बघता बघता बालपण पुढे सरकते व माणूस तरूण, प्रौढ होतो. काळाच्या ओघात ते रम्य बालपण, बालपणाचे ते निरागसपण हळूहळू कमी कमी होत जाते व शेवटी तर ते नष्टच होते. बालपण निरागस असते कारण बालमनाच्या भावना निरागस असतात, मृदू असतात. याच निरागस, मृदू भावना पुढे काळाच्या ओघात कठोर होतात कारण त्यांना पुढे आयुष्यातील कठोर व्यवहार येऊन चिकटतात. लहानपणीचे देवधर्म व म्हातारपणीचे देवधर्म यातील फरक जर एखाद्या म्हाताऱ्याला कळत नसेल तर तो म्हातारा धन्य होय! एवढेच काय पण भावनांना शब्दरूप देऊन तयार झालेल्या कविता जेंव्हा स्वरबद्ध होतात तेंव्हा त्या कवितांचे रूपांतर संगीतमय गाण्यांत होते. ही भावनाप्रधान गाणी लहानपणी, तरूणपणी मानवी मनाला जेवढी भावतात तेवढी म्हातारपणी भावतात का? या भावनांचे आकर्षण, जोर म्हातारपणी कमी होत असल्याने या भावना वृद्ध मनावर पूर्वीसारख्या प्रभाव टाकत नाहीत. या भावनांच्या बाबतीत मानवी मन म्हातारपणी आकाशातून, हवेतून खाली जमिनीवर येऊन निवांत बसलेले असते. हा काळाचा महिमा असतो.
वेळ म्हणजे क्षण तर काळ म्हणजे अशा अनेक क्षणांचा मोठा गठ्ठा! वेळ ही काळाची गुलाम असते. ती कायम काळाच्या बंधनात असते. काळ हा वेळेला जोरात पुढे ढकलत असतो. पण स्वतःच्या मस्तीत धुंद असलेल्या वेळेला काळाचा हा जोर कळत नाही. वृध्दापकाळी वेळ महत्त्वाची नसते, काळ महत्त्वाचा असतो. म्हातारपणी एका क्षणात कधी दिवसाची रात्र होते व रात्रीचा दिवस होतो हे कळत नाही. या काळात काळाचा जोर मोठा असतो. याचे एक कारण असे की, म्हाताऱ्या माणसाच्या डोक्यात एवढा इतिहास, एवढया आठवणी, एवढी मोठी माहिती व एवढे परिपक्व ज्ञान भरलेले असते की त्या साठ्यातील एकेक गोष्ट जरी आठवत बसले तरी दिवस व रात्रीची वेळ कधी संपली व काळाने पटकन कसे गोल फिरवले हे त्या वृद्ध माणसाला कळतच नाही. दिवस व रात्र या वेळेचे प्रतिनिधित्व करतात, तर वर्ष हे काळाचे प्रतिनिधित्व करते. पृथ्वीवर रात्रंदिवसाची वेळ आहे, पण पृथ्वीवरील ही वेळ काळ सूर्याच्या बंधनात आहे.
माणसे जगण्यासाठी धडपडतात व स्वतःचा मोठेपणा गाजवण्यासाठी नाना उचापती करीत राहतात. यात दुसऱ्या माणसांपुढे भाव खात रूबाबात जगण्याचा प्रकार असतो. या कर्तुत्व स्पर्धेत भाग घेऊन कुस्त्या खेळा, कुस्त्या जिंका नाहीतर दुसऱ्यांच्या कुस्त्या बघत प्रेक्षक बनून टाळ्या वाजवत बसा असाच काहीसा तो प्रकार असतो. जगण्यात थोडी गंमत आणण्याचाच तो प्रकार असतो. यात चुकीचे काही नाही! पण पैलवानांनी प्रेक्षकांना एकदम तुच्छ समजू नये. कुस्त्या बघायला प्रेक्षकच नसतील तर मग या कुस्त्या कोणापुढे खेळणार आणि भाव तरी कोणापुढे खाणार? या पैलवानांची वेळही संपत येते व काळ त्यांना खायला उठतो. म्हातारे सिंह व म्हातारे पैलवान यांची गत वृध्दापकाळी एक होते. कर्तुत्व स्पर्धेत भाग घेणारी तरूण मंडळी ही तरूण पैलवानांसारखी असतात. त्यांना वेळ महत्वाची असते. पण म्हाताऱ्यांना काळ हाच महत्त्वाचा असतो. कारण त्यांची वेळ काळाच्या ओघात निघून गेलेली असते. तरूणांनी वेळेचे भान ठेवावे व म्हाताऱ्यांनी काळाचे महात्म्य ओळखावे! काही म्हातारे मात्र काळाच्या पुढे असल्यासारखे वागतात याचे मला आश्चर्य वाटते.
- ॲड.बी.एस.मोरे©
मुख्यसंपादक