ओटीभरणे

ड्रायव्हरने सावकाश गाडी चालवत अलगदपणे बंगल्याच्या दाराशी उभी केली. विजयरावांनी श्रृतीला गाडीतच थांबायला सांगितले. सुश्रुतने पटकन जाऊन दरवाजा उघडला. डायनिंग टेबलवर ओवाळणीचे ताट आणि भाकरतुकडा घरून निघण्याआधीच विजयरावांनी तयार ठेवले होता. पटकन येऊन त्यांनी लेकीला आधार देऊन गाडीतून उतरायला मदत केली. सुश्रुतने श्रृतीला, त्याच्या दिदीला ओवाळले. तिच्यावरून भाकरतुकडा पण ओवाळून टाकला. सारे सोपस्कार उरकून श्रुती घरात आली. विजयरावांनी तिची खोली व्यवस्थित आवरून ठेवली होतीच पण तिची डिलिव्हरी झाल्यावर तिच्या खोलीतच सर्व गोष्टी तिला हाताशी मिळाव्यात अशाप्रकारे सगळ्या सोयी करून घेतल्या होत्या अगदी बाळाच्या पाळण्यापासून ते दुपटे लंगोटापर्यंत सर्व जय्यत तयारी केलेली होती.
ताई बरोबर थोडा वेळ गप्पा मारून सुश्रुत झोपायला गेला. तेवढ्यात विजयराव श्रुतीला आवडणारे हॉटचॉकलेट घेऊन तिच्या खोलीत आले.
“बाबा आत्ता कशाला आणले हे ? आज सकाळपासून खूप खाणं झालय.”
“असू दे ग. हे तुझ्यासाठी नाही आणलय माझ्या होणाऱ्या नातवंडांसाठी आणलय. बरं रात्री तुला काही हवे असेल तर हाताशी आहे ती बेल वाजवायची. उगाच आत्ता कोणाला त्रास नको, असले विचार करायचे नाहीत. तुला नववा महिना लागला की आपल्या कुसुमताई रात्रीच्या इथेच रहायला येतील. त्यांनी तुझ्या बाळंतपणाची जय्यत तयारी केलीय. “
” बाबा, किती कराल? आई असती नं तर तिने सुद्धा एवढे काही केले नसते. चला आता झोपा. तुम्हीपण दमला असाल. “

” हो ग, जातो झोपायला.”
” आणि एक गोष्ट बाबा, माझ्या डिलीव्हरीनंतर सासूबाई येणार आहेत आपल्याकडे पंधरा दिवस रहायला.”

” हो, त्या म्हणाल्या मला. काही काळजी करू नका. तुम्हाला लेकीची डिलिव्हरी माहेरी करायची आहे नं! तर तसच करूया. मी येईन तिथे रहायला काही दिवस..”
” आई किती प्रेमळ आहेत नाही? “
” हो ग, देवमाणसे आहेत तुझ्या सासरकडची सारी. किती सांभाळून घेतात? आजचच बघ नं तुझी जगावेगळी मागणी पण त्यांनी सहज मान्य केली. “
” बाबा, जाऊ द्या आता तो विषय. तुम्ही पण खूप थकलाय. चला झोपा बघू आता. उद्या मला रगडापॅटीस करून खायला घालणार आहात नं? मग तयारी करायला लवकर उठायला लागेल. चला झोपा बरं. मी पण झोपते. “

विजयरावांनी मायेने लेकीच्या डोक्यावरून हात फिरवला. लाईट बंद करून नाइट लॅंप लावला आणि ते झोपायला आपल्या खोलीत गेले.

कपडे बदलून आरामखुर्चीत विसावले. समोरच विदुलाचा, त्यांच्या पत्नीचा लाईफसाईझ फोटो होता. आरामखुर्चीत बसून तिच्या फोटोशी मनातले सारे सांगायचे हा त्यांचा कितीतरी वर्षांपासूनचा प्रघात होता.
श्रुतीची दहावीची परीक्षा झाली आणि त्याच सुट्टीत रस्ता ओलांडत असताना विदुलाचा अ‍ॅक्सीडेंट झाला. तिथल्याच एका दगडावर डोके आपटल्याने ती कोमात गेली आणि चारच दिवसात मुलांना आणि आपल्याला पोरके करून गेली. एवढी संपत्ती, उत्तमातले उत्तम डॉक्टर काही करू शकले नाहीत. श्रुती आणि सुश्रुत यांनाही जबरदस्त धक्का बसला होता. विजयरावांचीही तीच अवस्था होती. पण मुलांसाठी त्यांनी स्वतःला सावरले.
आधी कधीही इकडची काडी तिकडे न करणारे विजयराव नेटाने सगळे शिकले. सुदैवाने दोन्ही लेकरे समजूतदार होती. दोघेहीजण विजयरावांना घरात मदत करत. घरातल्या जुन्या नोकरांनी देखील खूप मदत केली. कुसुमताई, स्वैपाकाच्या बाई आणि पार्वती यांच्या जीवावरच तर घराची घडी नव्याने बसली.
तशी गरज नव्हती तरी विजयराव अगदी पुरणपोळ्या सुद्धा करायला शिकले. विदुलाला पदार्थांच्या रेसिपी अगदी बारकाव्यांसकट लिहून ठेवायची सवय होती. विजयराव अनेकदा त्यावरून तिची चेष्टा करायचे पण आता तीच वही त्यांच्या उपयोगी पडत होती.
त्यांच्या कारखान्यात इमानी नोकरमाणसे होती त्यामुळेच श्रृती बारावी आणि सुश्रुत दहावी होईपर्यंत त्यांना दोन्ही मुलांकडे बघायला व्यवस्थित वेळ मिळाला.
मोठ्या वहिनी आणि विदुलाकडच्यांनी त्यांना पुन्हा लग्न करायचा खूप आग्रह केला. मुलेही तयार होती पण विदुलाच्या जागी दुसऱ्या कोणाची कल्पना करणे त्यांनाच अशक्य झाले.
दोन्हीकडची माणसे नाही म्हटले तरी दुखावली आणि वहिनींच्या मनात अढीही बसली. विजयरावांनी पण कधीही अडचणीच्या वेळी कोणाची मदत मागितली नाही. आपले आपण निभावून नेण्याकडेच त्यांचा कल होता.
खुर्चीवर बसल्या बसल्या ते जुने दिवस आठवत होते. श्रृतीने स्वतःचे लग्न स्वतःच जमवले. अनिकेत तिच्याच कॉलेजात शिकत होता. दोघांनाही शेवटच्या वर्षी कॅंम्पस इंटरव्ह्यू मध्ये नोकरी मिळाली. मग घरच्यांनी लवकर लग्न करायची गळ घातली. विजयरावांनी अगदी थाटामाटात त्यांचे लग्न लावून दिले. लग्नाच्या वेळी पुजेसाठी त्यांनी मोठ्या भावाला आणि वहिनीला बसवले तेव्हा वहिनी खूप मिनतवारीने पूजेला बसल्या.”इतरवेळी आम्हाला काडीची किंमत देत नाहीत. आता गरजेला भाऊवहिनी आठवतात” असे त्या सगळ्या पाहुण्यांना सांगत होत्या. विजयरावांनी पडते घेऊन शांत रहायचे ठरवले. विजयराव वहिनीच्या बहिणीशी लग्न करायला नाही म्हणाले याचा राग त्यांनी अगदी मनात धरून ठेवला होता. तशी श्रुतीची मावशी, मामा पण आले होते लग्नाला, पण त्यांनाही फार उत्साह नव्हता.
ही सारी कसर भरून काढली ती श्रृती अनिकेतच्या मित्रमैत्रिणींनी आणि अनिकेतच्या नातेवाईकांनी… त्यांच्या उत्साहामुळे आणि सक्रिय सहभागामुळेच ते लग्न निर्विघ्नपणे पार पडले.
विजयराव आणि सुश्रुतने मिळून कुसुमताईंच्या मदतीने श्रुतीचे वर्षसणही केले. श्रुतीच्या सासूबाई आणि सासरे म्हणजे देवमाणसे होती. श्रुतीच्या सासूबाई तर दिवाळसणावेळी स्वतः मदतीला आल्या. विजयरावांचे मन राखायचा ते दोघेही आटोकाट प्रयत्न करत.

