Homeवैशिष्ट्येहसले मनी चांदणे

हसले मनी चांदणे

हसले मनी चांदणे
अमित आणि सई ची सकाळ घड्याळ्याच्या काट्यावर सुरु होते आणि घड्याळ्याच्या काट्यावर संपते.
त्यांचीच काय….. अनेक मध्यमवर्गीयांची हीच कथा आहे.
अमितच्या लहानपणी तो दादरला एका चाळीत रहात होता आणि सई गिरगावच्या एका चाळीत!

अमित आणि साईचं लग्न ठरल्यानंतर बाबांनी घराला पोटमाळा करून घेतला. त्या चाळीत सगळीच कुंचबणा व्हायची. सगळे काही सार्वजनिक असायचे. तिथल्या सार्वजनिक नळासारखेच….
जरा म्हणून एकांत नाही. अमित खरं तर चाळीला वैतागला होता. दोन्ही मुलांच्या जन्मानंतर मात्र चाळीतली अपुरी जागा आणखीच अपुरी वाटू लागली.
शेवटी आईबाबांना समजावले, आणि दोघांनी भरीला कर्ज काढून डोंबिवलीला एक टू बीएचके फ्लॅट घेतला. नवीन घर पाहून आईबाबाही खूश झाले. सईला पण जरा ऐसपैस घर बरे वाटले. त्यात एकाच घरात दोन बाथरुम्स आणि टॉयलेट बघून तर सगळ्यांनाच बरे वाटले.
या सगळ्या आनंदात त्यांनी इतर बारीक सारीक गोष्टींचा विचारच केला नाही. घर मोठे होते पण तेव्हापासून त्यांची धावपळ सुरू झाली. सकाळी सगळे आवरून मुलांना शाळेत पाठवून स्वतःची तयारी करून बाहेर पडायचे म्हणजे सईला पहाटे पाचच्या ठोक्याला उठावे लागायचे. आधी अमितला ऑफिसला जायला पंधरा मिनिटे लागायची; आता तब्बल पावणेदोन तास लागायला लागले. सईला सुद्धा चेंबूरला जायला सव्वा दीड तास लागायचाच. त्यात कुर्ल्याला ट्रेन बदलायला लागायची.
दिवसभर काम आणि प्रवास करून दोघेही अगदी थकून जायचे.
त्यात दोन दोन‌ बाथरुम्स असली तरीही नळ चोवीस तास पण त्या नळाला पाणी मात्र चारच तास अशी अवस्था होती. घरही स्टेशनपासून पंधरा मिनिटे अंतरावर होते. डोंबिवलीत रस्ते कमी आणि खड्डे जास्त अशी अवस्था! सुरुवातीला दोघे खूप वैतागयचो. कुठून दुर्बुद्धी झाली आणि आपण इथे आलो असे वाटायचे . जवळपास घर घ्यायला हवे होते असेही वाटत राहायचे. पण माणसाच्या शरीराला आणि मनाला कशाचीही सवय पटकन होते म्हणतात ते काही खोटं नाही . अमित सईला आता डोंबिवलीची चांगलीच सवय झाली.
आईबाबांना मात्र छान समवयस्क सोबती मिळाले होते. त्यांच्यासारखे अनेकजण दादर गिरगाव सोडून डोंबिवलीत स्थाईक झालेले होते.
त्यांचा मस्त ग्रुप जमला.
आता त्यांना इथे येऊन जवळपास दहा वर्षे झाली.
कर्जाचे सगळे हप्ते फिटले. मुलेही मोठी झाली.
इतकी वर्षे मान मोडून काम केले. फारशी हौस मौजही केली नाही. अमितला आणि सईला दोघानाही आपापल्या कमाच्य ठिकाणी प्रमोशन मिळालं. चार पैसे हातात खेळू लागले. आताशा अमितच्यातला रसिक नवरा डोके वर काढू लागला. पण सई मात्र आई आणि सुनेच्या भुमिकेतून‌ बाहेरच पडायला तयार नाही. स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते हे अगदी सोदाहरण स्पष्ट करायचा हिने वसाच घेतलाय असं तो मनातल्या मनात म्हणायचा.
एखादा सिनेमा जरी बघायचा म्हटले तरी मुले अभ्यास करणार नाहीत,आईबाबा काय म्हणतील ,
अलाणेफलाणे कितीतरी किंतूपरंतू सुरू व्हायचे. तरीही चिकाटी दाखवून त्याने तिला एखाद्या सिनेमाला नेलेच तर ती शरीराने त्याच्याबरोबर असायची पण मन मात्र घरीच विसरून यायची. तरीही तो विक्रमादित्यासारखा त्याचा हट्ट सोडत नसे.

