Homeमुक्त- व्यासपीठआम्ही काय मेंढरे आहोत का?

आम्ही काय मेंढरे आहोत का?

शेळ्यामेंढ्यांना मेंढपाळ लागतो कारण त्यांना अक्कल नसते, पण आम्हा माणसांना नेते का लागतात? माणूस म्हणून जन्मल्यावर माणूस म्हणूनच जगायचे, जनावर म्हणून जगायचे नाही ही साधी अक्कल आम्हाला नाही काय? आम्ही काय मेंढरे आहोत? नाहीतरी त्या मुंबई लोकलमध्ये आम्ही मेंढरासारखे कोंबलो जातो आणि मेंढरासारखे बाहेर ढकललो जातो. कुणी आणि का केली आमची अशी मेंढरांसारखी स्थिती? जगातील आर्थिक संपत्ती २५% हूनही कमी असलेल्या मूठभर श्रीमंतांकडे कशी काय एकवटली? एवढी हुशार आहेत का ही मूठभर श्रीमंत मंडळी? बरं मग आम्ही इकडेतिकडे विखुरलेली माणसे एकत्र येऊ शकत नाही म्हणून आम्ही आमच्यातूनच काही राजकीय नेत्यांची निवड केली. पण या नेत्यांनी तरी या मूठभर श्रीमंतांना सरळ करून या जगातील संपत्तीची योग्य वाटणी आमच्यात केली का? मुद्दा माणसांनी माणसासारखे जगण्याचा आहे. मग या मुद्यावर ज्ञान शिकविण्यासाठी आम्हाला नेते धर्मगुरू, तत्ववेत्ते का लागतात? आम्ही नेत्यांचे पुतळे बनवतो. पण नीट विचार करा, या नेत्यांच्या विचारात तरी एकवाक्यता आहे का? याच पुतळ्यांवरून नेत्यांच्या अनुयायांत रणकंदन माजते. माणूस म्हणून माणसासारखे कसे जगावे हे सांगणारी किती तत्वज्ञाने जगात निर्माण झाली व ही तत्वज्ञाने सांगणारे किती तत्ववेत्ते जगात निर्माण झाले? काही ठिकाणी तर यावर तत्वज्ञान विद्यापीठेही निर्माण झाली आहेत. निसर्गविज्ञान हाच खरं तर माणसाला माणसासारखे जगण्याचे ज्ञान देणारा मूलभूत पाया आहे. तो मूलभूत पाया शिकविण्यासाठी आम्हाला विज्ञान गुरूंची गरज भासणे ही गोष्ट मान्य करण्यासारखी आहे. पण माणुसकी व माणुसकीचा व्यवहार शिकविण्यासाठी आम्हा माणसांना धर्मगुरू, तत्ववेत्ते, नेते यांची गरज का भासावी? आम्ही काय मेंढरे आहोत का?

  • ॲड.बी.एस.मोरे
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular