पाऊस हा एक मित्र असतो, सखा असतो, प्रियकर असतो. पाऊस प्रत्येकाच्या जीवनात आणि हृदयाच्या एका कोपऱ्यात कायमचा घर करून राहिलेला असतो.
पाऊस कुणाला सुखावतो तर कुणाला दुखावतोही. पावसाच्या या कडू, गोड आठवणी कधी कधी आठवल्या की मन भरून येतं आणि हातात लेखणी घेऊन याच आठवणी शब्दरुपी कागदावर उमटल्या जातात. मग त्यातून तयार होते एक कविता. अशी कविता जी मनाच्या तारा एकेकाळी घडून गेलेल्या प्रसंगावर भाष्य करण्यास उत्स्फूर्त होऊन नाचू लागतात, गाऊ लागतात.
मग अशी कविता जन्माला येते जीचा कल्पना विस्तार आपल्या मनातून सुरू होऊन कागदावर अलगद उतरतो. अशीच एक कविता मी आपल्यासमोर सादर करणार आहे. आपल्याला ही कविता कशी वाटली आणि आपल्याला या पावसाची आठवण असेलच, तर मग त्याबद्दल कमेंट मध्ये नक्की अभिप्राय द्या.
…..माझ्या आठवणीतला एक पाऊस…२६ जुलै २००५…..
अरे ये पावसा असा कोसळू नकोस रे, तुलाही भावना असतात, असं कुठेतरी वाचलं होतं…
तुला कोसळताना बघून डोक्यात विचारांनी थैमान घालून मन आणि हृदय धडधडत होतं…
बाहेर वादळ आणि तुझा खेळ रंगला होता…
तुझा अवतार पाहून प्रत्येकाला आपला बाप आठवला होता…
निसर्गाने आपले रौद्र रूप धारण केले होते, भिजवून टाकला होता सारा संसार…
धो धो पाऊस, थंड वारा, सोबत होता लखलखत्या सरींचा मार…
चहू बाजूंनी हाहाकार माजला, ढग फुटून वाहत होता, वीज कडकडून धरणी मातेला कवटाळत होती…
पृथ्वी वाहत होती, जणू आपल्या पतनाची कहाणी स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होती…
नद्यांनी वाट बदलली, शहराकडे धाव घेतली, महापुराच्या संकटात, माणसं, गुरे वाहत गेली…
सगळीकडे पाणीच पाणी, कुठे कमरे एवढं, कुठे छाती एवढं तर कुठे घरेच्या घरे बुडाली….
मोठ-मोठी झाडं उन्मळली, उंच उंच पुल क्षणार्धात पडले, रेल्वेचे रूळ निसटले सर्व काही पाण्याखाली गेले…
कुणाचा वंशाचा दिवा गेला, कुणाची लेक बुडाली, तर कुठे जन्मलेले बाळ आईविना पोरके झाले…
सत्यानाश आणि सर्वनाश करून एकदाचा तू शांत झालास…
भरलेल्या पाण्यावर तरंगणारी प्रेतं बघून मन गहिवरून आलं…
नियतीचा खेळ सारा, नियतीनेच ही व्यथा मांडली…
भुकेसाठी व्याकूळ होऊन, भाकरी शोधणारी माय मात्र उपाशीच राहिली…
उपाशीच राहिली…
✍️विजय वैशाली दत्ताराम पराडकर- आण्णा
( विरार )
समन्वयक – पालघर जिल्हा
खरंच तो पाऊस आठवला,
नमस्कार सर…
खरंच ते दिवस आठवले की आपसूकच अंगावर काटा येतो. त्यावेळी खूपच जीवितहानी झाली होती. प्रत्येकाचा संसार उध्वस्त होऊन गेला होता.
इतके सर्व होऊनही सर्वांनी परिस्थितीचा सामना करत सर्व काही पूर्ववत केले.
तो दिवस आणि तो पाऊस पुन्हा नकोच असेच वाटते आहे.
आपले मनःपूर्वक धन्यवाद…!!💐
[…] आठवणीतला एक पाऊस…२६ जुलै २००५ अमित गुरव […]