Homeक्राईमसायबर क्राईम : अदृश्य चेहरे

सायबर क्राईम : अदृश्य चेहरे

सायबर क्राईम ब्रँचच गुन्ह्यांचा तपास लावणे हे अतिशय जिकरीचे आणि चिकाटीचे काम असते आणि ते आपला सायबर विभाग कौशल्याने करतच असतो. पण ‘माणूस आयुष्यातून उठू शकतो’ इतकं गंभीर स्वरूप या गुन्ह्यांच आहे आणि म्हणूनच जनजागृती शिवाय याला पर्याय नाही

सायबर क्राईमची कांही उदाहरणे.

(०१)
कास्टिंग फ्रॉड :

Table of Contents

या प्रकारात मोठ-मोठ्या प्रोडक्शन हाऊसेसच्या नावाने, ‘तुमच्या मुलीला पिक्चर मध्ये काम देतो’ म्हणून करारही केले जातात व त्यानंतर फोटोशूट, ड्रेसेसचा खर्च इत्यादी नावाखाली लाखोंनी रक्कम उकळली जाते. या सर्व गोष्टी ऑनलाईन होतात आणि आरोपी कधीही तुमच्या समोर येत नाही.


(०२)
के.वाय.सी.फ्रॉड :

यात SMS मध्ये लिंक येते. बँकेचे KYC अपडेट करायचे आहे म्हणून सांगितले जाते. लिंकवर क्लिक केल्यावर डुप्लिकेट वेबसाईट उघडली जाऊन तुमचे सर्व बँक डिटेल्स घेतले जातात व त्यानंतर तुमच्या खात्यातून पैसे गायब होतात. बँकांचे व्यवहार हे म्हणूनच अधिकृत वेबसाईटवर किंवा प्रत्यक्ष बँकेत जाऊन करणे हे आवश्यक.


(०३)
ॲमेझॉन फ्रॉड :

तुम्हाला ‘दिवाळी धमाका’ ‘न्यू इयर धमाका’ या प्रकारच्या लॉटरीमध्ये “ॲमेझॉनवर” बक्षीस लागलय’ असा फोन येतो, पत्रही पाठवले जाते. फुकट मिळणारी दहा लाखाची कार कोणाला नको असते ,मग त्यांनी दिलेल्या साईटवर आपण ऑनलाइन जातोच. आणि तिथेच फसतो.


(०४)
OLX फ्रॉड :
यात OLX वर ऑनलाइन आपण ‘विकत घेत असलेली वस्तू’ अथवा ‘आपल्याला विकावयाची वस्तू’ या दोन्ही बाबतीत गुन्हे घडू शकतात.

बहुतांशी वेळा तुम्हाला संपर्क करणारी व्यक्ती ही स्वतःला सैनिकी क्षेत्रातील असल्याचे दर्शवते, जेणेकरून ती फसवणार नाही याचा आपल्याला विश्वास वाटतो. तशी खोटी सैनिकी ओळख पत्रेही दिली जातात. आपण बँक डिटेल्स शेअर करुन पैसे भरतो, पण वस्तू येत नाही. ‘काहीतरी गडबड झाली असावी’ असं म्हणून दिलगिरी व्यक्त करून समोरचा आरोपी QR कोड पाठवतो. आपण तो स्कॅन करतो आणि आपले अजूनच पैसे गायब होतात. वस्तू आपल्याला विकायची असेल तर समोरचा फोन करून ऑफर देतो. ‘अकाउंट खात्रीसाठी मी आधी रू. १ पाठवतो’ असं सांगून तो QR कोड पाठवतो. आपण स्कॅन करतो आणि खरंच रू. १ जमा झाल्यावर आपली खात्री पटून आपण त्याने पाठवलेला दुसरा कोडही स्कॅन करतो आणि आपल्या खात्यातले अजून पैसे गायब होतात. त्यामुळे अशा व्यवहारांमध्ये QR कोड वापरू नका आणि शक्यतोवर प्रत्यक्ष भेटून व्यवहार करा.


(०५)
न्यू इयर फ्रॉड :

वर्षअखेर जवळ येत चालली आहे. अशावेळी प्रसिद्ध उपहारगृहांच्या नावाने फेसबुकवर ‘एका थाळीवर एक फ्री’ अशाप्रकारच्या सवलतीच्या जाहिराती आपल्या पेजवर येत राहतात. त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला एका खोट्या फेसबुक पेजवर नेले जाते, तिथे फॉर्म भरून आपण आपले बँक डिटेल्स देतो. तुम्हाला ‘तुमची थाळी तयार आहे, बँकेचा OTP शेअर करा’ म्हणून मेसेज येतो. तुम्ही तो शेअर करता आणि..बुम! तुमच्या खात्यातले पैसे गायब! एका फ्री थाळीच्या नादात लोकांनी ५०-६० लाख रुपयेही गमावले आहेत.


(०६)
गुगल एडिट फ्रॉड :

यात बँकांचे, वाईन शॉपस्, पिझ्झा कंपन्यांचे ‘कस्टमर केअर नंबर’ एडिट करून (बदलून) त्यावरून तुम्हाला फोन केला जातो. त्यावरून तुमची वैयक्तिक माहिती, खात्याची माहिती घेतली जाते आणि बँकेचा ओटीपी मागवला जातो. वाईन किंवा पिझ्झाच्या खरेदीसाठी तुम्ही पैसेही भरता, पण डिलिव्हरी होत नाही. म्हणूनच कस्टमर केअर नंबर्स हे नेहमी अधिकृत साइटवर जाऊन पडताळून बघा आणि मगच व्यवहार करा.


(०७)
स्क्रीन शेअर फ्रॉड :

ज्यांना मोबाईल किंवा कम्प्युटर बाबत तांत्रिक ज्ञान नाही, विशेषतः वयस्कर व्यक्ती किंवा स्त्रिया, त्यांना यात फसवण्यात येते. ‘तुम्हाला हवा तो व्यवहार करण्यास मी मदत करतो’ असे सांगून तुमच्या कडून ‘स्क्रीन शेअर’ नावाचे ॲप डाऊनलोड करून तुमच्या कम्प्युटरचा अथवा मोबाईलचा ताबा समोरची व्यक्ती स्वतःकडे घेते. आणि त्यानंतर ती तुमच्या वैयक्तिक माहितीचा कसा आणि किती गैरवापर करू शकते, ते सांगू शकत नाही!


(०८)
इन्शुरन्स फ्रॉड :

याचे उदाहरण म्हणजे अगदी करोना काळातील ही घटना. चार-पाच वर्षापूर्वी रिटायर झालेले गृहस्थ, त्यांना मेलवर उत्तम रिटायरमेंट पॅकेज ऑफर करण्यात आले. त्यांनी तीन वर्षे नियमितपणे पैसेही भरले. वेगवेगळ्या अकाउंटवर पैसे भरण्यासाठी त्यांना सूचना मिळत गेल्या तरीही त्यांना संशय आला नाही. सायबर क्राईमच्या या गुन्हेगारांचे हे वैशिष्ट्यच आहे की त्यांचे ‘वाचा आणि भाषेवर’ जबरदस्त प्रभुत्व असते. दुर्देवाने कोरोना काळात या गृहस्थांचे निधन झाले. पत्नीने इन्शुरन्सच्या रकमेची मागणी केल्यावर पॉलिसी क्लोजरच्या नावाखाली तिच्याकडून अजून पैसे उकळून हि गुन्हेगार मंडळी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून गायब झाली. आपल्या खात्रीच्या इन्शुरन्स एजंट कडून किंवा कंपनी कडूननच पॉलिसी घ्या, ऑनलाइन कॉल्सवर भरवसा ठेवू नका.


(०९)
कस्टम गिफ्ट फ्रॉड :

यात स्त्रियाच जास्त फसल्या जातात, विशेष करून अविवाहित, एकल महिला. त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट वरुन त्या एकाकी आहेत याचा अंदाज घेतला जातो व ऑनलाइन मैत्रीचे जाळे फेकले जाते. थोडी मैत्री झाल्यावर ‘मी तुला एक गिफ्ट परदेशातून पाठवतोय’ म्हणून सांगितले जाते. स्त्री ‘नको- नको’ म्हणते पण सुखावते. मग तिला ‘कस्टम डिपार्टमेंट’ च्या नावावर कॉल येतो. ‘कस्टम्स ड्युटी भरा’ या बाबीवर कित्येक लाख मागितले जातात. परदेशातला मित्र सांगतो ,’मीच गिफ्ट पाठवली आहे. तू ड्युटी ऑनलाइन भर मी भारतात येतोच आहे.’ या बहुधा परदेशी गँग्स असतात. कुटुंबाच्या अपरोक्ष हे सगळे प्रकार, व्यवहार केले जात असल्याने महिला हातोहात फसवलीही जाते आणि ती पोलिसात तक्रारही करत नाही.


(१०)
मॅट्रिमोनियल फ्रॉड :
मॅट्रिमोनियल साईट वरुन वय वाढलेल्या एकल महिलांना सावज केले जाते. अनपेक्षितपणे एखाद्या देखण्या परदेशी स्थळाकडून विचारणा झालेली स्त्री हि मोहरते. मग मेलवर किंवा फोनवर वैयक्तिक गप्पा व्हायला लागतात. या गुन्हेगारांच्या ‘लव्ह स्क्रिप्टस्’ हि तयारच असतात. ‘माझ्या दिवंगत काकांनी त्यांची संपत्ती माझ्या नावावर केली आहे, मी चेक ने ते पैसे तुझ्या नावावर पाठवतोय’ असे ही व्यक्ती सांगते. स्त्रीला पुरेसे काही उमजायच्या आतच कस्टम्स मधून कॉल येतो

“तुमचा चेक आला आहे, हे टेररिस्ट फंडिंग नाही म्हणून सर्टिफिकेट द्या, एवढे पैसे कुठून आले ते सांगा !” असे म्हणून घाबरवून महिलेकडून पैसे उकळले जातात.


(११)
के.बी.सी. फ्राॅड :

तुम्हाला ‘कौन बनेगा करोडपती’ची लॉटरी लागलीये, या नंबरवर कॉल करा अशासारखे मेसेज येतात. मोहात पडलेली व्यक्ती फोन करते, बँक डीटेल्स देते, जीएसटी भरावा लागेल असेही सांगितले जाते. मग ओटीपी शेअर केला जातो आणि या प्रक्रियेत व्यक्तीचे अकाउंट रिकामे होते.


(१२)
परचेस फ्रॉड :

साड्या, दागिने, बॅग्स अत्यंत कमी किमतीत दाखवून खोट्या वेबसाईट बनविल्या जातात. महिला तिथे पैसे भरतात पण वस्तू घरी येत नाहीत.


(१३)
लोन फ्रॉड :

यात मोठमोठ्या फायनान्स कंपन्यांच्या नावांचा वापर केला जातो. पार मा. पंतप्रधानांचा फोटो वापरून वेबसाईट तयार करून ‘पंतप्रधान कर्ज निधी’ मधून कर्ज देण्याच्या जाहिरातीसुद्धा ही मंडळी करतात. कर्जाच्या रकमेच्या काही टक्के रक्कम तुमच्याकडून आधीच घेतली जाते आणि मंडळी गायब होतात.


(१४)
सेक्सटोर्शन :

तुमच्या सोशल मीडिया हालचालींवर लक्ष ठेवले जाते. पॉर्नसारख्या साइट्सवर तुमची हालचाल जाणवली तर तुम्हाला ‘लाइव्ह सेक्शुअल व्हिडिओ कॉल’ केले जातात, ‘चॅटस्’ हि येतात. यात ‘डिप फेक टेक्नॉलॉजीचा’ वापर केला जातो. तुम्ही प्रतिसाद दिलात तर तुमचाही लाइव्ह व्हिडिओ रेकाॅर्ड होतो. पुढे धमक्या आणि ब्लॅकमेल यांचे सत्र सुरू होते आणि लाखो रुपये उकळले जातात. हेच व्हिडीओ दुसऱ्या गँग्सना दिले जातात जे तुम्हाला ‘पोलिस’/ ‘सीबीआय’ या नावाने फोन करून परत पैसे उकळतात.


(१५)
फेक फेसबुक प्रोफाईल :

तुमच्याच फेसबुक प्रोफाईल वरील माहिती घेऊन दुसरे प्रोफाइल तयार केले जाते आणि त्यावरून तुमच्या मित्र मंडळींना पैशाची मागणी केली जाते.


(१६)

सोशल मिडियावरील मुलींचे फोटो आणि व्हिडिओ मॉर्फ करून पॉर्नसाईटवर टाकणारी मोठी साखळीच आहे. कित्येक अजाण मुलीनी अशा परिस्थितीत घाबरून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आपले अकाऊंट वैयक्तिक ठेवणे आणि अनोळखी व्यक्तींना अकांउटमधे प्रवेश न देणे हाच यावर उपाय आहे.


(१७)
मायनर गर्ल्स फ्रॉड :

हा एक भयंकर प्रकार आहे. पालकांच्या नकळत कधीकधी अल्पवयीन मुली इन्स्टाग्रामवर आपण १८ वर्षावरील असल्याचे दाखवून अकाऊंट उघडतात. या मुलींना हेरून एखाद्या मुलीच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. मैत्री झाल्यावर ‘माझ्याकडे स्तनांचा आकार वाढवायचे औषध आहे. पण त्यासाठी आधी तुझी साईज बघावी लागेल’ असे सांगून तिच्या कडून नग्न व्हिडीओची मागणी केली जाते. तो दिला कि मग ब्लॅकमेलिंग सुरू होतं. घाबरलेल्या मुलीकडून तिच्या अकाउंटचा ताबा घेऊन तिच्या मित्र यादीतील इतर अशाच लहान मुलींना या मुलीच्या नावाने संपर्क केला जातो व असेच व्हिडिओज घेतले जातात. अशा गुन्हेगाराकडे नुकतेच ७०० हून अधिक अजाण मुलींचे नग्न व्हिडिओ पोलिसांना सापडले.


हे सगळंच खूप धक्कादायक व सुन्न करणारे आहे. या सगळ्या प्रकारात न घाबरता पालकांनी आणि पीडितांनी पुढे येऊन पोलिसांत तक्रारी नोंदवणे गरजेचे आहे.

आपली सुरक्षितता ही आपल्याच हातात असते,यास्तव या ‘सायबर युगातील’ आपले प्रत्येक पाऊल सावधपणे टाकू या आणि सजग राहूया.

Be Aware, Be Cyber Smart & Stay Safe…

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular