मी शाळेत होते तेव्हाची गोष्ट, शाळा बर्यापैकी लांब होती आणी आजच्या सारखे बस, व्हॅन असे चोचले नसत. तेव्हा चालत जाणे येणे. जाताना किंवा येताना रस्त्यावर एक मुलगी दिसायची. तीचे वय साधारण 20,22 च्या आसपास असावे, मळकट फ्रॉक, केस अस्ताव्यस्त, अनवाणी, तोंडाच्या एका कोपऱ्यातून थोडी लाळ गळत असावी. त्या वयात भिती वाटायची अश्या वेडसर लोकांची. पण तीच्या चेहर्यावर हास्य, कधीच तिचे ओठ मिटलेले दिसले नाहीत.ना कधी बोलत असे काही. आजही ती तशीच अठवते. बघत राहायची येणाऱ्या जाणाऱ्या कडे. एक प्रश्न मनात यायचाच की ही जेवत कुठे असेल, कोण देत असेल कधीतरी डब्यातले द्यावे वाटे पण तिच्या वाटेला जाण्याचे धाडस झालेच नाही कधी. कुणाकडून तरी समजले की तमाशा कलाकार स्त्रिया तिला रोज जेवण देतात.
काॅलेज सुरु झाले आणी तिचा काहीसा विसर पडलेला असतानाच ती गर्भवती असल्याची बातमी पुर्ण गावात पसरली. आणी धस्स झाले. तिची मानसिक स्थिती थोडीफार समजण्याचे वय होते. आणी रोजच्या बघण्यात होती त्यामुळे अनामिक आस्था पण. तिला विचारलं संबंधितांनी, कोण होते जाणून घेण्यासाठी तर फक्त रीक्षा दाखवत असे. . बाकी काहीही नाही. तिला तिच्या पोटात बाळ आहे हे तरी समजले होते का नाही कोण जाणे. पोट दिसू लागले तेव्हाच लोकांना समजले. कोण असेल तो नराधम ज्याला तिचा अवतार, मानसिक स्थिती कशाचाही फरक पडला नाही. निसर्गाने त्याचे काम केले नसते तर कळूनही आले नसते. पुढे ती कधीच दृष्टीस पडली नाही. अगदी नजर शोधत असे तरीही... पण तिच्या बाळंतपणाचे अवघड काम मुंबई च्या कुठल्या तरी प्रसूती तज्ञ दंपतीने केले आणी बाळाला घेऊन गेले अशी बातमी होती.
का वागतात काही नराधम असे ? तेव्हापासून ते आजपर्यंत रोज काहीना काही कानावर येतच असतं. दिल्लीच्या निर्भया प्रकरणाने तर कीत्येक दिवसांची झोप उडवली होती. असे वाटले देशातल्या प्रत्येक व्यक्तीचे काळीज चिरत गेली ती घटना. आशा होती की असे प्रकार काही अंशी तरी कमी होतील. पण कसलं काय... झाले उलटेच... एकामागोमाग असिफा अगदी 8 वर्षाची त्याला राजकारण, समाजकारण असा रंग दिला गेला. त्या खोलात न शिरलेलेच बरे पण काय संबंध ह्या सर्वाशी त्या अबलेचा??
एक गोड कळी नुसतीच खुडली गेली नाही तर छीन्नविछीन्न केली गेली. शक्ती मिल प्रकरण, प्रेम करणे ही चुक म्हणावी का?? असा आडमार्ग अनुसरायला नको होता हे मान्य करुन सुद्धा तिला तिथे नेणारा तिचा प्रियकरच होता.. एक पुरुष.. आणी भोग आले त्या मुलीच्या वाट्याला. दिल्ली मधेच स्कुटी बंद पडलेल्या मुलीला मदतीच्या बहाण्याने, अत्याचार करुन तिला पेट्रोल टाकून जाळण्यात आले. अलिकडेच अंधेरी येथे हुबेहुब दिल्ली च्या निर्भया सारखे प्रकरण घडले. अगदी काही दिवसापूर्वी एका 15 वर्षांच्या मुलीला थंडपेयातून ड्रग्ज देऊन तिच्यावर जानेवारी पासून अत्याचार घडत होते. आणी त्याचा व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल केले जात होते ते प्रकरण उघडकीस आले. 29 जणांना ताब्यात घेतले गेले. त्यातल्या एकाकडेही साधी माणुसकी असती तर त्या अबलेची केव्हाच सुटका झाली असती. अंगावर शहारे आणणार्या या ठळक घटना. मुलींच्या आईवडिलांना कसे सुरक्षित वाटणार. एकही असे शहर, गाव नाही जिथे स्रियांवर अत्याचार होत नाहीत.
2-4 वर्षांच्या मुलींपासून ते 70 वर्षांच्या वृद्धेपर्यंत बातम्या येतच असतात. दाबलेली किंवा लाजेकाजेस्तव दबलेली अगणीत प्रकरणे असतील ते वेगळेच.