पण त्याच्या या चिकाटीला म्हणा किंवा तपश्चर्येला म्हणा फळ मिळू लागण्याची शक्यता निर्माण झाली.
त्याच काय झालं
दोनेक वर्षांपूर्वी सईने फेसबुक जॉईन केले. तिथे सुरूवातीच्या उत्साहात अनेक मित्रमैत्रिणींना लिस्ट मध्ये add केले. आताशा तिचा ट्रेन मधला वेळ फेसबुकवर फेरफटका मारण्यात जाऊ लागला.

तिथले इतरांचे कुठले कुठले आणि कोणत्या कोणत्या वेषातले‌ फोटो पाहून आणि एकंदरीतच अघळपघळ प्रेमळपणा पाहून‌‌ आपले आयुष्य तिला एकदमच वरणभात भेंडीच्या भाजी सारखे वाटू लागले.
आजकाल आम्ही साधी जेवणानंतर ची शतपावली करायला‌ गेलो तरी walking in a moonlight असले काहीतरी लिहून त्याबरोबरच दोघांचा एखादा सेल्फी काढायला ती विसरत नसे.

आपणही इतरांसारखे लाईफ एंजॉय करायचेच असे तिला आताशा वाटू लागले होते. घरात एखादा सण असला की गोडाधोडाचे पदार्थ पानात पडायच्या आधी फेसबुकच्या भिंतीवर विराजमान व्हायला लागले. साधे साधे दिवसही इव्हेंट व्हावे ही तिची मानसिक गरज होऊ लागली आहे.

आणि अमितने नेमका तिच्या याच मनस्थितीचा फायदा करून घ्यायचे ठरवले.

एक दिवस पेपर वाचताना कोणा एका ट्रॅव्हल्स कंपनीची जाहिरात त्याने वाचली . त्यांनी कोजागिरीच्या निमित्ताने दोन दिवस आणि एक रात्रीची ट्रीप अरेंज केलेली होती.या वर्षी अनायसे कोजागिरी शनिवारी होती त्यामुळे सुट्टीचा प्रश्न नव्हता. तशा या पिकनिक नावालाच दोन दिवसांच्या आहेत असे म्हणायचे. आपल्याकडे कसे दीड दिवसाचे गणपती असतात. आले कधी आणि गेले कधी कळतच नाही तसेच काहीसे या ट्रीपचे होणार होते.
पण तरीही कोजागिरीच्या चांदण्या रात्री बायकोच्या हातात हात घालून समुद्र किनाऱ्यावर फिरायला मिळणार… छानपैकी तंबूत रहायला मिळणार…… या विचाराने तो हवेत… नाही नाही समुद्राच्या लाटांवर तरंगायला लागला होता.

सिनेमातल्या किंवा पेज थ्रीमधल्या बायका कशा लांबलचक गाऊन आणि हिल्सच्या सॅंडल घालून अलगद तरंगल्या प्रमाणे चालतात आणि त्यांच्या बरोबर असलेले पुरुष कसे एकदम स्मार्ट पणे त्यांचा हात धरून साथ देतात तसेच त्या दोघांनी पण कधीतरी करावे असे त्याचे एक स्वप्न होते.

या कोजागिरीच्या वेळी ट्रीपला जायचे. दोघांनी असे कपडे घालायचे आणि समुद्रकिनाऱ्यावर फिरायचे असे त्याने मनातल्या मनात ठरवले.

आता घरात हा ट्रीपचा विषय कसा काढायचा हा एक मोठा यक्षप्रश्न होता. आईबाबा नाही म्हणाले नसते पण…विचारायचे कसे हा प्रश्न होताच आणि असा थिल्लरपणा करायचा तर लोक काय म्हणतील असेही वाटत होते.पण कधीतरी आपले नशीब बलवत्तर निघते. सगळे ग्रहतारे एकत्रितपणे चांगल्या स्थानावर जाऊन शिस्तीत पटापट बसतात. तसे त्याचे झाले .
संध्याकाळी घरी आला तर आई बाबांची चर्चा सुरू होती . कोजागिरीच्या दिवशी सकाळी ते आणि त्यांचा ग्रुप कुठेतरी देवदर्शनाला जाणार होता. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परतणार होते.
आणि मुले साईच्या माहेरच्या सोसायटी ग्रुपबरोबर विकेंडला ट्रेकिंग साठी जाणार होती.
आईबाबांनी ‘तुम्ही काय करणार” असे त्याला विचारले तेव्हा. “आम्ही घरीच थांबू.घरात किती कामे बाकी आहेत ती करू” असे मोठ्या आढ्यतेने उत्तर दिलं .सईचा बिचारीचा चेहरा अगदीच पडला होता. पण अमितला मात्र आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. त्याने उत्साहाने दोघांचे बुकिंग करुन पण टाकले.
तिच्या अपरोक्ष दोघांसाठी नवीन ड्रेस खरेदी केले. अगदी आजच्या ट्रेंड प्रमाणे आणि मॅचिंग…….

आता तो कोजागिरीची वाट पहात होता.
सईची धुसफूस, आदळाआपट सुरू होती. “माझं मेलीचं नशीबच असं वाईट आहे.जरा म्हणून हौसमौज नाही. ” अशी वाक्य अमितला ऐकू जातील इतपत हळू आवाजात ती पुटपटत होती.
कोजागिरीच्या आदल्या दिवशी “मी पण उद्या मुलांबरोबर माहेरी जाते ना….. काही नाही तर आईला तरी भेटते. मुले जातील पिकनिकला!” असे जेव्हा ती म्हणाली तेव्हा मग नाईलाजाने तिला अमितने प्लॅन सांगितला.

कोजागिरीच्या दिवशी घरात एकदम लगबग सुरू होती. सकाळी तो मुलांना सईच्या माहेरी सोडून आला. आईबाबा पण आठच्या सुमारास निघाले .
हे दोघेही पटापट आवरून‌ तयार झाले.

आज सईचा मूड काही वेगळाच होता. अमितला पंधरा वर्षांपूर्वीचे दिवस आठवले. अगदी पंचवीस वर्षांचा तरुण झाल्यासारखे वाटत होते. त्यानं तिला दोघांसाठी केलेली खरेदी दाखवली. नवीन वनपीस ड्रेस पाहून तर सई अगदी हरखूनच गेली. अगदी लग्गेच ती तो ड्रेस घालून‌ आली.
एखाद मिनिटासाठी अमितला वाटले……कोजागिरीचा चंद्रच इथे समोर आलाय! कशाला कुठे जायचे त्याला शोधायला ! अगदी तिला सांगावे वाटले की घरीच करू कोजागिरी. पण कधी नव्हे ते दोघांना मोकळेपणाने फिरायला मिळतेय तर जाऊयात असा विचार करून दोघे निघाले.

ट्रॅव्हल एजन्सीने एका मस्त एसी बसची सोय केली होती.साधारण त्यांच्याच वयाची जोडपी होती.
तिथल्या टूर मॅनेजरने सांगितले की एकूण आठ बसेस निघणार होत्या काही बसेस आधीच निघाल्या होत्या. बस सुरू झाल्या झाल्या गाण्याच्या भेंड्या,डंब शराडस् सारखे गेम्स घेऊन टूर मॅनेजर मुलांनी वातावरण एकदम रिचार्ज करून टाकले. हे दोघेही खूप एन्जॉय करत होते.
दोनेक तासात सगळी अलिबाग जवळच्या एका गावातल्या समुद्रकिनाऱ्यावर पोहोचली. हे दोन तास कसे गेले कळले देखील नाही.

तशी समुद्रकिनाऱ्यावर बरीच गर्दी होती पण छोट्या छोट्या तंबूवजा रुम्स होत्या. काहींनी हॉटेल रुम्स बुक केल्या होत्या. अमितने मात्र एक तंबुच बुक केला होता.
दोघे खूप खुश होते. एकदम सातवे आसमांन पर म्हणतात ना तसे.

टूर लीडर ने सगळ्यांना ठीक साडेसात वाजता तयार होऊन समुद्र किनाऱ्याजवळ मोकळ्या जागी बोलावले होते.
उत्तम सोय होती. एक छोटे स्टेज बांधले होते.समोर तीनेकशे खुर्च्या मांडलेल्या होत्या.
आज तयार होऊन बाहेर यायला सईने जरा जास्तच वेळ लावला.हो आणि एक ….. इथे आल्यापासून ती असंख्य फोटो घेत होती.त्यातही बराच वेळ गेला. आज तिला कशालाच अडवायचे नाही हे अमितने आधीच ठरवले होते. पण या उशिरा मुळे झाले काय की त्यांना सुरूवातीच्या काही कार्यक्रमास मुकावे लागले.
टूर मॅनेजर आणि त्यांची टीम अनेक छोटया स्पर्धा घेत होते.
हे दोघे तिथे पोहोचले तेव्हा सिनियर सिटीझन्स साठी कपल डान्स स्पर्धा सुरू होती. सगळेच आजी आजोबा नाचताना अगदी गोड दिसत होते.

प्रत्येकाने कोणत्यातरी कार्यक्रमात भाग घ्यावा या बद्दल टूर वाले आग्रही होते. अमितला काय हुक्की आली माहित नाही. पण त्याने सईला युगुल गीत स्पर्धेत मध्ये भाग घ्यायला तयार केले. या आधी दोघांनी एकत्र गाणी म्हटली होती. पण इतक्या लोकांसमोर नाही. पाठीमागे जाऊन त्यांनी एखाद दोन वेळा प्रॅक्टीस केली. खरंतर खूप धडधडत होते पण नाहीतरी अगदी चुकलो तरी इथे त्यांना कोण ओळखणार होते? मग
घेतले देवाचे नाव आणि गेले स्टेजवर…
छान झाले गाणे. मजा आली.
तासाभरात कार्यक्रम संपला.

जेवणानंतर रात्री बारापर्यंत मोकळा वेळ होता आणि मग बक्षीस समारंभ !!
दोघे मस्त समुद्रावर फिरले. खूप गप्पा मारल्या. किती दिवसात त्यांना असा निवांतपणा मिळाला नव्हता. मूड एकदम फ्रेश झाला. बाराच्या सुमारास बक्षीस समारंभ होता. पण हे दोघे गप्पांच्या नादात विसरूनच गेले. स्पीकर वरून पुन्हा पुन्हा काळे आडनाव ऐकले म्हणून जवळपास धावतच स्टेज जवळ पोहोचले.
बघतात तर काय आज दोन नाही चार काळे तिथे हजर होते!!
आईबाबा आणि हे दोघे!! आईबाबांना पटकन ओळखणे कठीण होते! कारण नेहमी अंबाडा आणि साडीत असणारी आई चक्क केस मोकळे आणि सलवार कमीज मध्ये होती आणि बाबा पण एकदम कलरफूल टी शर्ट मध्ये!! त्या दोघांना डान्समध्ये बक्षीस मिळाले होते आणि अमित सईला गाण्यांमध्ये .पण बक्षीसे मिळून सुद्धा चौघांचे चेहरे चोरी करताना रंगे हात पकडल्यासारखे झाले होते. सईला तर मिस्टर इंडियातल्या अनिल कपूर प्रमाणे गायब व्हावे असे फारच वाटत होते..

चौघेही स्टेजवरून उतरले. एकमेकांना पहात नुसतेच उभे होते. बाबा अचानक हसायलाच लागले. “काय रे झाली का घरची कामं??”
आणि आमचे पण देवदर्शन झाले बरं का!!!”
“तुला हा ड्रेस बाकी मस्तच दिसतोय !” आई म्हणाली.
“आई बाबा तुम्हीपण एकदम यंग दिसताय!!” अमितहसत हसत म्हणाला.

चौघेही समुद्रकिनाऱ्यावर जाऊन बसले. आकाशात सुंदर पूर्णचंद्र दिसत होता. समुद्रही शांतावला होता. सई तिच्या सुरेल आवाजात गाणे गुणगुणत होती.
पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब दिसत होते.

आपण मध्यमवर्गीय कोण काय म्हणेल याला फार घाबरतो नाही. यात किती साध्या साध्या आनंदाला मुकतो.
आज या चौघांनीही ठरवले यापुढे जेव्हा जमेल जसे जमेल तसा जगण्याचा आनंद भरभरून लुटायचा. कोणी काही म्हणत नाही आणि कोणी काही म्हटले तर त्यांना ते ऐकूच येणार नाही.
आजची कोजागिरी पौर्णिमा त्यांच्या कायम लक्षात राहील.

  • – समिधा गांधी
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular