ठाणे अधिकारी किंवा ठाणे अंमलदार.
Station House Officer
ठाणे अंमलदार हा ग्रामीण भागात पोलिस हवालदार दर्जाचा असतो.
तर मुंबई शहरात पोलिस ठाणे अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक किंवा सहा.पोलिस निरिक्षक दर्जाचा अधिकारी काम पाहातो.
या ठाणे अंमलदार,अधिका-यांचे त्या त्या पाळीत (दिवस पाळी/रात्र पाळी) पोलिस ठाण्यातील प्रत्येक घडामोडीवर प्रत्यक्ष नियंत्रण असते. त्यांचे कडे ठाणे दैनंदिनीचा चार्ज असतो.
ठाणेअंमलदार,अधिका-याची प्रमुख कामे
1) दूरध्वनीवरील संभाषण.
ठाणे अंमलदार यासं जवळ जवळ सर्व फोन घ्यावे लागतात.
अश्या वेळी फोन वर बोलतांना त्याने. आदरपूर्वक व विनम्र भाषेत बोलावे. आपले बोलणे मुद्देसुद आणि आटोपशिर असावे.
आणि अतिशय महत्वाचे.
बोलण्यात एकेरी जसे (तू,तुझ्या,तुला,त्याला)शब्द वापरू नयेत.
कारण?
या देशातील प्रत्येक व्यक्ती भारतीय संविधानानुसार सन्माननीय आहे. आपले बोलणे स्पष्ट असावे.
वरिष्ठ अधिकारी किंवा ठाणे प्रभारी अधिका-यासांठी फोन असल्यास विनाविलंब तो त्यांना द्यावा.
2) पोलिस ठाण्यात येणा-या लोकांशी सौजन्याने वागावे. त्यांच्या तक्रारीची त्वरीत दखल घ्यावी.त्यांना उगाच ताटकळत ठेवू नये.
3) तक्रार देणा-या व्यक्तीच्या तक्रारींवर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक असल्यास ती ताबडतोब करावी. किंवा तशी कारवाई करणा-या संबंधितांना आदेश द्यावेत (लक्षात असूद्या ठाणे अंमलदार हे महत्वाचे पद असून त्याचेवर कायदेशीर जबाबदारी स्थापित आहे.) कायदेशीर कारवाई शक्य नसलेस (दिवाणी किंवा अदखलपात्र गुन्ह्यात) तसे त्यांना स्पष्ट मार्गदर्शन करावे.
4)फिर्यादी जखमी असेल तर त्यास तात्काळ औषधोपचारासाठी सरकारी रूग्णालयात पाठवावे. जर जखमी बरोबर जाणे आवश्यक असेल तर स्वतः रूग्णालयात जावे. व त्याचा जबाब नोंदवावा तसेच वैद्यकीय अधिका-यांकडून त्याच्या जखमांची सविस्तर माहीती घेऊन कारवाई करावी.
5)आकस्मात मृत्यूच्या बाबतीत ताबडतोब इन्क्वेस्ट पंचनामा करून प्रेत पोस्ट मार्टेमसाठी पाठवावे.व प्रेताची हेळसांड होणार नाही किंवा संबंधितांच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी.
6) पोलिस ठाण्याचे कार्यालयीन व्यवस्थापन पोलिस ठाण्याची व्यवस्था नीटनेटकी ठेवणे हे ठाणे अंमलदाराचे प्रथम कर्तव्य आहे. सर्व कर्मचा-याशी सौजन्य व समतेची वागणूक ठेवावी.कुणाशीही भेदभाव करू नये. गैरहजर व्यक्तीबाबत ठाणे दैनंदिनीत नोंद घ्यावी.
7) महत्वाच्या घडामोडी. गंभीर गुन्हे व विशेष घटना बाबतची माहीती त्वरीत वरिष्ठांना कळवावी.
8)हरवलेल्या व्यक्तीच्या किंवा मुलांच्या बाबतीत नातेवाईकांना सौजन्यपूर्वक वागणूक देऊन तपासकार्य त्वरीत सुरू करावे.
9) स्त्री फिर्यादी यांचेशी सौजन्यपूर्वक वागणूक करावी. त्यांच्या तक्रारींची किंवा गा-हाण्यांची स्त्री पोलिस अंमलदार यांचे कडूनच चौकशी करावी.
10) लाॅक-अपची तपासणी करून अटक इसमाच्या सुविधेकडे व स्वास्थाकडे (आजारी असल्यास) लक्ष पुरवावे.
त्याचप्रमाणे ठाणे अंमलदारांस भारतीय दंड संहिता,फौजदारी दंड प्रक्रिया संहिता,महाराष्ट्र पोलिस कायदा,संपूर्ण भौगोलिक व प्रशासकीय बाबी,पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनक्षम स्थळे,गुन्हेगार इ.ज्ञान असणे आवश्यक आहे.
पोलिस ठाणे अंमलदाराच्या अंगी सौजन्य,निःपक्षपातीपणा,कायद्याचे ज्ञान,निर्णयक्षमता,कडक शिस्त,वक्तशिरपणा हे गुण असणे आवश्यक आहेत.तसेच त्याचा गणवेष नेहमी स्वच्छ व नीटनेटका असावा.
तो एक आदर्श पोलिस अंमलदार म्हणून जनतेपूढे असावा.
(सदरची माहीती आपल्या परिचित प्रत्येक ठाणे अंमलदार म्हणून काम करून राहीलेल्या सहका-यांना वितरित करणेची विनंती आहे.)
मुख्यसंपादक