“बरं का ग विदु, आपली लेक गरोदर राहिली नं तेव्हा तिने ती बातमी पहिली मला सांगितली. बाबा करून गळ्यात पडली नं, तेव्हा तुझी खूप आठवण येत होती. तू असतीस तर तिचे किती लाड केले असतेस. तसा मी आणि आपला सुश्रुत दोघेही आपापल्या परीने तिचे डोहाळे पुरवतो. तिच्या घरचे तर तिला फुलासारखे जपतात. आज आपल्या लेकीचे डोहाळजेवण होते. मोठ्या वहिनी मानाची माहेरची ओटी भरायला येते म्हणून आल्याच नाहीत. तुझी बहिण आणि वहिनी आली होती. पण तुमच्याकडची ओटी आम्ही कशी भरणार असे मला म्हणाल्या. तशा कुसुमताई होत्या ग पण त्यासुद्धा मानाची पहिली ओटी भरायला कुचमत होत्या. काय करावे मला सुचेचना. मी मग सुजाताताईंना, आपल्या विहिणबाईंना म्हणालो, “तुम्ही माझ्या लेकीला आईच्या जागीच आहात. तुम्हीच तिची माहेरची मानाची ओटी भरा.”तेव्हा आपली श्रुती उठून उभी राहिली म्हणाली, “थांबा बाबा.” ती सुजाताताई आणि अनिकेतशी काहीतरी बोलत होती. मग ती पुन्हा तिच्या जागी जाऊन बसली. तिथे जमलेल्या सगळ्यांच्या समोर मला आपली लेक काय म्हणाली माहितीय? ती म्हणाली,” बाबा, माझ्या सासूबाई खूपच प्रेमळ आहेत माझ्या आईइतकीच त्यांची माझ्यावर माया आहे पण माझ्या सख्ख्या आईची जागा जर कोणी घेऊ शकत असेल तर ते तुम्ही आहात. आमची आई आम्हाला सोडून गेल्यावर तुम्हीच आमचे बाबा आणि आई दोन्ही झालात. मग आज आईच्या ऐवजी तुम्हीच माझी ओटी भरा बाबा. आणि हो, आमच्या घरातल्या सर्वांना हे मान्य आहे. “

” ती जे काही म्हणतेय ते योग्यच आहे विजयराव, काय हरकत आहे तुम्ही ओटी भरायला? आपण स्त्रीपुरूष समानतेच्या गप्पा मारतो मग पुरुषाला या आनंदापासून का बर वंचित ठेवतो? मला मान्य आहे की स्त्री हे सृजनशीलतेचे प्रतिक आहे. त्यामुळे तिला ओटी भरायचा मान मिळतो. पण मूल जन्माला घालण्यात पुरुषाचाही सहभाग असतोच ना? पुरुषांनी ओटी भरायची प्रथा नाही पण आपण अशी प्रथा पाडायला काय हरकत आहे? विजयराव भरा तुम्ही तुमच्या लेकीची ओटी! “आपल्या श्रुतीचे सासरे असे म्हणाले गं.
आपल्या सुश्रुतने मला हाताला धरून श्रुतीजवळ नेले आणि आज.. आज मी श्रुतीची यथासांग ओटी भरली… तू तेव्हा तिथेच होतीस नं. मला सारखे वाटत होते की तूच माझ्याकडून तिची ओटी भरवून घेत होतीस. आज मी खऱ्या अर्थाने आपल्या श्रुतीची आई झालो. आपल्या लेकीच्या बाळंतपणातही तू असशील नं आसपास? मला खात्री आहे. तू असशीलच… “

  • डॉ. समिधा ययाती गांधी

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular