Homeमुक्त- व्यासपीठकृतज्ञता असावी ……

कृतज्ञता असावी ……

कृतज्ञता असावी ……

माझ्या आयुष्यातील लेखनाचं विश्व काही सुंदरच आहे त्या व्यक्तीप्रमाणे जे आपल्या आयुष्यात असण्याने आपल्या आयुष्याला खूप सुंदर अर्थ प्राप्त होतो अगदी तसाच . मग अश्या व्यक्ती आपण नेहमी जपाव्यात. आपल्या आठवणीच्या पानामध्ये ते खूप सुंदर जागा निर्माण करून जातात.

आजच सकाळी मी ऑफिस ला चालत जात असताना माझ्या वडिलांनी प्रेमाने दिलेले माझ्या हातातील घड्याळ कुठे पडले मलाही समजले नाही. कोणीतरी तरी एक व्यक्ती माझ्या मागून धावत येऊन समोर थांबली अन मला म्हणाली ” म्याडम जी आपका वॉच “

तशी मी लगबगीने हाताकडे पाहिलं तर माझं च घड्याळ होत ते. काय बोलू शब्दच नव्हते .

” थँक यु भाई , थ्यान्क यु सो मच ” म्हणत होतेच की ‘ वेलकम ” बोलून तोवर तो लगेच निघून गेला.

माझी सवय तर अल्मोस्ट सर्वाना माहित आहे कॅडबरी देण्याची , सो मी २ कॅडबरी खरेदी करून त्यांना गाठून देऊ केली .

तरीही तो म्हणाला ” म्याडम जी इसकी क्या जरुरत थी ,”

मी म्हणाले ” आपने एक अच्छा काम किया हॆ , आप चाहे तो खुद के पास रख सकते थे, इसे बेच सकते थे पर आपने ऐसे कुछ भी नही किया “

त्याच्या चेहऱ्यावरचा भाव पाहण्यासारखा होता.

त्याने त्या कॅड्बरी घेण्यास प्रथम नकार दिला पण देताना माझा आनंद खूप होता आणि घेताना त्याला ही त्याच्या चेहऱ्यावर ही एक स्माईल आली.

आपल्या अवती भोवती चे वातावरण इतके गढूळ आहे कि कधी कधी वाटत चांगुलपणा राहीलाच नसावा . पण खरच अश्या व्यक्ती भेटल्या ना कि वाटत हा अजूनही माणुसकी आहे.

कृतज्ञता म्हणजे लोकांनी आपल्यावर केलेल्या उपकाराची जाण ठेवून जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा त्याची परतफेड करणे किंवा आभार मानणे. थॅंक यू किंवा आभारी आहे हे शब्द कृतज्ञता व्यक्त करणारे आहे.

आणि

कृतघ्नता म्हणजे आपल्यावर केलेल्या उपकाराची जाण व सत्कृत्य विसरून जाणे, त्याची परतफेड न करणे व उपकारकर्त्याचेच वाईट चिंतणे, म्हणजेच काय तर “ गरज सरो आणि वैद्य मरो”. उपकारकर्त्याची जाण ठेवणारा तो कृतज्ञ आणि न ठेवणारा तो कृतघ्न.

कृतज्ञता ही भावना नसून मनाची अशी अवस्था आहे, ज्या मध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रचंड साठा आहे.

या जगात चांगुलपणा आहे तो कृतज्ञतेमुळेच! कृतज्ञता व्यक्त करणारे लोक नेहमी आनंदी असतात. ते जास्त आशावादी, उत्साही, निश्चयी असतात इतकंच नाही तर त्यांचं एकूण मानसिक आरोग्यही उच्च प्रतीचं असतं.

कृतज्ञता बाळगली की सकारात्मता वाढते. समस्यांना तोंड देतांना मन सकारात्मक असेल तर विधायक उपाय सुचतात. कृतज्ञतेच्या जाणिवेमुळे किती तरी नकारात्मक विचारांवर- भावनांवर सहज मात करता येते.

जीवन जगत असतांना पदोपदी आपल्याला इतरांची मदत मिळत असते. त्यामुळे कृतज्ञता हा आपला अंतर्भूत गुण व्हायला पाहिजे. जन्मापासून तर मृत्यूपर्यंत आपल्याला इतरांची मदत मिळत असते जसे की बालपणी आईवडील, विद्यार्थीदशेत शिक्षक, तरुणपणी पतिपत्नी, मित्रमंडळ, म्हातारपणी आपली मुलेबाळे, समाज तसेच आपल्याला सदैव मदत करणारा निसर्ग यांच्या सर्वांच्या सहकार्यानेच तर आपण आपले संपूर्ण आयुष्य यशस्वीपणे जगत असतो. ज्या सृष्टीने, निसर्गाने, ईश्वराने आपल्याला जन्म देऊन पालन पोषण केले त्याच्याप्रती अर्पणभाव , कृतज्ञता आपल्याला व्यक्त करता आली पाहिजे.

कधीकधी भुकेच्यावेळी आपल्या टिफीनमधून दोन घास आपल्याला कोणीतरी खायला देतो, बसमधील गर्दीत आपण स्वत: उभे राहून आपल्याला बसायला जागा देते, मोलकरीण कपडे धुवून देते, पत्नी तुमच्यासाठी स्वयंपाक करते, तब्येत बिघडली की डॉक्टर उपचार करतात व परिचारिका रुग्णांची शुश्रूषा करतात, देशाचे जवान अहोरात्र डोळ्यात तेल घालून आपल्या देशाचे संरक्षण करतात त्यामुळे आपण सुरक्षित राहतो असे कितीतरी उदाहरण आपल्याला देता येईल जिथे आपण कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे.

आयुष्यातल्या वाटचालीत वेगवेगळ्या वळणावर ज्यांनी आपल्याला साथ दिली त्यांचे विस्मरण होणार नाही याची खबरदारी आपण सदैव घेतली पाहिजे. रोज रात्री झोपताना पाच मिनिट तरी, आज दिवसभर ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांचे आभार मानले व ज्यांनी दिवसभरात आपल्याला त्रास दिला त्यांना क्षमा केली की मनाला भरपूर शांतता लाभते व गाढ झोप लागते. आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आवर्जून वेळ काढला पाहिजे कारण आपण आभार मानत गेलो व कृतज्ञता व्यक्त करत गेलो की आपल्यात करुणा भाव निर्माण होतात व आपला अहंकार गळून पडतो.

एकमेकांबद्दल कृतज्ञेची भावना मूळ धरू लागली की नाते संबंध दृढ होतात. अध्यात्मामध्ये असे म्हणतात की जे साधक नेहमी कृतज्ञतेच्या व समर्पणच्या भावात असतात , ते ईश्वराच्या सदैव जवळ असतात.

संस्कृत मधील श्लोक सांगतो, ‘जीवने यावद् आदानम्- स्यात् प्रदानं ततोऽधिकम्’ म्हणजेच आपल्याला जे मिळतं त्यापेक्षा जास्त देण्याची वृत्ती आपल्यात यायला पाहिजे.

दुसर्‍यांना जास्त देण्याची वृती ही ते कृतज्ञतेच्या भावनेतून निर्माण होत असते. आयुष्यात मिळालेली प्रत्येक गोष्ट ही ईश्वराचा आशीर्वाद आहे, आपण या जगात काहीच घेऊन येत नाही आणि जातांनाही काहीच नेऊ शकत नाही, हे जेव्हा आपल्याला कळते तेव्हा माणसाला समाधानाची, तृप्तीचा ढेकर येतो. तुमच्यापाशी जे काही आहे त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहिलात, तर तुम्हाला अधिक मिळते; पण तुम्ही जर स्वत:कडे जे नाही त्याकडेच स्वत:च लक्ष केन्द्रित केलत , तर कोणतीही गोष्ट तुम्हाला कधीच पूर्णत्वाची भावना निर्माण होऊ देणार नाही. म्हणुन प्रत्येक माणसानं, आपल्याला मिळालेल्या वरदानांना आठवुन, रोज न चुकता, मनापासुन भगवंताप्रती कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे आणि भगवंताचे श्रद्धापूर्वक आभार मानायला पाहिजे. आयुष्याच्या प्रवासात थांबून थांबून कृतज्ञतेच्या फुलांचा सुगंध आपण अनुभवायला पाहिजे, तेंव्हाच आपले जीवन सुखकर होत असते.

माझ्या लायब्ररी च्या नीलम म्याडम यांनी ही माझ्यासाठी खूप मोलाची साथ दिली . माझ्या लेखन विश्वातील साथीदार असा एक भन्नाट नवीन लेख लवकरच लिहिला जाईल.

माझ्या लेखनवाचकांची मी खूप खूप आभारी आहे , मी वेळात वेळ काढून लिहत असते तर तुम्ही ही वेळात वेळ काढून वाचत असता.

धन्यवाद … !

सौ . रुपाली शिंदे

भादवन (आजरा )

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular