हलाकीची परिस्थिती आणि चार मुलं,दारिद्रय पाचवीला पुजलेले.वाटेल ते कष्ट उपसायचे,पडेल ते काम करायचे,पोटाला पीळ घालायचा पण पोराला शिकवायचं असा निश्चय करून आबा आणी काकु खूप राबले. आहे त्यातून तीन पोरींची लग्न केली. आता राबायच आणि मिळवायचं ते पोराच्या शिक्षणासाठी.पोरगं शिकत होत.शिकलं सवरलं,इंजिनिअर झालं.आबा आणि काकु आनंदाने भारावून गेलीं. नोकरीच्या शोधात पोरानं पुणं गाठलं,नोकरी मिळाली,शहरात रमल. चार वर्षे झाली आता लग्नाचा विषय सुरू झाला. चांगला शिकला,पगार चांगला हाय.पोरगी बऱ्यापैकी शिकलेली,देखणी मिळाली.कष्टाचं चीज झालं,आता जरा जीवाला विसावा मिळल म्हणून आबा काकू खुश झाली.नवीन चालरीत पावन ,रावळ,भावकीची ओळख झाली.चारसहा महिने गेले आणि पोरानं आईला सांगितले माझ्या पोटाच लै हाल होतंय, बायकोला घेऊन जातो.न्हे बाबा म्हणण्या पलीकडे दुसरा शब्द माऊलीच्या तोंडातून बाहेर पडला नाही.म्हाताम्हातारीचा सुखाचा पहिला बुरुज ढासळला होता.पोरगा,सून छोट्या संसारात रमली.गावाकडं येनजाण हळूहळू कमी झालं. म्हातारीच्या जीवाला घोर लागला.म्हातारी अचानक देवाघरी गेली.आबा हबकून गेला.आधार मोडून पडल्यागत झाला.कसबस दुःख सावरून चार दिवस या पोरीकडे, चार दिवस त्या पोरीकडे असं दिवस काढत राहिला.पण परकी भावना लक्षात आली की परत गाव धरू लागला.एकटाच राहिला.तिकडे पोराच्या संसाराच्या वेलीवर छोटसं फुल उमलल होतं. बायको,नोकरी आणि लहान मूल यातून गावाकडं यायला साहेबाला वेळ मिळेना,आणि इकडे मात्र आबाला वेळ जाता जाईना.जमल तशी भात आमटी करून खात खात दिवस काढू लागला.गावातून फिरून आलो तरी माझं पोट भरतय अस म्हणायचा.चार सहा वर्षे गेली,आबा थकला आणि एक दिवस साहेब येऊन आबाला गाडीत घालून पुण्याला घेऊन गेला.नातवंडे आणि आबा थोडे दिवस रमले.नातू शाळेला गेले की चार भिंती आबाला खायला उठायच्या.चार भिंतीतून आबा गावातील घर,शेती,तिकटी, शिवार,गल्ल्या,नदी,गुरेढोरे सगळं सगळं मनातल्या मनात बघायचा.विचाराने थकला.गावाकडं येन जवळपास बंद झालं.मरण तरी गावात यावं ही आबाची धडपड. पण सेवा करायला वेळ कुणाला आहे हा यक्षप्रश्न.

आबा थकला आणि एक दिवस गेला.पोरानं गावाकडं फोन करून प्रेत घेऊन येत असल्याची माहिती बहिणींना दिली.दोन तीन वर्षे झाली आबा दिसला नाही,आता आला की मड्याचं तोंड बघायचं या विचाराणं पोरी रड रड रडत होत्या.भावकी जमा झाली.आबाला पोहोच केला.गावाकडं संपर्क कमी झाल्याने लोकांना समजावं म्हणून आबाचा भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलेला चकचकीत बोर्ड तयार करून दारात असणाऱ्या झाडाच्या फांदीला कात्या बांधून लावला.येणारे जाणारे बोर्ड बघून साहेबाला भेटायला गेले.बाकी बारा दिवस रजा,पोरांची कॉन्व्हेंट शाळेतील रजा हे सगळं खरतरं फार अवघड वाटत होतं.पण नाईलाज झाला होता.खरतर बारा दिवस दुखवटा पाळायचा वगैरे या गोष्टी साहेबाला आणि साहेबाच्या पत्नीला पण पटेना झालं होतं.कधी बारा दिवस होतील आणि पुणे गाठू अस झालं होतं.पोरांची चुकलेली शाळा,परीक्षा या सगळ्या गोष्टी समोर दिसत होत्या.उत्तरकार्य करण्याचा दिवस उजाडला,विधी झाले,फोटो पुजला,गोड नैवेद्य दाखवला, पाहुणे मंडळी जेवली.दुपारी निघून गेली,बहिणींनी दुपारनंतर भावाचं तोंड गोड करून जड अंतकरणाने पाय घरातून काढला.आईवडील गेले,परत या घरात येणं होईल की नाही हा विचार त्यांना भेडसावत होता.तिकडे नोकरी, मुलांची शाळा समोर दिसत होती .उत्तरकारयाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे साहेबाने गाडीला स्टार्टर मारला.अकरा वाजता पुणे गाठले.
या सगळ्या गडबडीत आबाचा झाडाला टांगलेला डिजिटल बोर्ड काढायचा राहून गेला.आबाचा जीव टांगणीला लागल्या सारखा झाला होता.बारा दिवस शांत असलेला बोर्ड नन्तर मात्र वाऱ्याने फडफड करू लागला .रात्री शांत झाल की बोर्डाचा आवाज लईच वाटायचा.चार दिवस फडफड करणारा बोर्ड शेताला जाणाऱ्या शेतकऱ्याने बघितला.टांगलेल्या आबाला मुक्त करावं म्हणून खुरप्याने दोन्ही कात्याच्या दोऱ्या कापल्या.बोर्ड गुंडाळला आणि आबाच्या घराच्या वळचणीला टाकला.फडफड थांबली,आयुष्यभर प्रेम केलेल्या घराच्या भिंतीलगत आबा शांत झाला,कायमचा दगडागत.
अंबादास देसाई.(नजरेत आलेल,शब्दात उतरण्याचा प्रयत्न)

मुख्यसंपादक