मला प्रश्न पडतो तो असा की, काय मानसिकता असावी या लोकांची, एका स्त्री ने जन्म दिलेला असतो, दुध पाजलेले असते मोठे केलेले असते. सोबत एखादी बहिण मोठी झालेली असते. पत्नी असते घरी, अगदी मुलगी पण असते काही जणांना. आई, आजी, मावशी, आत्या, बहिण, शिक्षिका अश्या स्त्रियांच्या सानिध्यात, त्यांच्या जिवावर वाढलेला एखादा पुरुष इतका हिंस्र, निष्ठूर कसा होऊ शकतो...
काही लोकं मुलींच्या कपड्यांना, वागण्याला दोष देतात. पण सरसकट सर्वजणी तंग कपड्यात नसतात. आणी काही झाले तरी रस्त्याने जाणाऱ्या, ओळख, मैत्री, नाते असणाऱ्या एका स्वतंत्र स्रीवर अत्याचार करायला पुरूषांना हक्क कोणी दिला. कोणत्या मानसिकतेचा परीपाक असतो हा. कोणत्याही घरात असे वाईट संस्कार दिले जाणे शक्य नाही. स्त्री सौंदर्य पाहणे हे पुरुषांचे अकर्षण असते असे जरी असले तरी सगळेच ते ओरबाडण्याचा विचार निश्चितच करत नाहीत. मग ह्या अश्या नराधमांना स्वताःवर ताबा का ठेवता येऊ नये. सर्व पुरुषांत नैसर्गिक षुरुशी भावना असतातच ना. तरी स्रियांचा सन्मान करणारे, त्यांना आदर देणारे, संरक्षण देणारे पुरुष ही असंख्य आहेत.
असे नराधम कधी विचार करतील का की, अत्याचार पिडीतेची शारीरिक,मानसिक स्थिती काय होत असेल. संपूर्ण जिवन ती कसे कंठत असेल. रस्त्यातून जाताना अनोळखी पुरुषाचा साधा धक्का लागला तर संताप होतो स्रीयांचा. असे किळसवाणे शल्य घेऊन जगणे सोपे नसते. मग काही आत्मघाताचा मार्ग स्वीकारतात. काही मानसिक रोगी होतात. काही स्वताःला कोंडून घेतात. काही वाळीत टाकली जातात. कुटुंब उध्वस्त होतात. जगाची नजर टोचत राहाते त्यांना. आणी हे सर्व त्यांची काहीही चूक नसताना.
कायदा आहे पण त्यानिमित्ताने परत परत त्या भयानक अत्याचाराची किळसवाणी उजळणी होत राहते. आणी कोणाला शिक्षा झालीच तरी तीचे झालेले नुकसान भरुन येऊच शकत नाही. पूर्वीप्रमाणे ती जगू शकेलच असे नाही.
त्या साठी अशी काही कठोर शिक्षेची योजना व्हायला हवी की साध्या विचाराने पण अश्या लोकांच्या अंगाचा थरकाप उडावा.
आणी असे काही करण्यास धजाऊ नयेत.
लेखिका - रश्मी हुले
बोरिवली-पश्चिम
( मुंबई )
फोटो सहायता :- श्री मनोज वढणे सर
धन्यवाद सर 🙏🏻
समन्वयक – पालघर जिल्हा
नमस्कार –
मॅडम- आपण खूप सुंदर लेख लिहिला आहात. आजची सत्य परिस्थिती आपण आपल्या शब्दांत उलगडून, होणाऱ्या अत्याचाराचे मुखवटे जगाला सांगण्याचा आपला प्रयत्न खूप छान आहे.
सगळीकडेच सध्याची परिस्थिती खूपच भयावह होऊ पाहत आहे, एकट्या स्त्रीने रात्री-अपरात्री फिरणे खूपच जीवघेणे झाले आहे.
परंतु स्त्रीयांनीही आता स्वतःहून एक पाऊल पुढे टाकले आहे, आजची स्त्री ही तिच्यावर अत्याचार होताना हात उगारत नाही तर सरळ चप्पलच काढून समोरच्याचे तोंड फोडते. पण हे झाले स्वतःचे रक्षण करू शकत असणाऱ्या स्रियांविषयी.
लहान मुलींनी काय करावे ??
म्हणूनच प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांवर असे प्रसंग येऊ नयेत म्हणून त्यांना लहानपासूनच स्व-रक्षणाचे धडे द्यायला सुरुवात केली पाहिजे. तर आज प्रत्येक मुलगी आणि स्त्री स्व-रक्षण करू शकेल.
धन्यवाद….
विजय वैशाली दत्ताराम पराडकर-आण्णा
धन्यवाद सर 🙏🏻
अगदीच खरंय. ज्युडो कराटे सारखे शिक्षण लहान वयात दिले पाहिजे. म्हणजे मुलींचा आत्मविश्वास वाढेल. लहानपणापासून मुलांना ही स्री सौजन्य शिकवले पाहिजे. घरातले वातावरण त्या साठी पोषक असावे. 🙏🏻🙏🏻
खूप छान व्यक्त झाला आहात रश्मी मॅडम असा आवाज उठवणे गरजेचे आहे..
सर खुप खुप धन्यवाद 🙏🏻 😊
वास्तवादी लिखाण…
सर खुप खुप आभार 🙏🏻😊