“मन-तुरुंग”

का कुणास ठाऊक पण आज घोर प्रश्नांनी मस्तकात वाजविलेला शंखनिनाद उपरांत विदीर्ण झालेले मन आणि त्यातून निर्माण होणारी व्याकुळता एका तुरुंगात डांबून ठेवलेल्या कैद्यासारखी भासत आहे.

अतंर मनात चालू असलेली ही किलबिल म्हणजे जणूकाही सर्वांनी चहूबाजूंनी अपेक्षांचा भंडारा आपल्याच कपाळी लावावा आणि जबाबदारीची पालखी खांद्यावर वाहून मिरवणूक काढण्यात यावी याचा प्रत्यय येतोय.

आपल्यासाठी काय योग्य आहे आणि आपण काय केले पाहिजे याची जाणीव असून सुद्धा का आपण तेच करतो जे करतो आहे याचे उत्तर कुणाकडेच कसे मिळत नाही?

पण नवल आहे, याचे भान ही कुणाला राहिले नाही की मनी घोठलेल्या अनंत विचारांचा उद्वेक त्यामुळे काळजाच्या स्पंदनातून डगमगणारी अस्तित्त्वाची रेषा संपुष्टात येत आहे.

इतरांच्या अपेक्षांचा पतंग आकाशात उंच नेताना स्वतःच्या इच्छांचा दोरा हातातून निसटून चालाय याचा थांगपत्ताच कुणाला कसा काय लागत नाही?

तर एकीकडे समाज सुशिक्षित होतानाची उदाहरणे देताना विचार का अशिक्षित होत चालेत याच्याकडे मात्र कुणाचंच लक्ष जात नाही.

एका गोजिरवाण्या घराची किंमत मोजताना आयुष्याची शिदोरी गहान ठेवावी लागली पण त्यामुळे पोटाला काढलेल्या चिमट्यांच्या जखमांचा कुणालाचं कसा फरक पडत नाही?

हातातून वाळू निसटुन जावी तसे दिवसामागून दिवस तर वर्षामागून वर्षे सरत आहेत पण सर्वश्रेष्ठ बनण्याच्या लोभाची ससा-कासव शर्यत मात्र अजूनही संपली नाही.

वेळ निघून गेली की पश्चात्तापाचा काहीच फायदा नाही तरीही वेळ असताना धाडस करण्याची चेष्टा सुद्धा का कुणी करत नाही?

आयुष्याच्या प्रशालेत‌ हजेरीची यादी भरता भरता स्व:निष्कर्षाचा पाठ “मन-तुरुंग” होत चालाय याची जाणीव कुणालाच लागत नाही..!

 लेखक - रोहित उंडगे
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular