रयतेचा राजा, रयतेला आईप्रमाणे प्रेम देणारा राजा.
सद्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने निरर्थक बाबींबाबत फक्त वाद घडवून आणणाऱ्या विचारसरणींपासून सावधानतेसाठी खऱ्या विचारसरणींवर संवाद होणे गरजेचे.
✍🏻 – मनोज प्रल्हाद गावनेर
मंगरूळ चवाळा, ता. नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती
इतरांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी असे काय वेगळे केले होते ज्यामुळे आपण लोकशाहित सुद्धा एका राजाची जयंती साजरी करतो? या प्रश्नाचा मागोवा घेताना इतिहासाशी इमान ठेवून उत्तर शोधण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहून शिवजयंती साजरी करावी.
१८६९ ला फुलेंनी दुर्लक्षित असलेल्या शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला व सर्वात पहिली शिवजयंती महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८७० ला ‘कुळवाडीभूषण बहुजन प्रतिपालक’ असे म्हणत पोवाडा गाऊन साजरी केली होती. ही झाली शिवजयंती सुरू झाल्याची पार्श्वभूमी. पण त्यावेळी शिवरायांनी अशी कोणती वेगळी किमया केली होती ज्यामुळे रयतेला ते आपले राजे वाटायचे. शिवाजींचा इतिहास वाचून आपल्याला कळते कि, आतापर्यंत होऊन गेलेल्या सत्ताधाऱ्यांनी जे करायला पाहिजे होते पण केले नाही तेच शिवाजी राजांनी प्रामाणिकपणे केले होते, करून दाखवले होते. हे सर्व करताना शिवाजींमधील बुद्धिचातुर्य, दूरदृष्टी, पराक्रम, माणसे जमविण्याची, टिकवण्याची व निष्ठा बाणवण्याची इत्यादी अनेक कला, गुणविशेष व चारित्र्यसंपन्नता याकडे दुर्लक्ष करता कामा नये. या सर्व कला गुणांचा, स्वभावाचा शिवचरित्रातील वेगवेगळ्या प्रसंगातून आपणास प्रत्यय येतो. आजपर्यंत शिवाजी महाराजांवर अनेक लिखाण झाले व होत आहेत पण महाराजांची प्रतिमा काही जणांत जशी बनायला पाहिजे तशी सर्वांमध्ये कदाचित बनू शकली नाही. यासाठी अनेक संशोधक, पुरोगामी अभ्यासक यांनी प्रयत्न केले व सुरू आहेत. आपल्याला कोणत्याही गोष्टीची सत्यता पडताळायची असल्यास अनेक प्रश्न डोक्यात ठेवून तर्कपूर्ण विचार करत मागोवा घ्यावा लागेल तेव्हा कदाचित आपण खरं आणि खोटं यातील फरक ओळखू शकणार. इतके वर्ष उलटून सुद्धा आपण अगदी मनापासून तन मन धनाने जल्लोषात शिवजयंती साजरी करतो.
छत्रपति शिवाजी महाराज हे वारसा हक्काने राजा नव्हते बनले. कारण त्यांचे वडिल शहाजीराजे एक सरदार होते आणि त्यांना पुण्याची जहागिरी मिळाली होती. पण शहाजीराजेंना आपले स्वतंत्र आणि रयतेच्या हिताचे राज्य असण्याची महत्त्वाकांक्षा होती आणि ते उभारण्यासाठी त्यांनी शिवबांना मार्गदर्शन व मदत केली. त्यांनी बाल शिवबांना माँसाहेब जिजाऊंच्या मार्गदर्शनामध्ये पुण्याची जहागिरी दिली. सर्वप्रथम जिजाऊंनी शेतकऱ्यांचे राज्य व्हावे असा संदेश देण्यासाठी शापित समजल्या जाणाऱ्या जमिनीला सोन्याच्या नांगराने बाल शिवबाच्या हातून सामान्यजन समवेत नांगरणी केली आणि लोकांच्या डोक्यातील अंधश्रद्धा मिटवून समतेसाठी एक होण्याचे आवाहन केले. शिवबांना घडविण्यामध्ये राजमाता जिजाऊंच्या संस्कारांचा, शिस्तीचा, मुत्सद्दीपणाचा सर्वात मोठा वाटा आहे. जिजाऊंच्या स्वराज्य स्थापनेच्या संकल्पनेला सत्यात उतरविण्यासाठी शिवाबांनी प्रत्यक्ष काम करत असताना अनेक निष्ठावान मावळे मिळवले व त्यांच्या मनात उदात्त हेतू प्राप्त करण्यासाठीची लढाई ही आपली सर्वांची आहे ही भावना उद्युक्त केली. ज्यामुळे सामान्यजनांना हे कार्य आपल्याठीच होत असल्याचे जाणवले.
सिद्दी जोहर ने पन्हाळगडाला वेढा दिला होता तेव्हा अनेक महिने उलटले तरि वेढा सैल पडेना. नेताजी पालकर व सिद्दी हिलाल ने वेढा फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. युक्ति म्हणून शिवा न्हावी ने शिवाजींचा वेष धारण केला व वेढ्यातून किल्ल्याच्या बाहेर पडला. तेव्हा संपूर्ण सैन्याचे लक्ष तिकडे जाऊन शिवा न्हावीलाच शिवाजी समजून पाठलाग केला. तेवढ्या वेळेत शिवाजी लक्ष चुकवून विशाळगडावर जाण्यासाठी निघाले होते. सिद्दी जोहरच्या लक्षात येताच तो महाराजांच्या मागे सुसाट निघाला पण वाटेत जीवाचे बलिदान देऊन राजांना वाचविण्यासाठी मूठभर मावळ्यांसह बाजीप्रभू देशपांडे घोडखिंड लढविण्यासाठी उभे ठाकले होते. शिवा न्हावी, बाजीप्रभू देशपांडे व इतिहासातही नोंद नसलेले काहि मावळे यांना जीव जाणार माहिती असतानाही प्राणपणाने लढले. यामागे त्यांचा लोभ नव्हता, मर्दुमकी गाजवून इनाम मिळवण्यासाठी त्यांचे बलिदान नव्हते किंवा कुणीतरि भडकून देत आहेत म्हणून कुठल्यातरि विवादा साठी त्यांचे बलिदान नव्हते.
औरंगजेबाचा शूर सरदार मिर्झाराजे जयसिंह याच्याशी शिवबांनी तह केला व आग्रा येथे औरंगजेबाच्या दरबारात गेले पण तिथे अपमान झाला म्हणून दरबार सोडू पाहणाऱ्या शिवबांना बाळ संभाजींसमवेत औरंगजेबाने नजरकैदेत ठेवले. यावेळी सुद्धा युक्ति ने महाराज पेटाऱ्यांमधून बाहेर निघण्यामध्ये यशस्वी झाले. सैनिकांना पटकन लक्षात येऊ नये व राजांना दूरवर जाण्यास सवड मिळावी म्हणून शिवरायांच्या जागी त्यांचा वेष धारण करून हिरोजी फर्जंद बिछान्यावर झोपला होता व मदारी मेहतर पाय चेपत बसला होता. प्राण जाण्याची भिती असताना सुद्धा असे कार्य केले म्हणून त्याची दखल इतिहास नक्किच घेते. फक्त बलिदान देण्यामागचा हेतू हा उदात्त व जनसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू पाहणारा हवा. नाहि तर सद्या इस्टेटीच्या लोभापाई किंवा ज्या गोष्टिंचा सामान्यांच्या जीवनात काहिच फरक पडत नाहि अशा गोष्टिसाठी लढतात – मरतात पण अशा गोष्टींची इतिहासात नोंद होत नाहि.
सैनिकांमध्ये व रयतेमध्ये शिवाजींबद्दल अशी भावना निर्माण झाली होती ज्यामुळे शिवाजींचे कार्य रयतेला आपले कार्य वाटायचे व प्रसंगी त्यासाठी प्राणही न्योछावर करण्याची मानसिकता असायची. असे करण्यामागे अनेक कारणे आहेत. रयतेची लूट करण्यातच आपली धन्यता मानणाऱ्या व त्यामार्फत जीवन ऐशोआरामात जगणाऱ्या जहागिरदार, वतनदार व एकूणच गावगाड्या संबंधी रयतेच्या हिताचे बदल शिवाजी महाराजांनी केले. प्रत्येकाची जमीन मोजून देऊन ठरल्याप्रमाणेच वसूली करण्याचे आदेश दिले. रयतेला तक्रार करण्याची व निष्पक्ष न्यायदानाची हमी मिळू लागली. त्यामुळे रयत व राजा यांचा थेट संबंध येऊन माजुरड्या वतनदारांमध्ये एक प्रकारे जरब निर्माण झाला. इतर राजांचा राज्यकारभार होता तेव्हा सैन्य शेतातील पिकांचा विचार न करता उभ्या पिकातूनच घोडे, फौजफाट्यासह जायचे पण शिवबांनी रयतेच्या उभ्या पिकातून न जाण्याचे आदेश सैन्याला दिले होते. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये व जे लागेल ते पैसे देऊन मर्जीने घ्यावे, रयतेला त्रास होता कामा नये. आरमार उभारणीसाठी कुणाच्या शेतातील जिर्ण झालेले झाडच तोडायचे असा आदेश देताना तेही परवानगीने द्रव्य देऊनच तोडावे असा राजेंचा आदेश असायचा. रयतेला हे सर्व नविनच होतं. शेती, शेतकरी व सामान्य रयत यांची बारिक सारिक गोष्टिंपासून ते त्यांच्या हिताचे असणारे दूरगामी मोठे बदल घडविणारे राजेशाहीतील लोकशाहिसाठी आदर्श असणारे शिवाजीराजे होते. पण सद्याचे लोकशाहिमधील सरकार स्वतःच्या आडमुठेपणामुळे अडून बसलेले असल्याने हे लोकशाहिला मारक सरकार तर नाही ना? असे चित्र दिसत आहे. केंद्र सरकारचे तिन कृषी कायदे फक्त भांडवलदारांच्याच हिताचे असल्याने शेतकऱ्यांना नको होते म्हणून लाखोंच्या संख्येने विरोध दर्शविण्यात आला. शेतकऱ्यांना खलिस्तानी, देशद्रोही म्हणत व हिंसा घडवून आणून बदनाम करण्यात आले परंतु शेतकरी आपल्या मागण्यांपासून डगमगले नाही आणि शेवटपर्यंत भूमिका ठाम घेतली म्हणून सरकारला कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घ्यावा लागला. तसेच सरकारने आपल्या देशाची मालमत्ता विकणे ही देशासाठी धोक्याची घंटा अाहे. त्याचप्रमाणे सरकार हे नेहमीच धर्मनिरपेक्ष असणे गरजेचे असते पण देशातील सत्तेत येणारे पक्ष निवडणूक लढवताना धर्माचा आधार घेतात. प्रसंगी निवडून आल्यानंतरही सामान्य लोकांच्या डोळ्यांवर धर्माची पट्टी बांधून त्यांचे पुरोगामी व देशाच्या विकासासाठी आवश्यक विचार नपुंसक केले जातात. राजकीय भावनेतून धर्मा धर्मात भांडणे लावली जातात. त्यांच्या त्यांच्या धर्मातील पुढाऱ्यांचे राजकीय नेतृत्व तयार होऊन त्यांचे फावते पण त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरणारी जनताच नेहमी पिचली जाते. म्हणून अशा गोष्टींमध्ये कुणी भडकवित असल्यास आधी त्यांना त्यांच्या परिवारातील सदस्यांना यामध्ये भाग घेण्यास सांगा, यामुळे कदाचीत निष्कर्ष लागेल. परंतु सामान्यांचे मूलभूत अधिकार हिसकावून घेणाऱ्या निर्णयाविरोधात व त्यांचे हक्क मिळवण्यासाठी कुणाचीही वाट न बघता जितके सोबत येत असतील तितक्यांसहच लढा देणे म्हणजे उदात्त हेतूने कार्य करणे होय. देशविघातक, अन्यायकारक निर्णयाविरोधात शेतकरी आंदोलनाप्रमाणे ठाम भूमिका घेऊन विरोध दर्शविणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. सरकार मधील व्यक्ति विशेषांनी शिवरायांकडून शासनव्यवस्था कुणासाठी असते? व कशासाठी असते? हा मुख्य धडा घेऊन केवळ राजकारणीय दृष्टिकोनातून शिवरायांकडे न बघता त्यांच्या स्वराज्याची प्रतिकृती करून दाखवावी. शिवरायांनी त्यावेळी शेतकरी, रयत यांच्यासाठी काय काय केले होते? आणि त्यावरून शिवाजी महाराज आता असते तर काय केले असते? या प्रश्नांचे उत्तर मिळविण्यासाठी आधी शिवरायांना समजून घेणे महत्त्वाचे आहे. मग या प्रश्नाचे ज्याचे त्याला उत्तर मिळवणे कठिण जाणार नाही.
शिवाजींच्या स्वभावातील आणखी एक महत्त्वाचा गुणविशेष म्हणजे त्यांचा स्त्रियांविषयी चा दृष्टिकोन. राजेशाहिमध्ये गरीब स्त्रिच्या अब्रुला किंमत नव्हती, स्त्रिला फक्त उपभोग्य वस्तूच समजले जायचे. रांझ्याच्या पाटलाने आपल्या पाटीलकीचा आव आणत अशाच एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीची अब्रु लुटली म्हणून राजांनी वस्तुस्थिती जाणून घेऊन विलंब न करता हात पाय तोडायची शिक्षा फर्मावली. रयतेसाठी हे नविनच वाटले, बदल जाणवू लागला.
आणखी एक घटना आहे, १६७८ मध्ये सकुजी गायकवाड या शिवरायांच्या सरदार ने बेळवाडीला जिंकण्यासाठी किल्ल्याला वेढा दिला. किल्लेदार सावित्री देसाई नावाची एक स्त्रि होती. तब्बल महिनाभर तिने लढा दिला शेवटी हरली. पण शत्रू भावनेच्या उन्मादात सकुजी ने त्या स्त्रि वर बलात्कार केला. शिवाजींच्या कानी हि गोष्ट पडताच त्यांनी तात्काळ सकुजीचे डोळे काढण्याची शिक्षा देऊन आयुष्यभरासाठी तुरूंगात डांबले. शत्रू असली तरि व कोणत्याही धर्मातील स्त्रियांचा सन्मान करण्यात यावा अशी सक्त ताकिद राजांनी दिली होती. पण सद्या वर्तमानात आपल्या वतनदारांच्या दुष्कृत्यांवर पांघरूण घालण्याचे, त्यांना पाठिशी घालण्याचे काम आपल्याला उघड्या डोळ्याने बघावे लागत आहे. हाथरस ची घटना असो कि कठुआ ची असो, कि महाराष्ट्रातील एखादी घटना असो, शिवाजी महाराजांचे नाव घेणाऱ्यांना शिवाजींचे रूप माहिती नाहि का? कि फक्त राजांचा वापर आपल्या सोईपुरता, फायद्यापुरता व त्यांच्या नावाने धर्मांधता पसरविण्यापुरताच करायचा का? असे प्रश्न पडणे व विचारणे साहजिक आहे. महाराजांसमोर कल्याणच्या सुभेदाराच्या सुंदर सुनेला सैनिकांनी हजर केले तेव्हा त्यांनी मातेचा दर्जा देऊन सन्मान केला. यावरून महाराजांचा चारित्र्यसंपन्नता व सौंदर्या संबंधीचा निरोगी दृष्टिकोन स्पष्ट होतो. शिवरायांना मानणाऱ्या आजच्या शिवभक्तांनी शिवरायांपासून हे घ्यावे, यासाठी आठवावे.
इतर राजांच्या सैन्याला लढाई हा व्यवसायच असायचा पण राजेंनी शेतकरी, कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या शेतकऱ्यांना सैनिक बनवले होते. ज्यांचा शेतीशी जिवंत संबंध असतो ते लुटारू होत नाही. म्हणून शेती, शेतकरी, लेकी- सुनांचा आदर करणारे सैनिक म्हणून ओळख निर्माण झाली होती. पण सद्या देशात लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना देशद्रोही म्हटल्या जाते, हे केवढे मोठे दुर्दैव आहे. शिवाजींचे सैन्य शेती करायचे व गरज पडल्यास मोहिमेवर जायचे. लढाईचा उद्देश लूट करणे नसून लूट थांबवणे हा होता. सूरतेची परकीय लूट करणे ही त्यावेळी गरज म्हणून केली होती. इतर राजांच्या सैन्याला लूटितील हिस्सा मिळायचा त्यामुळे त्यांचा जास्त लूट करण्यावर भर असायचा. पण शिवबांनी हिस्सा न देता ठराविक मेहनताना देण्याचे ठरविले होते. लूट मिळो अगर न मिळो सैन्याला नियमित पगार मिळे. त्यामुळे जास्त लूट करण्यामध्ये हितसंबंध नसायचा. लूटीमध्ये मंदिर, मस्जिद, दर्गा व स्त्रि यांना त्रास होता कामा नये असा सक्त आदेश शिवरायांचा असायचा. मुसलमानांचा धर्मग्रंथ कुराण हाती लागल्यास सन्मानाने आपल्या मुसलमान नोकराकडे देण्याचा आदेश होता. शिवरायांनी स्त्रि-पुरूष यांची गुलाम म्हणून खरेदी विक्री करण्यास बंदी घातली होती.
सद्या शिवाजी महाराजांच्या नावाने धर्मांधता व समाजामध्ये विकृती पसरविण्याचे काम राजरोसपणे चालू आहे. स्वतःच्या जाति धर्मातील, प्रदेशातील थोर व्यक्तिमत्वांना पूजणे व त्यांच्या माध्यमातून आपले वैयक्तिक किंवा जातिचे, धर्माचे, प्रदेशाचे मोठेपण सांगणे हा मानवी स्वभाव आहे. हे एकप्रकारे ठिक आहे असे मानूयात. छत्रपति शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील हिंदू धर्माचे होते व त्यांची धर्मावर श्रद्धा असून त्याप्रमाणे वागायचे. ते हिंदू होते म्हणून सर्व हिंदूंना त्यांचा सार्थ अभिमान वाटतो, यात काहिच गैर नाही. इतके वर्ष लोटूनही महाराष्ट्रातील अशिक्षित व्यक्तिला सुद्धा शिवाजी महाराजांबद्दल माहिती पोहचविण्याचे माध्यम म्हणजे पोवाडे, किर्तने, लोककथा, व्याख्याने, चित्रपट वगैरे आहे. पण यातील सर्व घटकांना जाणिवेच्या मर्यादा असतात. शिवाय हे कार्यक्रम लोकांमध्ये जाऊन सांगावे लागते त्यामुळे प्रेक्षकांना शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी चमत्कार, भडकपणा सांगण्याच्या नादात इतिहासाचा विपर्यास होतो. म्हणून काव्य आणि इतिहास यामधील फरक सर्वांनी जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. पण याव्यतिरिक्त ही विकृत विचारसरणी आपल्या समाजात कार्यरत असल्याने वर्तमान स्वार्थ साधण्यासाठी सोईचा होईल असा इतिहास जाणून बुजून सांगितला जातो, पटवला जातो. इतिहासाकडे अपुरे पणाने किंवा चुकीच्या पद्धतीने पाहिल्या जाते आणि स्वार्थासाठी जाणूनबुजून हिंदू विरूद्ध मुसलमान द्वेष पसरविण्यासाठी शिवाजींचा गैरवापर केला जातो.
बरेच मुसलमान सहिष्णु असल्याचे इतिहासात नोंद आहे. पण यांकडे दुर्लक्ष केले जाते. निजामशाही चा मूळ पुरुष गांगवी हा बहिरंभट कुलकर्णी चा मुसलमान झालेला मुलगा होता, विजापूरचा संस्थापक युसुफ आदिलशहा ची पत्नी मराठा होती, शहाजहान पुत्र व औरंगजेबाचा भाऊ दारा शिकोह हा तर संस्कृतचा जाणकार होता आणि याची काशीच्या पंडितांमध्ये बैठक असायची. हे सर्व राजे सर्व धर्माला समान मानणारे सहिष्णू होते. अकबर बादशहा चे तर शिवाजी राजांनी औरंगजेबाला लिहिलेल्या एका पत्रात भरभरून कौतुक केले आहे. बादशहा अकबर ने हिंदू-मुसलमान ऐक्याचा ‘दिनेइलाही’ नामक धर्माची स्थापना केली होती. मुसलमान राजाकडे अनेक हिंदू सरदार होते याची लांब यादि आहे. ज्यामध्ये स्वतः शहाजीराजे आदिलशाहित होते, शहाजीराजेंचे सासरे लखुजी जाधव निजामशाहीत होते असे अनेक शिवाजींच्या रक्ताचे नाते, मराठे व हिंदू मुसलमान राजाकडे इमानेइतबारे कार्यरत होते. हिंदू राजपूत तर त्यावेळी मुसलमान राजाशी विवाहसंबंध सुद्धा जोडायचे व बादशहा प्रति निष्ठा कमी नाहि होऊ द्यायचे. तेव्हा कुणीही यांना धर्म बुडवे म्हणत नव्हते. कारण धर्म मुख्य नसून राज्यनिष्ठा महत्त्वाची होती.
शिवाजी महाराजांकडे ही मोठमोठ्या हुद्यांवर मुसलमान सरदार, सैनिक होते. आरमार प्रमुख दर्यासारंग दौलतखान, खास व्यक्ती म्हणून मदारी मेहतर, एक वकिल काजी हैदर, तोफखाना प्रमुख इब्राहिम खान, सरनोबत नूरखान बेग, सिद्दी हिलाल, सिद्दी वाहवा इ. व याव्यतिरिक्त सातशे पठाण तुकडी शिवबांच्या सैन्यात होती. त्याकाळी धर्मामुळे, धर्मासाठी लढाया नव्हत्या तर मुख्य उद्देश राज्यविस्तार करणे हाच होता. कार्यसिद्धिसाठी उपयोगी ठरेल तेवढ्यापुरताच धर्म होता. शिवाजींची लढाई ही जाचक धोरणाविरूद्ध होती यासाठी महाराजांना अनेक लढाया हिंदूंविरूद्ध, मराठ्यांविरूद्ध सुद्धा कराव्या लागल्या. तर अनेक मुसलमान राजांच्या मुसलमान राजसत्तेविरोधात सुद्धा अनेक लढाया झाल्या. त्यावेळी सैन्यात हिंदू राष्ट्रवाद किंवा मुसलमान प्रसाराची भावना नसून पोटाला देणाऱ्याशी इमान राखला जाई.
मुसलमान राजे हिंदूंची मंदिरे लूटत, पाडत इत्यादी पसरविल्या जाते, हे सत्य आहे पण यामागचा हेतू फक्त संपत्ती लूटणे हाच होता. सद्या काहि हिंदू व मुसलमान संघटना आपापल्या धर्मातील लोकांना भडकविण्याचे काम करत आहेत. अनेक मुसलमान राजे त्यावेळी मंदिरांना देणगी देत किंवा लुटलेल्या मंदिरांना दुरूस्ती करत. पाडणे आणि देणगी देणे हे दोन्हीही व्हायचे राज्यासाठी, राज्य प्रस्थापित व टिकवण्यासाठी. कारण मुसलमान राजांना त्रासदायक ठरू लागल्यास मुल्ला मौलवींचीही पर्वा नसे. स्वतः चे राज्य स्थापना व स्थिरतेसाठी धर्माचा वापर व्हायचा किंवा स्वतःची दुष्कृत्ये लपवायला धर्माचा गैरवापर सुद्धा व्हायचा.
शिवाजीराजे धर्मश्रद्ध होते पण त्यांनी कधीही परधर्माचा द्वेष केला नाही उलट मशिद, पिर, दर्गा यांना देणगी दिली व स्वतः शिवबा मुसलमान फकिर याकुतबाबा यांना मानत. शिवाजींच्या नावाने धर्मद्वेष पसरविणाऱ्या तथाकथित भक्तांनी आपल्या हिंदू – मुसलमान ऐक्याच्या भारतीय संस्कृतीला बदनाम करू नये. मुसलमान बांधवांनी तथाकथित खोट्या शिवभक्तांच्या कारवाया, भाषणे, लिखाण पाहून व काही मुसलमान संघटनांच्या भडकविण्यामध्ये येऊन शिवाजीस ओळखू नये. तर शिवाजी महाराजांचा इतिहास पहावा व त्यांचा मुसलमान धर्मासंबंधीचा दृष्टिकोन समजावून घेऊन मगच काय ते ठरवावे. शिवाजी राजेंनी स्वधर्मा इतकाच परधर्माचा सन्मान केला. उपासना पद्धती वेगळ्या असल्या तरि सर्व धर्माचा उद्देश एकच असल्याचे तत्व शिवरायांनी त्यावेळी मांडले होते. पण सद्या परधर्म द्वेषाच्या पायावरच स्वतःच्या धर्मात उच्च स्थान मिळते या समजुतीवर धर्माची पायाभरणी व अशा धर्माच्या पायावर सत्तेची भिंत चढवल्या जात आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे घाणेरडे राजकारण केल्या जात आहे. हिजाब आणि भगवा यांसारख्या निरर्थक गोष्टिंमध्ये गुरफटत ठेऊन देशाच्या विकासाच्या व इतर महत्त्वाच्या मुद्यांपासून लक्ष वळविल्या जाते. पण यांमध्ये सहभागी विद्यार्थी युवक शिवरायांना डोक्यात घ्यायच्या ऐवजी फक्त डोक्यावरच घेण्याचे काम करत आहे, असे दिसत आहे. ऊठसूठ कुणीतरी चुकीच्या मुद्यावर, चुकीच्या मागण्यांसाठी भडकवितात आणि विद्यार्थी युवक भडकतात. राजेशाहीमध्ये तलवारीच्या जोरावर राज्य चालायचे त्यामुळे तलवार चालवणे अपरिहार्य होते. परंतु लोकशाहीमध्ये तलवारीची आवश्यकताच नसून लेखणीला तलवारीपेक्षा खूप जास्त महत्त्व आहे. शिवरायांनी त्यांच्या आयुष्यात तलवारीपेक्षा बुद्धीने जास्त युद्ध जिंकले आहेत असे इतिहासातून कळते. धर्माधारीत सत्ता चालविणे व लोकांनाही त्यातच गुंतवून ठेवणे चुकिचे असून लोकशाहिला अतिशय घातक व मारक आहे म्हणून सद्या शिवाजीं सारखी डोळस धर्मसाधनेची नितांत गरज आहे.
प्रत्येक काळामध्ये प्रत्येक व्यक्तिला विशिष्ट अशा कालसापेक्ष मर्यादा असतात. त्याकाळी शिवाजी राजांना सुद्धा काळाच्या, धर्माच्या, परिस्थितीच्या मर्यादा होत्या म्हणून त्याप्रमाणे राजेंना काही गोष्टि कराव्या लागल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांना राजा म्हणून मान्य करण्यास हिंदू धर्माचा विरोध होता त्यामुळे एकही ब्राम्हण महाराजांच्या राज्याभिषेकास तयार नव्हता. कारण हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्य प्रमाणे राजा फक्त ब्राम्हण व क्षत्रिय च बनू शकत होते आणि शिवाजी कुणबी असल्याने शूद्र वर्णात गणल्या जात होते. शेवटी काशीहून गागाभट्ट नामक ब्राम्हणाला बोलावण्यात आले व त्याने प्रचंड दक्षिणा घेऊन राज्याभिषेक केला. चातुर्वर्ण्य रचनेचा व वर्णवर्चस्वाचा त्रास राजेंनाही झाला. शिवाजी महाराज स्वबळाने, युक्तिने, शौर्याने मिळवलेल्या राज्याचे राजे होते. अगदी औरंगजेब सुद्धा राजेंना मानीत पण धर्माला शिवाजी हे राजे म्हणून मान्य नव्हते. शिवाजी क्षत्रिय होते कि नाही हा मुद्दा निरर्थक आहे कारण व्यक्तिची ओळख त्याने केलेल्या कार्यावरून, विचारावरून होत असते. शिवाजी महाराजांनी वर्णव्यवस्थे नुसार शूद्र, अतिशूद्र समजल्या जाणाऱ्या लोकांच्या पराक्रमाला वाव देऊन मोठ्या हुद्द्यावर नोकरीस ठेवले ज्यामध्ये मुख्य गुप्तहेर बहिर्जी नाईक रामोशी, शिवा न्हावी, जिवा महाला, मराठा, कुणबी, बेरड, आडेकरी इ. अठरा पगड जातिंचा मावळ्यांमध्ये समावेश होता. अतिशय महत्त्वाच्या मोहिमांमध्ये यांची स्वराज्याला भरीव साथ मिळाली. समुद्राच्या सहाय्याने उपजिविका भागविणारे कोळी, सोनकोळी, भंडारी, मुसलमान इ. कष्टकऱ्यांना आरमार उभारणीच्या सैन्यामध्ये सामिल करून घेतले. कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी त्यांच्या 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकामध्ये म्हटले आहे कि, _"सामान्यांना शिवाजीने मोठे केले, मग सामान्यांनी शिवाजीला मोठे केले आणि मग सर्वांनी मिळून खूप मोठे कार्य केले. चांगला विचार सामान्य लोक जेव्हा स्वीकारतात तेव्हा तो 'विचार' एक शक्ति होते आणि ती शक्ति सामान्यांकडून असामान्य कार्य करवून घेते. सामान्यांच्या सहभाग व सहकार्याविना इतिहासातील असामान्य कार्ये घडत नाही. ज्यांचे बरे चाललेले असते त्यांना बदल नको असतो, जुलूम करण्यात सहभागी असणारे जुलूम नाहिसा कसा करतील? बदल हवा असतो जुलूम सहणाऱ्या सामान्यांना आणि शिवाजीने सामान्यांना संघटित, शहाणे, मोठे केले व जुलूमाला आळा घातला."_ पण पेशवाईमध्ये चातुर्वर्ण्य हिंदू धर्माप्रमाणे राज्यकारभार चालत असल्याने अराजकता, जातिभेद खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला. म्हणून पेशवाईतील हिंदू धर्म हा भेदाभेद, अन्याय करणारा तर शिवाजींचा हिंदू धर्म समानता, संधी व अंधश्रद्धेच्या विरोधात होता. आपल्याला कोणता हिंदू धर्म हवा?
सद्या शिवाजी महाराजांना देव बनविण्याचा खोडसाळपणा काहि मतलबी, स्वार्थी लोक करताना दिसत आहे. शिवाजींचा देव केला म्हणजे सर्वांना सोईचे असते. 'तो शिवाजी देव होता म्हणून करू शकला, आपण तर सामान्य माणूस आहे', असे म्हटले म्हणजे त्यांच्या विचारांवर चालण्याची गरज राहत नाही. राज्यकर्त्यांना तसे शासन चालविण्याची गरज उरत नाही. गळ्यात, हातात, वाहनावर, मोबाईल वर फोटो ठेवला कि शिवभक्त झाला का? बाकि काहिच करण्याची गरज उरत नाहि का? तत्कालीन शिवाजीं संबंधी काहि चमत्काराच्या अफवा झाल्या असतील तर त्याचा त्यांना फायदा झाला असेल पण सद्या त्यांच्या नावाने त्यांचा गैरफायदा घेणाऱ्यांपासून आपण व आपला समाज सावध ठेवावा आणि भोंदू कोण आणि भक्त कोण हे ओळखायला शिवाजी समजून घ्यावेत. शिवाजींच्या तलवारीची अफवा ही अशीच जनमानसांत पसरविण्यात आली. शिवाजींना तलवार भवानीने नाहि दिली तर ती तलवार पोर्तुगाल मध्ये बनल्याचे पुरावे आहेत. लोकांच्या धार्मिक वृत्तीचा, अशिक्षित वृत्तीच्या भावनांचा गैरवापर केला जातो.
प्रस्थापितांनी थोर पुरूषांचा त्यांच्या हयातीत विरोधच केला पण तरि ही सामान्यांच्या मनातून काहि केल्या जात नसल्यामुळे प्रस्थापित स्वतःच पूजायला लागतात, भांडवल करतात. ज्ञानेश्वरांनी प्राकृतात ग्रंथ निर्मिती केल्याने प्रस्थापितांची ज्ञानाची मक्तेदारी मोडित काढून गरीब, अगदी अशिक्षिताला सुद्धा ज्ञान दिले म्हणून आणि ते गरीब असल्याने धर्माचे प्रस्थापित ठेकेदार त्यांना संन्याशाची पोरं म्हणून हिणवायचे. तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवून आणि स्वर्गासी पाठवूनही तुकाराम महाराज संपतच नाही म्हणून मंबाजी भट व आताचे त्याचे वारसदार त्यांना पूजायला लागतात. त्यांच्या अभंगांत आपले अभंग घुसवून काहि जण किर्तने करू लागलेत. पण त्यांनी अंधश्रद्धेवर, प्रस्थापितांवर कठोर शब्दांत ओढलेले ताशेरे कालबाह्य ठरवू पाहत आहेत. महात्मा गांधीजींना ही मारणारा नथुराम गोडसे व त्याच्या कटात सामिल असणारे कोणत्या विचारसरणीचे होते याचाही प्रत्येकांनी विचार करावा? आजही गोडसेला पूजणारे आणि गांधी संपत नाहि म्हणून नावापुरते जगभर गांधींचे नाव घेणारे गोडसेचे वारसदार आपल्यात आहेत. त्यांना ओळखून अशी देशविघातक, महाराजांना त्रास देणाऱ्या विचारसरणीचा नायनाट करावा लागेल. काहि वर्षा आधीच आपल्या महाराष्ट्रातील आपल्या तर्कशुद्ध व अभ्यासपूर्ण विचाराने महाराष्ट्राला नवविचार देऊ पाहणारे कॉम्रेड गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली. जेव्हा विचाराला हरवू शकत नाही तेव्हा शरीराला मारून टाकतात. पण विचार नेहमी जीवंत राहतो व असंख्य जणांमध्ये तेवत राहतो. विचार मरत नाही हे आता धर्माचा आंधळा अतिरेक असणाऱ्या सनातन्यांना सुद्धा आजपर्यंतच्या अनुभवातून माहित पडले आहे. पण तरि ही ते हत्या करतात कारण त्यांना वाटते कि यांचा वारसा चालविणारा दुसरा विचार जीव जाण्याच्या भितीने तयार होऊ नये. पण बदल घडवू पाहणाऱ्यांना जीव जाण्याची भीती नसते, त्यांना काहि केल्या बदल हवा असतो. आणि असा विचार करणाऱ्या एका विचारामागे 'आम्ही सारे गांधी' , 'आम्ही सारे पानसरे' , 'आम्ही सारे दाभोळकर' म्हणत हजारो विचार तयार होत असतात, होत राहणार.
सद्याचे वतनदार भांडवलदारांच्या हिताचे जे काही करता येईल ते करण्यात मशगुल असल्याचे दिसत आहे. यासाठी सामान्य जनतेवर अन्याय करून त्यांची फसवणूक करून त्यांना लुटण्यासाठी पोषक वातावरण तयार केले जात आहे आणि भांडवलदारांच्या आधीच खूप वाढलेल्या संपत्तीत आणखी भर पडत आहेत. शिवाजी महाराजांच्या राज्याला आपण आदर्श राज्य म्हणतो, इतिहासकार सुद्धा सर्वतोपरी योग्य सुशासन असलेलं राज्य, रयत सुखी असलेलं राज्य म्हणून वर्णन करतात. मग तशा पद्धतीचे राज्य निर्माण करण्यात काय हरकत आहे? त्यावेळी राजेशाही, सरंजामशाही, धर्माचा हस्तक्षेप, परकिय आक्रमण या गोष्टिची चिंता नेहमी सतावत राहायची. पण या सर्वांवर अंकुश ठेवण्यासाठी शिवाजींनी प्रामाणिक प्रयत्न केले आणि त्यामध्ये ते खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी सुद्धा झाले होते. आता तर देशात लोकशाही आहे व देशाच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी आवश्यक गोष्टि उपलब्ध आहे. पण हे सर्व करण्यासाठी फक्त प्रामाणिक मानसिकता हवी. देशासंबंधी भेडसावणारे जागतिक मुद्दे सरकारने मनात आणले तर मिटवू शकत नाहि का? राजकिय हितसंबंध कायम राहावे म्हणून हे मुद्दे असेच राहतात किंवा ठेवतात का? आणि देशांतर्गत धर्माचा गैरवापर केला जातो ते फक्त राजकिय हितसंबंध जोपासण्यासाठी. म्हणून शिवाजी राजा व शिवाजी राजांचे स्वराज्य, राज्यकारभार कसे होते? कुणासाठी होते? आणि सद्या तसे का नाही? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यामध्ये व तसे सुशासन व्हावे व त्यासाठी मनापासून प्रयत्न करावे असे ज्याला वाटत असेल तो खरा शिवरायांचा अनुयायी आहे. विचारांचे शस्त्र प्रतिगामी यांकडे ही असते आणि त्यांच्याकडे जे आहे ते टिकवून ठेवण्यासाठी ते त्यांच्याकडिल विकृत विचारांचा प्रभावी वापर करतात. पण आपल्याकडे पुरोगामी विचारसरणीचा मोठा वारसा आहे फक्त त्यामध्ये प्रामाणिकपणा कायम ठेवून विचाराला अधिक बळकट बनवूया. आज शिवाजी आपल्यात नाही आणि येऊ पण शकत नाही पण त्यांचे विचार व उपदेश अजूनही आपल्यात आहे. म्हणून चला खरा शिवाजी समजून घेऊ व समजता समजताच जिथे बरे चालले नसेल तिथे बदल घडविण्यासाठी सज्ज होऊया.
जय जिजाऊ! जय शिवराय!!
(सदर लेख कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक वाचून प्रेरणा मिळाल्याने स्वतःचे मत मांडण्यासाठी लिहू शकलो. मी असे लेख लिहित राहावे यासाठी कृपया तुमचा अभिप्राय नक्की कळवा.)
✍🏻 मनोज प्रल्हाद गावनेर
मंगरूळ चवाळा, ता. नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती
https://surveyheart.com/form/615fcb6ec182fe215fb90303
लेखक व कवींना व्यासपीठ निर्माण करण्यासाठी लिंक मराठी हे न्यूज पोर्टल घेऊन येत आहे एक सुवर्णसंधी .
तुमचे स्वलेख नावासह प्रसिद्ध केले जातील ; यासाठी लिंक मराठी कडून कोणताही मोबदला घेतला जात नाही.
मुख्यसंपादक