवशी आपला राज्याचा चा कारोभार वाढला जाईल , लोक एकीने राहतील , वेळेचे महत्व जाणले जाईल,
आई वडिलांचा उतरता वयात जोपासना केली जाईल, वृद्धाश्रम बंद होतील, थोरा मोठ्यांचा आदर राखला जाईल. वेळेचा सदुपयोग केला जाईल, माणसातील माणुसकी जपली जाईल. मानवाचे समान अधिकार सर्वांना प्राप्त होतील, खून, दरोडेखोरी, बलात्कार, विविध स्तरावरील अत्याचार, कमी होतील त्यादिवशी शिवजयंती ला उधाण येईल. राजे जिथे ही आहेत आपल्याला पाहत आहेत. आताची परिस्थिती पाहून ते काही खुश नाहीत. हे आपल्याला ही संमजते आहे.
परिस्थिती बदला स्थिती सुधारेल.
फुलांचे रांगोळीचे सडे पसरवू, आपल्या देवाला
पुरणपोळीचा नैवेद्य तयार करू , फुलांनी, दिव्यांनी गावं सजतील, सह्याद्रीच्या रांगा हिरव्या गार नटलेल्या असतील ……तिथून च घोडीवर स्वार होऊन राजे स्वतः येतील शिवजयंती साजरी करायला. तेंव्हा खऱ्या अर्थानं शिवजयंती साजरी करण्यात येईल.
तेंव्हा आपण म्हणून राजांना …..
“मुजरा घ्यावं राजं……”
सौ. रुपाली शिंदे
(भादवण ता. आजरा )
मुख्यसंपादक