कसं सांगू तुला हे जीवन कसे आहे
मीच माझ्या डोळ्यांनी ते पाहत आहे
प्रत्येकजण इथे स्वतःत सरपंच पाहतो आहे
कारण आयुष्य एक रंगमंच आहे, रंगमंच आहे…
जीवनात कोणी सुखी तर कोणी दुःखी असतो
आपल्या मनाप्रमाणे प्रत्येकजण वागत असतो
भावना ह्रुदयात ठेऊन ओठांवर हसू ठेवले जाते
कधी स्पंदने वाढून डोळ्यांतून अश्रू वाहिले जाते
उपकाराची भाषा करणारे परोपकारी होतात
मदतीसाठी येणारे हात रंग देऊन जातात
बिशाद नाही कुणाचीही स्पर्श करण्याची
रक्ताळलेल्या डोळ्यांतले अंगार विझवण्याची
यशाच्या पायरीवर पाय चला संगतीने ठेऊ
शिखराची उंची गाठाया चला हातात हात घेऊ
एकमेका सहाय्य करून अडचणींवर मात करू
ठेऊन मनाचा मोठेपणा मोठे होऊ,अवघे सुपंथ धरू
पडद्या मागे काय चाललंय, कधी न लागे सुगावा
रोजचा चालू असतो कोलाहल,धिंगाणा आणि कांगावा
आजच्या पोटाला चिमटा काढून तो कुटुंब पोसतो
खरा राजा तोच जो या खऱ्या रंगमंचावर राजा शोभतो
विचारांची जादू नसे कुणा, कुणाला शब्दांतून
हुंदके फुटतात जेव्हा काळीज येते आक्रंदून
तो श्रीमंत आहे ज्याकडे बुद्धीचा संच आहे
सोपे नाही जगणे इथे, आयुष्य एक रंगमंच आहे
रंगमंच आहे…
✍️विजय वैशाली दत्ताराम पराडकर – आण्णा
( विरार )
समन्वयक – पालघर जिल्हा